भारतभर ७०० कोटी फळझाडे लावण्याच्या कृती कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपण प्रत्यक्ष सहभाग घेण्याचे आश्वासन इको फ्रेन्डली लाईफचे संस्थापक अध्यक्ष सर अशोक एन. जे. यांना दिले. मुख्यमंत्री महाबळेश्वर येथील दरेगाव दौऱ्यावर असताना त्यांच्या निवासस्थानी इको फ्रेन्डली लाईफ संस्थेच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली आणि येणाऱ्या पर्यावरण दिनापासून संपूर्ण भारतभर हा उपक्रम राबवण्यास सुरुवात करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांना सांगितले. मुख्यमत्र्यांनी या उपक्रमाचे स्वागत करीत आपण या कार्यक्रमात प्रत्यक्ष सहभागी होणार असल्याचे आश्वासन दिले. यावेळी संस्थेचे प्रमुख अशोक एन. जे.यांच्यासोबत महाराष्ट्रातील विविध ठिकाणचे प्रमुख पर्यावरण प्रेमी ठाण्यातून कुणाल बागुल, किशोर बनकर, तसेच नवी मुंबईतून सागर झेंडे आणि मुंबईतून राहुल गायकवाड हे प्रामुख्याने उपस्थित होते.
५ जून २०२४ या जागतिक पर्यावरण दिनापासून इको फ्रेंडली लाईफ फाउंडेशन ने देशभरात ७०० कोटी फळझाडे लावण्याचा निर्धार केला आहे. प्रत्यक्ष कृती कार्यक्रमाची माहिती पुस्तिका यावेळी मुख्यमंत्र्यांना देण्यात आली. या कृती कार्यक्रमाची सुरवात मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यातून होत आहे. मुरबाड तालुक्यातील म्हसा गावात १०,००० फळझाडे लावून त्या गावाचे आदर्श मॉडेल संपूर्ण देशापुढे ठेवण्यात येईल अशी माहिती संस्थेचे अशोक एन. जे. यांनी मुख्यमंत्र्यांना दिली. याबाबत मुख्यमंत्र्यांनी तात्काळ ठाण्यात १० लाख झाडे लावण्यात यावी असा मानस व्यक्त केला. तसेच साताऱ्यात किती झाडे लावण्यात येतील अशीही विचारणा केली. यावर किमान ७ लाख फळझाडांचे बिजरोपण साताऱ्यात केले जाईल अशी अशोक एन. जे. यांनी ग्वाही दिली. वाढत्या तापमानाच्या विळख्यातून देशाला वाचवण्यासाठी आणि संपूर्ण फळझाडानी बहरलेल्या समृद्ध भारताची निर्मिती करण्याकरिता एकच विचार, एकच लक्ष्य! भारतभर ७०० कोटी वृक्ष! या इको फ्रेंडली लाईफच्या विचारांचे आणि कृती कार्यक्रमाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भरभरून कौतुक केले. तसेच शासन आपणा सोबत असल्याचे सांगून ५ जून या पर्यावरण दिनी मुरबाड येथील म्हसा या गावी ७०० कोटी फळ झाडे लावण्याच्या शुभारंभ कार्यक्रमा करिता मुरबाड येथे आपण हजर राहणार असल्याचे आश्वासन दिले.
0 टिप्पण्या