Top Post Ad

फँटसी ऑफ जयभीम नगर...


      अभिनेता अंकुश चौधरी निर्मित तोडी मिल फँटसी हा प्रयोग पाहिला.( थॅन्क्स टू भानुदास धुरी ).लेखक सुजय जाधव आणि दिग्दर्शक विनायक कोळवणकर यांची लक्षवेधी आणि भन्नाट कारागिरी.जिजामाता नगरच्या झोपडपट्टीतले तीन झोपडपट्टी छाप मित्र आहेत.त्यांच्या स्वप्नातली दुनिया म्हणजे हा प्रयोग.त्यांच्या बाजूच्या राम टेकडी झोपडपट्टीला हटवून त्या जागी उभ्या राहिलेल्या आलिशान हाय राईज किंग स्टोन टॉवर ते मुंबईतील झोपडपट्ट्या असा रोप वे बांधून देश विदेशातील पैसेवाल्यांना हवाई झोपडपट्टी टुरिझम घडवायची त्यांची बिझनेस आयडिया आहे.यातून खूप पैसा कमवून किंग स्टोनच्या टॉप फ्लोअर वर ऑफिस थाटून ऐश करायची ही त्यांची फँटसी.पुढचा सगळा राडा म्हणजे गरीब विरुद्ध श्रीमंत यांच्यातील  संघर्ष. 

            अर्थात हा संघर्षही अफलातून पद्धतीने सादर केलाय.आपल्या पारंपरिक प्रायोगिक नाटकातील ढोल ताशे यांची जागा अत्याधुनिक बॅण्ड ने घेतलीय.सगळं नाट्य मिल तोड फँटसी कॅफे अँड रेस्टो बारच्या टॉयलेट मध्ये,त्याच्या समोर आणि त्याच्या छतावर घडतंय.कॅरेक्टर्स जितके वास्तववादी,प्रायोगिक तितकेच प्रोफेशनल.              

                मध्यवर्ती कल्पना म्हणजे, कोणत्याही मोठ्या शहरातील हाय राईज टॉवर विरुद्ध झोपडपट्टी या कॉमन प्रश्नाची, पण तितकीच अन् कॉमन मांडणी.झोपडपट्टीतील गरिबांना चिलटासारखे चिमटीत पकडून अलगद दूर भिरकावून देणे.त्यासाठी सगळ्या राजकारणी,अधिकारी,भाई लोकं आणि पैसेवाल्या जमातीने एकत्र येणे.आणि काही मूठभर तरुणांनी त्या विरोधात उभं राहणं.रंगमंचावर जे पाहिलं त्याला नाटक म्हणणार नाही,पण जे काही बघितलं ते तुफान हाऊस फुल्ल आणि तितकंच सक्सेस्फुल! गिरणी कामगारांच्या 'अधांतर ' आयुष्यानंतरची पुढच्या पिढीची अगतिक आणि तितकीच केविलवाणी फँटसी.

                  हे सगळं रंगमंचावर बघत असताना मनातून पवई हिरानंदानी मधील जयभीम नगरातील बेघर दलितांची भयाण अवस्था मात्र डोळ्यांसमोरून हलत नव्हती.गिरणी कामगारांचा लढा आणि त्यांचे उद्ध्वस्त आयुष्य जगभरातील संवेदनशील कार्यकर्ते,विचारवंत यांच्या अभ्यासाचा विषय ठरला.कामगारांच्या रोजी रोटीचं साधन हिसकावलं गेलं,घर दार विकून ते परागंदा झाले,कामगारांची बायको मुले देशोधडीला लागली.तरी त्या कामगारांना मरणोपरांत नशीबवान म्हणायला हरकत नसावी.किमान ते माध्यमांच्या चर्चेचा विषय ठरले.सरकार दरबारी त्यांच्यासाठी वाटाघाटी झाल्या.कोणी मोर्चे आंदोलने केली.कोणी टाचा घासून मेले पण कोणी पीएचडी पण करून गेले.गिरणी कामगारांचा संप आणि लढा हा ऐतिहासिक ठरला.गरिब कामगारांच्या दुःखाचं भांडवलात रूपांतर झालं.

                     मात्र जित्याजागत्या दलितांच्या वाट्याला बहुधा हे पण सुख नसावं.मुंबई सारख्या शहरात आणि आसपासच्या महानगरात दररोज या ना त्या ठिकाणच्या वस्त्या उठवल्या जातात.आताच काही दिवसांपूर्वी पवईच्या हिरानंदानी कॉम्प्लेक्स मधून दिवसाढवळ्या शेकडो दलित कुटुंबं घरादरातून जबरदस्तीने ओढून काढून पावसापण्यात भिरकावली गेली.ती माणसं ( ? ) अजूनही तिथल्या फुटपाथवर जीव मुठीत धरून आणि प्लास्टिकचं छप्पर बनवून बसून आहेत.पोलिस,गुंड, बाऊन्सर कधी हल्ला करतील त्याचा नेम नाही. कोण्या मिडियाच्या लालने यावर ब्र शब्द काढलेला नाही.विचारवंत स्तब्ध बसलेत. पुरोगामी पार्ट्या आणि त्यांचे कार्यकर्ते पुरोगामित्व पांघरून गपगार पडलेत.दलितांचा प्रश्न म्हणून नॉन दलित कार्यकर्ते आणि पक्ष संघटनांना त्यात फारसा इंटरेस्ट नसतोच,तसा तो आताही नाही.राहता राहिले ते दलित कार्यकर्ते आणि त्यांच्या पार्ट्या.त्यातही कोण कुठल्या पार्टीत कोणालाच कळलं नाही.अजूनही कळत नाही. दिवसा जे इकडच्या पार्टीत असतात,त्यातलेच काही रात्री बेरात्री अशाच एखाद्या' किंग स्टोन ' च्या पार्टीत पण दिसतात.सामान्य मुंबईकरांना वाटतं,त्यांच्याकडे रहीवासाचे पुरावे नाहीत म्हणजे त्यांना उठावच लागणार.अशा अवस्थेत तिथल्या बेघर दलितांनी कोणाच्या तोंडाकडे बघायचं? कोणावर भरोसा ठेवायचा? वर्षानुवर्षे सगळीकडे हीच बोंब.

 


          बरं जे बिच्चारे झोपडपट्टीतील कार्यकर्ते किडुक मिडुक वाचवायसाठी जिवाचं रान करतात त्यात पण कोणी झोलर तर कोणी दलाल असल्याची चर्चा.कोणी नेता येऊन फोटो काढून जातो तर कोणी आश्वासनांची बरसात करतो. लोकं प्रत्येकाच्या मागे आशेने धावतात. गटा तटात विखुरले जतात.काही जेन्युईन कार्यकर्ते,सोशल वर्कचे विद्यार्थी ठिय्या मांडून बसलेत.पण त्यांना विचारतो कोण ? सगळा फियस्को झालाय.आता दुसरीकडे कुठेतरी पुनर्वसनाचं गाजर दाखवलं जातंय.एकदा का लोकांनी आपल्या हक्काची जागा सोडली तर ते पुन्हा कुठेतरी दहा बाय पंधराच्या खुराड्यात आणि त्यांना हाकलून लावणारे हजारो कोटींच्या नफ्यात. सबका साथ,बिल्डर का विकास !

       मात्र शेकडो दलितांना भर पावसात बेघर करणारा,त्यांच्या बायको मुलांवर बाउन्सर,पोलीस घालून अत्याचार करणारा बिल्डर गुन्हेगार आहे असं कोणीच कसं छातीठोकपणे बोलत नाही ? त्याला सगळ्या सरकारी,खासगी प्रोजेक्ट मधून ब्लॅक लिस्ट करण्याचं जयभीम नगरातील लोकांचं म्हणणं अशीच एक वांझ फँटसी तर राहणार नाही ना ?

  •  फँटसी ऑफ जयभीम नगर
  • - रवि भिलाणे 
  •   ( 22/ 6 /2024 )


             

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com