पहिल्याच मोठ्या पावसात मुंबईची दाणादाण उडाली असून मुंबईच्या अनेक भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. कामावर जाणा-या मुंबईकरांचे आज पुन्हा हाल झाले. मुंबईतील मान्सूनपूर्व काम पूर्ण झाल्याचे बीएमसी व राज्य सरकारचे दावे पहिल्याच पावसात धूवून निघाले. महायुतीचे सरकार हे धादांत खोटे बोलणारे असून नालेसफाईच्या आणि मान्सूनपूर्व कामांत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आणि हलगर्जीपणा करण्यात आल्यानेच मुंबई तंबून मुंबईकरांना नाहक त्रास झाला, असा आरोप मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा, खासदार प्रा. वर्षा गायकवाड यांनी केला.
महायुती सरकार व मुंबई महानगर पालिकेच्या भ्रष्ट कारभाराचा समाचार घेत खासदार प्रा. वर्षा गायकवाड म्हणाल्या की, मुंबई पहिल्याच मोठ्या पावसात अक्षरशः तुंबली, अनेक रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले, शहराच्या अनेक भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने कामाच्या वेळी वाहतूक कोंडी झाली. मिलन सबवे, अंधेरी सबवे, दहिसर सबवे, एलबीएस मार्ग, साकीनाका ९० फूट रोड, माटुंगा, पश्चिम द्रुतगती मार्ग तसेच महालक्ष्मी, दादर, माहीम, धारावी, परळ, शिव, किंग सर्कल, कुर्ला, विद्याविहार, चेंबूर, अंधेरी, मुलुंड, दहिसर या ठिकाणच्या सखल भागांत पाणी मोठ्या प्रमाणात साचून नागरिकांची मोठी गैरसोय झाली.
मुंबईची लाईफलाईन लोकल सेवेचाही बोजवारा उडाला. भांडुप, कांजूरमार्ग, वडाळा, जीटीबी, माटुंगा रोड, दादर, कुर्ला, शिव सारख्या स्थानकांदरम्यान रेल्वे रुळांवर पाणी साचल्यामुळे तिन्ही रेल्वे लाईनवर मोठा परिणाम झाला. रेल्वे प्रशासन व राज्य शासन यांच्यात योग्य समन्वय नसल्याने रेल्वे रुळाचे कॅनल झाले. 'आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास' अशी रेल्वे व्यवस्थापनाची अवस्था आहे. लोकल रेल्वेच्या कारभारावर मा. उच्च न्यायालयानेही मागील आठवड्यात ताशेरे ओढले परंतु रेल्वे व्यवस्थापन गेंड्याचे कातडीचे आहे, त्यांना मुंबईकरांना होत असलेल्या त्रासाबद्दल खेदही वाटत नाही खंतही वाटत नाही. सर्वसामान्यांना जो नाहक त्रास सहन करावा लागत आहे याला जबाबदार कोण? याचे उत्तर राज्य शासन, बीएमसी व रेल्वे प्रशासनाने द्यावे असेही वर्षा गायकवाड म्हणाल्या
0 टिप्पण्या