भारतीय समाज किंवा जगातील कोणताही समाज नैतिक अधिष्ठानावर उभा असतो. नैतिक अधिष्ठान इथल्या ब्राह्मणी व्यवस्थेने कायम नाकारले आहे. याचा अविभाज्य परिणाम असा दिसतो की, भारतातील बहुजन समाजासह जगातील सर्व समाजव्यवस्था एका बाजूला आणि ब्राह्मणी समाज एका बाजूला. त्यांच्या नैतिक अधिष्ठानाच्या अभाव असणाऱ्या परंपरेविरूध्द आजचा लढा निवडणूकीच्या रूपात उभा राहिला आहे.
नैतिक अधिष्ठान - मानवी समाजाचा भटक्या रानटी अवस्थेतून स्थिरावण्याचा विकास जसजसा होत गेला, तसतसे त्यांचे नैतिक नियम बनू लागले. स्थिरावलेल्या समाजात कुटुंब व्यवस्था जन्म घेते. त्यातून सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो. हे प्रश्न स्थिरावलेल्या समाजातील प्रत्येक व्यक्तीला सतावतात. त्यातूनच सार्वजनिक नियमांची गरज निर्माण झाली. प्राथमिक समाजात अशा प्रकारचे नियम म्हणजे नैतिक नियम बनवणे; समाजात तोच प्राथमिक कायदा बनतो. याचा दुसरा अर्थ नैतिक नियम म्हणजेच कायदा; परंतु, अशा प्रकारचा कायदा म्हणजे प्राथमिक संविधानच!. आधुनिक समाजात कायदा बनवताना संविधानाच्या मुलभूत संरचनेला धक्का लागू नये म्हणजे समाजाच्या नैतिक नियमांना धक्का लागू नये हाच त्याचा मूळ अर्थ असतो.
भारतीय संविधानाचे अधिष्ठान बुध्दाच्या तत्त्वज्ञानात असल्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जेव्हा म्हणतात, तेव्हा, त्याचा अर्थ होतो की, भारतीय संविधानाची मुलभूत संरचना बुध्द विचारांच्या सामाजिक नियमात आहेत. हे नियम म्हणजे पंचशिल. पाच शिलांचे पालन हा विचार भारतीय समाजाचाच नव्हे, तर, जगातील कोणत्याही समाजाचा पाया आहे. परंतु, ब्राह्मणी जातीव्यवस्थेने हा सिध्दांत कधीच स्विकारला नाही. म्हणून आजच्या काळात एका बाजूला गोमांस निर्यातीचा उद्योग करायचा आणि दुसऱ्या बाजूला, कोण काय खातं यावरून त्यांचे माॅब लिंचिंग करण्यासाठी सामाजिक अज्ञान असलेल्यांना उद्युक्त करायचे. देशात श्रमातून आणि करातून जनतेने जी सार्वजनिक संपत्ती निर्माण केली, ती संपत्ती फुकटखाऊ भांडवलदारांना रेवड्या वाटाव्यात, तशी द्यावी. क्रुरतेचा कळस करणाऱ्या गुजरातमधील खूनी-बलात्कारी ब्राह्मणांना कैद होऊच नये, म्हणून त्यांची सुटका घडवून आणणे. टू जी स्पेक्ट्रम चा न झालेला घोटाळा आंदोलन करून झाल्याचे सांगणे आणि त्याआधारे सत्तेवर आल्यावर खोटारडेपणाची ट्रोलिंगच्या माध्यमातून हद्दपार करणे. दारू घोटाळ्यात पैसे लाटूनही त्यातील एकाच बाजूच्या लाभार्थ्यांना कैद करणे, या पाचही बाबी पंचशीलाच्या अगदी विपरीत आहेत. 'निती म्हणजे धम्म आणि धम्म म्हणजे निती', हे तत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्म तत्त्व म्हणून नव्हे तर मानवी समाजाचे वैश्विक आणि त्रिकालाबाधित तत्त्व म्हणून सांगितले. हे तत्त्व म्हणजे आख्खे भारतीय संविधान आहे.मानवी समाजाची नैतिक मूल्ये पायदळी तुडवून कृत्रिम जातीव्यवस्थेच्या क्रमिक असमानतेत सर्वात वर अस्तित्व ठेवून, राज्यव्यवस्था चालवू पाहणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तत्वज्ञानाशी भारतात राजकीय संघर्ष "संविधान बचाव विरूद्ध संविधान बदलाव", अशा समिकरणातून उभा राहिला आहे. या समिकरणात संविधानाच्या बचावाच्या बाजूने जे या निर्णायक लढ्यात उभे राहिले, ते सर्व नैतिक अधिष्ठान मानणारे म्हणूनच आपल्याला आज विचारात घ्यावे लागतील; तर, जे संविधान बचावच्या ऐवजी बदलाव च्या बाजूने आहेत, ते सर्व अनैतिक अधिष्ठानावर उभे राहिले आहेत, हे स्पष्ट दिसते. या व्यतिरिक्त जे संविधान बचाव च्या बाजूने आहेत आणि संविधान बदलावच्या बाजूने नाहीत; परंतु, कृतीतून स्पष्ट भूमिका घेताना दिसत नाही, त्यांच्या विषयी काय भूमिका घ्यावी, हा वर्तमान राजकीय निवडणूकांनी उभा केलेला प्रश्न आहे. त्यामुळे, लोकसभा निवडणूक २०२४ च्या निवडणुकीत व्यावहारिक मतभेदांचे कंगोरे अधिक टोकदार दिसत आहेत.
या सर्व विरोधाभासात एक गोष्ट मात्र आश्वासक दिसते, ती म्हणजे भारतीय संविधान बचावासाठी भारतीय समाज बहुसंख्येने उभा राहिला आहे. समाजाचे हे वास्तव, संविधान विरोधकांना कळल्यामुळे त्यांनी "गंगाजळी" खुली केल्याचा सार्वत्रिक आरोप होत आहे. खुली केलेली "गंगाजळी" कुठे कुठे संचित होत आहे, हा या निवडणुकीत वादाचा मुद्दा बनला आहे. संविधान बचाव आणि बदलाव नव्हे; तर, नैतिकता विरूद्ध अनैतिकतेचा संघर्ष ऐतिहासिक काळापासून काही समाज आपला वंश शुध्द ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करित असतात. परंतु, भारतीय आणि जागतिक वास्तव हेच आहे की, आज जगातील कोणताही वंश शुध्द राहीलेला नाही. जात्याभिभान असणाऱ्यांना शुध्द वंशाचे फार आकर्षण; परंतु, त्यातून त्यांच्या वंशात व्यंग निर्माण होण्यापलिकडे अन्य काही साध्य झाले नाही, असे आरोग्य विज्ञान म्हणते!
कोणताही समाज नेहमीच आपल्यापेक्षा वरच्या मानल्या गेलेल्या समाजाचे अनुकरण करतो. अर्थात, गरीब जसा श्रीमंताचे अनुकरण करू पाहतो; तसे जातीव्यवस्थेत खालच्या बहुजन जाती व्यवस्थेतील सर्वात वरच्या जातीचे अनुकरण करतात. नैतिकता ही ज्यांना शत्रूस्थानी वाटते, अशा वरच्या जात व्यवस्थेने स्वतंत्र भारतात त्यांच्या वैयक्तिक संपत्तीच्या निर्माणासाठी एक योजना शोधून काढली. ती योजना कार्ल मार्क्स याच्या उत्पादकाला होणाऱ्या वरकड कमाईपेक्षा वेगळी संकल्पना आहे. वरच्या जातव्यवस्थेने शोधून काढलेली ही संकल्पना म्हणजे भ्रष्ट मार्गाने संपत्ती मिळवणे. भ्रष्ट मार्गाने संपत्ती मिळवणे म्हणजे सार्वजनिक पैशांचा देशाच्या विकासासाठी वापर करताना, ज्यांच्यामार्फत वापरण्याचा मार्ग जातो, त्या विश्वस्त म्हणून असणाऱ्यांनी तो जनहिताचा पैसा खोट्या व लबाडीच्या मार्गाने आपल्या घरात आणणे! म्हणजे आर्थिक भ्रष्टाचार. हा मार्ग नैतिक नाही; म्हणून असा भ्रष्टाचार करणाऱ्यांना वर्तमान सरकारने एका फटक्यात आपल्या शरणी आणले. कारण, जे अनैतिक आहे ते बेकायदेशीर आहे, हेच सत्य. अर्थात, असा दंडक उगारणारे वर्तमान सत्ताधीश, त्या पुढचा भ्रष्ट अध्याय निर्माण करित आहेत; हे कालांतराने समोर येईलच!
भारतीय संविधान आता पाऊण शतकाच्या उंबरठ्यावर आहे. या काळात संविधानिक नैतिकता समाजात निर्माण होऊन, नैतिक अधिष्ठानावर भारतीय समाज जगात उठून दिसला असता. एवढंच नव्हे, तर, तो जगाची महासत्ताही कदाचित बनला असता. परंतु, या देशात वरच्या जातीतील भ्रष्टांचे अनुकरण येथील संविधानवादी समाजातीलही स्थानापन्न झालेल्या पदश्रेष्ठींनी स्विकारले. संविधानवादी असलेल्या समाजातून पुढे गेलेल्यांनी आर्थिक भ्रष्टाचाराचा मार्ग (अपवाद वगळता) नाकारला नाही. परिणामी, वरच्या जातीतील पदश्रेष्ठी आणि खालच्या जातीतील पदश्रेष्ठी यांची एक अघोषित युती झाली. या कडव्या युतीमुळेच भारतीय समाज फुले-शाहू-आंबेडकरी विचारांना अभिप्रेत असलेली क्रांती संविधानोत्तर कालखंडात करू शकला नाही. यासाठी, हे पदश्रेष्ठी वेगवेगळ्या सबबी कारण म्हणून सांगतात.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटी ची स्थापना करून त्याचे ब्रीद प्रज्ञा-करूणा असे केले. यावर अनेकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना प्रश्न विचारले की, बाबासाहेब, यात 'शील' का नाही? तेव्हा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले की, "प्रज्ञेचा विकास झाला की शील आपोआपच निर्माण होते!" भारतीय समाजात हे शील निर्माण करण्यासाठी वर्तमान लोकसभा निवडणुकीत "संविधान बचाव विरूद्ध संविधान बदलाव', असा संघर्ष उभा राहिला आहे. या संघर्षात नुसते संविधान बचाव एवढेच आव्हान नाही, तर, समग्र भारतीय समाजाला नैतिक अधिष्ठानावर उभे करण्यासाठी हा निवडणूक लढा आहे.
- चंद्रकांत सोनवणे... संपादक
- 3 Ways Media Network,Mumbai - 1
- Email : 3waysmedia2015@gmail.com
0 टिप्पण्या