Top Post Ad

मी एक मास्तर" पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न


 लोणावळ्यातील गुरुकुल विद्यालयाच्या प्रांगणात गुरुवर्य दीपक चैतन्य गंगोळी लिखित "मी एक मास्तर" ह्या शिक्षण क्षेत्राशी निगडित अशा पुस्तकाचे प्रकाशन पद्मविभूषण डॉ.रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते रविवार,दिनांक ९ जून  रोजी  झाले. या पुस्तकाला डॉ.माशेलकर यांचीच प्रस्तावना आहे.हा प्रकाशन समारंभ मोठ्या उत्साहात आणि दिमाखात संपन्न झाला.या समारंभासाठी लोणावळ्यातील नागरिक, शिक्षक, पालक,मित्रपरिवार आणि गुरुकुलचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.पुण्याच्या "मिहाना पब्लिकेशन" ने सदर पुस्तक प्रकाशित केले आहे.

आपले मनोगत व्यक्त करतांना गुरुवर्य दीपक गंगोळी यांनी उपस्थितीतांचे स्वागत करून पुस्तक लिहिण्यामागची भूमिका स्पष्ट केली.अहमदाबाद येथील विचारवंत हरिभाई कोठारी यांनी "मास्तर" या शब्दाची छान फोड केली आहे.मा के स्तरपर जाकर जो पढाता हैं वह मास्तर.हे मनाला खूप भावले म्हणून या पुस्तकाचे नाव "मी एक मास्तर" ठेवण्यामागचा हेतू सरांनी स्पष्ट केला.प्रामाणिकपणे ज्ञानदानाचे काम करून आपली प्रतिष्ठा प्राप्त करता येते हा संदेशही दिला.या पुस्तकाचा खटाटोप आर्थिक प्राप्तीसाठी नसून यातून जी रॉयल्टी मिळेल त्याचा विनियोग समाजातील हुशार होतकरू आणि गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी होणार असल्याचे सांगितले.त्याचे प्रतीक म्हणून एक चेक गुरुकुल विद्यालयाला तर दुसरा चेक रोटरी क्लब तळेगाव दाभाडे यांना शैक्षणिक कार्यासाठी देण्यात आला.

मिहाना पब्लिकेशनने हे पुस्तक सुबक आणि सुंदर केल्याबद्दल त्यांचे आभार मानले.गुरुवर्यांच्या सुविद्य पत्नी सौ.कल्याणी गंगोळी यांनी आपल्या स्नेहापोटी समारंभास उपस्थित राहिलेल्या सर्व प्रेक्षकांना धन्यवाद देत आपले भावनिक विचार व्यक्त केले.तर गुरुकुलचे विश्वस्त कु.अनुज गंगोळी यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला.मिहाना पब्लिकेशनच्या सौ.अमृता कुलकर्णी यांनी सांगितले की गुरुकुल शैक्षणिक प्रणालीवर पुस्तक प्रकाशित करण्याचा त्यांचा मानस होता तो या पुस्तक रूपाने साध्य झाला.पूर्वीच्या शिक्षणप्रणालीची कास धरून आज वाटचाल केली तर आजच्या तांत्रिक जगतात शिक्षण अधिक परिणामकारक होईल असे मत व्यक्त करून दीपक सरांचे आणि डॉ.माशेलकर यांचे विशेष आभार मानले.

समारंभाचे दुसरे पाहुणे तळेगाव दाभाडे येथील "अंबर" या साप्ताहिकाचे संपादक श्री.सुरेश साखवळकर म्हणतात की दीपक सरांचे लेखन सात्विक आणि विनम्र या गुणांनी ओतप्रत भरलेले दिसून येते.सोपी सरळ आणि ओघवती भाषा असल्याने सहजगम्य वाटते.या पुस्तकात शिक्षणाबद्दलचे विचारमंथन तर आहेच परंतू "लाल्या" आणि "उषा" या विद्यार्थ्यांची शब्दचित्रे जीवाला चटका लावणारी आहेत.गुरुवर्य गणेश लक्ष्मण चंदावरकार आणि वसुंधराबाई चंदावरकर या दाम्पत्याने ७५ वर्षांपूर्वी ध्येय वादाने सुरु केलेल्या या गुरुकुल शाळेला दीपक सरांनी स्वतःला वाहून घेतले.त्यांच्या या शैक्षणिक आणि सामाजिक अनुभवाचं कथन पुस्तकातून व्यक्त होते.


आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ.माशेलकर म्हणतात... मी एक मास्तर हे दीपक गंगोळी यांनी लिहिलेले पुस्तक म्हणजे एका हाडाच्या शिक्षकाने लिहिलेली जीवनगाथा आहे.पुस्तकाची विभागणी तीन भागात झाली असून पहिल्या भागात शैक्षणिक विषयावरचा उहापोह,दुसऱ्या भागात निवडक विद्यार्थांची व्यक्तीचित्रे रेखाटली आहेत आणि शेवटच्या भागात आपली जडण घडणी बाबत भाष्य केले आहे.दीपक गंगोळी यांनी या पुस्तकात मुख्यतः मूल्यसंवर्धनावर अधिक भर दिला आहे.आपले शैक्षणिक विचार सरळ सोप्या ओघावत्या शब्दात लिहिले असल्यामुळे ते केवळ माहितीवजा नाहीत तर प्रेरणादायी सुद्धा आहेत.हे पुस्तक माझ्या विद्यार्थी दशेत मिळाले असते तर मी अधिक चांगला विद्यार्थी झालो असतो.. अधिक चांगला शिक्षक बनलो असतो.. अधिक चांगला माणूस बनलो असतो.हे पुस्तक म्हणजे समाजाला मोठी देणगी आहे म्हणून दीपकचे अभिनंदन आणि समाजातर्फे आभार.

या सर्व कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन गुरुकुलचे माजी मुख्याध्यापक श्री.बापूलाल तारे यांनी केले तर कु.अवनी निरंत गंगोळी यांनी आभार व्यक्त केले.संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता पुस्तक प्रकाशन समितीतील श्री.बापूलाल तारे सर,श्री.रमेश बोंद्रे सर,प्रा.श्री.विजय बच्चे सर,डॉ.मिलिंद कोठावदे,श्री.जगदीश भोई,श्री.सुजीत पडवळकर,कु.अनुज गंगोळी तसेच गुरुकुलातील शिक्षक वर्ग,शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी अथक परीश्रम घेतले.पसायदानाने समारंभाची सांगता झाली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com