Top Post Ad

आंबेडकरी अभ्यासकांपुढील ‘जाती’चे आव्हान


  ‘जाती’ संकल्पनेचे एक मूळ असलेल्या मनुस्मृतीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अभ्यासपूर्ण घाव घातला. आता अन्य मुळे तपासून पाहिली पाहिजेत.. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांची भारतीय प्रबोधनातील भूमिका अत्यंत मूलगामी आहे. हजारो वर्षांच्या अनेक प्रकारच्या अंधश्रध्दांमधून हिंदू समाजाला मुक्त करणारे लोकशाहीप्रधान भान देणारे बाबासाहेब हेच पहिले समाजधुरीण होते.‘जात म्हणजे काय?’ हा मूलभूत तत्त्वज्ञानात्मक प्रश्न विचारणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे पहिले आधुनिक विचारवंत आहेत. जातीव्यवस्थेची तात्त्विक मुळेही शोधताना त्यांना धर्मरचनेतून त्याची उत्तरे मिळाली. ज्या मुळापर्यंत ते जाऊन पोहोचले, ते मूळ भारतीय हिंदू तत्त्वज्ञानात आहे.

हिंदू तत्त्वज्ञानातील न्यायदर्शनाने ही जातीची संकल्पना मांडली. ती त्यांनी प्रत्यक्षातील जातीसाठी मांडली, असे नव्हे तर ज्ञानशास्त्रीय वस्तू म्हणून चच्रेसाठी मांडली. तथापि ही संकल्पना आजच्या विद्यमान जातिव्यवस्थेला लागू केली तर कोणते चित्र दिसू शकते, ते कळू शकते. ही संकल्पना जणू काही जातिसंस्था आणि जातिव्यवस्था यांचा आराखडाच तयार करते, असे म्हणता येते.डॉ. आंबेडकरांच्या समोर मनुस्मृती हा ग्रंथ प्रामुख्याने असला तरी ही संकल्पनासुद्धा नव्या अभ्यासकांपुढे एक आव्हान मानता येईल. न्यायदर्शनाच्या मते, जसे जगात अनेक पदार्थ आहेत तसे भाषेतही पदार्थ असतात. ‘पद म्हणजे शब्द.’ शब्दाने ज्याचे ज्ञान होते तो पदार्थ. पदार्थ हा शब्द जिला लांबी, रुंदी, रंग, गंध इ. गुण आहेत अशा वस्तूसाठी वापरता येतोच, पण जिला असे काहीच नाही अशा सूक्ष्म किंवा केवळ कल्पनेनेच जिचे अस्तित्व गृहीत धरलेले असते, अशा वस्तूसाठीही हा शब्द वापरता येतो.   

न्यायदर्शनाच्या मते, जाती हा काल्पनिक पदार्थ आहे. ते जाती म्हणजे वर्ग (class) असे मानतात. जाती जिच्यामार्फत जाणवते ती व्यक्ती असते. जाती अस्तित्वात नसते. पण ती प्रत्यक्षपणे ज्ञात होते. जसे की गायीची ‘गोत्व’ ही जाती ‘गाय’ या व्यक्तीच्या मार्फत अनुभवास येते.  जाती संख्येने नेहमी एकच असते आणि नेहमी अक्षय्य असते. उदा. आज असलेल्या सर्व गायी (गो व्यक्ती) मरून गेल्या तरी गोत्वरूपी जाती मात्र शिल्लक राहते.  प्रत्येक गायीत राहणारी ही जाती कितीही गायी निर्माण झाल्या व नष्ट झाल्या तरी संपत नाही. ती या अर्थाने अनंत, क्षय न होणारी, सतत असणारी अशा स्वरूपाची म्हणता येईल. म्हणून न्यायदर्शन जातीची व्याख्या ‘जे अनेक वस्तूंमध्ये समान असते ते’ (‘नित्य एकम अनेकानुगतम्’ ) किंवा ‘नाश न पावणारी एक प्रकारची वस्तू’ (‘नित्यत्वे सति अनेक समवेत्वम’) अशी करतात. ही अक्षय्यता म्हणजे नित्य असणे होय.   

जाती व्यक्तीशी नेहमीच संलग्न असते. आता या संलग्नतेला विशिष्ट अर्थ आहे. त्या विशिष्ट संबंधानेच व्यक्ती जातीशी आणि जाती व्यक्तीशी बांधलेली असते. या संबंधाला ‘समवाय’ म्हणतात. म्हणजे असे की जाती व जातिसदस्य हे दोन्ही घटक वेगळे दाखविता येतात पण वेगळे करता येत नाहीत. त्यांच्यात फरक करता येतो पण दोघांना वेगळे करणे अशक्य असते. याचा अर्थ ते एकरूप असतात, असेही नाही. एकरूप नसलेले, वेगळे करता येऊ शकणार नाहीत पण वेगळे दाखविता येऊ शकतील असे हे संबंध असतात. या संबंधालाच ‘समवाय’  म्हणतात.

जातीची व्याख्या, तिचा व्यक्तीशी असलेला संबंध लक्षात घेता जातीबद्दल असे म्हणता येते की, ‘जो अनेक व्यक्तीमध्ये जातीशी समवाय संबंधाने राहणारा, व्यक्तीमार्फतच कळणारा नित्य, अक्षय्य पण अस्तित्व नसणारा म्हणून कधीही नष्ट न होणारा’ पदार्थ आहे. न्यायदर्शनाची  ‘जाती’ ही संकल्पना प्रत्यक्षातील जातिव्यस्थेतील जातीस लागू करता येते. उदाहरणार्थ, जातीच्या व्याख्यांनुसार जातिव्यवस्थेतील जाती अनेक व्यक्तीमध्येच आढळते. प्रत्येक जात ही संख्येने एकच असते. उदा. मांग, ब्राह्मणातील देशस्थ/ कोकणस्थ, महार, मराठा, सुतार, सोनार, कुंभार इ. अशा शेकडो जाती असल्या तरी प्रत्येक जात संख्यात्मकदृष्टय़ा ‘एकच एक’ असते. पोटजात असू शकते, पण तीही एकमेवच असते. जाती अमूर्त असतात, म्हणजेच त्यांना कधीही स्थलकालयुक्त अस्तित्व नसते. पण तरीही जातीचे तत्काळ ज्ञान होते. ब्राह्मण, महार इत्यादी जात अस्तित्वात नसते. पण तिच्या असण्याचा अनुभव येतो तो त्या जातीच्या सदस्यांमार्फतच. प्रत्येक जात आपल्या सदस्यामार्फतच प्रकट होत राहते. जात ठरते ती जन्मानुसार. जन्म घेणे म्हणजे आपली जात इतरांना कळविण्याचे आणि जातीचे ‘असणेपण’ अबाधित राखण्यासाठीचे साधन म्हणूनच अस्तित्वात येणे.

जन्मापासून चिकटलेली जात ती व्यक्ती मेली तरी शिल्लक राहते. कारण दुसरी त्याच जातीची व्यक्ती जन्माला आलेली असू शकते. हा संबंध तोडणे म्हणजे व्यक्तीच तोडणे होय. जातीपासून व्यक्तीला तोडण्याचा प्रयत्न केला तर व्यक्तीचा नाश होतो, जातीचा नाही. कारण व्यक्तीलाच अस्तित्व असते. जातीला अस्तित्वच नसते,  परंतु जात अबाधित, अविनाशी असते. अनेक व्यक्ती जन्मतात, जात आविष्कृत करतात, मरतात, पण जात चिरस्थायीरीत्या अविनाशी, अक्षय्य राहते.  न्यायदर्शनाच्या या ‘जाती’ व्यवस्थेकडे एक प्रारूप म्हणून पाहिले आणि त्याचे उपयोजन प्रत्यक्ष जातिव्यवस्थेशी जोडून पाहिले तर कोणते चित्र मिळेल? कशी मांडणी करता येईल? जाती संकल्पना प्रत्यक्षातील जातिव्यवस्थेच्या रचनेचे आणि तिच्या अविनाशित्वामागील ‘छुपे तर्कशास्त्र’ मानता येईल काय? आज भारतीय प्रबोधनाचे नवे प्रश्न आणि आंबेडकरवादाचा विस्तार या अर्थाने विचारता येईल.

आज ‘जाता जात नाही, ती जात’  अशी व्याख्या केली जाते, पण ती योग्य नाही. जात जाऊ शकते, जातधर्मत्याग शक्य आहे, जाती व जातिसदस्य यांचे नाते तोडता येते, हे डॉ. आंबेडकरांनी दाखवून दिले आहे. त्यांची धर्मातराची जागतिक घटना हे आजही भारतीय समाजधुरिणांपुढील मोठे आव्हान आहे. मात्र वैदिक धर्मापेक्षा वैदिक तत्त्वज्ञानाने निर्माण केलेल्या जाती संकल्पनेसारख्या प्रश्नांची उत्तरे शोधता आली तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापुढे कोणते आव्हान होते, याची कल्पना येऊ शकते. बाबासाहेबांना या दिशेने विचार करण्यापेक्षा धार्मिक दृष्टिकोनातून विचार करणे महत्त्वाचे वाटले, कारण प्रत्यक्ष धर्मसंस्था जास्त प्रभावी होती. आज जातीची बंधने नाहीशी झाली असून समता व बंधुता या दिशेने भारताची प्रगती चालू आहे, असे म्हटले जाते. समृध्दी हा प्रश्नही बऱ्याच अंशी सोडविला गेला आहे. या पाश्र्वभूमीवर, शुध्द तात्त्विक चिंतन अथवा तर्कशास्त्रीय चिंतनाकडे जाणीवपूर्वक लक्ष देण्याचे आव्हान व आवाहन नव्या आंबेडकर अभ्यासकांपुढे आणि विशेषत: आंबेडकरी नेतृत्वापुढे आहे. 

श्रीनिवास हेमाडे टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com