Top Post Ad

महाराष्ट्राचा विकास गतिशील करण्यासाठी राजकीय पुढाऱ्यांनी तत्परता दाखवावी

 महाराष्ट्र दिवस मराठी भाषीकांसाठी आनंदाचा व गौरवाचा दिवस आहे.१ मे १९६० रोजी संयुक्त महाराष्ट्राची स्थापना करण्यात आली.तेव्हापासुन संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने व थाटाने महाराष्ट्र दिवस साजरा केल्या जातो.महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने राजकीय पुढाऱ्यांनी महाराष्ट्राच्या विकासाकडे आवर्जून लक्ष देण्याची गरज आहे.कारण आज महाराष्ट्रातील अनेक राजकीय पुढाऱ्यांजवळ वाममार्गाने कमविलेली करोडोंची चल-अचल संपत्ती आहे हा पैसा राज्याच्या विकासासाठी वापरायला तर राज्याचा विकास अवश्य भरभराटीला येईल.महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांचा,शुरविरांचा, क्रांतिकारकारकांचा,थोरमहात्म्याचा व साधुसंतांची पावन भूमी आहे.त्यामुळे महाराष्ट्र सरकारकडून जनतेला (प्रजेला) कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची जबाबदारी सरकारने,राजकीय पुढाऱ्यांनी, सत्ताधाऱ्यांनी व पक्ष-विपक्षनी स्वीकारून जनतेच्या कल्याणासाठी संपूर्ण शक्तीनीशी कार्य करण्याची गरज आहे.तेव्हाच महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होण्यास मोठी मदत होईल व विकास भरभराटीला येईल. 

कारण सध्याच्या परिस्थितीत विकासाच्या बाबतीत केंद्राची व राज्याची संपूर्ण धुरा राजकीय पुढाऱ्यांच्या हातात आहे.सत्ताधाऱ्यांनी विकासाची कामे करणे व कोणते काम करायचे आहे हे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना सांगणे. अशाप्रकारचे हे राजकीय चक्र असायला हवे.परंतु सध्याच्या परिस्थितीत महाराष्ट्राच्या विकासापेक्षा पक्ष-विपक्षाचे राजकीय पुढारी एकमेकांची उखाड-पाखाड करून स्वतःच्या विकासाकडे जास्त लक्ष देतांना दिसतात. त्यामुळे महाराष्ट्राचा विकास खुंटत आहे ही राज्याची शोकांतिका म्हणावी लागेल.राजकारण्यांच्या वादांमुळे जर राज्याचा विकास खुंटला तर त्याचे प्रायचित्य राज्यांच्या १२ कोटी जनतेला भोगावे लागेल.महाराष्ट्रात बेरोजगारी, महागाई, शेतकऱ्यांच्या समस्या, शिक्षणाच्या समस्या असे अनेक ज्वलंत प्रश्न आहे.परंतु गेल्या चार वर्षांत राज्यात मोठ्या प्रमाणात राजकीय भुकंप होऊन उलथापालथ दिसून आली व यात राज्याला मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका सुध्दा बसला हे सर्वांनाच ठाऊक आहे. राजकीय पुढारी आपली राजकीय पोळी शेकण्यासाठी मोठ्या प्रमाणात डावपेच खेळतात परंतु यात सोंड्यासारखा भरडल्या जातो गोर-गरीब, सर्वसामान्य, शेतकरी, बेरोजगार युवक यावर सरकारने लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे.

राज्याच्या विकासापेक्षा ईडी, सीबीआय अशाप्रकारच्या अनेक मुद्यांवर वाकयुध्द आताही सुरू असल्याचे दिसून येते.यांच्या वाकयुध्दाशी राज्यांच्या जनतेला काहीही देणेघेणे नाही.परंतु राज्यातील महागाई, बेरोजगारी, शिक्षण,शेतकऱ्यांच्या समस्या यावर जनतेचा होहल्ला होवू नये यासाठी राजकीय पुढाऱ्यांची ही वाक युध्दाची खेळी खेळत असावी असे मला वाटते. राजकीय पुढाऱ्यांनी लक्षात ठेवले पाहिजे की महाराष्ट्र दिनाला कोणतेही राजकीय वळण येणार याची काळजी घेतली पाहिजे. कारण सध्याच्या परिस्थितीत लोकसभा निवडणुका सुरू आहे व पुढे विधानसभा निवडणुका येणार आहेत.त्यामुळे प्रत्येक पक्षाचा राजकीय पुढारी आपली पोळी कशी शेकता येईल या उद्देशाने आपली खेळी खेळत आहे.परंतु यात राज्याचा नागरिक भरडतो आहे.आज महाराष्ट्रात अनेक गंभीर समस्या आहेत सुर्य तळपतो आहे यामुळे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आपल्याला पाण्याची समस्या पहायला मिळते तर दुसरीकडे अवकाळी पावसामुळे राज्याच्या शेतकऱ्यांना गारपिटीने झोडपले आहे यामुळे शेतकऱ्यांना अनेक कठीणायीचा सामना करावा लागतो आहे.याकडे सरकारने व राजकीय पुढाऱ्यांनी जातीने लक्ष देण्याची गरज आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी मुठभर मावळ्यांच्या बळावर हिंदवी स्वराज्याची स्थापना केली व प्रजेची सेवा केली.परंतु आज महाराष्ट्राचा राजकीय पुढारी गर्भश्रीमंत झाल्याचे दिसून येते. परंतु प्रजा मात्र गरीबीतच मरत आहे.त्यामुळे महाराष्ट्रात असे चित्र निर्माण झाले आहे की "राजकीय पुढारी तुपाशी आणि महाराष्ट्राची जनता उपाशी"अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.महाराष्ट्राच्या राजकीय पुढाऱ्यांनी मनात ठानले राज्याचा विकास भरभराटीला येवु शकतो.याकरीता राजकीय पुढाऱ्यांजवळ असलेली चल-अचल संपत्ती सरकारच्या तिजोरीत जमा करावी किंवा जनकल्याणासाठी उपयोगात आणली पाहिजे यामुळे महागाई, बेरोजगारी, शिक्षण, शेतकऱ्यांच्या समस्या याला आळा घालण्यास मोठी मदत होईल व सुवर्ण महाराष्ट्र निर्माण झाल्याचे दिसून येईल.महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने संपूर्ण राजकीय पुढाऱ्यांनी शपथ घेतली पाहिजे की राज्याच्या कठीण घडीला आपले संपूर्ण मतभेद विसरून महाराष्ट्राच्या १२ कोटी जनतेसाठी  युध्दपातळीवर तन,मन, धनाने प्रयत्न करून महाराष्ट्रातील जनतेला दिलासा देण्याची गरज आहे.

केंद्र सरकारने अनेक राज्यात गरीबांना रेशनकार्डवर अन्नधान्य मोफत ही योजना राबविण्यात येत आहे त्याचे स्वागतच.परंतु राज्यासह देशाची मोठी समस्या शिक्षण व आरोग्य सेवा आहे.त्यामुळे महाराष्ट्र सरकारने राज्याच्या कल्याणासाठी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून शिक्षण व आरोग्य सेवा मोफत करण्यास प्रथम प्राधान्य द्यायला हवेत याचा फायदा राज्याच्या जनतेला अवश्य होईल.यातच खरा महाराष्ट्र दिवस साजरा केल्याचे दिसून येईल.आज महाष्ट्राच्या विकासासोबत पृथ्वीला वाचविण्याचे दायित्व राजकीय पुढाऱ्यांसोबतच जनतेवर आहे.त्यामुळे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्याच्या संपूर्ण राजकीय पुढाऱ्यांनी व जनतेनी एकतरी झाड लावुन महाराष्ट्र दिवस साजरा करायला हवा.यामुळे महाराष्ट्रातील हवेतील वातावरण शुद्ध राहिल, ऑक्सिजन मिळण्यास मोठी मदत होईल, गुरांना चारा मिळेल, पशुपक्ष्यांना शुद्ध हवा मिळेल.अशाप्रकारे आल्हाददायक वातावरणात निर्माण होईल.महाराष्ट्र दिना निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!


रमेश कृष्णराव लांजेवार
(माजी विद्यापीठ प्रतिनिधी,नागपूर)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com