Top Post Ad

राजकीय चळवळीतल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची आजची अवस्था

 


 आयुष्यातली ४० वर्ष हा रस्त्यावर... आंदोलन असले की हा पुढे. अंगावर राजकीय आणि सामाजिक चळवळीतले बारा गुन्हे. त्यामुळे दर चार दिवसाला कोर्टात एक तारीख. कोर्टात अकरा ते तीन वाजेपर्यंत याची हजेरी. एकदा तर तारखेला गैरहजर म्हणून दोन हजारांचा दंड झाला. याशिवाय नेत्यांना कोणाचा काटा काढायचा असेल तर याच्या खांद्यावर बंदूक. ४० वर्ष राजकीय, सामाजिक काम. पण कधी विशेष कार्यकारी अधिकारी कोणी पद दिले नाही. पोराला नोकरी लावली. पण कंत्राटी तत्त्वावर सहा सहा महिने तेथे पगार नाही. पोराने एके दिवशी घरातच गळफास लावून आत्महत्या केली.., अशा कटू वाटचालीच्या अनुभवाने खचलेल्या जयकुमार शिंदे या साऱ्या शहराला परिचित असलेल्या कार्यकर्त्याने राजकीय सामाजिक क्षेत्राला उद्वेगाने रामराम ठोकला आहे.

समाजकारण, राजकारणात पडायचे असेल तर पहिल्यांदा स्वतःचे बस्तान बसवा. पदरचे खाऊन लष्कराच्या भाकऱ्या भाजत आयुष्य घालवू नका. अडचणीच्या वेळी सगळे टाळतात... अशी वेळ तुमच्यावर कधीही येऊ देऊ नका, असा अनुभवाचा सल्ला देत त्याने सध्याच्या सर्वच पक्षांतील निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या भावनांना वाट करून दिली आहे. जयकुमार शिंदे म्हटले की प्रत्येकाला परिचित कार्यकर्ता. काँग्रेस राष्ट्रवादीशी संबंधित असला तरी प्रत्येक पक्षात प्रत्येक संघटनेत त्याचा वावर. समाजकार्याचे त्याला व्यसनच. आता तो शहाणपणाच्या गोष्टी करत असला तरी ज्यावेळी त्याला इतर लोक 'तू तुझं काहीतरी स्वतःचे कर... सांगत असताना त्यांने कधी ऐकले नाही. कोल्हापुरात कुठे काही झाले की हा पहिल्यांदा हजर. चळवळीत सक्रीय. आंदोलनात पुतळे जाळायला पुढे. त्यामुळे एक नव्हे, दोन नव्हे १२ गुन्हे त्याच्या अंगावर. दिवसभर तिरंगी स्कूटरवरून फिरत रहायचा. त्यानंतर मिरजकर तिकटीला खुर्च्य टाकून बसायचा. कोणी बोलावलं तर लगेच मदतीला पळायचा. कामाला खमक्या. ओळखी पाळखी काढून हमखास अनोळखी गरजूला मदत करायचा. मिळकत काही नाही. त्यामुळे ठराविकांकडून धान्य, कपडे, पैसे घ्यायचा. पण कोणत्याही आंदोलनात त्याने तडजोड केली नाही. ब्लॅकमेलिंग केले नाही. याची राजकारणी मंडळीत उठ-बस आणि ओळख. सरकारी अधिकाऱ्यांत, पोलिसात ओळख. महापालिकेत तर याला सर्व विभागात जणू मुक्त प्रवेशच. अतिशय हजरजबाबी आणि विनोदी. आंदोलनात तर कोणाचीही भीडभाड तो बाळगायचा नाही. पोलीस पहिल्यांदा याला उचलून गाडीत घालायचे आणि लांब कुठेतरी सोडून यायचे. दिवसभर रस्त्यावर असलेला जयकुमार घरी आला की घरातल्या चिंतेने वेढला जायचा. पोरगा अक्षरशः त्याच्यावर रोज संतापायचा. गावासाठी झटता माझ्या नोकरीसाठी जरा झटा.., म्हणायचा. रोज पेपरला तुमचा फोटो बघून आमचे पोट भरत नाही.., म्हणायचा. जयकुमार पोराची व्यथा नेत्यांना सांगायचा. पण कोणी फारशी ती गांभीर्याने घेतली नाही. ते टोलवतच राहिले. याच चिंतेत त्याच्या बायकोचे निधन झाले आणि गेल्यावर्षी एका रात्रीत मुलाने गळफास लावून घेत स्वतःला संपवले. अनेक दुर्घटनातील मृतदेह पुढे उचलणारा जयकुमार आपल्या पोराचा घरात तुळीला लोंबकळणारा मृतदेह पाहून मट्टकन खालीच बसला.

जयकुमारच्या हजारो ओळखी. पण ठराविक सोडले तर प्रत्येकाने त्याच्याकडे पाठ फिरवली. त्याचा हत्यार म्हणून वापर करून घेतला. आता त्याचे वय ७० आहे. शुगर आहे. बीपी आहे. वरवर आक्रमक दिसत असला तरी तो आतून खचला आहे. कार्यकर्त्यांनी आधी स्वतःचे बस्तान बसवावे. मगच नेत्यांच्या मागे धावावे. स्वतःचा जयकुमार शिंदे कोणीही करून घेऊ नये, एवढेच त्याचं भावनिक आवाहन आहे. जयकुमार शिंदे हे या बातमीतले केवळ प्रतीक. पण अनेक सामाजिक आणि राजकीय चळवळीतल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची आजची हीच अवस्था आहे.

सुधाकर काशीद., कोल्हापूर



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com