Top Post Ad

मुंबईतील आंबेडकरी चळवळीचे राजकीय अपयश


 भारतीय संविधानाचे निर्माते महामानव डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेल्या मानव मुक्ती आंदोलनाचा केंद्रबिंदू हा प्रामुख्याने मुंबई होता. मुंबई मधूनच त्यांनी सर्व चळवळीचे  आराखडे मांडले आणि तिथूनच त्यांनी संपूर्ण देशभर सामाजिक आणि राजकीय आंदोलने उभी केलेली आहेत. त्यांनी शेड्युल कास्ट फेडरेशन पक्ष बरखास्त केला. त्यानंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या प्रबळ विरोधी पक्षाची देशव्यापी संकल्पना मांडली. त्यासाठी त्यांनी भारतीय जनतेला उद्देशून खुले पत्र जारी केले होते. मुंबई शहर आणि उपनगरामध्ये विविध ठिकाणी आंबेडकरी चळवळीचे बालेकिल्ले आहेत. एवढेच नव्हे तर त्यांनी तत्कालन नायगाव लोकसभा मतदारसंघातून स्वतंत्र निवडणूक लढवून आपले स्वतंत्र मतदान दाखवून दिले होते. मुंबईत पि.टी बोराळे हे पहिल्यांदा शेड्युल कास्ट फेडरेशनचे महापौर म्हणून निवडून आले होते . तेव्हापासून मुंबईत आंबेडकरी स्वतंत्र मतदार असलेला एक मोठा वर्ग म्हणून ओळखला जातो.

        दक्षिण मध्य मुंबई आणि ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघांमध्ये एक निर्णायक आंबेडकरी मते आहेत.परंतु महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाल्यानंतर स्थापन झालेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे खासदार, आमदार  स्वतंत्रपणे निवडून आले होते. मात्र रिपब्लिकन पक्ष दुरुस्त, नादुरुस्त वादात अडकला आणि रिपब्लिकन पक्षाचे गट पडले. तेव्हापासून मुंबईतील आंबेडकरी मते विखुरली गेली. गटबाजीच्या वादात या आंबेडकरी मतांची विभागणी झालेली दिसते आहे. तथापि रिपब्लिकन ऐक्य झाल्यानंतर ही आंबेडकरी मतांची ताकद ही वेळोवेळी पहावयास मिळालेली आहे.

        १९९० नंतर रिपब्लिकन पक्षाचे १२ नगरसेवक आणि त्यानंतर दुसऱ्यांदा रिपब्लिकन पक्षाचा मुंबईचा महापौर म्हणून चंद्रकांत हंडोरे यांची नोंद झाली.  सन २००० नंतर रिपब्लिकन पक्ष आठवले आणि भारिप बहुजन महासंघ आत्ताचा वंचित बहुजन  आघाडी दोन गटात मुंबईत प्रामुख्याने आंबेडकरी मतांमध्ये मत विभागणी होताना दिसत आहे. मुंबईतील चेंबूर, घाटकोपर, माटुंगा लेबर कॅम्प, खार, विक्रोळी मुलुंड ,कांजुरमार्ग ,वरळी, मानखुर्द, शिवाजीनगर ,भायखळा सायन कोळीवाडा आदी विधानसभा भागात आंबेडकरी मतदार निर्णायक आहेत. मात्र सन २००० पासून आंबेडकरी चळवळीत नवीन पिढीकडून रिपब्लिकन गट बाजीला कंटाळून त्यांची म्हणजेच युवा मतदारांची मते कालांतराने प्रस्थापित पक्षाकडे वळू लागली. 

अनेक दुय्यम फळीतील रिपब्लिकन नेत्यांनी प्रस्थापित पक्षात प्रवेश केल्याने या मतांमध्येही विभागणी झाली. त्यामुळेच स्वतंत्र नगरसेवक आंबेडकरी वस्त्यांमध्ये प्रस्थापित पक्षाचे निवडून येताना दिसत आहेत. आंबेडकरी आणि निळ्या झेंड्याचा मागील तीन मुंबई महापालिकेच्या निवडणुका लक्षात घेता निवडून आलेला एकही नगरसेवक नाही. याचाच सरळ अर्थ आहे की, नव्या पिढीचे मतदान प्रस्थापित पक्षाकडे वळत असल्याने ही परिस्थिती दिसते. मुंबईतील  २२७पैकी  ६० वार्ड असे आहेत की, त्या ठिकाणी रिपब्लिकन मते एकगठ्ठा पडल्यास ते सर्व उमेदवार निवडून येऊ शकतात. पण सध्या तशी परिस्थिती दिसत नाही. रिपब्लिकन पक्षाची गटबाजी आणि तडजोडीच्या राजकारणामुळे पक्षाचे कार्यकर्ते सत्ताकेंद्री पोचत नसल्याने  आंबेडकरी राजकीय ताकद कमकुवत बनत चालली आहे, हे अधोरेखित आवर्जून करावे लागेल.

        चेंबूर विधानसभेत आंबेडकरी मतांच्या जोरावर आमदार होऊ शकतो.  पी. एल. लोखंडे मार्गवर ९० टक्के आंबेडकरी मतांच्या जोरावर एक नगरसेवक कायम निवडून जात आहे. सिद्धार्थ कॉलनीमध्ये हीच परिस्थिती होती. परंतु सिद्धार्थ कॉलनीची  वार्ड रचनेत विभागणी झाली. वाशीनाका पांजरापोळ येथेही मते विभागली गेली. लाल डोंगरमधील मत विभागणीमुळे या जागेवर नेहमीच पराभव होतो. गोवंडी लिंबूनि बागमध्ये आंबेडकरी मतांची विभागणी व  गटबाजीमुळे या जागेवर ही पराभवाला सामोरे जावे लागते. घाटकोपर मधील रमाबाई कॉलनी आणि कामराज नगर मध्ये थेट मतांची विभागणी झाल्याने या हक्काच्या जागेवर पराभव होतो. विक्रोळी, कांजूरमार्ग, वरळी ,खार आदी भागातील वार्ड रचनेत बदल झाल्याने आंबेडकरी मते जिंकून येण्यास अपुरी पडत आहेत. 

मागील महापालिका २०१४ दरम्यानच्या निवडणुकीत आठवले गटाने शिवसेना, भाजप महायुतीतून २९ जागा मिळविल्या. परंतु धारावी मुकुंदराव आंबेडकर नगर वार्ड मधून केवळ एक नगरसेवक निवडून आला होता. याचा सरळ अर्थ असा होतो की, इतर पक्षांचे मते रिपब्लिकन आंबेडकरी उमेदवाराला मिळत नाहीत. सध्याच्या मुंबई महानगरपालिकेत आंबेडकरी निळ्या झेंड्यावर निवडून येणारा एकही नगरसेवक नाही. मुंबईतल्या किमान १५ अनुसूचित जाती व दोन शेड्युल कास्टसाठी  राखीव  असणाऱ्या जागांवर ही निळ्या झेंड्याचा अथवा रिपब्लिकन आंबेडकरी चळवळीचा एकही नगरसेवक निवडून येत नाही, ही एक खंतच म्हणावी लागेल. आंबेडकरी चळवळीच्या बालेकिल्ल्यात स्थानिक पातळीवर प्रत्येकाने दुय्यम फळीतील नेत्याने स्वतंत्र आंबेडकरी मते बांधून ठेवल्याने केवळ गटबाजीच्या राजकारणामुळे आंबेडकरी राजकीय चळवळीला अपयश येत असल्याचेच शेवटी नमूद करावे लागेल.

  • महादू पवार...पत्रकार, 
  • मुंबई... 9867906135

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com