भाजपच्या मोदी सरकारची धोरणे ही शेतकरी, कष्टकरी, मजूर-छोटे उद्योजक महिला आणि अल्पसंख्यांक तसेच सर्वसामान्य जनतेच्या विरोधातली आहेत हे मागील १० वर्षांत स्पष्ट झालेले आहे. मुठभर भांडवलदार आणि धर्माध संघटना यांच्यासाठीच भाजपचे मोदी सरकार काम करते हेही आता लपून राहिलेले नाही. हे सर्व थांबवायचे असेल आणि देशाला हुकूमशाहीपासून रोखायचे असेल तर पुन्हा एकदा जनतेचे सरकार अर्थात लोकशाही आणणे ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे. देशाला रसातळाला जाण्यापासून वाचवायचा हा हेतू घेऊन आम्ही लोकसभा 2024च्या निवडणुकीसाठी काम करीत आहोत. देशातील सर्व सरकारी यंत्रणांचा गैरवापर करून विरोधकांना घाबरविण्याचे तंत्र वापरून अबकी बार 400 पारचा नारा देणाऱ्या या हुकूमशाही सरकारला रोखण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करून या देशात संविधानाला अभिप्रेत असणारे सरकार आणण्यासाठी आम्ही कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन भारत जोडो अभियानच्या उल्का महाजन यांनी आज केले. तसेच भाजप यावेळी 200चा आकडा तरी पार करेल का अशी शंका महाजन यांनी व्यक्त केली.
भारतात संविधान लोकशाही येण्यासाठी लोकसभा निवडणुक 2024च्या पार्श्वभूमीवर आज भारत जोडो अभियानच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या अभियानाबाबत प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधण्यात आला. यावेळी ही लढाई भाजप विरुद्ध भारताचे लोक अशी आहे. आणि जगाचा इतिहास हे सांगतो की जेव्हा जेव्हा तमाम जनता पेटून उठते तेव्हा तेव्हा कुठलीही धनशक्ती, कुठलीही ताकद तिच्यासमोर पराभूत होते. या आमच्या कामात ज्येष्ठ नागरिकांनीही मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला. जे आज रिटायर्ड झालेत त्यांनीही या सरकारबाबत आपला रोष व्यक्त केला. जरी वरवर हे आपल्याला दिसत नसले तरी अंतर्गत हा रोष दिसून येत आहे. ह्या जगात सार्वभौम फक्त एकच, जनता! आता हीच जनता भाजपला सत्तेतून हद्दपार करायचे जाहीर आवाहन भारत जोडो अभियानचे संजय मंगला गोपाळ यांनी केले.
भारतीय जनता पक्षाच्या १० वर्षांच्या लोकशाही विरोधी, संविधान विरोधी राजवटीला लोक वैतागले आहेत. अगदी ऐन निवडणुकीच्या काळात भाजपच्या दोन नेत्यांनी कर्नाटक मधले अनंत हेगडे आणि राजस्थान मधल्या ज्योती मिर्धा ह्या दोन नेत्यांनी भाजपला ४०० पेक्षा जास्त जागांवर निवडून द्या कारण संविधान बदलायचे आहे अशी भूमिका मांडली. भाजपच्या कुठल्याच नेत्याने याचा साधा निषेध पण केला नाही, हेगडे पक्षात कायम आहेत आणि ज्योती मीर्धा लोकसभेच्या उमेदवार म्हणून पण कायम आहेत, अश्या स्थितीत संविधान आणि लोकशाही वाचवायची लढाई देशातील तमाम विरोधी पक्ष आणि सामाजिक संघटना एकत्र येऊन लढत आहेत. याचाच एक भाग म्हणून भारत जोडो अभियान देशभरात सक्रियपणे कार्यरत आहे. भारत जोडो अभियान हे जाणून आहे की या निवडणुकीत ५४३ पैकी एक एक मतदारसंघ महत्त्वाचा आहे. महाराष्ट्रात तब्बल ४८ मतदारसंघ आहेत आणि उत्तर प्रदेश इथल्या ८० मतदारसंघांच्या नंतर महाराष्ट्र हे दुसरे मोठे राज्य आहे. महाराष्ट्रातही सर्व ४८ मतदारसंघांत अभियानाचे कार्यकर्ते पसरलेले असून २३ मतदारसंघात अगदी फोकस ठेवून काम करत आहेत. अश्या स्थितीत येत्या निवडणुकीत भारत जोडो अभियान राज्यातल्या प्रत्येक मतदारसंघात एक स्पष्ट भूमिका घेऊन कामाला लागले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
मागील वर्षी जुलै १ आणि २ तारखेला जळगाव इथे महाराष्ट्रातल्या सुमारे हजाराहून अधिक समविचारी सहकाऱ्यांचे राज्यस्तरीय संमेलन घेऊन या कामाची सुरुवात झाली. अद्यापही प्रक्रिया त्यानंतर अथकपणे सुरू आहे. ह्या मधल्या काळात राज्यातल्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघात समविचारी व्यक्ती, संस्था शोधणे इथपासून ते जनमानसाचा कानोसा घेऊन भाजप व महायुतीतील उमेदवारांचा पाडाव करण्यासाठी जनचळवळीची उपस्थिती आहे अशा मतदारसंघांत प्रचाराचे काम उभे करणे इथपर्यंत प्रक्रिया पार पडली आहे. यातूनच मग जिथे भाजपच्या पाडावासाठी अधिक कष्टाची गरज आहे असे २३ मतदारसंघ निवडण्यात आले.
दुसरा टप्पा या मतदारसंघांत काम करणारे जे कार्यकर्ते असणार आहेत त्यांच्या प्रशिक्षणाचा होता. यात मतदार यादीत नाव कसे नोंदवून घ्यावे हेही शिकवले गेले आणि लोकांपर्यंत कोणते मुद्दे कसे मांडावेत हेही सांगितले गेले. मागील चार दशकांत अश्या पद्धतीचे पहिल्यांदाच सामाजिक कार्यकर्ते निवडणुकीच्या राजकारणात हस्तक्षेप करत आहेत, सहभागी होत आहेत. यापूर्वी आंदोलनांची धुरा वाहणारे कार्यकर्ते निवडणुकीच्या प्रक्रियेपासून दूर राहत असत. पण यावेळी मात्र अगदी ठरवून या प्रक्रियेत सहभागी होत आहेत, याचे मुख्य कारण या देशावर आलेले भाजप नावाचे अभूतपूर्व संकट आहे. हे संकट उलथवून लावणे ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आणि भारत जोडो अभियानाच्या माध्यमातून हे काम करण्यात येत आहे. यासाठी नवमतदार नोंदणी देखील मोठ्या प्रमाणात करण्याचे काम संघटनेने हाती घेतले आहे. यासाठी आम्ही महाविद्यालयाच्या माध्यमातूनही मतदार नोंदणी अभियान राबवले. त्यालाही मोठ्ठा प्रतिसाद मिळाला. याकामी आम्हाला निवडणूक आयोगानेही सहकार्य केले. आणि हे काम आता यापुढेही सुरूच राहिल असे सिताराम शेलार यांनी स्पष्ट केले.
एकीकडे ही प्रशिक्षण प्रक्रिया सुरू असताना इतरही अनेक संघटना ज्या भारत जोडो अभियानाच्या भाग नव्हत्या त्यांच्याशी चर्चा करून 'निर्धार महाराष्ट्राचा' ही मुख्य प्रक्रिया उभी केली गेली. त्याचवेळी महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष, कम्युनिस्ट पक्ष, प्रकाश आंबेडकर यांचा वंचित, शेतकरी कामगार पक्ष आणि समाजवादी पक्ष या समविचारी पक्षांच्या नेत्यांना भेटून निवडणूक पूर्व आघाडीसाठी विनंती पण केली आणि सोबतच त्यांना महाराष्ट्रात सुरू असलेल्या आमच्या कामाची माहिती पण दिली. आता हे समन्वयाचे काम अत्यंत उत्तम सुरू असून इंडिया आघाडीतील सर्व घटकपक्षांना आम्ही पूर्ण सहकार्य करत आहोत. या संकटाचा सामना करताना येत्या निवडणुकीत राज्यातील सर्व ४८ मतदारसंघांत भाजपचा दारुण पराभव करणे हे अभियानाचे उद्दिष्ट आहे. आत्ता या क्षणी या सर्व मतदार संघांत भाजप आघाडी विरोधात सर्वात सक्षम उमेदवार हे महाराष्ट्र विकास आघाडी अर्थातच इंडिया आघाडीकडे आहेत. त्यामुळे ४८ च्या ४८ मतदारसंघांमध्ये कार्यकत्यांनी आणि नागरिकांनी कामाला लागून इंडिया आघाडीचे उमेदवार निवडून आणायला मदत करावी अशी स्पष्ट भूमिका या अभियानच्या राज्य समन्वयक उल्का महाजन यांनी शेवटी मांडली.
0 टिप्पण्या