डॉ. बाबासाहेब आंबेडकर 19व्या शतकातील महामानव ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं. महान सेनानी, युगप्रवर्तक, युगंधर मानवाच्या प्रतिष्ठेकरिता लढणारा, मानव मुक्तिचा प्रतिक, तमाम शोषित, पिढीत, वंचित जनांचा आवाज म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्या महान व्यक्तिमत्त्वाचा खडतर जीवनप्रवास नव्या युवापिढीस कळावा म्हणून त्यांचे `जीवनचरित्र' मांडणे हा आजच्या दिवसाचे आद्यकर्तव्य होय. संविधानाचे शिल्पकार, कोट्यावधी पददलितांचे तारणहार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म पूर्वाश्रमीच्या महार समाजाच्या सुभेदार रामजी आंबेडकर यांच्या परिवारात 14 एप्रिल 1891 रोजी महू येथे भीमाबाई हिच्या उदरी झाला. (भारतीय समाज जीवनात त्यांच्या जन्माने सोनेरी सकाळच उजडली.)
भीमरावांचे प्राथमिक शिक्षण सातारा व पुढील शिक्षण मुंबईत झाले. महार समाजात पहिले मॅट्रीक पास होणारे भीमराव आंबेडकर. तद्नंतर ते बी.ए. झाल्यावर श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांच्या मदतीने अमेरिकेत गेले व कोलंबिया विद्यापीठातून पी.एच.डी. झाले, नंतर बॅरिस्टर होण्यासाठी इंग्लंडला गेले.तेव्हा त्यांना कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी अर्थसहाय्य केले. लंडन विद्यापीठाची डी.एस.सी.ही दुर्मिळ व मानाची पदवी संपादन केली. मात्र परदेशात अध्ययन काळात त्यांना फार हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. कित्येक दिवस अर्धपोटी (उपाशी) राहून त्यांनी आपले अध्ययन पुढे चालू ठेवले, एवढेच नव्हे तर त्यात दैदिप्यमान यश संपादन केले. उच्चविद्याविभूषित असूनही अस्पृश्य (महार) जातीत जन्माला आल्यामुळे त्यांना अपमान व अवहेलना सहन करावी लागली. नंतर ते बडोदे संस्थानात नोकरीत होते. तेथेही त्यांना अस्पृश्य म्हणून फार वाईट अनुभव आले. शेवटी त्यांना अस्पृश्य उद्धाराची आणि त्यांच्यावर होणाऱया अत्याचार, अन्यायाच्या निर्मूलनाची प्रतिज्ञा करावी लागली. त्यासाठी त्यांनी स्वत:ला सर्वस्वी वाहून घेतले.
बाबासाहेब म्हणजे दिनदलितांचे आधारस्तंभ. हजारो वर्षे (मनुवाद्यांच्या चातुरवर्ण (व्यवस्थेमुळे शोषित) अज्ञानाच्या अंध:कारात, दारिद्र्य व गुलामगिरीत खितपत पडलेल्या पूर्वाश्रमीच्या महार समाजाला माणसाचा जन्म होऊन माणसासारखे जीवन जगता येत नव्हते. रस्त्याने किंवा सार्वजनिक ठिकाणी मोकळेपणाने वावरता येत नव्हते, उपजिविकेसाठी कोणताही कामधंदा नव्हता म्हणून पोटाची भूक शमविण्यासाठी ब्राह्मण, वैश्य, श्रत्रिय ह्या वर्णाची पडेल ती कामे करून शिळ्या तुकड्यावर दिवस काढावे लागे. कुत्र्या-मांजरांना व जनावरांना देखील अन्न पाणी मिळत होते. परंतु महार समाजास श्वानापेक्षाही माणुसकी हीन दर्जाची वागणूक मिळत होती व माणुसकीला पोरके होऊन उपेक्षितांचे (हिनदीन) जगणे त्यांच्या नशिबी आले होते. त्याचे मूळ कारण म्हणजे दलित समाजाला मनुवाद्यांनी शिक्षण घेण्यापासून वंचित ठेवले होते. विद्येविना अज्ञानी होते, म्हणून गुलामगिरीचे व अत्याचारिचे जीवन जगत होते. संपूर्ण समाज ज्ञानाशिवाय अंध:कारात चाचपडत होता.
ह्या एकंदरीत बिकट परिस्थितीला सामोरी जाऊन डॉ. बाबासाहेब शिक्षित झाले. त्यातूनच दलितांमध्ये अस्मितेची जागृती करण्यासाठी चळवळ सुरू केली. त्यासाठी त्यांनी जिल्हे, तालुके व गावोगावी सभा घेऊन दलितांचे संघटन केले. कार्यकर्त्यांची फळी तयार केली. सार्वजनिक ठिकाणाहून पिण्यासाठी पाणी मिळावे म्हणून 1927 साली महाड (जि. रायगड) येथे चवदार तळ्याचा (मानवमुक्तीचा) सत्याग्रह केला. व पुढे 1930 साली नाशिकला काळाराम मंदिर प्रवेशासाठी (अस्पृश्यांना मंदिरात प्रवेशबंदी होती.) सत्याग्रह केला परंतु तरीही दलितांना सामाजिक न्याय व हक्क मिळण्यास दुरापास्त झाल्याने 1936 साली येवला (जि. नाशिक) येथे परिषदेत धर्मांतराची घोषणा केली. (मी हिंदू धर्मात जन्मलो असलो, तरी हिंदू धर्मात मरणार नाही, अशी प्रतिज्ञाच केली) व त्या साली दलित व अस्पृश्यासाठी स्वतंत्र मतदार संघ मिळावा यासाठी सायमन कमिशनकडे मागणी केली व 1942 साली शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनची स्थापना केली. अस्पृश्यता व गुलामगिरीच्या विरोधात अनेक चळवळी उभारून प्रखर लढा दिला व आरंभिलेल्या चळवळी यशस्वी केल्या.
सामाजिक चळवळीचे कार्य करीत असतानाच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आपल्या मायभूमीप्रती म्हणजेच भारतभूमीवर निस्सीम प्रेम होते. त्यातूनच मातृभूमीच्या प्रेमापोटीच स्वतंत्र भारताची राज्यघटना लिहिण्याची संपूर्ण जबाबदारी एकट्याने यशस्वीपणे पूर्ण केली. घटनासमिती अस्तित्वात होती, परंतु समितीच्या सभासदांपैकी एकजणाचा अकाली मृत्यू झाला. एक जण आजारी होते तर बाकीचे सतत गैरहजर असत. म्हणून दिवस-रात्र झटून सर्वस्वपणाला लावून बाबासाहेबांनी स्वत:च्या अफाट कर्तत्ववान राज्यघटना लिहून पूर्ण केली व 26 जानेवारी 1950 रोजी भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्याकडे पहिले स्वतंत्र भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या उपस्थितीत राष्ट्राला समर्पित केली. बाबासाहेब लोकशाहीच्या तत्त्वावर आधारीत भारतीय समाजासाठी कल्याणकारी तसेच समता, स्वातंत्र्य, बंधूत्व या तत्त्वावर आधारित राज्यघटना लिहिली. म्हणून पृथ्वीच्या पाठीवर असलेल्या इतर देशाच्या राज्यघटनेपेक्षा नक्कीच उजवी ठरली आहे. लोकशाहीच्या मार्गाने राज्यकारभार करणे सुकर व्हावे, बहुजनांना शिक्षणाची संधी मिळावी अशा उदात्त हेतूने राज्यघटना (भारतीय संविधान) लिहिणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर केवळ मानव नव्हेत तर ते महामानव ठरतात व अभिमानाने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ह्या उपाधीचे मानकरी खऱ्या अर्थाने ठरतात.
``शिका... संघटीत व्हा.... संघर्ष करा'' ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समाजाला मोलाची त्रिसूत्री दिली. त्यातून त्यांनी शिक्षणाविषयी मौलिक उपदेश व कार्य केल्याचे स्पष्ट होते. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. ते प्यायल्यावर माणूस गुरगुरायला लागतो. याचा अर्थ शिक्षणाने माणूस बौद्धीकदृष्ट्या सक्षम होतो, तसेच तो विवेकी व विचारी होतो, असे विचार बाबासाहेबांनी शिक्षणाविषयी मांडले.
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ एका व्यक्तीचे नाव नव्हे तर एका युग प्रवर्तकाचे नाव आहे. देशात सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी स्वातंत्र्य, समता व बंधुता या त्रिसूत्रांचा पुरस्कार केला. इतकेच नव्हे तर व्यक्ती, समाज व शासन या तिन्ही घटकांना त्यांनी सामाजिक जबाबदारीच्या एकाच धाग्यात ओवण्याचे मौलिक कार्य केले. प्रत्येक नागरिक हा कायद्यापुढे समान आहे, ही संकल्पना देशात रूढ करण्यात बाबासाहेबांनी पुढाकार घेतला. ह्या विश्वात अनेक महापुरूष जन्माला आले. परंतु बाबासाहेबांनी इतिहास बदलला व नवा इतिहास घडविला. म्हणून ते महान क्रांतिकारक आहेत. त्यांनी नव्या युगाची पहाट उगविली. म्हणून ते युगपुरूष आहेत.
सुरेश गांगुर्डे ... मुंबई
बोधितत्व या पहिल्या आंबेडकरी ब्रँडचे
सर्व आंबेडकरी प्रॉडक्टस आता ठाण्यात उपलब्ध !
डॉ. आंबेडकर पुतळ्याजवळ, कोर्टनाका, ठाणे.
90042 30785 / 7045624584 / 9892659293 / 9702063345
0 टिप्पण्या