राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांच्या शिक्षण आराखड्यामध्ये भगवत गीता, मनाचे श्लोक आणि मनुस्मृतीतील श्लोकांचा समावेश करण्यात आला आहे. यावरुन राजकीय वाद-प्रतिवाद सुरु झाले आहेत. नव्या शिक्षण आराखड्यामध्ये प्राचीन ज्ञानवारसा जपूया या या मथळ्याखाली पाठांतर स्पर्धेचे आयोजन करण्याचा प्रस्ताव आहे. याअंतर्गत 1 ते 25 मनाचे श्लोक हे इयत्ता तिसरी ते इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांना स्पर्धेत पाठांतरासाठी असतील. तसेच 25 ते 50 क्रमांकाचे मनाचे श्लोक हे इयत्ता सहावी ते इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांना पाठांतरासाठी असतील. त्याचप्रमाणे भगवदगीतेचा अध्याय 12 वा 9 व्या इयत्तेपासून 12 व्या वर्गापर्यंतच्या विद्यार्थ्यांना पाठांतरासाठी असेल, असा प्रस्ताव आराखड्यात आहे. तसेच मूल्ये आणि स्वभाववृत्तीच्या अध्ययनासाटी मनुस्मृतीमधील श्लोकांचासमावेश केल्याचं आराखड्यात दिसत आहे. हा एकूण 336 पानांचा आरखडा आहे. या आराखड्यावर आक्षेप आणि सूचना मागवण्यात आल्या आहेत.
भाजपा-आरएसएस संविधान बदलून देशात मनुस्मृती लागू करू पाहत आहेत हे उघड आहे. लोकसभेत ४०० जागांच्या बहुमतासह सत्ता मिळाली की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान बदलणार अशी जाहीर भाषा भाजपाच्या नेत्यांनी केली आहे आणि आता नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार जाहीर झालेला महाराष्ट्र राज्याच्या शालेय अभ्यासक्रम आराखड्यात (एससीएफ) मूल्ये आणि स्वभाववृत्ती या घटकाची सुरुवात मनुस्मृतीतील श्लोकाने करण्यात आली आहे. ज्या मनूस्मृतीमुळे वर्णव्यवस्था निर्माण केली, बहुजन समाजाला शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे पाप केले, ज्या मनूस्मृतीमध्ये महिलांना समाजात दुय्यम स्थान देण्यात आले आणि ज्या मनुस्मृतीला महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या हातांनी जाळले त्याच मनुस्मृतीचा अभ्यास शाळेकरी विद्यार्थांनी करायचा का? असा संतप्त सवाल वर्षा गायकवाड यांनी केला आहे.
डॉ. मनमोहन सिंह सरकारने आणलेल्या शिक्षण हक्क कायद्यानुसार १४ वर्षांपर्यंत प्रत्येक मुलाला शिक्षणाचा अबाधित हक्क दिला गेला आहे, त्यांना शाळेतून काढून टाकता येत नाही. मात्र एससीएफमध्ये हा हक्क देखील हिरावून घेण्याचा प्रयत्न केला गेला आहे. एखाद्या विद्यार्थ्याने गैरवर्तन केल्यास त्याला शाळेतील प्रवेश रद्द करण्याची किंवा शाळेतून कायमची हकालपट्टी करण्याची अन्यायकारक तरतूद करण्यात आली आहे. यालाही काँग्रेसचा तीव्र विरोध राहील. मविआ सरकार असताना सर्व माध्यमांच्या, सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये मराठी भाषा सक्तीची केली होती मात्र, एससीएफमध्ये त्याबद्दल ही विसंगती दिसून येते. शिवाय इंग्रजी भाषेला 'परकीय भाषा' म्हणून वर्गीकरण करण्याचे धोरण देखील विद्यार्थीविरोधी आहे. भाजपा सरकार हे समाजाच्या एकात्मतेला, समतेला आणि लोकशाहीला धोका निर्माण करणारे असल्याने त्यांना धडा शिकवला पाहिजे, असेही वर्षा गायकवाड म्हणाल्या.
मनुस्मृतीतील श्लोकांचा अभ्यासक्रमात समावेश करण्याच्या प्रस्तावाला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी जोरदार आक्षेप घेतला आहे. मनुस्मृतीतील श्लोक अभ्यासक्रमात खपवून घेणार नाही असा इशारा नाना पटोलेंनी दिला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया नोंदवताना, शालेय पुस्तकाचे रिराईट करण्याची बातमी चिंताजनक असल्याचं म्हटलं आहे. "यावरून राज्य सरकारची मानसिकता कळतेय. याबाबत शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ज्ञांनी लक्ष घालावं," असं शरद पवार म्हणाले.
फक्त एकाच धर्माच्या अभ्यासक्रमाचा जर समावेश केला तर, इतर सर्व समाजामध्ये एक तेढ निर्माण होऊ शकतो. कारण या देशांमध्ये हिंदू, मुस्लिम, बौद्ध, सिख, ईसाई, पारसी, असे अनेक समुदायाचे लोक हे अनेक वर्षापासून गुण्या गोविंदाने या देशात एकत्रपणे रहात आहेत. हिंदू धर्मग्रंथाच्या अभ्यासक्रमांचा समावेश या पाठ्यक्रमामध्ये असेल तर,इतर धर्माच्या धर्म ग्रंथांचाही त्या पाठयक्रमात समावेश झालाच पाहिजे. म्हणजे येणाऱ्या पिढीला सर्व धर्मांचा आणि त्यांच्या धर्मग्रंथांचा सर्वतोपरी अभ्यास असेल. त्यामुळे समाजात कोणतीही मोठी धार्मिक आणि जातीय दरी निर्माण होऊ शकणार नाही. त्यामुळे, मनुस्मृति आणि मनाचे श्लोक, कुराण, बायबल, धम्मपद, गुरु ग्रंथ साहिब, या सर्वधर्म ग्रंथांचा या अभ्यासक्रमात समावेश करा. - दिलीप सिंग विश्वकर्मा. महापॅरेंट्स पुणे
-------------------------------------------------------------
विषय - राज्य अभ्यासक्रम आराखडा (शालेय शिक्षण) 2024 मसुद्यावर प्रतिक्रिया नोंदविण्याबाबत*
इयत्ता 3 री ते 12 वी इयत्तांचा अभ्यासक्रम, पाठ्यक्रम तयार करणेसाठी मार्गदर्शक ठरणारा राज्य अभ्यासक्रम आराखडा (शालेय शिक्षण)- 2024 मसुदा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे मार्फत तयार करण्यात आला आहे. सदर मसुदा परिषदेच्या https://www.maa.ac.in/index.php?tcf=scf_se या संकेतस्थळावर दिनांक. 23/05/2024 पासून जनतेच्या प्रतिक्रियांसाठी खुला करण्यात आला आहे. राज्य अभ्यासक्रम आराखडा (शालेय शिक्षण)- 2024 मसुद्याबाबत सर्व समाज घटक यांनी आपले अभिप्राय दिनांक. 03/06/2024 पर्यंत खालील लिंकवर नोंदवावेत अथवा पोस्टाने पाठवावेत असे आवाहन करण्यात येत आहे.
अभिप्राय नोंदविण्याचा कालावधी दिनांक- 23/05/2024 ते 03/06/2024
अभिप्राय नोंदविण्यासाठी LINK https://forms.gle/7r5ZRR7eYZ9WtUZ17
(राहूल रेखावार,भा.प्र.से.)
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे.
0 टिप्पण्या