Top Post Ad

भोंगळ कारभारामुळे निवडणुकीची टक्केवारी घटली...?

 


 मतदानाची टक्केवारी अधिकाधिक वाढावी यासाठी मागील महिन्याभरापासून निवडणूक आयोग कोणत्या ना कोणत्या माध्यमातून जाहीराती करीत आहे.  प्रसार माध्यमांचा, सोशल मिडीयाचा वापर करीत प्रत्येक नागरिकांनी मतदान करणे आवश्यक असल्याचे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात येत होते. मात्र प्रत्यक्षात नागरिकांनी निवडणुक प्रक्रियेत सहभागी होऊच नये अशा पद्धतीचे वातावरण एकूणच मुंबईसह ठाण्यात निर्माण झाल्याने अनेक नागरिकांनी संताप व्यक्त केला. मुळात ४८ मतदार संघ असलेल्या महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणूक घेण्यात आली. तसेच मुंबई-ठाणे-नाशिक सारख्या शहरी भागात सोमवारी निवडणूक होती. या दिवशी सुट्टी जाहीर करण्यात आली. परिणामी इथला उच्चभ्रू वर्ग विकेन्डचे तीन दिवस मिळाल्याने पिकनिकला पोहोचला. हेच इथल्या व्यवस्थेला अपेक्षित होते. त्यातच जो काही लोकशाही मानणारा वर्ग मतदानासाठी बाहेर पडला त्याला संथ गतीने मतदान प्रक्रीया सुरू असल्याने उष्णतेचा मारा सहन करीत  ताटकळत रांगेत उभे रहावे लागले. परिणामी अनेकांनी घरी जाणे पसंत केले.  घड्याळाच्या काट्यावर धावणारी मुंबई, ठाण्यासारखी शहरं. एक एक एक मिनीट महत्वाचा असताना निवडणूक आयोगाच्या सुस्तावलेपणामुळे अनेकांना मतदानापासून वंचित रहावे लागले. 

 मुंबई आणि उपनगरात अशा अनेक घटना समोर आल्या.  मोठ्या रांगा आणि उन्हाचा तडाखा यामुळे अनेक मतदार मतदान न करताच परत फिरल्याचं दिसून आलं. पवईत घडलेल्या या प्रकारावर अभिनेते आदेश बांदेकर यांनी संताप व्यक्त केला. तसेच मुंब्रा येथील मतदान केंद्रावर मतदारांच्या प्रचंड मोठ्या रांगा लागल्या होत्या. अनेक मतदान केंद्रांवर अशीच परिस्थीती असल्याचे म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी  याकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला. पालघरच्या डहाणूतील वाघाडी येथे सहा वाजून गेले तरी देखील मतदान केंद्राबाहेर 300 हून अधिक मतदार रांगेत उभे असल्याच समोर आल आहे . या मतदान केंद्रावर असलेलं ईव्हीएम मशीन स्लो चालत असल्याने मतदानास विलंब होत असल्याचा आरोप वाघाडी ग्रामपंचायत चे सरपंच यांनी केला आहे . सहा वाजून गेले असताना देखील शेकडो मतदार रांगेत ताटकळत उभे असून सकाळपासून हीच परिस्थिती असताना देखील प्रशासनाने कोणत्याही उपाययोजना केल्या नसल्याचा आरोप देखील वाघाडी ग्रामपंचायतचे सरपंच यांनी केला आहे. 


महाराष्ट्रातील 13 जागांसाठी मतदानाचा पाचवा आणि अखेरचा टप्पा पार पडला. हा अखेरचा हाय व्होल्टेज टप्पा दोन गटाच्या आमने-सामने वादामुळे प्रचंड गाजला.  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांना भांडूपमध्ये पोलिसांनी ताब्यात घेतल्यानं मोठा तणाव निर्माण झाला. मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीनचा डेमो ठेवल्याने पोलिसांनी ही कारवाई केली असल्याचे सांगण्यात येत आहे. या कारवाईमुळे आमदार सुनील राऊत यांनी संताप व्यक्त करीत कार्यकर्त्यांना अटक न करण्याची पोलिसांना तंबी दिली. तर ओशिवरामध्येही भाजप व ठाकरे गटामध्ये वाद झाला. भाजपचा झेंडा असलेली गाडी मतदान केंद्रावर नेल्याचा आरोप ठाकरे गटानं केल्यानं खळबळ उडाली. राज्यातील बदललेल्या राजकीय समीकरणांनंतरची ही पहिलीच सार्वत्रिक निवडणूक आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी ठाकरे-शिंदे दोन्ही गट आमनेसामने आल्याचे पाहायला मिळाले.

ईव्हीएम मशिन बंद असल्याचा प्रकार समोर आल्यानंतर जनतेच्या आक्रमकतेमुळे निवडणूक आयोगाने सायंकाळी सहा वाजेपर्यंत जे मतदार मतदान केंद्रावरील रांगेत असतील त्या सर्वांना मतदानाचा हक्क बजावता येईल असे जाहिर केले. अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ.किरण कुलकर्णी यांनी मतदारांना यासंदर्भात आवाहन केले. 

निवडणूक आयोग पक्षपातीपणा करत आहे.  कितीही उशीर झाला तरी हटू नका, मतदान करा - उद्धव ठाकरे (शिवसेना)

मी सर्वसामान्य मतदार म्हणून मतदान करायला आलो आहे. कोणी दिग्दर्शक किंवा अभिनेता म्हणून मतदान करायला आलेलो नाही. माझ्या त्रासाइतका त्रास इतरांना झाला आहे. कधीच असे होत नाही. 15 मिनिटात मतदान करुन आम्ही गेलो आहे. हे पहिल्यांदाच होत आहे. जवळपास साडेतीन तास मतदान केंद्रावर आहे. मतदान केल्याशिवाय जाणार नाही, - केदार शिंदे 

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात 8 राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील 49 मतदारसंघांमध्ये सोमवारी सरासरी 56.68 टक्के मतदान झालंय. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सर्वात जास्त मतदान पश्चिम बंगालमध्ये ७३ टक्के तर सर्वात कमी 48.66  टक्के मतदानाची नोंद महाराष्ट्रात झाली.  महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील १३ जागांवर सायंकाळी ६ वाजता मतदान संपलं तेव्हा  48.66 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघात सर्वात कमी म्हणजे 41.70 टक्के मतदान झालं तर दिंडोरीत सर्वाधिक 57.06 टक्के मतदान झाले आहे. मात्र पाच टप्प्यातील हे सर्वात निचांकी मतदान झालं आहे. काही ठिकाणी ७ नंतरही मतदान सुरू होतं, 

  • महाराष्ट्रातील १३ मतदारसंघात झालेलं मतदान
  • भिवंडी- 48.89 टक्के
  • धुळे- 48.81 टक्के
  • दिंडोरी- 57.06 टक्के
  • कल्याण - 41.70 टक्के
  • मुंबई उत्तर - 46.91 टक्के
  • मुंबई उत्तर मध्य - 47.32 टक्के
  • मुंबई उत्तर पूर्व - 48.67 टक्के
  • मुंबई उत्तर पश्चिम - 49.79 टक्के
  • मुंबई दक्षिण - 44.22 टक्के
  • मुंबई दक्षिण मध्य- 48.26 टक्के
  • नाशिक - 51.16 टक्के
  • पालघर- 54.32 टक्के
  • ठाणे - 45.38 टक्के
  • देशात पाचव्या टप्प्यात झालेलं मतदान
  • बिहार - 52.35
  • जम्मू काश्मीर - 54.21
  • झारखंड - 61.90
  • लडाख - 67.50
  • महाराष्ट्र - 48.66
  • ओडिसा - 60.55
  • उत्तर प्रदेश - 55.80
  • पश्चिम बंगाल - 73.00

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com