सध्याच्या परिस्थितीत जवळपास सर्वच पक्षांची उमेदवारी जाहीर झालेली आहे.या उमेदवारीमध्ये काही उमेदवार पक्षांशी निष्ठा ठेवणारे तर काही उमेदवार आयात केलेले किंवा सत्तेच्या लालसेने किंवा ईडीच्या कारवाईच्या भितीने आयाराम -गयाराम असे अनेक उमेदवार सर्वच पक्षांमध्ये आपल्याला रिंगणात उतरल्याचे दिसतात.अशां उमेदवारांना पक्षांशी निष्ठा नाही ते उमेदवार देशांच्या जनतेचे कसे काय भले करणार याचाही विचार देशातील मतदारांनी करायला हवा. आयाराम-गयाराम हे सत्ता लोभी असल्याने स्वतःच्या स्वार्थापोटी संपूर्ण नितिमत्तेवर पाणी फेरून सत्तेसाठी कोणत्याही पक्षांसमोर लोटांगण घालतांना दिसतात.सध्या लोकसभेच्या निवडणुकांसाठी राज्यातच नाही तर देशात अनेक पक्षातील राजकीय पुढाऱ्यांचे किंवा लोकप्रतिनिधीचे दलबदल झाले आहेत.परंतु यासाठी ठोस कायदा नाही किंवा शिक्षाही नाही मनात येईल तेव्हा सत्तेसाठी पक्ष बदलविने हा राजकीय पुढाऱ्यांचा गोरखधंदा बनल्याचे दिसून येते.
कारण काही कायदे राजकीय पुढारी आपल्या हिताचे बनवित असतात.ही लोकशाहीच्या दृष्टीने शोकांतिकाच म्हणावी लागेल.यामुळे सर्वसामान्यांचा लोकप्रतिनिधीवरून व राजकीय पुढाऱ्यांवरून हळूहळू विश्वास उडत असल्याचे दिसून येते.पक्ष बदलल्यानंतर त्याला सहा वर्षांसाठी पक्षातुन काढले जाते मग दुसरा पक्ष त्याला का घेतो? दुसऱ्या पक्षासाठी त्याची वर्तणूक कशी काय चांगली असेल?ही राजकीय पुढाऱ्यांची मनमानी नाही का? त्यामुळे पक्ष बदलल्या नंतर कोणत्याही पक्षाने त्या राजकीय पुढाऱ्यांना आपल्या पक्षात आश्रय द्यायला नको,जर दिला तर कोणतेही राजकीय पद किंवा लोकप्रतिनिधीत्व पद यापासून कोसो दूर ठेवायला हवे.परंतु पक्ष सोडलेल्या राजकीय पुढाऱ्यांना हे सर्वच संपत्तीच्या बळावर ताबडतोब मिळते त्यामुळे असे वाटते की यांच्यासाठी काहीही कायदे कानुन किंवा नियमावली नसल्याचे दिसून येते.राज्यात किंवा देशात पक्ष बदलण्या मागचा मुख्य उद्देश म्हणजे त्यांच्या जवळ असलेली करोडो रुपयांची वाममार्गाने कमविलेली अमाप चल-अचल संपत्ती असने ती वाचवण्यासाठी कोणत्याही सत्ताधारी पक्षात प्रवेश करणे किंवा केलेले घोटाळे बंद करण्यासाठी किंवा वाममार्गाने कमविलेल्या संपत्तीवर ईडी किंवा इतर कारवाई होवू नये या उद्देशाने राज्यात राजकीय पुढारी यापक्षातुन त्यापक्षात उंदरा सारख्या उड्या मारतांना दिसतात.तरीही स्वतःला आमदार-खासदार (लोकप्रतिनिधी- जनप्रतिनिधी) समजतात हे स्वतंत्र भारताचे दुर्भाग्य म्हणावे लागेल.
राज्यात किंवा देशात गेल्या काही वर्षांत असा एकही राजकीय पुढारी दिसला नाही की त्याने जनहितासाठी किंवा लोककल्याणासाठी पक्ष सोडला असावा.राजकीय पुढारी या पक्षातुन त्या पक्षात जातात तेव्हा त्यांना नीतिमत्ता,पक्षांचे नियम, पक्षासाठी घेतलेली शपथ, एकनिष्ठता, समाजाबद्दलची जागृकता,पक्षाबद्दल स्वाभिमान पक्षाची नियमावली,पक्षाने आपल्याला दिलेले वैभव हे संपूर्ण एका क्षणात विसरतात. अशांना धडा शिकविण्याची हिच खरी वेळ आहे.स्वत:ला धर्मनिरपेक्ष म्हणारा पक्ष किंवा राजकीय वर्तुळात विरोधी पक्षावर ताशेरे ओढणारे राजकीय पुढारी अचानक सर्वच गोष्टी विसरतात हे कसे काय? कोणत्याही राजकीय पक्षाचा आमदार-खासदार (लोकप्रतिनिधी) किंवा राजकीय पुढारी असो तो जेव्हा पक्ष बदलतो तेव्हा त्याला काहीच कसे काय वाटत नाही?ज्या पक्षाचे अनेक वर्षे प्रतिनिधीत्व राजकीय पुढारी करतो तेव्हा तो विरोधकांवर तुटुन पडतो.अशा वेळेस लोकांना खरे वाटते व तो राजकीय पुढारी लोकांची मने जिंकतो.परंतु हाच राजकीय पुढारी ज्यांच्या विरोधात बोलतो त्यांच्याच पक्षात प्रवेश करतो तेव्हा याला काय म्हणावे? यावरून स्पष्ट होते की आजचा राजकीय पुढारी फक्त स्वार्थासाठीच राजकारण करीत असल्याचे दिसून येते ही बाब मतदारांनी लक्षात ठेवली पाहिजे.
राजकीय पुढारी जेव्हा पक्ष बदलवितात तेव्हा सर्वसामान्यांच्या जिव्हारी लागते व मन दु:खावते.कारण राजकीय पुढाऱ्यांचे किंवा लोकप्रतिनिधीचे किंवा आमदार -खासदार यांनी सत्तेसाठी पक्ष बदलविने म्हणजे ज्या ताटात खाल्ले त्याच ताटाला छिद्र पाडने होय. महाराष्ट्रातील राजकारण पहाता राजकीय पुढाऱ्यांना असे वाटते की फक्त आपणच खूप हुशार आहोत व बाकी सर्व लोक अणपड-गवार आहेत असे वाटते.कारण गेल्या काही वर्षांपासून राजकीय उलथापालथ मोठ्या प्रमाणात सुरू आहे जनुकाय राजकीय भुकंप आला की काय असे वाटते.राजकीय उलथापालथमध्ये राज्याचा करोडो रुपयांचा चुराडा झाला.याचा सरळ परिणाम गरीब, सर्वसामान्यांना व शेतकऱ्यांना भोगावा लागतो आहे. करोडोचा भ्रष्टाचार राजकीय पुढारी करतील आणि त्याचे प्रायचित्य गरीब,सर्वसामान्यांनी व शेतकऱ्यांनी भोगावे हा कुठला न्याय म्हणावा?कारण गेल्या काही वर्षांपासून राजकीय दृष्ट्या सर्वसामान्यांची किंमत झीरोबजेटमध्ये असल्याचे दिसून येते. यामुळे राजकीय पुढारी तुपाशी आणि सर्वसामान्य जनता उपाशी असल्याचे दिसून येते. राजकीय पुढारी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करतात व सत्तेसाठी हपहपल्यासारखे करतात व एकमेकांवर कुत्र्या-मांजरासारखे तुटुन पडतात. यात सर्वसामान्यांचा किंवा मतदारांचा तिळमात्र विचार केला जात नाही हे महाराष्ट्राचे दुर्भाग्य म्हणावे लागेल. गेल्या काही वर्षांत राजकीय पुढाऱ्यांनी स्वतःच्या स्वार्थापोटी संपूर्ण हद्दी पार केल्याचे दिसून येते.
कारण आमदारांना-खासदार यांना (लोकप्रतिनिधींना) जनता पाच वर्षांसाठी निवडून यासाठी देते की राज्याचा आणि देशाचा कारभार सुरळीत चालावा व विकास झपाट्याने व्हावा.परंतु राजकीय पुढारी राज्याचा किंवा सर्वसामान्यांचा विकास करण्यापेक्षा स्वतःच्या विकासावर जास्त भर देतांना दिसतात मग तो कोणत्याही पक्षाचा पुढारी असो.याचे जीवंत उदाहरण सर्वांसमोर आहे. राजकीय पुढारी निवडुण आल्यानंतर मतदारांना विसरतात हे जनतेला चांगलेच लक्षात आले. गेल्या चार वर्षांत महाराष्ट्रात राजकीय पुढाऱ्यांनी जनुकाय तमाशा मांडला की काय असे चित्र सर्वांनीच पहाले.यावरून स्पष्ट होते की राजकीय पुढारी जनतेच्या भावनांशी वाईट खेळ खेळतांना दिसतात.सत्ताधारी पक्षाने भ्रष्टाचाराचे आरोप केलेल्या पक्षातील राजकीय पुढाऱ्यांना सत्ताधारी पक्ष आपल्या सोबत घेतो हे दुर्भाग्यच म्हणावे लागेल.मग काय भ्रष्टाचारी राजकीय पुढारी जर सत्ते सोबत गेले म्हणजे शुद्ध होतात काय? असाही प्रश्न उपस्थित होतो.अशाप्रकारे असे अनेक प्रश्न उद्भवतात.यामुळे राजकीय दृष्ट्या राज्याची परिस्थितीत दिवसेंदिवस अत्यंत बिकट होतांना दिसते. याकरीता कायद्याच्या माध्यमातून राजकीय पुढारी आमदार-खारदार (लोकप्रतिनिधी) यांच्यावर लगाम कसने अत्यंत गरजेचे आहे.
कारण राज्याच्या घडामोडी या लोकशाहीसाठी चिंताजनक आहे.राजकीय पुढारी आपल्या स्वार्थापोटी पक्षांतर करतात व सत्तेत सहभागी होतात.याचा मनस्ताप लोकांमध्ये दिसून येतो.याकरीता पक्षांतर बंदी कायद्यात मोठ्या प्रमाणात सुधारणेची गरज आहे.कारण कोणताही पक्ष असो त्याला पक्षाबद्दल निष्ठा व आपुलकी असायलाच हवी.परंतु सध्याच्या परिस्थितीत सर्वच राजकीय पुढारी निष्ठा,पक्षाचे आचारविचार हे सर्व बाजुला सारुन सत्तेकडे धावतांना दिसतात.यामुळे कायद्याच्या माध्यमातून राजकीय पुढाऱ्यांच्या मुसक्या आवरने अत्यंत गरजेचे आहे. सध्या राज्यातील राजकीय घडामोडीमुळे सर्वसामान्यांनमध्ये अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले आहे.जोपर्यंत राजकीय पुढाऱ्यांवर पक्षांतर बंदी कायद्यात सुधारणा होत नाही तोपर्यंत असाच राजकीय लपंडाव सुरू राहील.त्यामुळे राजकीय पुढारी खुर्चीसाठी सर्वसामान्यांचा बळी घ्यायला सुध्दा मागेपुढे पाहत नाहीत हे त्यांच्या पक्ष बदलण्याच्या प्रक्रियेत वरून स्पष्ट दिसून येते.परंतु मतदार बंधु-भगिनी दलबदल करणाऱ्या सर्वच उमेदवारांना त्यांची योग्य जागा दाखविण्याची हिच खरी संधी आहे.राज्यातील किंवा देशातील कोणत्याही राजकीय पक्षाचा उमेदवार असो त्याने जर दलबदल केले असेल तर मतदारांनी कोणालाही मतदान करावे.परंतु दलबदल वाल्या कोणत्याही उमेदवाराला अजीबात मतदान करु नये.कारण सत्तेसाठी तो पक्षाचा होवू शकत नाही तर आपला किंवा आमजनतेचा काय होईल याचाही मतदारांनी गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.
- रमेश कृष्णराव लांजेवार
- (माजी विद्यापीठ प्रतिनिधी नागपूर)
0 टिप्पण्या