Top Post Ad

यामुळे सरकार आणि समाजात पर्यावरण विषयक जनजागृती करता येईल


 आज ५ जून, आजचा दिवस जगभरात जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. मागील दोन अडीच शतकात विशेषतः औद्योगिक क्रांती नंतर जागतिक हवामान बदल आणि इतर नुकसानकारक बदल लक्षात घेता पृथ्वीचे आयुर्मान, सहज, स्वाभाविक आणि निसर्गनियमानुसार असावे या उद्देशाने संयुक्त राष्ट्र संघात ( युनो ) ५ ते १५ जून १९७२ दरम्यान एक संमेलन झाले. यात संयुक्त राष्ट्र संघाच्या आमसभेने संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम यावर सखोल चर्चा केली. त्यात मानवी हस्तक्षेपामुळे पर्यावरणाचे होत असलेले नुकसान आणि त्याचा मानवी जीवनावर होणारे विपरीत परिणाम यावर सखोल चर्चा होऊन काहीतरी गंभीर पावले उचलली पाहिजे यावर एकमत झाले. याच संमेलनात संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम United Nations Environment Program ( UNEP ) चा जन्म होऊन दरवर्षी ५ जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा करण्याचे ठरवण्यात आले, यामुळे लोकं, सरकार आणि समाजात पर्यावरण विषयक जनजागृती करता येईल. याच संमेलनात भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पर्यावरणाची बिघडती जागतिक परिस्थिती आणि त्याचा जगाच्या भविष्यावर होणारा प्रभाव या विषयावर प्रभावी भाषण दिले आणि समतोल पर्यावरणाचे महत्व विशद केले. आंतरराष्ट्रीय पर्यावरण विषयक स्तरावर हे भारत सरकारचे पहिले महत्वाचे पाऊल होते. पुढील वर्षी म्हणजे १९७३ मध्ये धरती हा विषय घेऊन मोजक्या संकल्पनेसहित हा दिवस साजरा करण्यात आला. १९७४  मध्ये जगातील विविध शहरात हा दिवस अत्यंत उत्साहाने साजरा करणे सुरू झाले आणि तिथून पुढे संपूर्ण जगभर दरवर्षी ५ जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून संपूर्ण आत्मीयतेने साजरा केला जातो. 

दरवर्षी सुमारे १५० देश हा दिवस साजरा करतात आणि दरवर्षी वेगळा देश हा उपक्रम जागतिक स्तरावर होस्ट करतो. जागतिक परिस्थिती, अन्न, पाणी, दुष्काळ, तापमान वाढ, हवामान बदल आणि त्याचे विपरीत परिणाम, मानवी जीवन आणि भविष्य, या सर्वांवर जनजागृती  म्हणून हा दिवस साजरा केला जातो.  त्यासाठी दरवर्षी एक नवी थीम निवडून त्यासंदर्भात कार्य केले जाते.  त्यासाठी मग विविध देशानी पर्यावरण संबंधित पशु, पक्षी प्राणी आणि जंगल संवर्धन करण्यासाठी वेगवेगळे कायदे केले.   २०२० साली  कोलंबियाने या दिवसाचे आयोजन केले होते. २०२१ साली पाकिस्तान या जीवन परिवर्तन  उपक्रमाचे यजमान होते . गतवर्षी म्हणजे २०२२ साली स्वीडन हा देश या दिवसाचा आयोजक होता.  फक्त आणि फक्त पृथ्वी ही गतवर्षीची थीम होती. यावर्षी म्हणजे २०२३ साली आयव्हरी कोस्ट हा देश या दिवसाचा आयोजक असून प्लास्टिक प्रदूषणावर उपाय ही यावर्षीची थीम आहे.  या दिवशी विविध देशांमध्ये अंतर्गत परिस्थितीत पर्यावरणविषयी होणाऱ्या दुष्परिणामांची जाणीव करून दिली जाणार आहे. २०२० आणि २०२१ साली  जगावर  कोरोना महामारीचे संकट असल्याने हा कार्यक्रम सार्वजनिकरित्या साजरा न करता ऑनलाइन साजरा केला गेला. जगभरातील लोकांनी या दिवशी पर्यावरणाचे जतन करुन मानवी भविष्य सुरक्षित करण्याचा संकल्प केल्यास या दिवसाचे सार्थक होईल. जागतिक पर्यावरण दिनाच्या सर्वांना शुभेच्छा! 


श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com