मानराज प्रतिष्ठानच्या वतीने मुंबईतील कुर्ला येथील माँ शीला क्लिनिकच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त आज ६ एप्रिल रोजी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला जागतिक किर्तीचे समाजसेवक डॉ प्रकाश आमटे आणि त्यांच्या पत्नी डॉ मंदाकिनी आमटे यांची विशेष उपस्थिती लाभली. या कार्यक्रमात 300 हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. तसेच माहिती कार्यकर्ते अनिल गलगली, उन्नती जगदाळे, डॉ.राजेंद्र सिंग, प्रमोद हिंदुराव, आर.यू.सिंग, उदय प्रताप सिंग, अमरजीत सिंग, शलाका कोरगावकर, अनुराग त्रिपाठी, आदित्य दुबे, विजयकुमार सिंग कौशिक, राजकुमार सिंग, जितेंद्र मिश्रा, सुधीर सिंग, डॉ. खातू., अजय शुक्ला, चेतन कोरगावकर आदी मान्यवरांनीही यावेळी आपली उपस्थिती दर्शवली. सूत्रसंचालन दिनेश अडावदकर यांनी केले. मानराज प्रतिष्ठानचे विश्वस्त व आयोजक मनोज राजन नाथानी यांनी समाजासाठी काहीतरी करण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या माँ शीला क्लिनिकची माहिती दिली. आपल्या आईची इच्छा होतील एखादे छोटे रुग्णालय सुरु करण्याची त्या इच्छेपोटीच आपण हे कार्य करीत आहोत. हीच त्यांच्या नावाने आपली समाजसेवा असल्याचे नाथानी यांनी आवर्जुन नमूद केले. आज या कार्यक्रमाला प्रत्यक्ष आमटे परिवारातील सदस्यांनी उपस्थित राहून जो सन्मान आम्हाला दिला आहे त्याबद्दल नाथानी यांनी डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. मंदाकिनी आमटे यांचे विशेष आभार व्यक्त केले.
डॉ.मंदाकिनी आमटे यानी माँ शीला क्लिनिक आणि तेथे सेवेत असणाऱ्या कर्मचारी तसेच डॉक्टरांना शुभेच्छा दिल्या आणि हे कार्य असेच सुरू रहावे असा आशिर्वादही दिला. त्यानंतर आपल्या छोट्याशा मार्गदर्शनपर भाषणात डॉ.प्रकाश आमटे म्हणाले की, देशातील गरिबी दुर्दैवी आहे. या गोरगरीब आदिवासी समाजाकरिता बाबांनी सुरु केलेल्या कार्याचा आज वटवृक्ष झाला आहे. खेड्यापाड्यात ही गोष्ट फार गरजेची आहे मात्र शहरात देखील गोरगरीब जनतेकरिता असा उपक्रम राबवण्याकरिता नाथानी यांनी पुढाकार घेतला. ही प्रेरणादायी बाब आहे. आज 10 रुपयांत दवाखाना चालवणे अतिशय कठिण परिस्थिती आहे. आई आणि वडील कडून समाजसेवेची प्रेरणा घेऊन मनोज नाथानी यांनी आपल्या संस्थेच्या माध्यमातून मुंबई शहरात क्लिनिक सुरू केले या क्लिनीकमधून दररोज शेकडो लोक उपचार घेतात. नाथानी यांचे हे कार्य असेच कायम सुरू रहावे म्हणून डॉ.प्रकाश आमटे यानी आशिर्वाद दिले. तसेच ते पुढे म्हणाले, हल्ली लोक म्हणतात की तरुण पिढी समाजसेवेपासून खूप दुर चालली आहे. मात्र याबाबत आमचा अनुभव वेगळा आहे. आम्हाला मेडिकल महाविद्यालयामधूनच अधिक बोलावणे होतात आणि येथील नवीन पिढीला मार्गदर्शन करण्याचा आग्रह धरतात. ही तरुण पिढी आपल्या करिअरबाबत अधिक चौकस असून त्याबाबत यांचे कौतूक आहे. आज हेमलकसा येथे विविध प्रकल्पांतर्गत शिक्षण घेणाऱ्या आणि उच्च शिक्षण घेणाऱ्या तरुणांची संख्या मोठी आहे. दोन पायाच्या माणसाकरिता सुरु केलेला आमचा उपक्रम आज चार पायाच्या प्राण्यांनीही गजबजला आहे. प्राण्यांच्या बाबतीत भीती वाटत नाही का? असे लोक नेहमी विचारतात, पण जेथे भिती निर्माण होते. तेथे प्रेम रहात नाही. आणि प्रेम असेल तर भीती वाटत नाही. भीतीमुळे प्रेम करता येत नाही, असे सांगतानाच डॉ.आमटे म्हणाले की, म्हणूनच आजही विविध प्रकारचे प्राण्यांसोबत या ठिकाणी सहजपणे जगता येते.
डॉ. प्रकाश आमटे आणि त्यांच्या पत्नी डॉ. मंदाकिनी आमटे यांचे कुर्ला पश्चिम येथील माँ शीला क्लिनिकच्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त ढोल-ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. यानंतर कुर्ला पश्चिम येथील श्रीकच्छी विसा ओसवाल सभागृहात बाबा आमटे यांच्या जीवनावर आधारित चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रसिद्धी माध्यमांचे प्रतिनिधी देखील मोठ्या संख्येने हजर होते. त्यांच्या प्रश्नांनाही डॉ.प्रकाश आमटे यांनी दिलखुलासपणे उत्तरे दिली.
0 टिप्पण्या