Top Post Ad

बाबासाहेबांच्या अंत्ययात्रेचे लाईव्ह शूटिंग

 १९५६ साली आमचा जन्मच झाला नव्हता. तरीसुध्दा माझ्यासारख्या अनेकजणांना बाबासाहेबांची महापरिनिर्वाणाची न भुतो न भविष्यती अशी अभूतपूर्व अंत्ययात्रा पाहता येते. याचं सर्व श्रेय हे कोल्हापूरचे काँग्रेसचे आमदार नामदेव व्हटकर यांना जाते. त्यावेळी आजच्यासारखे अँड्रॉइड फोन नव्हते. जे काही करायचे ते कॅमेरातूनच शूटींग करावे लागे. बाबासाहेबांचे दिल्लीत महापरिनिर्वाण झाल्याची खबर ऐकताच व्हटकरांनी मनोमन प्रण केला की, आपण बाबासाहेबांच्या अंत्ययात्रेचे लाईव्ह शूटिंग करायचेच. मग याबाबतीत त्यानी प्रोफेशनल कॅमेरामन केदार शर्मांना विचारणा केली. त्यांनी नकार दिला. पण व्हटकरांनी जिद्द सोडली नाही. निगेटिव्ह, कॅमेरा, कॅमेरामन यासाठी १४०० रुपयाचा खर्च येणार होता. विचार करा की, त्या काळातले एक हजार म्हणजे आताचे एक लाख होय. इतके पैसे व्हटकरांकडे नव्हते. मग व्हटकर, मोरबाग रोडवरील मारवाड्याकडे गेले आणि त्यांनी त्याच्याकडे आपला छापखाना गहाण ठेवून त्याबदल्यात दीड हजार रुपये घेतले. कॅमेरामन शंकरराव सावेकर यांच्याकडून दिडशे रुपये भाड्याने कॅमेरा आणला. सावेकरांकडून काही फ्लड लाईट्स घेऊन ते राजगृहासमोर येऊन उभे राहिले. ज्यावेळी बाबासाहेबांचं पार्थिव ट्रकमध्ये ठेवण्यात आले त्यावेळी व्हटकर व सावेकर कसेबसे ट्रकवर चढून एक कोपरा घेऊन उभे राहिले. आणि पहिला शाॅट त्यांनी दादरच्या खोदादाद सर्कलवर घेतला. २८०० फूट फिल्मचे त्यांनी शूटींग केले. त्यानंतर फिल्म प्रोसेससाठी व रश प्रिंट  एडिट करण्यासाठी २५० रुपये डिपॉझिट व नंतर फिल्म धुणे, दुसरी पाॅझिटिव्ह आणून  तिच्यावर रश प्रिंट काढून तिचे  एडिटींग करण्यासाठी ३०००/- रुपये खर्च लागणार होता. मग पुन्हा व्हटकर त्याच सावकाराकडे गेले. मोरबाग रोडवरील भावनगरी काॅटेजमधला आपला डबल रुम फ्लॅट गहाण ठेवून ३०००/- रुपये कर्ज घेतले. आणि हा संकल्प पूर्ण झाला. त्यावेळी बाबासाहेबांवर डाॅक्युमेंटरी केली म्हणून काँग्रेस नेतृत्वाने त्यांना झापलेसुध्दा. पण व्हटकर म्हणाले, मी जरी काँग्रेसचा आमदार असलो तरी मी मनाने बाबासाहेबांचा अनुयायी आहे. अशा या नामदेवराव व्हटकरांची आंबेडकरी जनता कायमच ॠणी राहिल. अशा या नामदेवराव व्हटकरांची नात म्हणजे व्हटकरांच्या मुलीची मुलगी म्हणजे डाॅक्टर चित्रलेखा कळंबे होय. करोना काळात त्यांनी अनेक लोकांना रस्त्यावर उतरुन मदत केली, आधार दिला. याबाबत त्यांना अनेक संस्थांनी सन्मानित केले आहे.  ठाणे सिटिझन फाऊंडेशन, संत कक्कय्या विकास मंडळ या सारख्या अनेक संस्थांनी त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा गौरव केला आहे. याव्यतिरिक्त त्यांची विशेष ओळख सांगायची तर त्यांनी सम्राट अशोकांवर एक हजार ऐंशी पानाचे दोन खंड लिहले आहेत. या संदर्भ ग्रंथाचे नाव आहे, 'प्राचीन भारताचा संक्षिप्त इतिहास आणि प्रियदर्शी अशोक'. अशा नामदेवराव व्हटकरांची अभ्यासू व प्रतिभावंत असलेली नात डाॅक्टर चित्रलेखा कळंबे उद्याच्या म्हणजेच एक जूनच्या उठावच्या कविसंमेलनात अध्यक्ष म्हणून ऐरोलीत येत आहेत. उठाव परिवाराच्या वतीने आम्ही त्यांचे हार्दिक स्वागत करत आहोत. जयभीम!

              - विवेक मोरे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com