भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीच्या पूर्वसंध्येला आज मुंबई मराठी पत्रकार संघात बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले. यावेळी रिपब्लिकन नेते राजाराम खरात यांच्यावतीने लाडू वाटप करण्यात आले.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानातून पत्रकारितेला लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा दर्जा दिला. त्यावेळची पत्रकारिता, सत्याचा शोध घेणे आणि अत्याचाराला वाचा फोडणे आणि सत्ताधाऱ्यांवर अंकूष ठेवून आपली भूमिका चोख बजावत होती. मात्र आज देशात इतकी भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे की, जनतेच्या समस्यांवर वाचा फोडणाऱ्या पत्रकारांवरच हल्ले होत आहे. खऱ्या पत्रकारांची दडपशाही सुरू आहे, त्यांना सत्य सांगण्याची सुद्धा मुभा नाही. त्यामुळे पत्रकारिता हवालदिल झाली आहे, अशा परिस्थितीतही काही पत्रकार आजही आपली चोख भूमिका बजावत असल्याने ही समाधानाची बाब आहे. यामुळेच हा चौथा स्तंभ अद्यापही टिकून आहे असा विश्वास रिपब्लिकन नेते राजाराम खरात यांनी व्यक्त केला.
यावेळी पत्रकार रवींद्र भोजने, दिनेश मराठे, सुरेश गायकवाड, तसेच रिपब्लिकन पक्ष आर.के.गटाचे सचिव प्रकाश कांबळे यांनीही डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकूणच जिवनप्रवासाबद्दल आणि त्यांच्या कार्याबद्दल आपले विचार मांडले. महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना श्रद्धा सुमने अर्पण करीत डॉ.बाबासाहेबांनी जगातील सर्वांग सुंदर आणि लोककल्याणकारी राज्य घटना भारतीयांना दिली हे आपल्या सर्व भारतीयांचे भाग्य असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले. यावेळी मुंबई मराठी पत्रकार संघाचे कर्मचारी तसेच पत्रकार शिरीष वानखेडे, नंदू घोलप, प्रकाश साबळे, सलीम खतीब, सलीम सय्यद, सुरेश ढेरे, गुणवंत दांगट, प्रियांका सिंग, जॉन मेढे आणि सुबोध शाक्यरत्न आदी उपस्थित होते.
0 टिप्पण्या