महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडीला किती जागा सोडल्या आणि वंचितने किती जागा मागितल्या यावर जनतेमध्ये चर्चेच्या फैरी झडत आहेत. ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांनी सांगितल्या प्रमाणे महाविकास आघाडीने वंचितला फक्त तीनच जागांचा प्रस्ताव दिला होता. त्याचवेळी वृत्तमाध्यमांमध्ये महाविकास आघाडी वंचितला ४ जागा सोडण्यास तयार आहे अश्या बातम्या आल्या, नंतर महाविकास आघाडी वंचित बहुजन आघाडीला ५ जागाचा सोडण्यास तयार आहे अश्याही बातम्या आल्या पण महाविकास आघाडीकडून वंचितला अधिकृत पणे ४ किंवा ५ जागांचा कोणताही प्रस्ताव देण्यात आलेला नाही असे दस्तुरखुद्द ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांनीच जाहीर केले आहे. बाळासाहेब जाहीर पणे बोलत आहेत कि आम्हाला फक्त तीनच जागांचा प्रस्ताव देण्यात आलाय आणि महाविकास आघाडी मधून कोणीही वंचितला किती आणि कोणत्या जागांचा प्रस्ताव देण्यात आलाय हे जाहीरपणे बोलायला तयार नाही. यातून पाणी कुठं मुरतंय हे समजणे फार कठीण नाही. एकंदरीत वंचितने आम्ही देत असलेल्या तीन जागा घ्याव्या आणि गप्प बसावे अशी महाविकास आघाडीची इच्छा असल्याचे स्पष्टपणे समजून येते आहे.
२०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने औरंगाबाद येथे विजय मिळविला होता, सांगली येथे वंचितचा उमेदवार दोन नंबरला होता. अकोला हा ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांचा मतदारसंघ आहे. नांदेड, बुलढाणा , हातकणंगले, परभणी आणि सोलापूर या मतदारसंघांमध्ये वंचितला दीड लाखाच्यावर मतदान मिळाले होते. वंचित बहुजन आघाडीतील सूत्रांनुसार वंचित बहुजन आघाडी अकोला, औरंगाबाद, नांदेड, सांगली, बुलढाणा, रामटेक, परभणी, हातकणंगले, अमरावती आणि मुंबई दक्षिण मध्य या जागांसाठी आग्रही होती, यातील काही जागांवर तडजोड करण्यासही वंचित बहुजन आघाडी तयार होती. या जागांपैकी काही जागा कमी जास्त करून वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीचा भाग होण्यात कोणतीही अडचण नव्हती. २०१९ मध्ये वंचितला या मतदारसंघांमध्ये मिळालेले मतदान बघता वंचित बहुजन आघाडीच्या मागणीत कोणतीही चूक नव्हती असे दिसून येते पण तरीही जाणीवपूर्वक वंचित बहुजन आघाडीला या जागा नाकारण्यात आल्या, युतीची बोलणी सुरु असतानाच यातील अनेक जागांवर काँग्रेस, शरद पवार गट आणि ऊबाठा गट यांनी आपले उमेदवार जाहीर केले. सांगली या मतदारसंघात ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांनी चंद्रहार पाटील या उमेदवारास वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी देण्याची तयारी सुरु केली होती पण उद्धव ठाकरे यांनी मित्र बनून पाठीत खंजीर खुपसला आणि वंचितला विश्वासात न घेता चंद्रहार पाटील यांना सांगलीतून शिवसेनेची उमेदवारी जाहीर केली. काँग्रेस, शरद पवार आणि ऊबाठा गट जागावाटपाची चर्चा करताना अकोला जागा ऊबाठा गटाला सोडण्यात यावी अशी मागणी उद्धव ठाकरे सतत करत होते अशी माहिती शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांनी जाहीरपणे प्रसार माध्यमांशी बोलताना दिलं. यावरून कोणालाही कळू शकते की वंचित बहुजन आघाडीला युतीमध्ये सामील न करण्याची तयारी आधीपासूनच सुरु होती. महाविकास आघाडीचे प्रत्येक निर्णय वंचितला महाविकास आघाडी पासून दूर ढकलण्यासाठी घेण्यात येत होते तरीही वंचित बहुजन आघाडी भाजपला रोखण्यासाठी आपला संयम बाळगून युती होईल या आशेवर होती.
वंचित बहुजन आघाडीच्या सभांना जमलेल्या लाखोंचा जनसमूह पाहून जेंव्हा महाविकास आघाडी कडून वंचितला चर्चेसाठी बोलविण्यात आले तेंव्हा वंचितला हव्या असलेल्या जागांवर कोणतीही चर्चा न करता मुंबई उत्तर, रावेर आणि अकोला या तीनच जागांचा प्रस्ताव बाळासाहेबांना देण्यात आला होता. या तीन पैकी मुंबई उत्तर हा मतदारसंघ मुंबईतील भाजपचा गढ मानला जातो, महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या ज्या बैठकांमध्ये वंचितचा सहभाग नव्हता त्या बैठकांमध्ये मुंबई उत्तर मतदारसंघ काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना ऊबाठा गट हे तीनही पक्ष लढविण्यास तयार नव्हते. कोणीही तयार नाही म्हणून राष्ट्रवादी आणि शिवसेनेची ताकद नसलेल्या हा मतदारसंघ वंचित बहुजन आघाडीला देण्याचे कारस्थान महाविकास आघाडीच्या नेत्यांनि रचले होते.
त्याचप्रमाणे रावेर मतदारसंघात भाजपने रक्षा खडसे यांना उमेदवारी दिलेली आहे. रक्षा खडसे या राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांच्या सुनबाई आहेत. रावेर मध्ये शरद पवार गट पूर्णपणे रक्षा खडसे यांच्यासाठी काम करणार आहे हे उघडपणे सर्वांना माहिती आहे त्यामुळे शिवसेना आणि काँग्रेस या मतदारसंघात निवडणूक लढविण्यास इच्छुक नव्हते. आपण इच्छूक नाही म्हणून रावेर मतदारसंघ वंचितला देऊन राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे यांच्या परिवारातील सदस्य निवडून आणावा असा महाविकास आघाडीचा हेतू होता. वंचितने महाविकास आघाडी तर्फे रावेर लढणे म्हणजे स्वबळावर लढणे हे स्पष्ट होते. याचा अर्थ वंचितला देण्यात येत असलेल्या तीन पैकी २ जागा महाविकास आघाडीची ताकद नसलेल्या जागा होत्या जिथे महाविकास आघाडी सोबत युती करून लढण्यात आणि स्वबळावर लढण्यात काहीही फरक नव्हता. फक्त अकोला हि एकच जिंकण्यालायक जागा वंचितला देण्यात येत होती आणि त्याबदल्यात बौद्ध, ओबीसी अश्या लहान समूहांचे मिळून जवळपास ४०-५० लाख मतदान लुटण्यात येणार होते. ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांनी स्वतःच्या एका जागेसाठी वंचित जनतेच्या मतांचा सौदा करण्यास नकार दिला यात चूक काय ??
काँग्रेस, शरद पवार गट आणि ऊबाठा गट या प्रस्थापित पक्षांची मानसिकता वंचित जाती समूहांना काहीही न देण्याची होती. आजही त्यांच्या या मानसिकतेत काहीही बदल झालेला नाही. ऍड.बाळासाहेब आंबेडकर बौद्ध, बहुजन या वंचित जनतेसोबत होत असलेल्या धोकेबाजीसाठी तयार झाले नाहीत म्हणून महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीची युती होऊ शकली नाही. पण बाळासाहेब या धोकेबाज आणि अन्यायपूर्ण युतीसाठी तयार झाले नाहीत म्हणून काही पत्रकार, स्वतःला आंबेडकरी म्हणवून घेणारे प्रस्थापितांचे गुलाम आणि वृत्तवाहिन्यांना हाताशी धरून ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या विरुद्ध प्रचार करण्यासाठी पुढे करण्यात आले आहे. महाविकास आघाडीची आणि वंचितचि युती होत नाही म्हणून ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांना खलनायक ठरविण्याचा प्रयत्न सुरु आहे. यापुढे आता जनतेलाच निर्णय घ्यायचा आहे कि ते वंचितांना त्यांचे हक्क आणि वाटा देण्यास तयार नसलेल्या महाविकास आघाडीला साथ देणार कि स्वतःच्या एका जागेसाठी संपूर्ण समाज विकण्यासाठी तयार नसलेल्या ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांना साथ देणार. -
सुमित वासनिक
0 टिप्पण्या