Top Post Ad

क्रिकेटचा जल्लोष आणि आझाद मैदानातला अंधार...


मी
हे लिहिणार नव्हतो. हे लिहिल्याने लोक शिव्या घालतील, नतद्रष्ट, विघ्नसंतोषीही म्हणतील. पण क्रिकेट टीमच्या विजयाचा मुंबईत इतका जल्लोष करण्याचे काहीच कारण नव्हते. मुळात टी-२० हे खरे क्रिकेट आहे का, हाच प्रश्न आहे. त्यातली एक स्पर्धा आपण जिंकल्याचा इतका जल्लोष होतोय, याचा अर्थ पराभव झाला असता तर याच लोकांनी आपल्या टीमची सालपटे काढली असती. याचे कारण आपल्याकडे खरीखुरी खिलाडू वृत्ती नाही. आपल्या विजयाची अशी दौलतजादा करून घ्यायला खरे तर खेळाडूंनीच नकार द्यायला हवा होता. राजकीय लोकांना प्रत्येक गोष्टीचे म्हणजे अगदी मृत्यूंचे आणि अंत्ययात्रांचेही भांडवल करायचे असते. खेळाडूंनी त्यांच्या कच्छपि कशासाठी लागावे?

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने या विजेत्या संघावर जी कोट्यवधी रुपयांची खैरात केली आहे, ती तर शिसारी आणणारी आहे.
तुमच्याकडे जो पैसा आहे, तो मूलभूत सोयीसुविधा वाढविण्यासाठी, नवी क्रीडांगणे बांधण्यासाठी वापरा ना..
केवळ एक स्पर्धा जिंकली म्हणून इतके पैसे कशासाठी वाटायचे.. ही अंगावर येणारी कुरूपता आहे.
रोहित शर्मा, विराट कोहली हे मोठे खेळाडू आहेत. त्यांचा खेळ खरोखर लाजबाब असतो. सूर्यकुमार यादवने घेतलेला झेल ‘कॅचेस विन द मॅचेस’ या उक्तीचे स्मरण करून देणारा होता.
पण या साऱ्यांनाही अजीर्ण होईल, इतके कौतुक करू नका. या खेळाडूंच्या अशा यात्रा-जत्रा भरवू नका. त्यांचे पाय जमिनीवर राहू देत. शिवाय, देशात अत्यंत उत्तम कामगिरी करणारे अनेक खेळांमधले उगवते खेळाडू आहेत. त्यांच्यावर या अफाट प्रसिद्धीचे ओझे येते. त्यांना त्यांची निवड चुकली आहे की काय, अशी शंका येते कधी कधी. क्रिकेटला इतके डोक्यावर बसविणे योग्य नाही...
आता वेगळाच मुद्दा. मुंबईच्या अनेक भागांमध्ये क्रिकेटचा असा ज्वर चढलेला असताना तिकडे ‘आझाद मैदाना’त राज्यभरातून जमलेले, न्याय मागणारे शेकडो-काही हजार गरीब कष्टकरी एकाकी आवाज उठवत होते.
मी गुरुवारी एक तासापेक्षा जास्त वेळ या निदर्शकांच्या सभांमध्ये, मांडवांमध्ये, निदर्शनांमध्ये फिरलो; तेव्हा त्यातील काहींची परिस्थिती पाहून डोळ्यांत पाणी येत होते.
काही अधिकाऱ्यांनी सांगितले की निदर्शनांचे ७२ परवाने वाटले आहेत. याचा अर्थ, विधिमंडळाच्या अधिवेशनात आपला आवाज ऐकला जाईल, या आशेने ७२ गट, संघटना, संस्था किंवा अनेक एकांड्या व्यक्तीही तेथे आल्या होत्या. यातही राजकारण नसते असे नाही.
पण यातली अंगणवाडी सेविका, कोतवाल, स्पर्धा परीक्षांमध्ये अन्याय झालेली मुले, जमिनी गेलेले भूमिहीन, आदिवासी, महिलांचे बचत गट ही सगळी समाजाची ‘सीमान्त’ मंडळी असतात. त्यातल्या अनेकांना आझाद मैदानाच्या आसपास खाण्यासाठी पन्नासाची नोट मोडायची तर दहादा विचार करावा लागतो. असे हे गट घोषणा देत होते. कुणाचे नेते आक्रमक भाषणे ठोकत होते. एखादा उपोषणवीर खंगल्या डोळ्यांनी आपल्या बॅनरच्या सावलीत डोके निववत होता. हा असा महाराष्ट्र मुंबईत आज धडका देतो आहे, असे नाही.
मी मुंबईत आल्यापासून गेली ३४ वर्षे हे दृश्य पाहतो आहे...
पण आता सरकारने या साऱ्या निदर्शकांना, न्याय मागणाऱ्यांनाही कोपऱ्यात ढकलून दिले आहे. मंत्रालयावर यायचे नाही. चर्चगेटलाही यायचे नाही. हुतात्मा स्मारकापाशी मोर्चा न्यायचा नाही. तुम्ही तिकडे आझाद मैदानात बसा. तिथे येतील मंत्री किंवा अधिकारी. यावेळी किती आले?
एका तंबूत मला फक्त सुषमा अंधारे दुरून दिसत होत्या. मेट्रोने आझाद मैदानाचा बराच हिस्सा व्यापल्याने तर आता सारे निदर्शक आणखी आत कोपच्यात ढकलले गेले आहेत. तिथवर कुणी सामान्य मुंबईकर जाणारही नाही. तसेही, हजारो-लाखो मुंबईकर या निदर्शकांच्या, उपोषकांच्या अंगावरून रोज ये-जा करीत असतात. त्यांची खरीखुरी भावंडे जरी या निदर्शकांमध्ये असतील तरी त्यांना तिथे थांबायला वेळ नसतो.
या निदर्शकांना इथे बसावे लागते आणि मंत्रालयापाशी जाता येत नाही, याचे कारण मुंबईचे जनजीवन विस्कळित होते.
मग क्रिकेट विजेत्यांच्या मिरवणुकांमुळे जनजीवन विस्कळित नाही का होत?
रुग्णवाहिका नाही का अडकून पडत?
घरी जाणाऱ्या आयांना नाही का उशीर होत?
हा इतका अमानुष जल्लोष करून आपण काय साधतो आहोत?
आपले सर्वच पक्षांचे नेते नेमके काय सांगत आहेत?
कुणीतरी मला म्हणाले की, आझाद मैदानात राहिलेले निदर्शकही गेले असतील पाहायला ती मिरवणूक. मी म्हणालो, अगदीच शक्य आहे. त्यांना हा जो भव्य खेळ चालू आहे आणि सगळ्या श्रमिकांना एक मूक प्यादे बनवून टाकले आहे; याचा अर्थ तरी कुठून कळणार आणि त्यांना तो समजावणारे आज आहे तरी कोण?
कदाचित, न्याय मागायला आलो आणि त्या भव्य चषकाचे दर्शन घेऊन भरून पावलो; असेही काहींना वाटू शकते.
डाळ खूप खोलवर नासली आहे!
मुंबई प्रत्यक्ष किंवा जगणे ताब्यात घेतलेल्या माध्यमांमधून सारा देश आणि बाहेरचे भारतीयही हा क्रिकेटोत्सव अनुभवत असताना आझाद मैदानातील अंधारात दिवसभर घोषणा देऊन सुकलेल्या घशांच्या-श्रमलेल्या अंगणवाडी सेविका कदाचित ‘उद्या आता गावाकडं जायला पाहिजे. इथं राहून कधी आणि काय मिळणार...’ असं मनाशीच म्हणत असतील.
हे सगळं चित्र अंगावर येणारं आहे. शेवटचा माणूस.. शेवटचा माणूस.. असं नुसतं सगळ्यांनी बोलायचं...
हे इतके आमदार परस्परांच्या कागाळ्या करत आणि आयाबहिणींवरून शिव्या देण्यात धन्यता मानतात.
आझाद मैदानातील या गावोगावच्या श्रमिकांच्या सोबत जाऊन बसावं, ऐकावं, तिथच एक रात्र राहावं... असं किती लोकप्रतिनिधींना वाटत असेल?? किती तसं वागतात??
क्रिकेट महत्त्वाचा खेळ आहे. देशाच्या एकात्मतेत क्रिकेटचा काही एक रोल आहे.
पण क्रिकेटचे रूपांतर आता मादक द्रव्यात केले आहे. ड्रग्ज धुंदी देतात. पैसा देतात. मौज देतात आणि मुख्य म्हणजे सारे वास्तव पुसून टाकतात मेंदूतून.. समाधानाची पांढरी चादर चढवतात तुमच्यावर जिवंतपणीच.. तुमचा मेंदू निश्चल करून..
मग आझाद मैदानातलं वास्तव दिसेल कसं आणि पाहण्याची इच्छा तरी कशी होईल?

- सारंग दर्शने

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com