महाराष्ट्रात डाव्या लोकशाही पक्षांना एकही जागा सुटलेली नाही. समाजवादी गणराज्य पार्टी देखील एकही जागा लढवत नाही. पण तरीही फॅसिस्ट नथुरामी राजवट संपवण्यासाठी या लक्ष लक्ष हातांनी परिवर्तनाची धगधगती मशाल हाती घेतली आहे. तुतारी फुंकली आहे.
काळाचौकीला भगतसिंग मैदानात मित्रवर्य भाई अरविंद गणपत सावंत यांच्यासाठी शेवटची प्रचार सभा झाली. स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी या सभेत मोदींची राजवट संपणार असल्याचा निर्वाळा दिला. महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी मंचावर होते. आपल्या छोट्याश्या भाषणात ते म्हणाले, 'ठाकरे परिवाराचे आमच्या परिवारावर उपकार आहेत.' राष्ट्रपित्याचा खून नथुराम गोडसेने केला. गांधीजींवर त्या आधी सहा प्राणघातक हल्ले झाले होता. त्यातले दोन कट प्रबोधनकार ठाकरे यांनी उधळून लावले होते. गांधीजींचे प्राण वाचवले होते. गांधीजींच्या पणतूने 'उपकार विसरू शकत नाही' असे शब्द वापरणे ही खूप मोठी गोष्ट आहे.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर विधान परिषदेत पाठिंबा जाहीर करताना याच इतिहासाचा दाखला मी दिला होता. महात्माजींचे प्राण प्रबोधनकार यांनी दोनदा वाचवले, त्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, नथुरामी राजकारणाला विरोध करण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना सभागृहात पाठिंबा जाहीर केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे समर्थक असलेले माझे एक डॉक्टर मित्र आहेत. ते म्हणाले, 'पंतप्रधान पदावरच्या माणसाने प्रचारात खालची पातळी गाठणं हे पटलं नाही.' शरद पवार यांना भटकती आत्मा म्हणणं, उद्धव ठाकरे यांना नकली संतान म्हणणं त्या माझ्या डॉक्टर मित्राला आवडलं नव्हतं.लाख मतभेद असले तरी ही भाषा काही योग्य नाही. शरद पवार यांना विरोध समजू शकतो. त्यांच्या योगदानाबद्दल खुद्द नरेंद्र मोदी यांनीच किती वेळा तारीफ केली होती ! अटल बिहारी वाजपेयी यांनी सुद्धा शरद पवार यांच्या कामाची बुज राखली होती. ज्यांना महाराष्ट्राचं सामाजिक भान आणि संस्कृती माहितेय ते शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द वापरणार नाहीत.
महाराष्ट्रातील समाजवादी चळवळीचे आणि संयुक्त महाराष्ट्राचे शिल्पकार असलेले एस. एम. जोशी यांनी पवार आणि ठाकरे या दोन्ही परिवाराशी स्नेहाचे संबंध राखले होते. एस. एम. जोशी यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा संयुक्त महाराष्ट्राची लढाई संघटीत करण्याचा प्रयत्न शरद पवार यांनी केला होता. तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी मार्मिकच्या मुखपृष्ठावर धगधगत्या मशालीच्या रुपात एस. एम. जोशी यांना रेखाटलं होतं. मोदी शहांच्या फॅसिस्ट राजवटी विरोधात शरद पवार यांनी पुन्हा एकदा तुतारी फुंकली आहे. उद्धव ठाकरे स्वतः मशाल बनले आहेत. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडीतल्या सगळ्या उमेदवारांच्या पाठीशी उभं राहणं ही काळाची गरज आहे. इंडिया आघाडीतील हे मोठे पक्ष उद्या काय करतील ? न्यायाची भाषा कृतीत उतरेल का ? समीकरणं नंतर बदलतील का ? सर्वांना सोबत घेऊन देशाचे भाग्य बदलतील का ? हे प्रश्न आज दुय्यम आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेलं संविधान वाचवणं, लोकशाही वाचवणं, धर्मनिरपेक्षता वाचवणं म्हणजेच देश वाचवणं एवढाच प्रश्न महत्त्वाचा आहे.
कपिल पाटील..... अध्यक्ष, समाजवादी गणराज्य पार्टी
....,.......,.......
मतदानाचा दिवस जवळ आला आहे सर्वांनी काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.
( माझ्या कार्यालयातील कर्मचारी मतदानाची ड्युटी करत आहे त्यादरम्यान त्यांनी अनुभवाने जाणवलेल्या गोष्टी)
- 1. मतदान केंद्रावर गेल्यानंतर दोन स्त्रिया आणि एक पुरुष अशा हिशोबाने आत घेतले जाणार आहेत. दोघांच्याही वेगवेगळ्या रांगा असणार आहेत. आणि आपले कोणतेही सरकार मान्य ओळखपत्र घेऊन जाण्यास विसरायचे नसते.
- 2. मतदान केंद्रावर ड्युटी करणारे लोक म्हणजेच खोलीत प्रवेश घेतल्यानंतर समोरच दिसणारे चार लोक हे त्याच्या मागे किमान 36 तास खाण्यापिण्याच्या, इतर नैसर्गिक विधींच्या आणि झोपण्याच्या वगैरे सर्व वेळा उलट्या पलट्या होऊन सुद्धा दिवसभर तिथे काम करत असतात आणि त्या दिवशी रात्रीपर्यंत सुद्धा करणार असतात. त्यामुळे कृपया आपल्याला रांगेमध्ये थोडा जास्त वेळ लागला तर त्यांच्याशी वाद घालून त्यांचे टेन्शन वाढवू नका.
- 3. मतदारांशी सौजन्याने वागावे असे ट्रेनिंग मध्ये त्यांच्यावर हॅमरिंग केलेले असते मात्र आपलंही ते कर्तव्य आहे हे ध्यानात असू द्या.
- 4. टीम मध्ये कार्यरत असलेले बरेचसे शिक्षक असतात. कारण शिक्षक हे प्रामाणिकपणे कार्य करत असतात, म्हणून त्यांना या कार्यासाठी घेतलेले असते. शिक्षक हे पिढ्या घडवणारे असतात त्यामुळे त्यांच्याशी सन्मानाने बोला.
- 5. खोलीमध्ये बसलेले हे एका दिवसाचे म्हणून असलेले ऑफिसर्स हे तुमचे नोकर नाहीत. तुमच्या सारखेच नोकरदार आहेत हे ध्यानात घ्या.
- 6. काही अति उत्साही मतदार स्वतःचे ज्ञान जरा जास्त वाढवून, अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊन मतदान खोलीमध्ये येऊन आपला बडेजाव किंवा शहाणपणा दाखवत उगाचच दिसेल त्या गोष्टींवर ऑब्जेक्शन घेण्याच्या कुरापती काढतात. असलं काहीतरी केलं तर त्या बसलेल्या ऑफिसरांच्या डोक्यावरचा लिखापढीचा ताण अधिक वाढवला जाणार असतो हे लक्षात असू द्या. त्यामुळे सर्व काही सुस्थितीत असेल तर शांतपणे मतदान करून बाहेर पडावे.
- 7. मतदान संपण्याची वेळ सहा ही आहे. त्यामुळे पावणेसहा नंतर येऊन किंवा अगदी सहानंतर म्हणजेच गावानंतर उशिरा येऊन सुद्धा मला कसा मतदानाचा अधिकार आहे असा जावईहक्क दाखवायला जाऊ नका. मतदान हे 6:00 वाजता कोणत्याही परिस्थितीत बंद करावे असे निवडणूक आयोगाने सक्त आदेश दिलेले असतात. त्यामुळे तिथल्या ऑफिसर्सची त्यावरून उगाच भांडू नका आणि वेळेतच या.
- 8. विनंतीच्या माध्यमातून हे ऑफिसर्स जे आपणाला सांगतात ते ऐका आणि त्याप्रमाणे मतदानाचे कार्य पार पाडा.
- 9. आणि माणुसकी जरा शिल्लक असेल, तर खोलीतील ऑफिसर्स ना "कसे आहात, फार हेक्टिक तर झालं नाही ना?" असे वरवरचे विचारपूस करणारे प्रश्न विचारायची मानसिकता ठेवा, म्हणजे त्यांना जरा हुरूप येईल.
- 10. मोबाईल्स बाहेर ठेवण्याचे आदेश आहेत, त्यामुळे ते आत मध्ये घेऊन स्वतःकडे ठेवण्याचा हट्ट करू नका. चुकून आत आणलाच, तर त्या ऑफिसर्स पैकी मुख्य जे ऑफिसर असतात त्यांच्या हातात द्या आणि ओळख पटवणे व प्रत्यक्ष मतदान झाल्यानंतर जाताना त्यांच्याकडून घ्यायला विसरू नका.
- 11. शाई लावून झाल्यानंतर मतदानाच्या कक्षाकडे म्हणजे मशीन कडे जाण्याच्या वेळेला किंवा बटन दाबून तिथून बाहेर पडण्याच्या वेळेला आपल्या पायामध्ये कोणतीही वायर अडकणार नाही ना याची खबरदारी घ्या. जमिनीला ती चिकटवून आधीच खबरदारी घेतलेली असते, मात्र तरीही कारण जर वायर अडकून कनेक्शन निघाले तर संपूर्ण मतदान प्रक्रिया ठप्प होईपर्यंत गोंधळ उडू शकतात. त्यामुळे गाफील पणे वरती इकडे तिकडे बघत चालू नका. नाहीतर वायर मध्ये पाय अडकेल आणि त्याचा सगळा दोष आतील ऑफिसर्स वर येईल. त्यामुळे त्यांच्यावर कृपा करा व डोळे उघडे ठेवून हालचाली करा.
- 12. बटन दाबल्यानंतर व्हीव्हीपॅट यंत्राकडे जरा नीट डोळे फाडून बघणे. आपण ज्या चिन्हाला मत दिले आहे त्याचीच चिठ्ठी पडत आहे ना, हे पहा त्यासाठी दहा वेळा त्या ऑफिसर्स घसा ताणून सूचना द्यायला लावू नका. उलट आपण अशा आश्वासक आणि आत्मविश्वासपूर्वक हालचाली करा, की त्यांना त्या तशा सूचना द्यायला लागू नयेत; आणि जरी दिल्या तरीही सन्मानाने त्यांना हो, ओके असे म्हणा. ते त्यांचे कर्तव्य करीत असतात.
- 13. कृपया अति आत्मविश्वासाने जास्तीच्या चौकशा करू नका. ते डोळ्यावर येऊ शकते आणि उगाच भलताच संशय तुमच्यावर तयार होऊ शकतो.
- 14. सतत अकरा 12 तास हे लोक अथक परिश्रम करत असतात. त्यामुळे आपण जर मधल्या निवांत वेळामध्ये दुपारी वगैरे आलो आणि जर त्यांच्यापैकी कोणी जेवत असताना अथवा शौचासाठी गेलेले असल्यामुळे जागा रिकामी दिसली, तर त्या बाबतीत आरडाओरडा करू नका. जरा थांबा. ते परत येतातच.
- 15. अति हुशारीने खोलीतल्या कोणत्या यंत्रणेला आपल्याकडून कोणते नुकसान अथवा धक्का पोहोचणार नाही याची नितांत काळजी घ्या. कारण ते सेटअप अतिशय काळजीपूर्वक लावलेले असते आणि त्यावर त्या ऑफिसर्स चे भवितव्य देखील अवलंबून असू शकते.
- 16. जास्त बडबड करण्याच्या नादात आपण कोणत्या पक्षाला किंवा उमेदवाराला मत दिले आहे हे जाहीर सांगू नका किंवा कोणाचीही जाहिरात होईल अशी वाक्ये उच्चारू नका. कारण असे प्रकार घडू नयेत यासाठी काळजी घ्यावी म्हणून तिथल्या ऑफिसर्स आणि पोलिसांना सक्त सूचना दिलेल्या असतात.
- 17. खोलीत गेल्या गेल्या पहिल्याच ऑफिसरकडे आपण जेव्हा जातो तेव्हा आपली ओळख योग्य पद्धतीने पटवून द्या. कारण जर तिथे काही चूक झाली तर पुढे बरेच गोंधळ त्यांनाही झेलावे लागतात आणि तुम्हालाही.
- 18. अंध अथवा अपंग व्यक्तींना आधी आत मध्ये घ्यावे अशा सूचना असतात. त्यामुळे त्यामुळे आमचा जास्त वेळ जातो आहे म्हणून वाद घालू नये.
- 19. आपल्याला जर का आपले मतदान खोली नेमकेपणाने माहीत नसेल किंवा असेल जरी, तरी बाहेर जे बी एल ओ बसलेले असतात त्यांच्याकडून खात्री करून मगच रांगेला लागावे. कारण मग आपण चुकीच्या खोलीच्या बाहेर रांगेत तासभर उभे राहिल्यानंतर खोलीत गेल्यावर जर असे समजले की आपले मतदान दुसऱ्याच खोलीमध्ये आहे तर तुमचीच चिडचिड होऊ शकते. आपले नाव ज्या खोलीमध्ये आहे त्याच खोलीमध्ये मतदान करायचे असते. दुसरीकडे काही केल्या करता येत नाही याची नोंद घ्या.
- 20. शक्यतो गर्दीच्या वेळा टाळाव्यात. दुपारी ऊन असले तरी सुद्धा थोडीशी कळ काढून मतदानाला यावे, म्हणजे राहिलेल्या इतर वेळामध्ये मतदान केंद्रातल्या ह्या लोकांवर ताण येत नाही.
आपल्या एका बोटाने देश वाचेल ... लोकसभा निवडणुकीचा महाराष्ट्रातील शेवटचा टप्पा 20 मे रोजी पार पडणार आहे. फुले, शाहू, आंबेडकरी विचारांचा महाराष्ट्र स्पष्ट कौल देणार आहे. देशाचा निकाल तीन राज्यं फिरवणार आहेत. पश्चिम बंगाल, महाराष्ट्र आणि कर्नाटक. खुद्द उत्तर प्रदेशात खिंडार पडलं आहे. जनता गेल्या 10 वर्षातली फॅसिस्ट राजवट संपुष्टात आणणार आहे.
0 टिप्पण्या