Top Post Ad

कणखर देशा, दगडांचा देशा, पवित्र देशा....

 कणखर देशा, दगडांचा देशा, पवित्र देशा....असे ज्या महाराष्ट्राचे वर्णन केले जाते त्या महाराष्ट्रात माझा जन्म झाला, त्या महाराष्ट्रात मी लहानाचा मोठा झालो, वाढलो याचा मला सार्थ अभिमान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाने आणि साधू संतांच्या वाणीने पावन झालेली ही पवित्र महाराष्ट्र भूमी. महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, संत गाडगेबाबा यासारखे महापुरुषही  मराठी मातीनेच भारताला दिले. सात बेटांचे शहर म्हणून ओळखली जाणारी व देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई ही याच महाराष्ट्राची राजधानी आहे. देशाला सर्वात जास्त महसूल हा  मुंबईतूनच मिळतो, पण याच मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव दिल्लीश्वरांनी घातला, तेंव्हा मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती करण्यासाठी १०५ हुतात्म्यांना बलिदान द्यावे लागले. याच १०५ हुतात्म्यांमुळे संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती  झाली. महाराष्ट्राची निर्मिती होऊन आज ६३ वर्ष पूर्ण झाली आहेत. या ६३ वर्षात महाराष्ट्राने सर्वच क्षेत्रात प्रगती केली आहे. कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण, आरोग्य, शेती, जलसिंचन, विज्ञान, तंत्रदान, उद्योग, व्यापार अशा सर्वच क्षेत्रात महाराष्ट्राने नेत्रदीपक प्रगती केली आहे. आज महाराष्ट्र देशातील प्रगत राज्य म्हणून ओळखले जाते. 

   जगाला हेवा वाटावा असा निसर्ग महाराष्ट्राला लाभला आहे. एककिडे उंचच सह्याद्रीच्या रांगा तर दुसरीकडे ७२० किलोमीटरचा निसर्गरम्य समुद्रकिनारा. महाराष्ट्राला निसर्गाने भरभरून दान दिले आहे. असे असले तरी आजही महाराष्ट्रात अनेक समस्या आणि आव्हाने आहेत. महाराष्ट्रातच आज मराठी भाषेची गळचेपी होऊ लागली आहे. परप्रांतीयांच्या लोंढ्यामुळे मुंबई सारख्या शहरातून मराठी माणूस हद्दपार होतो की काय, अशी शंका येऊ लागली आहे. अमृतातही पैज जिंकणारी असे जीचे वर्णन केले जाते, त्या मराठी भाषेची महाराष्ट्रातच उपेक्षा  होऊ लागली आहे. मराठी भाषा बोलायला तरुणांना लाज वाटते. आज मराठी तरुण मराठी भाषा बोलण्याऐवजी हिंदी व इंग्रजी बोलण्याला प्राधान्य देत आहे. हिंदी व इंग्रजीच्या आक्रमणामुळे मराठी भाषा महाराष्ट्रातच मागे पडू लागली आहे. पालकही आपल्या पाल्यांना मराठी ऐवजी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत दाखल करू लागले आहेत. विद्यार्थ्यांअभावी मराठी माध्यमाच्या शाळा बंद पडू लागल्या आहेत. अभिजात भाषेचे सर्व निकष पूर्ण करूनही मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला जात नाही. सर्वसामान्य नागरिकांपासून, साहित्यिक तसेच राज्यातील अनेक नेत्यांनी ही मागणी करूनही शासन दरबारी त्याला वाटण्याच्या अक्षता लावल्या जात आहेत. 

    आज राज्यातील ४० टक्के जनता ही तरुण आहे. पण, या तरुणांच्या हाती रोजगार नाही. राज्यात बेरोजगारीने कळस गाठला आहे. शिक्षण व गुणवत्ता असूनही हाती काम नसल्याने तरुणांना नैराश्य आले आहे. जर या तरुणांना नैराश्यातून बाहेर काढायचे असेल तर सरकारने रोजगार वाढीसंदर्भात धोरणात्मक निर्णय घ्यायला हवेत. महाराष्ट्रातील तरुणांमध्ये प्रचंड ऊर्जा आहे. मेहनत करण्याची त्यांची तयारी आहे. जर या तरुणांच्या मेहनतीचा आणि ऊर्जेचा सरकारने उपयोग करून घेतला तर महाराष्ट्र देशातील नंबर १ चे राज्य बनेल.
    माझ्या स्वप्नातील महाराष्ट्रातील तरुण सुशिक्षित असेल पण  बेरोजगार नसेल.  तरुणांप्रमाणेच शेतकरी, कष्टकरी व वंचित वर्गाचे अनेक प्रश्न आहेत. तरुणांप्रमाणे शेतकरी, कष्टकरी व वंचित वर्गाचे प्रश्न सुटले तर महाराष्ट्रात पुन्हा एकदा शेतकरी, कष्टकरी वर्गाचे राज्य येईल. माझ्या स्वप्नातील महाराष्ट्र उद्योग व्यवसायात अग्रेसर असेल. शेतीसहित अनेक लहान मोठ्या उद्योगांचा विकास झालेला असेल तो ही पर्यावरणाचा ऱ्हास न होता. माझ्या स्वप्नातील महाराष्ट्रात पी जी ते के जी शिक्षण मोफत असेल. माझ्या स्वप्नातील महाराष्ट्रात एकही मूल शिक्षणापासून वंचित राहणार नाही. माझ्या स्वप्नातील महाराष्ट्रात सर्वांना परवडेल अशा दरात आरोग्यसेवा उपलब्ध असेल. पैसे नाहीत म्हणून कुणाचाही जीव जाणार नाही. माझ्या स्वप्नातील महाराष्ट्रात भ्रष्टाचाराला थारा नसेल. शिवशाहित ज्याप्रमाणे  माताभगिनी सुरक्षित होत्या, तशाच माझ्या स्वप्नातील महाराष्ट्रातही माताभगिनी सुरक्षित असेल. माझ्या स्वप्नातील महाराष्ट्रात जात-पात, धर्म -वंश याला थारा नसेल. भय, भूक आणि भ्रष्टाचार मुक्त असा माझा स्वप्नातील महाराष्ट्र असेल. माझ्या स्वप्नातील महाराष्ट्राची कीर्ती केवळ भारतातच नाही तर जगात पसरेल. संपूर्ण जगाला हेवा वाटेल असा माझा स्वप्नातील महाराष्ट्र असेल.

श्याम बसप्पा ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com