Top Post Ad

जागतिक कीर्तीचा असा महामानव होणे नाही


 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन म्हणजे भारतीय जनतेच्या समतेच्या लढयाची अविस्मरणीय गाथाच होय. दलितोत्ध्दारक, धर्मसुधारक, प्रकांडपंडीत, समाजशास्त्रज्ञ व संविधानाचे शिल्पकार असे विविध पैलू त्यांच्या जीवनाशी निगडीत आहेत. अशा या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा विचार करता, तत्कालीन सामाजिक, राजकिय प्रश्नांना ते कसे सामोरे गेलेत या प्रश्ना प्रमाणेच राष्ट्रीय एकात्मतेचा विचार ही त्यांनी केला. या सर्व बाबींचा मागोवा घेणे अभ्यासाचा विषय आहे. तेव्हा आपला समाज एक संघ असला पाहिजे, यावर त्यांचा अधिक भर होता. सर्व समाज शहाणा करुन सोडावा ही त्यांची कल्पना होती. तीच त्यांनी संविधानेत साकारली 

स्वत: बरोबर इतरांचा विचार करुन त्यांनी राष्ट्रनिष्ठे पुढे इतर निष्ठा गौण मानल्या. आपण सर्व भारतीय आहोत ही भावना रुजविणे व वाढविणे महत्वाचे आहे. या निष्ठेला कोणतीही निष्ठा स्पर्धा करु शकत नाही. संकुचित जातीय, धार्मिक किंवा राजकिय व अन्य स्वार्थासाठी त्यांनी राष्ट्रनिष्ठा सोडली नाही. त्यांची ही भावना स्वातंत्र्योत्तर काळात सत्तेत सहभागी होतांना (कायदामंत्री) असतांना शेडयुल्ड कास्ट फेडरेशन काढतांना, धर्मांतराची घोषणा करतांना अशा महत्वाच्या जीवनप्रसंगी सतत निष्ठा जागी राहिल्याचे दिसेल. त्यामुळे खऱ्या अर्थाने त्यांना राष्ट्रपुरुष संबोधले पाहिजे. त्याला कारण ही तसेच ते म्हणाले, मी प्रथम भारतीय आणि शेवटपर्यंत भारतीयच! अशा महान विद्यात्याला वगळून खरोखरच हा देश मोठा झाला असता काय ? याचा गंभीरपणे विचार करणे गरजेचे आहे. 

डॉ. आंबेडकरांनी स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता या लोकशाही तत्त्वांचा पुरस्कार करणारे अनेक ग्रंथ लिहिले, भाषणे दिली आणि आपली दलिताबद्दलची भूमिका स्पष्ट केली. त्यांच्या प्रेरणेने शाळा, प्र-शाळा तर निघाल्याच पण उच्च शिक्षण देणारी महाविद्यालयेही निघाली. शिक्षण, समाजकल्याण, अर्थकरण, राजकरण या सर्वामध्ये त्यांनी आपले स्वतंत्र, तर्कशुध्द विचार मांडून दाखविले. त्यांच्या ठायी असलेल्या अर्थकारणामुळे भारतीय रिजर्व्ह बँक उदयास आली, हे ही विसरुन चालणार नाही. दलित समाजात जागृती होत गेली तेव्हा त्यांना ज्ञानाचे महत्व पटले. अनेक दलित आज समाजात विचारवंत म्हणून मान्यता पावले आहेत, त्यामागे डॉ बाबासाहेबांची प्रेरणा आहे. समाजाने त्यांच्या विषयीचा आदर अनेक प्रकारे व्यक्त केला आहे. आज त्यांचे नाव दिलेली कितीतरी विद्यालये, महाविद्यालय, विद्यापीठे कार्यरत आहेत. ही त्यांच्या विद्वत्तेची पावती म्हणावी लागेल, जी जगमान्य ठरली.

डॉ. बाबासाहेबांनी बडोदे सरकारची शिष्यवृती मिळवून एल्फिन्स्टन कॉलेजात प्रवेश घेतला. कॉलेजात शिक्षण देखील भीमा महार असल्यामुळे त्याला योग्य मार्गदर्शन व मदत मिळाली नाही. तरीही तशाच परिस्थितीत भीमराव एल्फिन्स्टन कॉलेज मधुन 1912 साली बी.ए. झाले. बडोद्याच्या महाराजांच्या ऋणातून अल्पसे मुक्त होण्यासाठी त्यांनी त्यांचे कडे नोकरीचा अर्ज केला त्यांना सयाजीराव गायकवाडांच्या कडे नोकरी मिळाली. परंतु वडील आजारी असल्याची तार मिळताच डॉ. आंबेडकर मुंबईस निघाले. सुरत स्टेशनवर वडिलांसाठी बर्फी घ्यावी म्हणून ते उतरले असताना गाडी निघून गेली. त्यामुळे घरी पोहोचण्यास त्यांना उशीर झाला. वडिलांचे डोळे मुलाला पाहण्यासाठी आतूर झाले होते. मुलगा आल्याचे कळताच त्यांनी डोळे उघडले. आपल्या लाडक्या मुलाच्या अंगावरुन प्रेमाने हात फिरविला आणि त्या महान पुरुषाने हया जगाचा शेवटचा निरोप घेतला. 

बडोद्याच्या प्रागतिक राजे सयाजीराव साहेबांनी शिष्यवृत्ती देऊन त्यांना अमेरिकेत पाठविले. आपण केवळ शिक्षणासाठी अमेरिकेत आलो आहोत याची जाणीव भीमरावांना होती. एखाद्या तपस्व्या प्रमाणे त्यांनी उपासना केली. ते अभ्यासात दिवसाचे अठरा तास घालवू लागले. 1915 साली ते एम.ए. झाले. पैसा जमवला व 1920 साली ते अपुरा अभ्यास करण्यासाठी पुन्हा एकदा लंडनला रवाना झाले. तिथे ते सकाळी आठ ते संध्याकाळी पाचपर्यंत निरनिराळया ग्रंथालयात पुस्तके वाचीत आणि रात्री दहानंतर दिवस उजाडेपर्यंत त्यांचा अभ्यास चालू असे. 1923 मध्ये लंडन विद्यापीठाने त्यांना दिलेली "डॉक्टर ऑफ सायन्स' ही पदवी होय. त्यानंतर त्यांनी निरनिराळया विषयांवर दोन-तीन प्रबंध लिहिले. हया कष्टांचे फळ म्हणून 1924 साली कोलंबिया विद्यापीठाने त्यांना "डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी' ही पदवी दिली. 

त्यानंतर त्यांनी महाडच्या तळयातील सर्वांसाठी म्हणजेच अस्पृश्यांना पाणी मिळत नव्हते. पाणी म्हणजे जीवन, तेच त्यांच्यापासून हिरावून घेतले यासाठी सत्याग्रह करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. मार्च 1927 रोजी सत्याग्रही तळयाकडे निघाले. माणुसकीचे हक्क व निसर्गाची देणगी जे पाणी, ते मिळवायचेच एवढयासाठी चालेले होते. डॉ. आंबेडकर सर्वांच्या पुढे होते. अस्पृश्य म्हणून मुंबईच्या कॉलेजात ज्यांनी पाण्याचे हाल सोसले, बडोद्याच्या हॉटेलमध्ये ज्यांनी मार खाल्ला ते खरोखरच सत्याग्रहींचे सेनापती शोभत हेाते. सर्वजण तळयाजवळ येऊन पोहोचले. प्रथमत: त्यांनी पाण्याचा घोट घेऊन इतरांना पाणी पिण्याची मोकळीक दिली. नाशिकच्या काळाराम मंदिरात प्रवेश मिळवण्यासाठी 5 वर्षे सतत झगडत राहिले शेवटी 1935 मध्ये नाशिकचे काळाराम मंदिर अस्पृश्यांसाठी खुले करण्यात आले. त्याचवेळी बौध्द धर्म स्विकारणार अशी घोषणा त्यांनी येवले (नाशिक) या ठिकाणी केली. थोडीशी खटपट करुन त्यांनी सिडेनहॅम कॉलेजमध्ये प्राध्यापकाची जागा मिळवली. बहिष्कृत वर्गावर वर्षानुवर्षे जो अन्याय होत आलेला आहे तो वेशीवर टांगून त्याचे निराकरण झाले पाहिजे ही त्यांची मागणी होती. बहिष्कृतांचा हा लढा लढतांना त्यांनी नेमही विधायक आणि व्यापक भूमिका घेतली आणि अस्पृश्य समाजाला स्वत:हुन काही करावेसे वाटावे या दृष्टीने त्यांच्यात चैतन्य निर्माण करायचे अशा दृष्टीने त्यांनी आपल्या कार्याची पाऊले पुढे टाकण्यास सुरुवात केली.

आपल्या भारत देशात इंग्रजांचे राज्य होते. “चले जाव” चा नारा देऊन इंग्रजांना देश सोडावा लागला आणि नंतर 15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र्य झाला. भारतातल्या लोकांना विशिष्ट पध्दतीने राज्यकारभार करता यावा यासाठी भारताची स्वतंत्र्य राज्यघटना असणे आवश्यक झाले. त्या दृष्टीने भारतीय विद्वानांची एक घटना (तज्ञ) समिती नियुक्त करण्यात आली. त्यात बॅरी. तेजपाल सप्रु, बॅरी. जयकर आणि बॅरि. आंबेडकर हे होते. परंतु उर्वरित दोन तज्ञांनी नकार दिल्यामुळे पं. जवाहरलाल नेहरुंनी ही जबाबदारी बॅरी. आंबेडकर यांच्यावर सोपविली, ती त्यांनी स्विकृत केली. 

त्यांनी अहोरात्र जिद्द व चिकाटीने आपल्या अंगी असलेली सगळी बुध्दिमत्ता प्राणपणाला लावून 2 वर्षे 11 महिने 17 दिवसात घटना लिहून पुर्ण केली. त्यामुळे डॉ. आंबेडकरांना कायदेमंत्री पद बहाल करण्यात आले. 1950 पासुन राज्यघटना अंमलात आली. डॉ. बाबासाहेबांनी लिहलेल्या संविधानामुळे भारताला जगात नावलौकिक मिळाले, असे म्हटले तर अतिश्योक्ती होणार नाही. तेव्हापासुनच त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जाऊ लागले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर जेवढी जबाबदारी होती तेवढी जबाबदारी जगातील कोणत्याही पुरुषावर नव्हती. ते जर अजुन जगले असते तर कदाचित त्यांच्या मनासारखे निश्चित घडले असते, हे कोणीही नाकारु शकत नाही आणि एवढा मोठा कायदेतज्ञ असलेल्या या महात्म्याचे पूर्वजीवन मात्र अत्यंत वाईट गेले असतांना बेदरकारपणे आगपाखड करता आली असती, पण ती सुध्दा त्यांनी केली नाही. अशावेळी देखील बहिष्कृतांच्या चळवळीला वर्ग लढयाचे स्वरुप येणे सहज शक्य होते, त्यातून भारतीय एकसंघतेला तडा जाऊन धर्माच्या नांवावर या देशाची शकले झाली. तशी परिस्थिती उद्भवली असती परंतू ‘भारतीय’ हा त्यांचा स्थायीभाव होता. भारतीय समाजात त्यांना बदल हवा होता पण त्यासाठी समाजप्रबोधन हाच मार्ग होय, अशी त्यांची दृढनिष्ठा होती. त्यामुळेच राष्ट्रनिष्ठा त्यांनी कधी सोडली नाही. राष्ट्रीय एकात्मतेचा विचार त्यांनी सर्वात महत्वाचा मानला.

“पिकते तेथे विकत नाही” हा सिध्दांत माहित आहे. तेव्हा आपल्याजवळ असलेल्या माणसाचे गुण आपण ओळखु शकत नाही, दूसऱ्या माणसाला त्याची पारख होते हे सर्वविदित आहे, म्हणूनच 1 जून 1952 रोजी अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठाने “डॉक्टर ऑफ लॉ” ही पदवी देऊन त्यांचा गौरव केला. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वैचारिक तत्वज्ञानांचा तसेच सामाजिक/राजकिय संघर्षाचा वारसा लाभलेला असल्यामुळे हा समुह मूळत: प्रस्थापित विरोधी आहे, त्यांचा हिंदु धर्मातील पाखंडी संताना विरोध होता. भारत देशावर मात्र त्यांचे अलोट प्रेम होते, त्यामुळे हिंदु धर्मातून परधर्मात जाण्याचा विचार करतानाही भारतातच उगम पावलेल्या बौध्द धर्म याची नागपूर शहरात आपल्या लाखो अनुयायासह 14 ऑक्टोंबर, 1956 रोजी बौध्द धम्माची दीक्षा घेतली. आपण जो धम्म घेतला तो उत्तमरीतीने पाळण्याचा निर्धार केला पाहिजे, नाहीतर महार लोकांनी तो निंदाजनक स्थितीत आणला असे होऊ नये म्हणून आपण दृढनिश्चय केला पाहिजे हे आपल्याला साधेल तर आपण आपल्याबरोबर देशाचा इतकेच काय तर जगाचाही उध्दार करु, कारण या धर्माचे लोन जागतिक पातळीवर उंचावले आहे.  बाबासाहेब म्हणजे महान चारित्र्यवान व्यक्ति, अर्थशास्त्रज्ञ, शासनशास्त्रज्ञ, इतिहासाचे विद्वान, अभ्यासक, बुध्दिमान, कायदेपंडीत, स्मृतीकार, अनेक भाषांवर प्रभुत्व असलेला प्रभावी वक्ता, संशोधक, ग्रंथाकार, निधडया छातीचा व मनोधैर्याचा समाज मार्गदर्शक, भगवान बुध्दांच्या अवतार कार्याचा संदेश सर्व जगात पसरविणारा, पददलितांचे स्फूर्ती व आशास्थान अशा या जागतिक कीर्तीच्या महामानवाला 133 व्या जयंती निमीत्त मानाचा मुजरा !

  • प्रविण बागडे
  • नागपूर, भ्रमणध्वनी - 9923620919

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com