सचिन मुरलीधर शिंदे हे महागिरी कोळीवाडा परिसरात वास्तव्यास असलेले समाजसेवी व्यक्तीमत्व. लहानपणापासूनच समाजकारणाची आवड असल्याने विद्यार्थी दशेतच ठाणे शहर काँग्रेसमध्ये कार्यरत राहून त्यांनी अनेक आंदोलने, सामाजिक चळवळ, कामगार, विद्यार्थी, युवक यांचे प्रश्न सोडविण्यासाठी सक्रीय सहभाग घेतला. ठाणे शहर काँग्रेसचे माजी अध्यक्ष बाळकृष्ण पूर्णेकर यांच्या खांद्याला खांदा लावून विविध आंदोलनात रस्त्यावरची लढाई लढलेला सचिन शिंदे या ठाण्यानं पाहिलाय. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहु महाराज, क्रांतीसुर्य जोतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा वारसा, त्यांची प्रेरणा घेत सचिन शिंदे यांनी आपल्या समाजातील शेवटच्या घटकापर्यंत तळमळीने सामाजिक कार्य केले. माळी समाज मंडळ, ठाणे या संस्थेचे अध्यक्ष असताना माळी समाजाच्या उत्कर्षासाठी सचिन शिंदे यांनी शासन स्तरावर अनेक प्रश्न सोडविण्यासाठी लढा दिला. महागाई, बेरोजगारी, शैक्षणिक अशा विविध प्रश्नांवर त्यांनी शासन स्तरावर आंदोलने करीत जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न केला.
ठाणे शहर काँग्रेसचे प्रवक्तेपदी त्यांनी ठाण्यातील विविध प्रश्नांवर विरोधकांना जशास तसे उत्तर दिले. अभ्यासू, वैचारिक बैठकीतील आणि समाजाचे बारकावे जाणून घेणारा सचिन शिंदे तितकाच संवेदनशीलही होता. समाजाच्या शेवटच्या घटकाला न्याय मिळाला पाहिजे, या भुमिकेने कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता कार्य केले. ठाण्यातील महागिरी कोळीवाडा, खारटन रोड, खारकर आळी, चेंदणी कोळीवाडा या परिसरात हिंदु, दलित, मुस्लीम, मेहतर हर तर्हेचे, जाती वर्णाचे लोक एकत्र राहतात. या समाजातील प्रत्येक नागरिकांच्या सुख, दुःखात सचिन शिंदे यांचा सहभाग असायचा. शालेय परिक्षेत गुण मिळविलेला विद्यार्थी असो की एमपीएससी, आयपीएस झालेला तरुण असो त्यांचा जाहीर सत्कार करण्यासाठी तसेच आपल्या विभागातील गरीब, मागास विद्यार्थ्याला शैक्षणिक साहित्य वाटप, क्रीडा साहित्य वाटप करण्यासाठी सचिन शिंदे नेहमीच अग्रेसर असायचे.
खारटन रोडवरील लफाटा चाळीत राहणार्या ठामपाच्या कर्मचार्यांच्या उत्कर्षासाठी, त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी जगदीश खैरालिया सारख्या ज्येष्ठ सामाजिक चळवळीच्या कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन शिंदे यांनीही आपली कारकिर्द सुरु ठेवली. मराठी, कोळी, आगरी, साळी, माळी, कुणबी अशा सर्व समाज घटकांच्या सामाजिक कार्यात सहभागी होणारे सचिन शिंदे ओबीसी आणि मराठा चळवळीतही अग्रेसर होते. ठाणे शहर काँग्रेसच नव्हे तर शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय अशा सर्वच पक्षांचे नेते आणि पदाधिकार्यांसमवेत सचिन शिंदे यांचे मैत्री, स्नेहबंध कायम होते. तसेच ठाण्यातील पत्रकार बंधुमध्ये सचिन शिंदे यांची वेगळी छाप होती. ठाणे महापालिका, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय असो सर्वच ठिकाणी सचिन शिंदे यांचा वावर असायचा. अगदी हसतमुखाने सर्वांशी हस्तांदोलन करीत विनम्रपणे समोरचा कुणीही लहान-मोठा असला तरी आस्थेवाईकपणे विचारपूस करणारे सचिन शिंदे हे समाजप्रिय व्यक्तीमत्व होते. त्यांच्या जाण्याने ठाण्याच्या राजकीय, सामाजिक चळवळीत पोकळी निर्माण झाली आहे.
अजय जाधव.......
................................
"आपण बसलोय ते ठिकाण महापुरुषाचं नांव घेण्यासारखंही नाही आणि तुम्ही कसल्या चर्चा करताय महापुरुषांच्या. गप्प बसा. जेव्हा शुद्धीत असाल तेव्हा महापुरुषांच्या विचारांचा जागर घाला", असा दम देणारा आवाज आता कधीच ऐकू येणार नाही. एका ओल्या पार्टीत एका मित्राने जेव्हा महापुरुषांची चर्चा सुरू केली त्यावेळेस सचिननं हा दम दिला होता. लढणारे अनेक असतात पण युद्ध जगणारे जे काही मोजके लोक आहेत; त्यामध्ये सचिनचं नांव आवर्जून घेतलं जाईल. मुळचा काँग्रेसी किंवा फुले विचारधारेचा असलेला सचिन सुरुवातीच्या काळात एलआयसीमध्ये नोकरी करत होता. त्याचवेळी तो काँग्रेसमणध्येही सक्रीय होता. निवडणुकीच्या निमित्तानं त्याने एलआयसीची नोकरी सोडली. निवडणुकीत पराभुत झाल्यानंतर अनेकांनी त्याला पुन्हा नोकरी कर, एलआयसीत जा, असं सुचवलं. पण तत्वांशी बांधिल असल्याने त्याने पुन्हा नोकरीकडे ढुंकूनही पाहिले नाही. "मी माझं वजन वापरून पुन्हा नोकरी मिळविनही पण माझ्यामुळे रिकाम्या झालेल्या जागेवर जो बेरोजगार नोकरी करतोय त्याची नोकरी हिरावून घेण्याचा मला काय अधिकार?" , हा त्याचा नेहमीचा प्रश्न असायचा.
एक दिवस सामाजिक चळवळीचा विषय सुरू असताना त्याला मी म्हटलं, सचिन तु बर्यापैकी मोठा पुढारी आहेस... राजकारण करतोस, फुले, शाहु, आंबेडकरांचे नांव घेतोस पण तू ज्या समाजातून आला तो समाज राष्ट्रपिता जोतिराव फुलेंचा वारसदार आहे. या समाजाला एकत्र आणण्याचा प्रयत्न का नाही करत? सचिननं मला उत्तर दिलं नाही. पण साधारणतः पाच ते सहा महिन्यांनी त्याला फोन केला, 'संजा, तुला एका कार्यक्रमाला याचचं आहे'. मी गेलो आणि त्याच दिवशी त्यानं मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दिलं. त्याने ठाण्यातल्या सर्व माळी समाजाला एकत्र करून संघटना स्थापन केली. सचिन काय होता? कोण होता? यापेक्षा सचिन हा जीवाला जीव देणारा मित्र होता, एवढं मात्र निश्चित. बाळकृष्ण पुर्णेकरांच्या जाण्यानंतर खचलेला सचिन आता कुठे उभारी घेत होता. त्याचं असं अचानक जाणं ठाण्यातल्या पुरोगामी विचारधारेला नक्कीच परवडणारं नाही!
संजय भालेराव
0 टिप्पण्या