Top Post Ad

*पवई तलाव भरुन वाहू लागला*

 


बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कृत्रिम तलावापैकी एक महत्त्वाचा तलाव असणारा बृहन्मुंबई महानगरपालिकेचा पवई तलाव आज (दिनांक ०८.०७.२०२४) पहाटे ४:४५ वाजताच्या सुमारास पूर्ण भरुन वाहू लागला आहे. ५४५ कोटी लीटर एवढी जलधारण क्षमता असणाऱ्या या तलावाचे पाणी हे मानवाला पिण्यायोग्य नसल्याने प्रामुख्याने औद्योगिक वापरासाठी व आरे दुग्ध वसाहतीतील पिण्याव्यतिरिक्तच्या इतर कारणांसाठी वापरले जाते. गेल्या तीन दिवसात या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे हा तलाव भरून वाहू लागला आहे, अशी माहिती महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे.

  • .. बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयापासून साधारणपणे २७ किलोमीटर (सुमारे १७ मैल) अंतरावर हा तलाव आहे.
  • या कृत्रिम तलावाचे बांधकाम सन १८९० मध्ये पूर्ण झाले.
  • या तलावाच्या बांधकामासाठी सुमारे १२.५९ लाख रुपये एवढा खर्च तेव्हा आला होता.
  • या तलावाचे पाणलोट क्षेत्र हे सुमारे ६.६१ किलोमीटर असून तलाव पूर्ण भरलेला असल्यास पाण्याचे क्षेत्रफळ हे सुमारे २.२३ चौरस किलोमीटर एवढे असते.
  • तलाव पूर्ण भरलेला असताना तलावामध्ये ५४५.५ कोटी लीटर पाणी असते. (५४५५ दशलक्ष लिटर)
  • हा तलाव पूर्ण भरून वाहू लागल्यानंतर या तलावाचे पाणी हे मिठी नदीला जाऊन मिळते.
  •  ===

दरम्यान हवामान खात्याने मुंबईला ऑरेंज अलर्ट दिला असून राज्य आपत्ती नियंत्रण विभाग, बृहन्मुंबई महानगरपालिका, रेल्वे प्रशासन एकत्रितपणे काम करून मुंबईकरांना दिलासा देण्याचं काम करीत आहेत. मुंबईत काल रात्रीपासून (दिनांक ७ जुलै २०२४) २६७ ते ३०० मिलिमीटर एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला आहे. नागरिकांना मदतीसाठी सर्वोच्च प्राधान्य दिले जात असून, सर्व यंत्रणा २४ तास अलर्ट मोडवर असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (दिनांक ८ जुलै २०२४) दिली. शिंदे यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या नियंत्रण कक्षाला भेट देऊन मुंबईतील परिस्थितीचा आढावा घेतला.  यावेळी मुख्यमंत्र्यांनी निय़ंत्रण कक्षातून मुंबईतील विविध भागातील पावसाची माहिती घेतानाच महामार्ग, रेल्वे, प्रमुख रस्ते येथील परिस्थितीचा देखील आढावा घेतला. या पाहणीनंतर मुख्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, एरवी मुंबईत ६५ मिलिमीटर पाऊस झाला की अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण होते. मात्र रात्रीपासून २६७ ते ३०० मिलिमीटर पाऊस झाला आहे. एवढ्या मेठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने रेल्वे मार्ग आणि चुना भट्टी, सायन याभागात पाणी साचले. साचलेल्या पाण्याचा निचरा तातडीने होण्यासाठी रेल्वेने आणि मुंबई महानगरपालिकेने पंप बसविले आहेत.  एकाच वेळी एवढा पाऊस झाल्याने त्याचा निचरा होण्यासाठी वहन क्षमता तयार केली जात आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने जल साठवण टाक्या तयार केल्यामुळे यंदा मिलन सबवे, हिंदमाता भागात पाणी साचले नसल्याचे सांगत मायक्रो टनेलिंग सारखा प्रयोग देशात पहिल्यांदा केल्यामुळे निचरा होण्यासाठी मदत होत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. सकाळपासून रेल्वे, मुंबई महापालिका, राज्य आपत्ती नियंत्रण कक्ष, मुंबई पोलिस आयुक्त यांच्या संपर्कात राहून परिस्थितीची माहिती घेत होतो असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुंबईतील सुमारे ५ हजार ठिकाणांवर मुंबई महानगरपालिकेच्या नियंत्रण कक्षातून लक्ष ठेवण्यात येत आहे. महानगरपालिकेचे अधिकारी फिल्डवर असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले. मिठी नदीच्या ठिकाणी फ्लड गेट बसविण्यात येत असून त्यामुळे भरतीच्या वेळेस समुद्राचे पाणी शहरात येणार नाही. पंपाने साचलेले पाणी नदीत टाकण्याची यंत्रणा करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईत सात ठिकाणी पंपिंग स्टेशन करण्यात येत असून नागरिकांना मदतीसाठी यंत्रणा सज्ज असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री  दीपक केसरकर, मुंबई उपनगरे जिल्हा पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, ग्रामविकास व पंचायत राज मंत्री गिरीश महाजन, राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक, अतिरिक्त मुख्य सचिव (मुख्यमंत्री कार्यालय) इकबाल सिंह चहल, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) आश्विनी जोशी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प)  अभिजीत बांगर, सहआयुक्त (सामान्य प्रशासन) मिलीन सावंत, सहआयुक्त (महानगरपालिका आयुक्त कार्यालय) चंद्रशेखर चोरे, संचालक (आपत्कालीन व्यवस्थापन) महेश नार्वेकर व व रेल्वे प्रशासनाचे संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com