Top Post Ad

जाहीरनामा पर्यावरणाचा... नव्हे अस्तित्वाचा...!


   महाराष्ट्र एकाच वेळी सामाजिक सुधारणा आणि तंत्रज्ञानाची प्रगती याबाबत अग्रेसर होता. गांधीजींच्या द्रष्ट्या नेतृत्त्वाच्या प्रभावाखाली असलेल्या भारतात वैचारिक प्रबोधन आणि भौतिक प्रगती यातील भेद जनतेला समजत होता. परंतु, सन १९७० पासून जागतिक बँकेसारख्या संस्थांनी 'विकास' हा शब्द रूढ केला. नेमके त्याच वेळी त्यांनीच 'पर्यावरण' हा शब्द देखील प्रचारात आणला. 'भौतिक विकास' आणि 'पर्यावरण रक्षण', या एकाच वेळी शक्य नसलेल्या कल्पनांचा जोरात वापर सुरु झाला. महाराष्ट्रात सन १९९५ पासून ५०-१०० वर्षांपूर्वी युरोप अमेरिकेने केलेल्या भौतिक औद्योगिक विकासाचे आंधळे अनुकरण सुरु झाले. नितीन गडकरी पुसदच्या सभेत उष्णतेने भोवळ  येऊन कोसळणे... त्यांनीच केलेल्या बेधुंद पायाभुत संरचना विकास, हे नाव दिलेल्या प्रक्रियेचे फलित आहे. रस्ते, हायवे, पूल बांधण्याचा धडाका... ही विनाशाची वाटचाल होती. मोटार, वीज आणि सीमेंट काँक्रिट चा बेछूट पुरस्कार पृथ्वीवर ९५% कार्बन उत्सर्जन घडवतो. याने तापमानवाढ स्फोटक बनली. नंतर नितीन गडकरींनी भारतात याची अंमलबजावणी केली. त्याने तापमानवाढ महाविस्फोटक बनली.  महाराष्ट्र व भारताच्या आर्थिक-औद्योगिक प्रगतीचे प्रतीक असलेली मुंबई, अतिवृष्टीने बुडण्याची २६ जुलै २००५ ची दुर्घटना, उत्तराखंडची हिमनद्या घसरण्याची १५ जून २०१३ ची केदारनाथ दुर्घटना... या तापमान वाढीच्या, हवामान बदलाच्या म्हणजेच, औद्योगिकीकरणाचे   दुष्परिणाम आहेत.

१९६ देशांनी मानवजात वाचविण्यासाठी पृथ्वीचे सरासरी तापमान, उद्योगपूर्व  काळाच्या तुलनेत २° से ने वाढू नये, असा पॅरिस येथे केलेला करार अयशस्वी ठरला आहे. ऑगस्ट २०२० मधेच २° सें.ग्रे.ची वाढ नोंदली गेली आहे. सध्या  महासागर, दरवर्षी पूर्वीपेक्षा अधिक तापत आहेत, हे भयावह आहे. महासागर, पर्वत आणि ध्रुवांवरील बर्फाची वेगाने वाफ होत आहे. ही वाफ पृथ्वीवर अनियमित पद्धतीने विक्रमी स्वरुपात बर्फवृष्टी वा अतिवृष्टीच्या  स्वरुपात कोसळत आहे...हे हिमयुग येणे नाही. हे, तापमान वाढ महाविस्फोटक बनणे आहे. उन्हाळ्यात अवकाळी पाऊस व बर्फवृष्टी हा त्याचा भाग आहे. उच्चतम तापमान ६५ ते ७० ° से पर्यंत जात आहे. उदा. कुवेत. भारतातही राजस्थान व चंद्रपूर येथे ५२ ते ५५ अंश तापमान नोंदले गेले. उष्णतेच्या लाटा, अतिवृष्टी, महापूर, अवर्षण, वणवे, घटते भूजल, बर्फवृष्टी, अवकाळी पाऊस, अन्न उत्पादनात व जैविक विविधतेत घट  हे औद्योगिकीकरणाने घडवलेल्या तापमान वाढीचे व हवामान बदलाचे परिणाम आहेत. आपल्या जन्मदात्या पृथ्वीला शरण जाणे, हाच फक्त यावर उपाय आहे.

सध्या संसदेचे प्रतिनिधी निवडण्यासाठी अनेक टप्प्यांत निवडणूक चालू आहे. पक्षांचे जाहीरनामे प्रसिद्ध झाले आहेत. 'विकास' या मुद्द्यावर सर्वांचे एकमत आहे. म्हणजे, जोरात विकास करायला हवा, यावर पक्षांचे आणि जनतेचे एकमत आहे. पंतप्रधान मोदींचा मतदारसंघ वाराणसी (काशी किंवा बनारस) हे आध्यात्मिक आणि धार्मिक केंद्र आहे. भारतीय संस्कृतीचे प्रतीक मानले गेलेल्या गंगेच्या काठावरील, हे संत कबीराचे शहर, 'गंगा जमनी तहजीब', म्हणजे धार्मिक सलोख्यासाठी प्रसिद्ध आहे. या शहरात मोदींच्या कार्यकाळात मोठे रस्ते, पूल-उड्डाणपुलांसारखे पायाभूत संरचना प्रकल्प केले गेले. याला विकास म्हणतात... परंतु, त्याचवेळी देशात मुली व स्त्रियांवरील बलात्कार, दलित व अल्पसंख्याकांच्या हत्यांनी कहर केला. मणिपूरला महिलांना विवस्त्र करून धिंड काढणे व खुद्द वाराणसीत बनारस हिंदू विद्यापीठातील मुलींवर विद्यापीठाच्या आवारात भाजपच्या आय. टी. सेलच्या पदाधिकाऱ्यांनी केलेला बलात्कार, हे यातील काही नमुने. प्रश्न असा आहे की, हा भौतिक विकास करून काय मिळवले? देश तर काही शतकांपूर्वीच्या मध्ययुगीन मानसिकतेत गेला. सत्य, प्रेम, अहिंसा, न्याय, समता, धर्मनिरपेक्षता, नैतिकता ही स्वातंत्र्य चळवळीत जोपासलेली जीवनमूल्ये सत्ताधाऱ्यांकडून रोज पायदळी तुडवली जात आहेत.

आता यापुढचा विचार करु. इंडिया गठबंधनातील पक्षांचे जाहीरनामे, सामाजिक न्याय व इतर मूल्यांचा पुरस्कार करतात. इंडिया गठबंधन सत्तेवर आले; न्याय, लोकशाही, राष्ट्रीय एकात्मता व व्यक्तिचे स्वातंत्र्य यांच्या रक्षणासाठी ते यावेच... परंतु, त्याही परिस्थितीत पायाभूत संरचना विकास, रिफायनरी, औष्णिक विद्युत केंद्रे, खाणी, अणुप्रकल्प, बंदरे, विमानतळ, हायवे, पूल, कारखाने इ. केले जाणार. या प्रकल्पांशी औद्योगिक जीवनशैली आणि रोजगार जोडले आहेत.अशा स्थितीत, युरोपात पर्यावरणाची चळवळ झाली. त्यातून हरित (ग्रीन) पक्ष बनले. ते इतर पक्षांबरोबर सत्तेतही आले. परंतु, त्यामुळे पृथ्वीवरील विनाशाची प्रक्रिया थांबली नाही. कारण, या हरित पक्षांनाही 'भौतिक विकास' मान्य आहे. मोटार, वीज, सीमेंट, वॉशिंग मशिन, वातानुकूलन यंत्रे, टीव्ही, काँप्युटर, मोबाईल आणि अशा हजारो स्वयंचलित यंत्रे व वस्तूंचे कोट्यवधींच्या संख्येने सतत होत असलेले उत्पादन हवे आहे. कृत्रिम जगात उपभोगवाद वाढण्याने आणि औद्योगिकरणासाठी बनलेल्या शिक्षणामुळे प्रगती व विकासाचे लेबल लावलेल्या या जीवनशैलीचा त्याग करण्याची तथाकथित आधुनिक माणसाची तयारी नाही.

म्हणून इतरांचे सोडाच; पण, पर्यावरणवादी पक्षांचे जाहीरनामे देखील विशिष्ट मर्यादा ओलांडत नाहीत. औद्योगिकरण, शहरीकरण व अर्थव्यवस्थेच्या रुळलेल्या वाटेवरच ते चालतात. युरोपात व अमेरिकेत असूनही ते कोपर्निकस, ब्रूनो व गॅलिलिओंचा सत्य शोधण्याचा व ते अंगिकारण्याचा प्रयत्न करत नाहीत. ते विज्ञानाचे वारसदार नाहीत. गतीचे नियम, गुरुत्वाकर्षणाचा सिध्दांत, ऊर्जेचे सूत्र... याचा प्रबोधनाशी, सत्याशी व शोषणमुक्तीशी संबंध आहे, परंतु मोटार वा अणुबॉंम्ब बनवणाऱ्या तंत्रज्ञानाशी नाही हे, ते समजून घेत नाहीत. उपभोगवादावर उभारलेल्या अर्थव्यवस्थेने त्यांना तंत्रज्ञानाचे म्हणजे जेम्स वॅटचे, एडिसनचे वारसदार बनवले आहे. म्हणून, सुखाच्या शोधाच्या नावाने, ते जगाला विनाशाच्या खाईत लोटत आहेत. 

 या भौतिक विकासाचा परिणाम म्हणून पृथ्वीची वास्तव स्थिती भीषण आहे. दर वर्षी ०.२° से सरासरी वाढ, या गतीने तापमानवाढ होत आहे. याचा अर्थ दर पाच वर्षांत १°से ची सरासरी तापमानात वाढ. पुढील वर्षी आपण सन १७५६ च्या, म्हणजे पहिले स्वयंचलित यंत्र येण्याच्या वर्षाच्या तुलनेत ३°सेची वाढ अनुभवणार आहोत. ही प्राणघातक वाढ असणार आहे. मानवजात व जीवसृष्टीच्या अंताची नांदी! यापुढे, दर पाच वर्षांत १°सेची सरासरी वाढ असेल, यात कोणतीही अतिशयोक्ती नाही. मानवजात व दृश्य जीवसृष्टी फक्त २५ ते ३५ वर्षांत नष्ट होईल. अशावेळी देश, पक्ष, धर्म, जाती, भाषा, प्रांत इ. सर्व भेद निरर्थक ठरतात. *विविध सरकारे, ज्या औद्योगिकरणाचा भाग आहेत, ते औद्योगिकीकरण पृथ्वीच्या क्षमतांमुळेच चालू होते. एखाद्या बांडगूळ किंवा कॅन्सरप्रमाणे त्याने पृथ्वीच्या जीवनाचे शोषण केले. जीवन व ते शक्य करणारी पृथ्वीच्या चारही आवरणांची जडणघडण संपुष्टात आल्याने... हे बांडगूळ, हा कॅन्सरही नष्ट होणार आहे!

या भीषण संकटातून वाचायचे; तर, पूर्ण मानवजातीने खऱ्या अर्थाने पर्यावरणाचा म्हणजे, आपल्या अस्तित्वाचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्याची गरज आहे. याबाबत भारत मार्गदर्शन करु शकतो. भारताला सत्याग्रहाची परंपरा आहे. ब्रिटीशांनी, सन १८१० मधे बनारस शहरातील नागरिकांवर असह्य कर लादला. तेव्हा बनारसने सत्याग्रहाचा मार्ग स्वीकारला. ब्रिटीशांची दडपशाही वाढल्यावर बनारसच्या रहिवाशांनी, सर्व शहर रिकामं केले व ते आसपासच्या जंगलात राहू लागले. अशी दोन वर्षे गेल्यावर ब्रिटिश नमले. त्यांनी कर रद्द केला.

गांधीजींनी या सत्याग्रही परंपरेचे पुनरुज्जीवन केले. आज स्वयंचलित यंत्रामुळे जीवन नष्ट होणार आहे . शंभर वर्षांपूर्वी, जगाला विनाशाकडे नेणाऱ्या औद्योगिकरणाचे प्रतीक असलेल्या, मॅंचेस्टरच्या यांत्रिक कापड गिरण्यांना, भारतात हजारो वर्षे स्वावलंबन टिकवणाऱ्या चरखा आणि हातमागाद्वारे गांधीजींनी आव्हान दिले. प्रत्येक भारतीयाने गांधीजींचे 'हिंद स्वराज्य' वाचावे.  गांधींच्या भारताने जगाला मार्ग दाखवलेला आहे. आपण पृथ्वीवरील सजीव, जीवनाच्या जाळ्याचा भाग आहोत. कृत्रिम वस्तुंच्या मानवनिर्मित जगाचा भाग नाहीत ...याचे भान तत्काळ येण्याची गरज आहे.

पृथ्वी जीवन देण्यासाठी आहे, नोकरी देण्यासाठी वा नोकरी देणारे उद्योग चालवण्यासाठी नाही. यातूनच कार्बन-उत्सर्जन होत आहे... हरितद्रव्य व पाण्याचा क्षणोक्षणी नाश होत आहे. पृथ्वीवर पृथ्वीच्या विरुद्ध जाणारी कोणतीही अनैसर्गिक पद्धती यशस्वी व शाश्वत होऊ शकणार नाही. काही शेकडा वर्षांत नष्ट झालेल्या जगातील सर्व संस्कृती, याची साक्ष देतात. भारतीय संस्कृती ही एकमेव संस्कृती तिच्या संयम, शहाणपण व साधेपणामुळे टिकली. हे गुण सोडल्याने आपण स्वतःबरोबर जगाचा विनाश घडवणार आहोत. नैसर्गिक किंवा शेकडो वर्षांची परंपरागत शेती, चरखा व हातमागावर वस्त्र आणि माती, बांबू व कुडाची शाश्वत घरे... याद्वारे, भारतीय संस्कृती हजारो वर्षे अखंड प्रवाहित राहिली. रस्त्यांचा अभाव हे भारतीयांचे मागासपण नव्हते... ते भारतीयांचे शहाणपण होते, ती भारतीय खेड्यांची स्वयंपूर्णता होती.  भारताचा विकास, आत्मिक, अध्यात्मिक, नैतिक होता, भौतिक नव्हता...पृथ्वीला तेच मान्य आहे.

नोकरी उदरनिर्वाहासाठी लागते, असे कोणी म्हणु नये. ते कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये स्पष्ट झाले आहे. आज माणसे उदरनिर्वाह करत नसून मोटार, वीज, सीमेंट, वॉशिंग मशिन, एसी, टीव्ही, काँप्युटर, मोबाईल इत्यादींचा निर्वाह करत आहेत. अगदी हत्ती आणि व्हेलसारख्या, अलिकडेपर्यंत लाखो वा कोटींच्या संख्येने असलेल्या महाकाय सजीवांचे पोटही पृथ्वीने सहज भरले होते. तर टीचभर पोटाच्या माणसाला ती जगवणार नाही काय? पण आज माणसाने जीवनाच्या ऐवजी जीवनशैलीच्या नादी लागून मुंगीलाही जगणे अशक्य केले आहे. आपल्याला मुला-नातवंडांचे अस्तित्व हवे असेल तर आपण मोटार, कोळसा जाळून बनलेली वीज व सीमेंट काँक्रिटचा नाद सोडू. त्याची आपणावर कुणी जबरदस्ती तर केलेली नाही. 

भारतीय, मॅंचेस्टरच्या स्वयंचलित यंत्राने लादलेल्या गुलामगिरीला तोंड देण्यासाठी न्यायालयात गेले नाहीत की ब्रिटीश सरकार वा राणीपुढे त्यांनी विनवणी केली नाही. निर्वैर अनासक्त पद्धतीने सत्याग्रह करुन स्वातंत्र्य मिळवले व जगाला केवळ स्वातंत्र्याचाच नाही तर अस्तित्वात राहण्याचा मार्ग दाखवला.आपण भारतीय, पाश्चात्यांचे अनुकरण करण्याच्या नादात स्वतःचे आचरण पृथ्वीसुसंगत करण्याचे तत्त्व, योग विसरलो आहोत. जीवनाच्या रक्षणासाठी कोणत्याही रूढ विचारसरण्यांची वा कोणाशीतरी संघर्ष करण्याची गरज नाही. आपले आयुष्य कसे जगायचे, हे प्रत्येकाच्या हाती आहे. अडथळा आपल्या इच्छांचा आहे. प्रगती, प्रतिष्ठा, विकास, सोय, सुख इ. मिथ्या कल्पनांचा आहे. तो झुगारुन दिला की, आपण मुक्त होतो...या मुक्तित जीवन आहे. हा मानवजातीच्या व जीवसृष्टीच्या अस्तित्वाचा जाहीरनामा आहे. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी कोणत्याही पक्षाची, सरकारची वा सत्तेची गरज नाही. तोच स्वातंत्र्यलढ्याचा आशय होता. 

ॲड. गिरीश राऊत

भारतीय जीवन व पृथ्वीरक्षण चळवळ

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com