Top Post Ad

एक दोन जागा पदरात पाडून निवडणुका लढा... कायम काँग्रेसच्या दाराची राखण करा


  बी. बी. सी. मराठी या वाहिनीवर लोकसभा निवडणूकीनंतर बाळासाहेब आंबेडकर यांनी  पहिलीच सविस्तर मुलाखत दिली. मुलाखतकर्त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना बाळासाहेब यांनी थेट उत्तरे दिली आहेत,ती ऐकून एकूणच आंबेडकरी राजकारणाबाबत गंभीर प्रश्न उभे राहिले आहेत. साधारणतः बाळासाहेब आंबेडकर हे राजकारणात १९८४ पासून आहेत. त्यांचे राजकारण प्रस्थापित राजकीय पक्षांच्या (काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना,भाजप इ.) विरोधात राहिले आहे. त्यामुळे त्यांचा फायदा भाजपला होतो, तर कधी काँग्रेस प्रणीत आघाडीला होतो.असं राजकीय विश्लेषक मांडणी करीत असतात. बाळासाहेब आंबेडकर, हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आहेत,त्याचा त्यांनी कधीही स्वतः च्या पदासाठी उपयोग केलेला नाही. हे लक्षात घेणे आवश्यक आहे. रा. सु. गवई, जोगेंद्र कवाडे, रामदास आठवले या सारख्या नेत्यांना हाताशी धरून प्रस्थापित पक्षांनी नेहमीच त्यांना कुठली ना कुठली पदे देऊन आपल्या वळचणीला उभे केलेआहे  मात्र आजअखेर बाळासाहेब आंबेडकर कुणाच्याही हाती लागलेले नाहीत, हेही खरे आहे.

१९९८ साली एकत्रित रिपब्लिकन पक्षाने काँग्रेस सोबत केलेली युती आणि १९९९ मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीचा अपवाद वगळला तर बाळासाहेब आंबेडकर आणि काँग्रेस यांचे सूर कधीही जुळलेले नाहीत. बाळासाहेब यांचा अकोल्यात २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत  सलग पाचव्यांदा  पराभव झाला आहे . त्यामुळे त्यांच्यावर सर्व स्तरातून टीकेची झोड उठविण्यात येत आहे. 

- बाळासाहेब आंबेडकर हे अहंकारी आहेत.त्यांना राजकीय व्यवहार जमत नाही.
- त्यांनी महाविकास आघाडी सोबत जुळवून घ्यायला पहिजे होतं, मिळेल त्या जागा घेऊन स्वतः अकोल्यातून निवडून यायला पाहिजे होतं.
- संविधान आणि लोकशाही धोक्यात असताना त्यांनी स्वतंत्र उमेदवार द्यायला नको होते.
- बाळासाहेब आंबेडकर प्रत्यक्ष,अप्रत्यक्ष भाजपला मदत करणारी भूमिका घेत असतात.
- बाळासाहेब आंबेडकर हे सत्ता मिळविण्यासाठी प्रयत्न करीत नाहीत,वंचितला दिलेली मते वाया जातात.बौद्धांची मते कुजविली जात आहेत.

या सारखे आक्षेप त्यांच्या राजकारणाबाबत घेतले जातात ; किंबहूना त्यांच्यावर सातत्याने टीका केली जाते. बाळासाहेब आंबेडकर आपल्या भाषणांमधून,वेळोवेळी घेतलेल्या पत्रकार परिषदांमधून उत्तरे देत असतात. आंबेडकरी राजकारणाबाबतची भूमिका स्पष्ट करीत असतात.मात्र, वर्षानुवर्षे जोपासलेली काँग्रेसी मानसिकता आंबेडकरी समूहाच्या राजकारणासमोर  मोठे आव्हान असल्याचं,पुन्हा एकदा २०२४ च्या निवडणुकीने दाखवून दिले आहे. बाळासाहेब यांची भूमिका त्यांच्या पचनी पडत नसल्याचे चित्र २०२४ च्या लोकसभा निवडणूकीतही  कायम असल्याचे दिसून येत आहे.

बाळासाहेब आंबेडकर यांचे राजकारण स्वाभिमानाचे आहेच ,त्याबद्दल दुमत नाही.मात्र,ते व्यवहारात उतरत नसल्याने सत्तेपर्यंत पोहचता येत नाही,हा एक ठळक मुद्दा  या निवडणुकीत चर्चिला गेला,त्याची चर्चा या लेखात करण्याचा प्रयत्न आहे. वास्तविक सरकार भाजपचं असो की काँग्रेसचं किंवा अन्य पक्षाचं,प्रत्येक सरकारमध्ये कुणीतरी दलित नेता सत्तेत सहभागी राहिला आहे .रामविलास पासवान,रामदास आठवले यांची उदाहरणे त्यासाठी आपल्याला देता येतील.त्यांनी आपापल्या पद्धतीने राजकारण केले आहे.रामविलास पासवान यांचे व्ही पी सिंग सरकारच्या काळातील काम कुणालाही नाकारता येणार नाही.केंद्रात बौद्धांना सवलती,भारतरत्न, बाबासाहेब यांचे संसदेत तैलचित्र लावणे,यासारखे काँग्रेसने जाणीवपूर्वक दुर्लक्षित केलेले विषय व्ही पी सिंग सरकारच्या काळात मार्गी लागले होते, त्यावेळी बाळासाहेब आंबेडकर राज्यसभेचे खासदार होते. हेही लक्षात घेणे आवश्यक आहे.

बाळासाहेब आंबेडकर यांच्या बाबत चर्चिला जाणार सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे,त्यांना राजकीय व्यवहार जमत नाही.अलीकडे : 'काँग्रेस सापनाथ तर भाजप नागनाथ आहे',अशी घनाघाती टीका बाळासाहेब करताना दिसत आहेत,त्याचा धांडोळा घेतला तर हे दोन्ही पक्ष प्रस्थापित समाजाचं राजकारण करतात,हे तर खरंच आहे.या  निवडणुकीत राहुल गांधी संविधानाची प्रत हातात घेऊन फिरले नसते तर त्यांना काँग्रेसच्या जागा वाढवता आल्या असत्या का,हा प्रश्न पडतो. याचा अर्थ काँग्रेस संविधानवादी आहे, असा होत नाही.एकीकडे संविधान आणि लोकशाही वाचविण्याचा नारा द्यायचा तर दुसरीकडे बाबासाहेब आंबेडकर यांच्या नातवाने काँग्रेसला काही जागांवर पाठींबा देऊनही बाळासाहेब यांच्या विरुद्ध उमेदवार देऊन त्यांना आणि त्यांच्या वंचितांच्या राजकारणाला संपवायचे,बदनाम करायचे,हे उद्योग काँग्रेस पक्ष बाबासाहेब यांच्या हयाती पासून अगदी १९५२,१९५६ या दोन्ही निवडणुकांपासून करीत आला आहे. या बाबत स्वतः ला आंबेडकरवादी म्हणविणारे देखील काँग्रेसला प्रश्न विचारताना दिसत नाहीत.उलटपक्षी बाळासाहेब आंबेडकर यांच्यावरच प्रश्नांची सरबत्ती करताना दिसून येत आहेत. 

एका चॅनेल वरती सुखदेव थोरात यांची मुलाखत ऐकली.सध्या ते कर्नाटक सरकारच्या एका कमेटीवर कार्यरत आहेत, भालचंद्र मुणगेकर यांच्यासारखे तेही काँग्रेसच्या मीठाला पुरेपूर जागत आहेत ; निवडणुका येईपर्यंत सगळे विचारवंत झोपलेले असतात आणि अचानकपणे ते जागे होऊन ऐन निवडणुकीत काँग्रेसची तळी उचलून धरतात,खरं तर हे आंबेडकरी चळवळीला नवीन नाही.  बाळासाहेब आंबेडकर यांचे राजकारण संपविण्यासाठी जे लोक पुढाकार घेत आहेत,त्यात विचारवंतांचाही सहभाग दिसतो आहे.संपलेले रिपब्लिकन नेते पुन्हा नव्याने उभे राहण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर टीका करण्याचा मार्ग स्वीकारताना दिसत आहेत, तर मेलेले पँथर नेहमी प्रमाणे काँग्रेसच्या वळचणीला उभे राहत आहेत, एक दोन जागा पदरात पाडून निवडणुका लढा आणि कायम काँग्रेसच्या दाराची राखण करा,अशी मानसिकता जोपासलेल्या ठराविक लोकांकडून वेगळी काय अपेक्षा असणार? त्यामुळे बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर प्रस्थापित राजकीय पक्षांसारखा स्वकीयांचाही राग असल्याचे चित्र निर्माण केले जात  आहे.बाळासाहेब आंबेडकर यातून मार्ग कसा काढतात,ते येणाऱ्या काळात पहावे लागेल.

दीपध्वज कोसोदे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com