भाऊराव पाटील यांचे वडिल पायगोंड पाटील इस्लामपूरला तालुका कचेरीत लिपिक म्हणून नोकरी करीत होते. वडिलांना भेटायला ते इस्लामपूरला निघाले होते. तिथल्या मराठी शाळेसमोरून जात असताना भाऊराव पाटलांना एक थोडंसं वेगळं दृश्य दिसलं. शाळेत २३-२४ मुलं बसली होती. एक बारकुळा मुलगा शाळेच्या पडवीत बसलेला आहे. त्याला बसून फळ्यावरचं दिसत नाही. तो उभा राहतो. फळ्यावरचं वाचून खाली बसतो. पाटीवर लिहितो. पुन्हा उठून फळ्यावरचं बघतो. भाऊराव पाटील यांना ते वावगं वाटलं. ते शाळेत गेले. त्याला विचारलं, कारे पडवीत बसलायंस? तर तो म्हणाला मी नेहमी इथंच बसतो. मला वर्गात बसायला देत नाहीत. मी म्हाराचा आहे.
भाऊराव पाटील म्हणाले, महार असशील किंवा मांग असशील, तू वर्गातच बसला पाहिजेस. विद्यार्थी आहेस. भाऊरावांना तेव्हा काळी दाढी होती. त्यामुळं ते पोरगं बावरून बघत होतं. त्यांनी मास्तरला विचारलं, तर मास्तर म्हणाला, मी त्याला वर्गात बसवलं तर शाळेतली सवर्ण मुलं निघून जातील.
अण्णा म्हणाले, ज्याला जायचं ते जाऊ दे. पण या मुलाचा हक्क त्याला मिळाला पाहिजे.
मास्तरला भाऊराव पाटलांचे विचार पचेनात. आणि भाऊरावांना मास्तरचं म्हणणं पटेना.
भाऊराव त्या मुलाकडं गेले अणि म्हणाले चल रे, मी तुझं शिक्षण करतो. त्याचं बोट धरलं. थोडावेळ ते पोरगं अण्णांच्या खांद्यावर बसायचं. थोडं चालायचं. थकलं की खांद्यावर घ्यायचे. दोन दिवसाचा प्रवास करून ते पन्नास किलोमीटर अंतरावर कोल्हापुरात आले. त्याला कोल्हापूरच्या राजवाड्यावर आणलं.
काय रे भाऊ पाटील, पोरगं कुठून आणलंस?
शाहू महाराज मोठे. प्रश्नही मोठा.
बरं केलंस. नाहीतरी तिथं त्याचं शिक्षण झालं नसतं. मी करतो शिक्षण.
शाहू महाराजांनी आपल्या देखरेखीखाली शिक्षण केलं. तो मुलगा त्या काळात मॅट्रिक पास झाला. दलित समाजातील मुलं मॅट्रिकपर्यंत जात नसत. नुसता मॅट्रिक झाला नाही तर अण्णा आणि शाहू महाराजांच्या सानिध्यात वाढ झाल्यामुळं सरकारी नोकरीत न जाता सामाजिक क्षेत्रात काम करू लागला. १९२०च्या सुमारासची गोष्ट. डॉ. बाबासाहेब आंबेडकर बॅरिस्टरीच्या अभ्यासासाठी लंडनला गेले. शाहू महाराजांनीच त्यांना मदत केली होती. तेव्हा आंबेडकरांच्या डोळ्यासमोर प्रश्न होता. तेव्हा आंबेडकरांच्या गैरहजेरीत त्यांचे मूकनायक पत्र या मुलानं चालवलं. ज्ञानदेव घोलप त्याचं नाव. शाहूवाडी तालुक्यातल्या सरुडचा हा मुलगा. सरुडला शिक्षणाची सोय नव्हती. त्यांचे नातलग पेठेला होते. तिथं राहून इस्लामपूरला शिकत होता. त्या सरूडच्या महारवाड्यातला मुलगा. त्याला अण्णांनी योगायोगाने आणले. मॅट्रिकनंतर समाजकारणात पडला. मूकनायकचा संपादक म्हणून काम केलं. त्यावेळच्या मुंबई सरकारने त्याला मुंबई लेजिस्लेटिव्ह कौन्सिलमध्ये नामनियुक्त केले. तिथे एमएलसी म्हणून १९२० ते २३ अशी तीन वर्षे काम केले. त्या जागेवर पुढे १९२४ साली डॉ. आंबेडकरांची नियुक्ती झाली.
ज्ञानदेव घोलप हे एक उदाहरण. अब्दुल गणी अत्तारांपासून एनडी पाटलांपर्यंत अशा कितीतरी पोरांच्या आयुष्याला कर्मवीर भाऊराव अण्णांचा परिस स्पर्श झाला. फुले शाहू आंबेडकर महर्षी शिंदेंच्या पुरोगामी महाराष्ट्राची धुरा सुमारे पाऊण शतक कर्मवीर अण्णांच्या शिष्यांनी आपल्या खांद्यांवर पेलली.
-
0 टिप्पण्या