जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने ठाणे महापालिकेने हरित ठाणे अभियान हाती घेतले आहे. या अभियानात १५ ऑगस्टपर्यंत महापालिका क्षेत्रात एक लाख झाडे लावण्यात येणार आहेत. बांबू तसेच, स्थानिक प्रजातींच्या झाडांना या वृक्षारोपण अभियानात प्राधान्य दिले जाणार आहे. महापालिका यासाठी विनामूल्य झाडे उपलब्ध करून देणार आहे. महापालिकेच्या जागांबरोबरच, सर्व शासकीय संस्था, निमशासकीय संस्था, शासनाचे सर्व विभाग, संरक्षण दल, खाजगी कार्यालये, गृहसंकुले, स्वयंसेवी संस्था, धर्मादाय संस्था यांनी जागा उपलब्ध करून द्यावी. रोपांची मागणीही नोंदवावी. या सगळ्यांच्या सहकार्याने हरित ठाणे अभियान यशस्वी करू, असा विश्वास महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी व्यक्त केला.
या अभियानाचा प्रारंभ बुधवारी सकाळी पोखरण रस्ता क्र्. ०१, कॅडबरी जंक्शन येथे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी बकुळीचे झाड लावून केला. जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने, ०५ जूनपासून १५ ऑगस्ट २०२४पर्यंत ठाणे महापालिका हद्दीत एक लाख झाडे लावण्याचे हरित ठाणे अभियान' हाती घेण्यात आले आहे. त्याची सुरुवात आज महापालिका क्षेत्रात वृक्ष प्राधिकरण, खाजगी संस्था यांच्या माध्यमातून सुमारे ५००० झाडे लावून करण्यात आली आहे. या अभियानात जास्तीत जास्त ठाणेकरांनी सहभागी व्हावे, असे आवाहन राव यांनी केले आहे.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात, तसेच वन विभागाकडे वनीकरणासाठी जागा उपलब्ध असल्यास त्यांच्या सहकार्याने महापालिका हे अभियान राबवेल. त्यात, ठाणे महापालिका क्षेत्रात बाबूंच्या लागवडीलाही प्राधान्य दिले जाणार असल्याची माहिती आयुक्त राव यांनी दिली. या अभियानात एकेका विभागाचे पालकत्व महापालिकेच्या एकेका विभागप्रमुखाकडे दिले जाणार आहे. या अभियानाचे संयोजन वृक्ष प्राधिकरण विभागाकडून होईल. मात्र, त्याच्यावर देखरेख ठेवणे, ठराविक काळाने झाडांच्या संगोपनाचा आढावा घेणे ही कामे विभाग प्रमुख करतील. त्यात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या विभागास पुढील वर्षी जागतिक पर्यावरण दिनी गौरविण्यात येईल, असेही आयुक्त राव यांनी स्पष्ट केले.
पोखरण रस्ता क्रमांक १ येथे रस्त्याच्या दुर्तफा पारंपरिक पद्धतीने वृक्षारोपण करण्यात येत आहे. त्यासाठी या अभियानात बकुळाची झाडे लावण्यात आली. वृक्ष अधिक्षक केदार पाटील यांनी यावेळी रस्त्याच्या दुर्तफा करण्यात येत असलेले वृक्षारोपण, त्यासाठी निवडण्यात आलेली झाडे यांची माहिती उपस्थितांना दिली. झाडांविषयी विशेष आस्था असलेले महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते कॅडबरी कंपनीलगतच्या फुटपाथच्या कडेने वृक्षारोपण करण्यात आले. त्यांच्यासह, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त (उद्यान विभाग) सचिन पवार, उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) तुषार पवार, उपायुक्त (पर्यावरण विभाग) अनघा कदम, मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान, उपनगर अभियंता (विद्युत) शुभांगी केसवानी, सहाय्यक आयुक्त रंजू पवार, सहाय्यक आयुक्त भालचंद्र घुगे आदींनी वृक्षारोपणात सहभाग घेतला.
त्याचबरोबर, नागला बंदर चौपाटी येथे मियावाकी पद्धतीने झाडे लावण्यात आली. कमी जागेत, कमी कालावधीत जंगल तयार करण्याची मियावाकी वृक्षारोपण पद्धत असून जैवविविधता संवर्धनासाठी ही उपयुक्त पद्धत आहे. या वृक्षारोपणात पळस, बेल, नीम, कांचन, सिता अशोक, जांभूळ, पारिजातक, शिसम, कोकम, शिवण, करंज, अडुळसा, तगर, लिंबू, कामिनी, बकूळ आदी देशी वृक्षांचा समावेश आहे. उपायुक्त सचिन पवार आणि वृक्ष अधिक्षक केदार पाटील यांनी येथे वृक्षारोपण केले.
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून विशेषतः शहरी भागात होणाऱ्या वृक्षारोपण उपक्रमात लागवड करण्यात आलेली झाडे/रोपे नक्की टिकतात का? यावर आता संशोधन समिती नियुक्ती करण्याची वेळ आली आहे.विविध पर्यावरण संस्था आणि शहरी भागातील पर्यावरणवादी राजकीय नेत्यांकडून पर्यावरण दिनानिमित्त मोठ्याप्रमाणात वृक्षारोपणाचा प्रसिद्धी भंपक कार्यक्रम करण्यात येतो. आजतागायत सुमारे वीस वर्षांहून अधिक काळ हजारोंच्या संख्येने वृक्षारोपण यांच्याकडून करण्यात आले आहे. परंतु, पर्यावरण दिन नंतर रोपण केलेली किती झाडे जंगली अथवा जगवण्यात आली, याबाबत यश प्रश्न उभा राहतो. कारण, जर का एवढ्या कालावधीमध्ये हजारो झाडे लावली तर, आतापर्यंत सदर शहरात त्या संस्था आणि राजकीय नेत्यांकडून लावण्यात आलेल्या झाडांची संख्या लाखोंच्या घरात असणे व ती दिसणे अनिवार्य आहे. परंतु, असे चित्र शहरात कुठेही निदर्शनास येत नाही.पर्यावरण दिनाच्या दिवशी मोठा गाजावाजा करून, लावण्यात आलेली रोपे/झाडे यांची विहित काळजी न घेतल्याने ते मृत्यू पावतात. परंतु, संस्था व नेत्यांचे फोटोसेशन आणि बातम्या प्रसिद्ध होण्याचा सोपस्कार पार पाडणे, इतकेच ध्येय उद्दिष्ट पर्यावरण दिन साजरा करण्याचे असते का? असा प्रश्न कायम ‘त्या’ शहरातील सामान्य जनतेला पडतो.
0 टिप्पण्या