Top Post Ad

अत्त दीपो भव’ -‘ स्वयंप्रकाशित व्हा’ एक प्रेरणादायी विचार

 ‘

                                                                           प्रा.डॉ.सुभाष वाघमारे 

                                      प्र-संचालक ,भाषा मंडळ ,कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ ,सातारा 

------------------------------------------------------------------------------------------------------------

 अत्त दीप भव म्हणजे आपण स्वतः दीप व्हा ! म्हणजे स्वतःचा प्रकाश स्वतः व्हा. ‘स्वयंप्रकाशित व्हा’ तथागत गौतम बुद्ध यांचा हा प्रेरणादायी संदेश सकल मानव समाजाला हितकारी असा आहे. जन्मापासून ते मरण येईपर्यंतचा जो काळ असतो त्याला आपण जीवन असे म्हणतो. हे जीवन सुखासमाधानाने जगावे असे जगातील प्रत्येक व्यक्तीस वाटते. पण हे जीवन अनेक दुःखांनी भरलेले आहे. सुख पाहता जवापाडे दुःख पर्वताएवढे असे विचार सांगून सज्जन संतांनी जीवनाचे वास्तव दर्शन घडवले आहे. बुद्धांनी जी चार आर्य सत्ये सांगितली त्यात,जगात दुःख आहे,दुःखाला कारण तृष्णा आहे,आपण दुःख दूर करू शकतो ,अष्टांग मार्ग हा दुःख निवारण करण्याचा मार्ग आहे हे विचार सांगितले. जीवनाचे यथार्थ ज्ञान प्रत्येक व्यक्तीने करून घेतले पाहिजे असे तथागत गौतम बुद्धांचे मत होते.. मनुष्यच आपले दुःख स्वतः निवारण करू शकतो. दुःख दूर करण्यासाठी त्याने सन्मार्ग स्वीकारला पाहिजे. स्वतःचे शील प्रथम चांगले ठेवले पाहिजे.,प्राणी हिंसा करू नये ,खोटे बोलू नये,चोरी करू नये, काम भावनेपासून अलिप्त राहावे ,तसेच दारू ,गांजा अफू इत्यादी अंमली पदार्थापासून दूर राहिले पाहिजे . म्हणजे बुद्धांच्या विचारात शीलवान होणे याला फार महत्व आहे. जगातील प्रत्येक व्यक्तीने प्रथम शील पालन करावे .कोणताही समाज शीलाचे पालन चांगले करत असेल तर तो समाज ,समूह ,कुटुंब हे नक्कीच सर्वाना हितकारी होतो .बहुजनहिताय ,बहुजन सुखाय असे आचरण हे शील पालन केल्यानेच होणार आहे. म्हणूनच स्वत : प्रकाशमान होणे यात शील पालन याला खूप महत्व आहे. शिलाशिवाय ज्ञान उपयुक्त नसते असे डॉ.आंबेडकर यांनी सांगितले आहे. म्हणूनच बुद्धांनी पंचशील पालन यास खूप महत्व दिले आहे. ज्या देशातील लोकांचे शील चांगले नसते ते लोक उन्मादी व स्वैर होण्याची शक्यता असते. म्हणूनच ज्ञान केवळ भौतिक विकास करणारे शिक्षण देण्यासाठी नाही .शील पालन केल्याने समाजात विश्वासार्ह वर्तन होत राहते. शीलाचे पालन न केल्यामुळे आपल्या कोणत्याही समाजात अनेक समस्या निर्माण होतात आणि त्याच दुःख निर्माण करतात. अत्त दीप भव मध्ये शीलवान व सदाचारी व्यक्ती होणे अभिप्रेत आहे. कुणी आशीर्वाद दिल्याने,किंवा कोणत्या गुरूने मंत्र दिल्याने माणूस शीलवान होत नाही. शीलवान होणे म्हणजे काया,वाचा ,व मनाने कोणाचेही वाईट न करणे हे अभिप्रेत आहे. आज जगात अनेक विद्यापीठे आहेत ,पण प्रत्येक विद्यापीठात नीतीशास्त्र हा विषय आहेच. धर्मातून देखील नैतिक शिकवण दिलेली आढळते .यात अहिंसा ,सत्य ,अस्तेय ,ब्रह्मचर्य,अपरिग्रह ,दया ,दान, परोपकार ,समता ,बंधुता ,मानवता ,न्याय ,गुण ग्राहकता,समाज सेवा,पुण्य ,शांती ,क्षमा ,बंधुता ,सहिष्णुता ,स्वातंत्र्य ,सदाचार , विज्ञाननिष्ठा ,अनित्यता इत्यादी मुल्ये ही केवळ बोलण्याचा विषय नाही समाजात हे संस्कार अभिप्रेत आहेत. जीवन सुखमय होण्यासाठी ही आपुलकी शिक्षणातून रुजली पाहिजे. जसा आकाशांत चंद्र पाहिल्यावर मनाला सुख मिळते तसे माणसात सदगुण असतील तर सर्वाना सुख मिळते. म्हणूनच स्वतः मध्ये सदगुण आणण्यासाठी स्वतः प्रयत्न करणे ,दुर्गुनापासून अलिप्त राहणे म्हणजे प्रकाशमान होणे आहे .दुर्गुनाच्या काळोखात माणसाने जगून समाजात अंधार पसरवू नये तर स्वतःच्या परिश्रमाने ,कर्तबगारीने ,सदाचरणाने ,कर्तृत्वाने स्वतः दीपस्तंभ व्हावे आणि अनेकांना मार्गदर्शन करावे .जसे गौतम बुद्धांनी आपल्या आयुष्यात मध्यममार्ग सांगितला .आणि अनेक सदाचरणी लोक तयार केले व चांगल्या समाजाची निर्मिती केली .आज अडीच हजार वर्षानंतरही बुद्ध विचार टवटवीत आणि मंगलदायी असा आहे. अत्त दीप भव’म्हणताना ‘आपण शीलवान व्हा’ हा संदेश त्यात सूचकपणे समाविष्ट आहे. बुद्ध धम्मात नैतिकतेवर अधिक भर देण्यात आला आहे. शील ,समाधी म्हणजे मनाची एकाग्रता आणि प्रज्ञा यांना बुद्ध आपल्या उपदेशात जास्त महत्व देतात. 

बुद्धाने कोणतीही गोष्ट स्वतः अनुभव घेण्यावर भर दिला आहे. प्रत्यक्ष अनुभव काय येतोय त्याचे निरीक्षण बुद्ध करायला लावतात .ईश्वराने सांगितले ,गुरूने सांगितले ,वाडवडिलांनी सांगितले त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवावा असे बुद्धांचे मत नाही .सत्यशोधक व्हावे ,अनुभवाने समजून घ्यावे ,स्वतः चिकित्सा करावी याला बुद्धांनी जास्त महत्व दिले. .मी स्वतः माणूस आहे. मला हे जग समजून घ्यायचे आहे ,हे जग कसे समजून घ्यायचे याचा मार्ग मी शोधून काढला आहे. तुम्ही मी सांगतो म्हणून विश्वास ठेवू नका .योग्य असल्यास ते स्वीकारा अशी स्पष्ट भूमिका त्यांची आहे.म्हणून बुद्ध बुवा नाही ,तो वैज्ञानिक आहे. तो ईश्वर नाही ,प्रेषित नाही ,देवदूत नाही ,तर माणूस आहे. आणि माणसाला सुख कसे मिळू शकते याची मांडणी त्यांनी केली. त्यामुळे जगातील पहिला मनाचा शोध घेणारा अभ्यासक बुद्ध आहे. त्यांची मते आजही आधुनिक मानसशास्त्र स्वीकारते . बुद्ध कधी ‘मी सांगितले तेच अंतिम सत्य’असा दावा करीत नाहीत. मला जेवढे समजले तेवढे सांगितले .मी सांगितले ते प्रमाण मानावे असे नाही तुम्ही स्वतः शोध घ्या असेबुद्ध सांगतात म्हणूनच अत्त दीप भव मध्ये ‘स्वतः संशोधक व्हा’ असा अर्थ अध्याहृत आहे  

दुसऱ्याकडून अपेक्षा न ठेवता स्वतःचा प्रकाश (प्रेरणा) व्हा. स्वत: प्रबुद्ध व्हा, असे ऐकिवात आहे की तथागत बुद्धांना त्यांचे आवडते शिष्य आनंद यांनी विचारले की, जेव्हा तुम्ही किंवा तुमच्यासारखे कोणीही सत्याचा मार्ग दाखवण्यासाठी पृथ्वीवर नसाल, तेव्हा आम्ही आमच्या जीवनाला दिशा कशी देऊ शकू? तर भगवान बुद्धांनी हे उत्तर दिले - “अत्त दीपो भव” म्हणजे स्वत: दीपक व्हा .कोणीही कोणाचाही मार्ग सदैव चोखाळू शकत नाही, ज्ञानाच्या प्रकाशानेच आपण सत्याच्या मार्गावर पुढे जाऊ शकतो. भगवान बुद्ध म्हणाले, आज मी तुझ्या सोबत आहे, उद्या मी तुझ्या सोबत नसेन, मग तुला स्वतःच्या पायावर चालायचे आहे. आपला प्रकाश तयार करा. बुद्ध स्व कर्तुत्वाला, कल्पकतेला .महत्व देतात. म्हणूनच ‘सर्जनशील व्हा,विचारी व्हा ’हा देखील संदेश त्यांच्या विचारात आहे. स्व विषयक ज्ञान ,सृष्टी विज्ञान ,स्वभाव विज्ञान ,जगाचे ज्ञान जाणून घेण्याचा विचार अत्त दीप भव मध्ये आहे. प्रज्ञावान होणे म्हणजे सत्याचे ज्ञान अनुभवाने करून घेणे हे स्वतः प्रकाशमान होणे आहे. ‘प्रज्ञावान व्हा’ हा विचार अत्त दीप भव मध्ये आहे. 

   शील ,समाधी ,प्रज्ञा यांच्या सहाय्याने आणि अष्टांग मार्ग आचरणातून जो मध्यम मार्ग त्यांनी जाणून घेतला तो मार्ग घेऊन त्यांनी त्याचा व्यापार केला नाही . ज्ञानी माणूस घडविण्याचा विचार त्यांच्या मनात आला .मला जे ज्ञान झाले ते व ज्या मार्गाने मिळाले ते इतरांना कळायला हवे हे कोणाला सांगावे ? हे जिज्ञासू व्यक्तीस सांगावे म्हणून त्यांनी सारनाथ येथे प्रथम पाच जणांना हा विचार समजावून सांगितला. बोधिसत्व ते सम्यक समबुद्ध होण्याचा हा प्रवास ,मार्ग इतरांचे कल्याण व्हावे म्हणून सांगणे हे देखील महान कार्य आहे. ज्ञान लपवून ठेवण्यासाठी नाही ,समाजाचे हित करण्यासाठी आहे.. समाजात महान म्हणवून घेण्यासाठी ज्ञानी असल्याची मिजास दाखवणे व त्यातून अनेकांचे शोषण करणे हे बुद्धाना अभिप्रेत नाही. समाजाच्या हितासाठी आपल्या ज्ञानाचा उपयोग करणे हे देखील अत्त दीप भव मध्ये अभिप्रेत आहे. अंधश्रद्धेचा अंधार दान करून नका .ज्ञानाचा प्रकाश देऊन ज्ञानमयी अनेक तारे तयार करायला हवेत हे अभिप्रेत आहे. अत्त दीप भव याचा अन्वयार्थ स्वयंप्रकाशित व्हा असा असला तरी त्यात दानशूर व्हा ,चिंतनशील व्हा ,शोधक व्हा ,संस्कारित व्हा ,उपकारक व्हा ,समतावादी व्हा ,डोळस व्हा ,स्वावलंबी व्हा ,तर्क सुसंगत विचार करा ,संघटक व्हा ,हितासाठी पर्यटक व्हा,अनित्य बोध ज्ञानी व्हा ,करुणाशील व्हा,वाणीचा सदुपयोग करा,मार्गदर्शक व्हा ,नेतृत्व करा ,जागरूक व्हा, कुशल कर्म करा ,सर्वांचे मंगल करा ,विनम्र व्हा ,शीलवान व्हा ,इंद्रियावर नियंत्रण ठेवा, स्थिरचित्त व्हा ,कर्तव्य वेळेत आणि योग्य करा ,संयमी व्हा ,निर्दोष व्हा ,अहिंसक व्हा ,शांती दूत व्हा ,न्यायी व्हा ,मैत्री भावना बाळगा ,उत्साही रहा ,स्वच्छ रहा , निरंतर प्रयत्नशील रहा ,सावध चित्त रहा ,विमुक्त व्हा ,क्षमाशील व्हा ,सुखी व्हा ,निर्लोभी व्हा ,निर्वाण प्राप्त कर्ते व्हा ,मितभाषी व्हा ,अष्टांग मार्ग पाळणारे व्हा ,आधुनिक व्हा ,कुशल कर्मे करणारे व्हा ,चिकित्सक व्हा ,विश्लेषक व्हा,विज्ञाननिष्ठ व्हा ,अप्रमादी व्हा ,सुज्ञ व्हा,विविध विद्येत प्रवीण व्हा ,विशेषज्ञ व्हा ,मार्गदर्शक व्हा ,उन्नत व्हा ,दोषमुक्त व्हा ,आदर्श व्यावसायिक व्हा ,निर्भय व्हा ,सदाचरणी व्हा ,निष्कलंक व्हा, स्व हा स्व चा स्वामी आहे ,स्व शिवाय आणखी कोण असू शकतो ? स्व संयत व स्व नियंत्रित असेल तर त्यास दुर्लभ स्वामित्वाची उपलब्धी होते. स्वहित दक्ष व्हा ,सुज्ञ व्हा ,न्यायी व्हा आणि सुसंगत व्हा ,धम्मधर व्ह्वा,स्व संरक्षक व्हा ,पुण्यकर्मी व्हा गहन ,गंभीर व्हा ,नेमस्त व सच्छील व्हा ,आदरणीय व्हा ,कर्तव्य परायन ,श्रेष्ठ धम्म प्रवण व्हा , धैर्यवान व दूरदर्शी व्हा ,विवेकशील व्हा ,क्रोधमुक्त व्हा ,सम्यक व्हा अशी अत्त दीप भव या बोधवाक्यातून अर्थांची अनेक वलये तयार होतात .जी चांगला माणूस घडवण्यासाठी बुद्ध संदेश म्हणून बोधवाक्यात ध्वनित झाली आहेत. सूर्याच्या प्रकाशाने जशी सारी सृष्टी उजळून निघते तसे ज्ञानाचे सामर्थ्य आपण स्वतःत तयार करावे जेणे करून बहुजन हित ,बहुजन कल्याण होईल .अंधार आणि प्रकाश या दोन प्रतिमा पूर्वी ज्ञान क्षेत्रात वापरण्यात आल्या. त्यात अंधारापेक्षा प्रकाशमान होण्याची अपेक्षा सर्व मार्गदर्शकांनी केली .अंधार हे अज्ञानाचे प्रतिक बनले तर प्रकाश हे ज्ञानाचे प्रतिक बनले .म्हणूनच माणसाचा प्रवास तमसो मा ज्योतिर्गमय असा व्हावा अशी आकांक्षा जगाच्या सर्व धर्म ग्रंथात केलेली दिसते. अज्ञानात सुख असते हा आळसी स्थितिवादी माणसाचा सिद्धांत असू शकतो ,पण ज्याला प्रगती करायची आहे त्याने नेहमी ज्ञानप्रकाशबीजे स्वतःत निर्माण करायची असतात. यथार्थ समजून घेऊन स्वहित व सार्वजनिक हित करण्याचे विधायक ध्येय त्याच्या मनात असावे लागते. अत्त दीप भव चा अर्थ हा असा स्वतःला सक्षम करण्याचा आहे. कर्तबगार होऊन मैत्री भावनेने इतरांना देखील कर्तबगार बनवण्याचा आहे. कोणत्याही अलौकिक ईश्वरावर विसंबून राहून ईश्वराची इच्छा आहे तसेच होईल अशी ईश्वर शरणता यात नाही .जे काही करायचे ते स्वतः करायचे आहे. स्वतः शोधायचे आहे. स्वतः निर्माण करायचे आहे. माणसाच्या सर्जनशील विधायक कार्यावर विश्वास ठेवणारा हा विचार आहे. जन्माच्या अगोदर काय झाले आणि मृत्युच्या नंतर काय होईल निरर्थक विचार न करता कोणत्याही काळात जीवनात योग्य मार्ग स्वतः शोधू आणि स्वतः सुखी होऊन इतरांना सुखी करू हा साधा सोपा पण कर्तव्य करावयास लावणारा हा विचार अत्त दीप भव मध्ये आहे. म्हणूनच खूप कमी शब्दात जगाच्या हिताचा विचार यात आला आहे. देव, आत्मा, स्वर्ग, नरक, मरणोत्तर जीवन या नुसत्या कल्पनेत जीवन जगण्यात अर्थ नाही. भगवान बुद्ध हे जगाच्या इतिहासात धम्माचे एकमेव उपदेशक आहेत जे तर्क आणि विज्ञान ,यथार्थ ज्ञान यांना महत्व दिले आहे. कुठल्यातरी धार्मिक पुस्तकात लिहिलेले आहे म्हणूनही ते स्वीकारू नका. ती केवळ प्राचीन परंपरा आहे म्हणून स्वीकारू नका. कोणतीही गोष्ट स्वीकारण्यापूर्वी तुमच्या तर्काची चाचणी घ्या. बरोबर असेल तर पाळा, नाहीतर सोडून द्या.भगवान बुद्धांसारखे स्वातंत्र्य इतर कोणत्याही धर्माने दिलेले नाही. लोकांना शरण येण्यासाठी ,गुलाम होण्यासाठी शिक्षण नसते. भगवान बुद्धांनी स्वतःला मार्गदर्शक म्हटले आहे आणि स्वतःला कधीही विशेष दर्जा दिला नाही.अशा प्रकारे भगवान बुद्धांचा एकच संदेश आहे की "अत्त दीप भव" म्हणजे स्वयंप्रकाशित व्हा ! विचार करण्याचे माणसाचे स्वातंत्र्य हे अत्त दीप भव मध्ये आहे. पृथ्वीतलावर सर्वकाळात प्रकाश देणारा हा विचार माणसाचे अस्तित्वाला योग्य अर्थ देतो आणि बहुजन हिताय काम करण्याची प्रेरणा देतो . अत्त दीप भव हे कोणाची एकट्याची संपत्ती नाही ,कोणाचे एकट्याचे पेटंट नाही, स्वार्थी आणि कंजूष माणसाची तिजोरी नाही ते जगातील अखिल मानवतेच्या कल्याणाचा हा विचार माणसाचा जगण्याचा नुसता उत्साहच वाढवत नाही तर सम्यक जीवनमार्ग आहे. विचार करणाऱ्या माणसाला करुणाशील ,शीलवान व प्रज्ञावान करणारा हा विचार आहे. कर्मवीर भाऊराव पाटील याच प्रकारचा मार्ग बहुजन हितासाठी सांगितला .बहुजनांचे हितासाठी रयत शिक्षण संस्था सुरु केली. स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद झाले. ते स्वतः सत्यशोधक होते. स्वतःवर त्यांचा प्रचंड विश्वास होता. बुद्धाने जसा बहुजन हितकारी मार्ग जगाला सांगण्यासाठी संघ तयार केला तसे कर्मवीर अण्णांनी रयत सेवक निर्माण केले. श्रमाला महत्व दिले .मन ,मनगट आणि मेंदूच्या विकासाला महत्व दिले. शिक्षण देण्याचा विचार हा प्रकाशमान होण्याचा विचार दिला . स्वतः गंभीर आजारी होते तरी त्यांची विधायक कृती करण्याची आकांक्षा मरेपर्यंत होती. कर्मवीर स्वतः स्वयंदीप झाले आणि त्यांनी जगाला ज्ञानप्रकाश दिला. नुसता विचार मनात घोळत ठेवून चालत नाही विचार कृतीत आणून रयत शिक्षण संस्थेची वाटचाल झाली आहे..कर्मवीरांचे जीवन आणि मूल्यवान विचार हेच मला अत्त दीप भव मध्ये दिसते. आज कर्मवीर भाऊराव विद्यापीठाने ‘ अत्त दीप भव’ हे बोधवाक्य स्वीकारले आहे. हा हितकारी निर्णय माणसाला सम्यक विकास करण्यास प्रेरणा देईल हा मला विश्वास आहे. येणाऱ्या पिढ्या स्वतः आत्मविश्वासू होतील आणि शिक्षण घेऊन जग प्रकाशमान करतील . अत्त दीप भवं सर्वकाळ नित्यनूतन असा सम्यक प्रेरणादायी विचार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com