सरकारने तरुणांना दरवर्षी २ कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन देऊन फसवले, नोकर भरती केली नाही. परीक्षा देऊन भविष्य उज्वल करु पाहणाऱ्या लाखो मुलांच्या स्वप्नावरही सातत्याने पाणी फेरण्यात आले. आता NEET परीक्षेचा पेपर फुटल्याने २३ लाखांहून अधिक विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या स्वप्नांचा चुराडा आणि विश्वासघात केला. मोदी सरकार विद्यार्थांसाठीही शाप ठरले आहे असा घणाघाती हल्ला करत काँग्रेस पक्ष सत्तेत आल्यास पेपरफुटी विरोधात कठोर कायदा करण्याची काँग्रेसची गॅरंटी आहे, असा विश्वास मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष व उत्तर मध्य मुंबई मतदारसंघाच्या इंडिया आघाडीच्या उमेदवार प्रा. वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केला आहे.
यासंदर्भात प्रतिक्रीया देताना वर्षा गायकवाड म्हणाल्या की, मोदी सरकारने १० वर्षांत विद्यार्थ्यांसाठी काहीही केलेले नाही. मोदी सरकारच्या नाकर्तेपणाची किंमत आजचा तरुण वर्ग चुकवत आहे. शिक्षण क्षेत्रालाही धार्मिक रंग देण्याच्या नादात भाजपा सरकारने विद्यार्थ्यांच्या भविष्याचा खेळखंडोबा केला आहे. उत्तर प्रदेशात पोलीस भरतीचा पेपर फुटला, विद्यार्थ्यांनी तीव्र आंदोलन केले, या आंदोलनाला राहुल गांधी यांनी पाठिंबा दिला शेवटी जनतेचा रोष लक्षात घेऊन योगी सरकारला नमते घ्यावे लागले. महाराष्ट्रातही तलाठी भरतीचा पेपर फुटला असताना गृहमंत्री फडणवीसांनी मात्र तपास करण्याऐवजी पुरावे मागण्याचा निर्लज्जपणा केला. भाजपा सरकारमुळे तरुण पिढीचे अतोनात नुकसान झाले आहे. पेपरफुटी विरोधात कठोर कायदा बनवून करोडो प्रामाणिक तरुणांचे भविष्य वाचवण्यास काँग्रेस कटिबद्ध आहे, असेही वर्षा गायकवाड म्हणाल्या.
आज सकाळी महाविकास आघाडीचे उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघाचे उमेदवार भूषण पाटील यांच्या मध्यवर्ती निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या हस्ते करण्यात आले. दुपारी वाकोला, सांताक्रुज पूर्व येथील व्यापारी व स्थानिक रहिवाशी यांच्याशी संवाद साधला. कलिना विधानसभा मतदारसंघात रामदास चौक ते मॅच फॅक्टरी तसेच कुर्ला विधानसभा मतदारसंघातील पंचशील नगर ते पंढरीनाथ सेवा मंडल अशी जनसंवाद यात्रा काढण्यात आली. .
0 टिप्पण्या