महाराष्ट्रामध्ये दुष्काळाच्या झळा अधिक तीव्र होताना दिसून येत आहे, सातारा सांगली आणि सोलापूर या तिन्ही जिल्ह्याच्या माणदेशी प्रांतामध्ये सांगोला, आटपाडी, माण, फलटण प्रवास करत असताना उन्हाच्या प्रचंड झळा जाणवत असताना पाण्यासाठी लोकांची वणवण होताना दिसत होती.
गावाच्या व शहराच्या जवळपास टँकरची वाट पाहणारी मंडळी आणि आपल्याकडे असणारी मोठे टप, बॅलर, छोटी-मोठी भांडी घेऊन ठीक ठिकाणी ज्या पद्धतीने बस साठी लोक थांबतात तशा पद्धतीची माणसं पाण्याच्या टँकर साठी थांबलेली दिसून येत होती. दोन दिवसा आड गावात पाणी येतं, असं महिलांचं म्हणणं होतं. काही ठिकाणी पाण्याच्या साठवण करण्याची व्यवस्था केलेली आहे, तर काही ठिकाणी बोरवेल काढून पाणी उपलब्ध होत आहे, मोठे मोठे असणारे पाण्याचे तलाव पूर्णतः सुकून गेलेले आहेत, नदीपात्र पूर्ण कोरडी ठणठणीत दिसून येतात, वीर धरण पाण्याचा साठा कमी झालेला दिसून येतोय, तर पाण्याची पातळी पावसाळ्यात जेवढी असते तेवढे एक दोन किलोमीटरचा अंतर आत मध्ये गेलेले दिसून येतं.
सातारा, सांगली व सोलापूर जिल्ह्यातील सधन भागांमधून दुष्काळी भागामध्ये प्रवास करताना एका बाजूला साधने दिसत आहेत आणि दुसऱ्या बाजूला ओसाड असणारा भाग दिसत आहे. वरील जिल्ह्यांमधील दोन भाग केल्यासारखे परिस्थिती वाटते, निरा,धोम व कृष्णाकाठच्या पाणीदार भागामधीन पुणे, बारामती, इंदापूर, अकलूज- माळशिरस, वाई सातारा, कराड,पलूस, कडेगाव. तर रखरखत्या उन्हातील ओसाड असणारा फलटण पश्चिमेकडील दुधेबावी घाटाकडील भाग व माण, खटाव मधला काही भाग तसेच सांगोला व आटपाडी तालुका.
३०-४० वर्षा पूर्वी जे राज्यकर्ते व धोरणकर्ते तसेच या भागामधील नेतृत्व करणाऱ्या लोकांनी या भागामध्ये दुष्काळी पट्ट्यामध्ये पाणी घेऊन जाण्याच्या दृष्टीने प्रयत्न केलेले असतील मात्र आजही हा दुष्काळी भाग तसाच कोरडा ठप्प पडलेला आहे. बाकी भागाचे नेतृत्व करणाऱ्या मंडळींच्या भागांमध्ये पाणी दिसत आहे. हा थोडासा विरोधाभास विकासाच्या दृष्टीने पाहणाऱ्यांनी निश्चितपणाने अभ्यासाची गरज आहे आणि या परिस्थितीमध्ये हा प्रश्न निश्चितपणानं दुष्काळी भागातील माणसांना पडल्याशिवाय राहणार नाही, की आमच्या हक्काचं पाणी कुणी आपल्याकडे वळवलय का? ते त्यांना परत मिळणार का? अशीच परिस्थिती म्हणावी लागेल.
लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने या देशाचं आधुनिकतेकडे जाणार स्वरूप आणि वेगवेगळ्या राजकीय पक्षातील पुढार्यांनी विकासाची दृष्टी मांडत होते, आम्ही मुंबई बसून टीव्हीवर हे पाहताना दुष्काळाची दाहकता वाटत नव्हती मात्र ज्यावेळेस या दुष्काळाच्या झळा अनुभवल्यानंतर त्याचं वेगळे स्वरूप आणि खरोखरच काही प्रश्न पडतात, विकासाच्या मुद्द्यावर आपण अग्रेसर आहोत का? कोणता विकास आपल्याला अपेक्षित आहे? स्वातंत्र्याच्या अमृत वर्षात गाव खेडी आणि तिथल्या असणार ओसाड माळरानात कधी पाणी येईल?
दुधेबावीच्या तिकडे म्हसवड वरून येत असताना अक्षरशः करपलेली झाड आणि माणसांच्या पाण्यासाठीची अडचण पाहिल्यानंतर आपण कोणत्या विकासाकडे आगे कुच करत आहोत, यावर विश्वास बसत नाही. आपण नद्याजोड प्रकल्प, सिंचनाच्या योजना, पाणलोट विकासाच्या गोष्टी, झाडे लावा, पाणी आडवा पाणी जिरवा या सगळ्या घोषणा जुमला असल्यासारखे वाटत आहे. सदर परिस्थितीमध्ये प्रशासन त्यांच्यावर लक्ष देत असेल पण कदाचित या आचारसंहिताच्या कालखंडामध्ये राजकीय वातावरण तापलं असताना या दुष्काळ सदृश्य परिस्थितीकडे थोडंसं दुर्लक्ष झाल्यासारखं वाटतंय. आता प्रशासकीय यंत्रणेने सतर्कपने पाठपुरावा करणे गरजेचे आहे. मात्र धोरणात्मक पातळीवर नियोजन झालं तरच या भागचा दुष्काळ जाऊ शकेल, नाहीतर ये रे माझ्या मागल्यासारखं, दुष्काळावर चर्चा होईल पाऊस येई पर्यंत. निवडणुकीमध्ये आश्वासन दिली जातील आणि प्रशासकीय यंत्रणा सुस्त. अश्या पद्धतीचे धोरण असल्यामुळे या लोकांना दुष्काळातच राहण्याची परिस्थिती निर्माण होईल आणि पावसाळ्याची वाट बघत, दुष्काळी प्रांतामधला समाज आपले प्रश्न अशाच पद्धतीने रेंगाळत राहतील असा समज करून पुढचा पावस कधी येईल याची वाट पाहिली.
- प्रवीण मोरे
- रिपब्लिकन सामाजिक कार्यकर्ता... खारघर, नवी मुंबई
- दिनांक २४ मे २०२४... आटपाडी ते मुंबई प्रवास..
0 टिप्पण्या