लोकसभेच्या निवडणुकीत ४०० जागा पार करण्याच्या वल्गणा केलेल्या भारतीय जनता पक्षाची हवा पहिल्या टप्प्यातील १०२ जागांच्या मतदानानंतर गुल झाली आहे. आता भाजपाचा पराभव कोणतीही शक्ती रोखू शकत नाही. पराभवाच्या भितीने ग्रासलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आता धार्मिक तिरस्कार पसरवत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जयपूरमधील द्वेष पसरवणारे भाषण हे हुकूमशहाची खुर्ची डळमळीत झाल्याचे चित्र आहे, असा हल्लाबोल मुंबई विभागीय काँग्रेसच्या अध्यक्षा प्रा. वर्षा गायकवाड यांनी केला.
नरेंद्र मोदी यांनी डॉ. मनमोहनसिंह यांच्या नावाने जे विधान केले ते मुळात धादांत खोटे व कपोलकल्पित आहे. डॉ. मनमोहनसिंह यांच्या विधानातील वाक्याची मोडतोड करुन मोदींनी त्याला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला आहे. नरेंद्र मोदी सारखा धादांत खोटे बोलणारा पंतप्रधान भारताला पहिल्यांदाच लाभला आहे, मोदी सातत्याने खोटे बोलत असतात, धार्मिक तेढ निर्माण करणारी भाषा वापरत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींची भाषा भडकाऊ व विखारी असून निवडणुकीत धर्माच्या नावावर मत विभाजन करुन राजकीय पोळी भाजण्याचा प्रकार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कृती ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्यांना दिलेल्या शिक्षणाचा परिपाक आहे. सत्तेसाठी खोटे बोलणे, खोटे संदर्भ देणे आणि विरोधकांवर खोटे आरोप लावणे, हे आरएसएस आणि भाजपच्या प्रशिक्षणाचे वैशिष्ट्य आहे. देशातील १४० कोटी जनता मोदी व भाजपाच्या या लबाडीला आता बळी पडणार नाही. काँग्रेसचे न्यायपत्र हे प्रत्येक भारतीयासाठी आहे, सर्व जाती धर्मांना न्याय देणारे आहे. पराभवाच्या भितीने नरेंद्र मोदी सैरभैर झाले आहेत व सत्ता जाण्याच्या भितीने ते धार्मिक मुद्द्यावर उतरले आहेत परंतु त्यांनी आता काहीही केले तरी जनतेने परिवर्तन करण्याचे मन बनवले आहे आणि मोदी व भाजपाला सत्तेतून बाहेर केल्याशिवाय ते गप्प बसणार नाहीत, असेही वर्षा गायकवाड म्हणाल्या
मोदी सरकारच्या या मनमानी कारभाराच्या विरोधात मुंबई काँग्रेस आणि त्यांचे इतर सेल आक्रमक झाले आहेत. आज मंगळवारी दुपारी मुंबई विभागीय कार्यालयासमोर मागासवर्गीय सेलचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी मोदी सरकारने केलेल्या मनमानी कारभारविरोधात निदर्शने केली. यावेळी सर्वसामान्य जनतेसाठी काँग्रेसने न्यायपत्र तयार केले असून या पुस्तिकेच्या १००० प्रती नरेंद्र मोदींना पोस्टाने पाठवण्यात येणार असल्याचेही सेलच्या कार्यकर्त्यांनी सांगितले. सामान्य माणसाला न्याय देत असताना त्यांच्यावर अन्याय कसा होईल यासाठी भाजपा सरकारने काम केले आहे. पर्यावरण बिघडले असताना उन्हाचे चटके बसत आहेत आणि त्यात महागाईचे चटके बसू लागल्याने जनता होरपळून निघत आहे. राहुल गांधी यांनी देशभर पायी यात्रा काढत जनतेची मते जाणून घेतली.
वाढलेली महागाई , शिक्षणाचा विभागाचा झालेला फज्जा , शेतकरी आत्महत्या , बेरोजगारी , महिलांची असुरक्षितता ,धर्माच्या नावाने सुरू असलेला मनमानी प्रकार , पत्रकारांची मुस्कटदाबी, कामगार आंदोलने, डबघाईस आलेले उद्योग व काही मोजकेच भांडवलदार यांना दिलेली साथ, पर्यावरणाकडे होत असलेले दुर्लक्ष या व इतर महत्वाच्या मुद्यावर मोदी सरकारने देश कसा मागे नेऊन ठेवला आहे. तसेच काँग्रेसच्या न्याय पत्रात जनतेसाठी काय असेल याचा सर्व लेखा जोखा या 50 पानी पुस्तिकेत दिला आहे. तो भाजपच्या मोदी सरकारला माहिती नाही. याकरिता तो आम्ही पोस्टाने पाठवत असून येणाऱ्या काळात कांग्रेसच सर्वसामान्य जनतेची पहिली पसंती असणार आहे. या सरकारच्या कारभारामुळे जनता त्रस्त झाली आहे व आगामी निवडणुकीत भाजपला पाडल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास काचरू यादव यांनी यावेळी व्यक्त केला.
0 टिप्पण्या