Top Post Ad

बेकायदेशीर पब-बार तसेच अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या दुकानांवर ठा.म.पा.ची धडक कारवाई

 


      पुणे शहरामध्ये तरुण अंमली पदार्थांच्या आहारी गेल्याची प्रकरणे समोर येत आहेत. अशाप्रकारचे गैरप्रकार राज्यातील कुठल्याही शहरात घडू नयेत यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातील सर्व शहरातील अनधिकृत पब्ज, बार व अनधिकृत अंमली पदार्थ विक्री केंद्रे नष्ट करावीत अशा सूचना दिल्या, तसेच याबाबत तात्काळ ठोस कारवाई करण्याचे निर्देश प्रशासनास दिले आहेत. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या आदेशानुसार ठाणे महापालिका क्षेत्रातील पब, बार व अंमली पदार्थ विक्री करणारी अवैध बांधकामे निष्कसित करण्याची कार्यवाही हाती घेण्यात आली आहे. या कारवाईत महापालिका कार्यक्षेत्रातील शाळा, महाविद्यालयापासून 100 मीटर अंतराच्या आत असलेल्या एकूण 31 पानटपऱ्या जप्त करण्यात आल्या तर हॉटेल, पब्ज, बार असे मिळून 8 ठिकाणी तर 9  व शेडवर कारवाई करण्यात आली.

पब्ज, बार आदींवर धडक कारवाई  आजपासून प्रभागसमितीस्तरावर अतिक्रमण नियंत्रण व निष्कासन विभागाचे उपायुक्त तसेच सहायक आयुक्तांच्या उपस्थितीत व पोलीस बंदोबस्तात कारवाईला सुरू करण्यात आली.      वागळे प्रभाग समिती कार्यक्षेत्रातील पंचशील बार, इंडियन स्वाद बार, अनधिकृत पानटपरी, गुटखा विक्रेते यांचेवर कारवाई करण्यात आली.   वर्तकनगर प्रभागसमिती कार्यक्षेत्रात असलेल्या द सिक्रेट बार व हुक्का पार्लर तसेच कोठारी कंपाऊंड येथे असलेल्या पब, बारवर कारवाई करण्यात आली. याच परिसरातील सोशल हाऊस पब येथील अनधिकृत बांधकाम व अवैध पानटपऱ्यांवर कारवाई करण्यात आली.      लोकमान्य सावरकरनगर प्रभागसमिती अंतर्गत  ज्ञानेश्वरनगर राजश्री शाहू महाराज विद्यालय येथील 100 मीटर परिसरात असलेल्या तीन टपऱ्या सील करण्यात आल्या, तसेच सावरकरनगर येथील ज्ञानोदय विद्यालय येथील एक पानटपरी जप्त करण्यात आली.       उथळसर प्रभाग समितीतील अनाधिकृत हॉटेल, हुक्का पार्लरवर कारवाई करण्यात आली तर राबोडी येथील के.व्हिला शाळेपासून 100 मीटरच्या आतील पानटपऱ्या हटविण्याची कारवाई करण्यात आली.      

त्याचप्रमाणे माजिवडा मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत घोडबंदर रोड येथील खुशी लेडीज बार व ओवळा येथील मयुरी लेडीज बारवर कारवाई करण्यात आली असून पोकलेन मशीनच्या सहाय्याने संपूर्ण बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले. तसेच चितळसर मानपाडा, सिनेवंडर परिसरातील अनधिकृत बार, कापूरबावडी येथील स्वागत बारवर देखील कारवाई करण्यात आली. तसेच ए.पी.शहा कॉलेजजवळील अनधिकृत दिव्यांग स्टॉलची तपासणी करुन ज्या ठिकाणी धुम्रपान निषेध पदार्थ आढळून आले ते स्टॉल जप्त करण्यात आले.        नौपाडा कोपरी प्रभागसमिती अंतर्गत असलेल्या अनधिकृत हॉटेल, बारचे बांधकाम देखील जमीनदोस्त करण्यात आले.  कोपरी परिसरात दिव्यांग व्यक्तींना देण्यात आलेले स्टॉल तसेच अनधिकृत स्टॉल यांची तपासणी  करुन ज्या ठिकाणी धुम्रपान निषेध पदार्थ आढळून आले त्या ठिकाणचे स्टॉल सीलबंद करण्यात कारवाई करण्यात आली. या ठिकाणची पाच दुकाने सील करण्यात आली आहेत.        कळवा प्रभाग समितीमधील शाळा परिसरालगत 100 मीटरच्या आत असलेल्या पानटपऱ्यांवर तसेच अनधिकृत बार यांच्यावर कारवाई करण्यात आली.            दिवा प्रभागसमिती अंतर्गत संपूर्ण विभागाचा सर्व्हे करुन शाळांपासून 100 मीटर परिसरात असलेल्या पानटपऱ्या तसेच अनधिकृत हॉटेल, बार यांच्यावर ठोस कारवाई करण्यात आली.

         प्रभागसमितीनिहाय करण्यात आलेली कारवाई अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, अतिक्रमण नियंत्रण व निष्कासन विभागाचे उपायुक्त जी.जी. गोदेपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ1 चे उपायुक्त  मनिष जोशी, परिमंडळ 2 चे उपायुक्त शंकर पाटोळे, परिमंडळ 3 चे उपायुक्त दिनेश तायडे, तसेच पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव, सहपोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या बंदोबस्तात, महापालिकेच्या सर्व प्रभागसमितीचे सहाय्यक आयुक्त यांच्या उपस्थितीत करण्यात आली.    महापालिका कार्यक्षेत्रातील अनधिकृत हॉटेल, पब्ज, बार तसेच पानटपऱ्या पूर्णपणे निष्कसित होईपर्यत सदरची कारवाई सातत्याने सुरू राहणार असल्याची माहिती उपायुक्त जी.जी. गोदेपुरे यांनी यावेळी दिली.


याआधीही अनेक समाजसेवी कार्यकर्त्यांनी या अनधिकृत पब आणि अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या दुकानांबाबत महापालिकेला तक्रार पत्रं दिली होती. मात्र ठामपाचे अधिकारी याकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करीत होते. यामध्ये त्यांचे अर्थपूर्ण व्यवहार असल्याची बाब आता नव्याने राहिली नाही. मात्र आता अचानक मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिल्यानंतर हा कारवाईचा बडगा उगारला गेला. केवळ मुख्यमंत्र्यांच्या आदेशाची वाट पाहणारे ठामपाचे अधिकारी सर्व सामान्य जनतेच्या तक्रारींना केराची टोपली दाखवतात. इतकेच नव्हे तर आता ज्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे ती दुकाने आणि पब-बार कालांतराने सुरु झाल्याने याला जबाबदार कोण?  आजपर्यंत ठाणे महानगर पालिकेने केलेल्या सर्व कारवाया या तकलादू आणि ठाणेकर जनतेच्या कर रूपी पैशाचा  अपव्यय करणाऱ्या ठरल्या आहेत. अशी अनेक अनधिकृत बांधकामे ठाण्यात आजही दिमाखाने उभी आहेत ज्यांच्यावर एक-दोन वेळा नाही तर तीन चार वेळा कारवाई झाली आहे. ती बांधकामे उलट अधिक व्यवस्थित आणि दिमाखाने उभी आहेत. या कारवाईच्या नाटकामध्ये नागरिकांच्या कररुपी पैशाची प्रचंड उधळपट्टी होते. काही काळाने ही बाधकामे पुन्हा उभी राहतात. मागील अनेक वर्षापासून ठाणे महानगर पालिका अधिकाऱ्यांचा आणि या भूमाफिया तसेच पब-बार, लेडीज-बार, अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांचा खेळ असाच सुरू आहे. यामध्ये पैसा मात्र नागरिकांचा जात आहे. यावर ठोस कारवाई कधी होणार हा खरा प्रश्न आहे.  येणाऱ्या निवडणुकीत राजकीय पक्षांना अधिक निधी देऊन ही पब-बार, अंमली पदार्थ विक्री करणारी दुकाने पुन्हा नव्याने उभी राहिली तर त्यात ठाणेकरांना काही आश्चर्य वाटणार नाही. ये सिलसिला तो चलता रहेगा.... - संपादक


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com