ठाण्यात २२ ठिकाणे धोकादायक
यंदाच्या पावसाळ्यात राज्यातील ४८३ गावांवर दरडी कोसळण्याचा धोका असून धोकादायक दरडींची ठिकाणे सरकारने सबंधित जिल्हा प्रशासानाला कळवली आहेत. त्यानुसार रायगड, रत्नागिरी, पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक गावांना दरडी कोसळण्याचा सर्वाधिक धोका आहे. ठाणे जिल्ह्यात अंबरनाथमधील खोड खुंटीवली, जांबिवली, मोरीवली, भिवंडीतील नागाव, तामघर, शहापूरमधील मोखावणे, ठाण्यातील उत्तण, बेलापूर, भाईंदरपाडा, माजिवडे, कोलशेत, शिरवणे, डोंगरी तसेच धारावी, पारसिक, मुंब्रा आदी २२ ठिकाणी दरडींचा धोका दर्शविण्यात आला आहे. दरडींची ठिकाणे निश्चित करण्यात आली असून तेथे कुणाला हानी पोहचणार नाही, याची काळजी जिल्हा प्रशासनाने घ्यावी, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
राज्य सरकारने तयार केलेल्या अहवालानुसार राज्यातील डझनभर जिल्हयातील ४८३ गावांवर धोकादायक दरडींचे संकट आहे. त्यामध्ये रायगड जिल्ह्यात खालापूर, कर्जत, महाड, म्हसळा, पनवेल, पोलादपूर या तालु्क्यातील सर्वाधिक १५७ गावांचा समावेश आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, दापोली, गुहागर, खेड, राजापूर, रत्नागिरी संगमेश्वर या तालुक्यातील १३८ तर पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, हवेली, जुन्नर, खेड, मावळ, मुळशी या तालुक्यातील ९३ गावांना धोकादायक दरडींपासूनच्या आपत्तीचा धोका आहे. साताऱ्यात जावळी, महाबळेश्वर, पाटण, सातारा, वाई या तालुक्यातील ८८, कोल्हापूरमधील भुदरगड, चंदगड, गगनबावडा, करवीर, पन्हाळा, राधानगरी, शाहूवाडी तालुक्यातील ५८, नगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यील ८ , सिंधुदुर्गातील सावंतवाडी, वैभववाडी या दोन तालुक्यातील १६,नाशिक जिल्ह्यात इगतपुरी, सुगरणा आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ५ गावांना पावसाळ्यात दरडी कोसळण्याचा धोका असल्याचे अहवालात म्हटले आहे. पावसाळ्यात राज्यातील काही जिल्ह्यात विशेषत: कोकण, मुंबई, पुणे, कोल्हापूर या भागात दरडी कोसण्याच्या घटना वारंवार घडत असतात, त्यामुळे काळजी घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
0 टिप्पण्या