Top Post Ad

तथागत बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्म प्रचारात स्त्रियांचा सहभाग

 


  भगवान गौतम बुद्धांना "द लाईट ऑफ एशिया "असे म्हटले जाते .तथागत बुद्ध व त्यांचा धम्म ही जगाला मिळालेली एक अलौकिक देणगी आहे .बुद्धांनी सांगितलेली तत्वे ,आर्य अष्टांगिक मार्ग ,पंचशील हे सर्व जगासाठी अंगीकारायला अतिशय सुलभ व विज्ञाननिष्ठ आहे. "मन "हे सर्व विकाराचे केंद्रबिंदू मानून बुद्धाने शिकवलेली आचरणाची तत्वे माणसाच्या विकासाला कारणीभूत ठरत आहे. कुठल्याही प्रकारच्या कर्मकांडाला नाकारून पूर्णतः विज्ञान निष्ठ व आचरणाला सोपा ,सहज असा धम्म बुद्धाने या धरतीवर रुजविला व वाढविला .संपूर्ण जगात बौद्ध धम्मियांची लोकसंख्या 52 करोडच्या वर आहे .बौद्ध धम्माचा उदय जरी भारतात झालेला असला तरी, तो इतर देशांनी स्वीकारल्यामुळे तो सर्व जगात पसरला व रुजला .सर्व जगात युद्ध ,अशांतता ,अमानवीयता, वंशवाद ,रूढी वाद  साम्राज्यवाद, भांडवलवाद तसेच स्त्री पुरुष असमानता या सर्व समस्यांवर बुद्ध धम्म एक उपाय म्हणून समोर येत आहे .अनेक राजे महाराजे ,सम्राट, श्रीमंत, गरीब या सर्वांनी बुद्ध धम्मा ला आपलेसे केले .प्रत्येक देशागणिक आणि प्रांतागणिक बुद्ध धम्माची आचरणाची पद्धत जरी वेगवेगळी असली तरी मूळ गाभा एकच आहे.

      बौद्ध धम्मामध्ये अनेक पंथ असून सर्वच पंथाचे नियम जरी वेगवेगळे असले तरी सर्वच पंथांनी त्यात महिलांना सामावून घेतले आहे. बौद्ध धम्मामध्ये महिलांना अतिशय महत्त्वाचे व बरोबरीचे स्थान दिले आहे. बुद्धाने स्त्रियांना काही मर्यादेत व वैयक्तिक खाजगीपणा जपत काही हक्क देऊन त्यांना संघात येण्याचे स्वातंत्र्य दिले .संघालाही भिककुनीॅचे हक्क व अधिकार जपत त्यांचे नेतृत्व मान्य करावे असे सुचित केले. त्याचप्रमाणे भिक्कुनिचे  कोणत्याही पुरुषाच्या पाठिंब्यावाचून त्या स्वतःचे वैयक्तिक आयुष्य घडवू शकतात हे मान्य केले. बुद्धाने हा भ्रम सुद्धा मोडीत काढला की ,कुटुंब व मुलांना जन्म देणे याशिवाय स्त्रिया निर्वाण प्राप्त करू शकत नाहीत. बुद्धांनी प्रथम स्त्रियांच्या शिक्षणाचा पुरस्कार केला व त्या राजनैतिक नेतृत्व सुद्धा करू शकतात याची ओळखही करून दिली.

 


       बुद्धाने स्त्रियांना संघामध्ये स्त्रियांच्या शारीरिक स्त्री रचनेचा आदर करीत व स्त्री-दक्षिण्य राखत स संघात प्रवेश दिला संघाच्या सर्व नियमांचे पालन व आर्य अष्टांगिक मार्गाचे पालन करून भिक्कुनी अर्हत पदावर गेल्या .थेरी गाथेमध्ये आपल्याला अनेक अर्हतपदावर गेलेल्या भिक्खूंनींचे चरित्र पहावयास मिळते. संघामध्ये प्रवेश घेण्यासाठी जसे कठोर नियम भिक्खू संघास पाळावे लागत होते तसेच भिकखुनी सही पाळावे लागत होते. संघाचा प्रवेश जरी बुद्धांनी त्यांच्या गृहत्यागाच्या कारणावरून प्रथम नाकारला होता तरीही नंतर महाप्रजापती गौतमीच्या इच्छेवरून व विनंतीवरून भिकखुनींच्या संघाच्या प्रवेशाचा मार्ग मात्र नंतर खुला केला.        महा प्रजापती गौतमी ही प्रथम भिक्कुनी होय जिने संघामध्ये प्रथम स्थान मिळवले .व सोबतच 500 भिक्खुणीला सोबत घेऊन गौतमीने संघाची दीक्षा घेतली. त्यानंतर एका पाठोपाठ एक अशा कितीतरी कर्तबगार, सुंदर, सुकुमार ,श्रीमंत, गणिका  महाराण्यांनी सुद्धा संघात प्रवेश घेऊन काहीजणी अर्हत पदावर पोहोचल्या. संघामध्ये प्रवेश करणे जरी वरवर पाहता त्यांच्यासाठी सोपे नव्हते तरीही या सर्व महान भिकखुनींनी त्यात अभिमानास्पद अशी कामगिरी केली ती येथे आपण पाहूच......

        एकूणच त्या काळाच्या सांप्रत समाजाचा व एकूणच समाज व्यवस्थेचा प्रथा परंपरांचा पगडा त्या काळात इतका जास्त होता की स्त्रियांना धर्मशास्त्रात किंबहुना कोणत्याही धर्माच्या अंतर्गत रचनेत ढवळाढवळ करण्याचा अधिकार नव्हता. जे काही पुरुष सत्ताकपद्धतीत चालत असे तसेच धर्मशास्त्रातही चालत असे परंतु बुद्धाने ही परंपरा मोडीत काढून संघप्रवेशाचा मार्ग स्त्रियांसाठी खुला केला .धम्मामध्ये स्त्री व पुरुष दोघेही समान आहेत याचा आदर्श पायंडा सर्वप्रथम बुद्धांनीच घातला. भगवान बुद्धाच्या काळात फक्त भिक्खुनींननच आत्मज्ञान प्राप्त केले असे नाही ,तर लहान बालकांनीही आत्मज्ञान प्राप्त केल्याची उदाहरणे आहेत .संघामध्ये भिकखुनींनी प्रवेश घेतल्यानंतर त्यांनी काय कर्तबगारी  किंवा उल्लेखनीय कामगिरी केली यावर चर्चा करणे प्रस्तुत लेखात आवश्यक आहे असे मला वाटते.

          सर्वात ज्येष्ठ भिक्खुनिया महा प्रजापती गौतमी होत, त्यांनीच इतर सर्व भिक्खुनींचे नेतृत्व केल्याचे आपणास दिसते. सर्वात जास्त विद्वान म्हणून हेमा भिक्खुनीचा उल्लेख करावा लागेल. त्या पाठोपाठ भिक्कुनी उत्पलवना यांचा उल्लेख येतो. त्याचप्रमाणे अजून एक विद्वान भिक्कुनी होत्या ज्यांचे धम्मावर अतिशय प्रभुत्व होते त्या धम्मदिना भिक्कुनी होत. सर्वात दानशूर म्हणून 'विशाखांचे 'नाव घ्यावे लागेल. शिक्षणामध्ये 'खुजुत्तराही' भिक्कुनी हुशार होती. यशोधरा जी की बुद्धाची पत्नी होती ती सुद्धा अर्हत भिक्खुनी झाली .भिक्कुनी काकंदी माता यांचे अधिधम्मपिठावर प्रभुत्व होते. त्यांनी सर्व पंथाचा व महायानी मार्गाचा अभ्यास केला होता. ध्यानधारणा  धम्मदेसनेत ,विनयात त्या निपुण होत्या. त्यांचा प्रवचनात हातखंड होता .त्या एक प्रज्ञावान भिक्कुनी होत्या. राजगृहाच्या पावनभूमीतील अनेक शील संपन्न ,महादानशूर, श्रद्धावान, कुशाग्र बुद्धिमत्तेच्या स्त्रिया भिक्कुनी संघात सामील झाल्या, त्यात धम्मदिना, खेमा, पारधी समाजातील चाफा ,पुरोहित कन्या कुंडलकेशा, महाकोशल नरेशाची कन्या वजीरा ,सोनार कन्या शुभा यांचा समावेश आहे. शुभाने आपल्या संपूर्ण चित्तवृत्ती त्यागल्या होत्या एका प्रसंगात तिच्या डोळ्याच्या सौंदर्यावर लब्ध झालेल्या पुरुषाला तिने आपला एक डोळा काढून दिला होता. या प्रसंगात बुद्ध म्हणतात ,"धन्य आहे ती भिकुनी जिने तारुण्यात बुद्ध शासनात प्रविष्ट होऊन अर्हत पद प्राप्त केले".' मंडपदायिका' या भिक्खुणीला प्रजापती गौतमीने प्रव्रज्या देऊन उपसंपन्न केले, तिने सर्व वासनांचे भावबंध तोडून अर्हतपद प्राप्त करून बुद्ध शासनाला पूर्ण केले. बुद्ध म्हणतात, स्त्री ही विश्वाची जननी आहे तिने अनेक महान रत्नांना  शुरांना ,चक्रवर्तींना, बोधिसत्वांना, राण्या महाराण्यांना, या जन्म दिला आहे. जसे महामाया, महाप्रजापती गौतमी, आम्रपाली ,नंदा, किसा गौतमी, कपिलायनी ,उत्पलवनी, मल्लिका  शोभा, शामा  खेमा, उत्तरा, माला, उत्तमा, चित्रा, मित्रपटाचारा, चाला, उपचाला, सोना, कात्यायनी  काली, शैला इत्यादी कित्येक अद्वितीय रत्नाला जन्म देऊन स्त्रिया अमर झाल्या. अनुप्रिया नगरीची जयश्री हिने बुद्ध, धम्म ,संघाची श्रद्धायुक्त अंतकरणाने सेवा केली. शामावती माता ,भद्रावती (महाराष्ट्र) ,माद्री माता, भिक्कुनी सुमनामाता (श्रावस्ती), गजंगला माता इत्यादी भिक्खुनींनीसुद्धा धम्माची सेवा केली.

       मीगार माता 'विशाखा 'हिला आपण दानशूर म्हणून ओळखतो. मगध देशाची उत्तरानंदा माता, सुमंगला माता या सुद्धा त्याकाळी प्रसिद्ध होत्या. भगवंताला खीर देणाऱ्या सुजाता मातेने चार आर्य सत्य व अष्टांग मार्गाचे ज्ञान मिळवले व अर्हतपदी पोहोचली .उपशम माता (कपिलवस्तू )वीरांगणा माता (कुशीनगर) भिक्खुनी चारुमती ह्या सुद्धा प्रसिद्ध पावल्या. भिक्कुनी पटाचारा माता प्रचंड ज्ञानी होती. भिक्कुनी वडध माता (भडोच)भिक्कुनी नंदूत्तरा माता, भिकुनी शैलामाता , भिक्खुनीं शॢक्रामाता (राजगृह) ह्या सुद्धा भिक्खुनींनी धम्माला वाहून घेतले होते. भिक्कुनी धम्मदिना माता (राजगृह), शामा माता (कोसंबी), मित्तकालीमाता (कुरुंदेश), उत्तरा माता (कपिल वस्तू )गणिका विमलमाता (वैशाली) ,वैद्यराज सुप्रिया माता (वाराणसी), भिक्खुनी तिष्यामाता (कपिलवस्तू) ,भिक्खुनी ऋषीदासी माता (उज्जैन), भिक्खुनीं संघमित्रा या भिक्खुनी सुद्धा इतिहासात अजरामर झाल्या. पूर्णामाता (साकेत), हेमलता (सुगतपुरी), मांगदीकन्या (कुरुक्षेत्र), कोसल कन्यारत्न सुजामाता, भिंकखुनी संघामाता ,माधवीमाता (मल्लदेश ),वासवादत्तमाता (मथुरा), भिक्खुनीं मंडपदायिका माता (वैशाली), भिक्खुनी ब्रह्मदत्तामाता (काशी जनपद) ,आग्रमहर्षी विदिशा (विदिशा नगरी), सुंदरी (श्रावस्ती), वशिष्ठी माता (वैशाली), भिक्खुनी कुलवयमाता (श्रावस्ती), सम्राज्ञी मल्लिका राणी (कोशल ),खुजउत्तरा (कोसंबी), मुक्ता माता (श्रावस्ती), पराक्रमी दासी श्यामामाता (कुशीनारा ),धम्मा माता (श्रावस्ती), भिक्खुनी चंद्रा माता, धिरामाता (कपिलवस्तू), राजकुमारी चुंदी (राजगृह ) चापामाता, कात्यायनी माता (कुरघर ),भिक्खुनीं अनुलामाता,शालवती गणिका, भिक्कुनी राजश्री , कण्णकी (चोलराज ),राजकुमारी भृकुटी या सर्व भिकखुनींनी आपले जीवन संघाला व बुद्धाच्या धम्माला अर्पण केले व धम्मकार्यास आपले जीवन वाहिले .विस्तार भय्यास्तव इतर नावे इथे समाविष्ट केलेली नाहीत याची नोंद असावी.....

         जसे बुद्धाच्या काळात स्त्रियांनी धम्म स्वीकारल्यामुळे त्यांचा त्यातील सहभाग व त्यांची झालेली जडणघडण आपण बघितली तशा स्वरूपाची सामाजिक जडणघडण 1956 नंतर धम्म स्वीकारल्यामुळे स्त्रियांचा धम्मकार्यातील व चळवळीतील  सहभाग पाहणे क्रमप्राप्त ठरते .14 ऑक्टोबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धांचा धम्म निवडण्या मागची कारणे ही विवेकनिष्ठ व विज्ञाननिष्ठ होती. आचरणात सहज व कर्मकांडावर विश्वास न ठेवणारा धम्म त्यांनी गरीब   पिङीत व जातीच्या उतरंडीत खालच्या स्थानावर असलेल्या महार लोकांना दिला. त्यानंतर या समाजाने उत्तरोत्तर प्रगती करीत समाजामध्ये प्रखर कृतिशील म्हणून मानाचे स्थान मिळवले. डॉक्टर बाबासाहेब म्हणतात ,"समाजातील स्त्रियांची प्रगती किती झाली यावरून मी त्या समाजाच्या प्रगतीचे मोजमाप करतो". 20 जुलै 1942 नागपूर मध्ये बाबासाहेबांनी स्त्रियांसाठी परिषद भरवली त्याकाळी त्या परिषदेला 25000 महिला सहभागी झाल्या होत्या. बाबासाहेबांच्या चळवळीतही अनेक महिलांनी सक्रिय सहभाग घेतलेला होता. बाबासाहेबांची चळवळ गतिमान करण्यासाठी कार्य केलेल्या तत्कालीन अनेक स्त्रियांची नावे इथे घेता येतील त्यात प्रामुख्याने जाईबाई चौधरी (नागपूर) सखुबाई मोहिते चिपळूण (कोकण), राधाबाई कांबळे (नागपूर), सुलोचना डोंगरे (यवतमाळ), मिराबाई पगारे (नाशिक), शांताबाई दाणे ,कीर्तीबाई पाटील (नागपूर), इंदिराबाई पाटील (नागपूर), लक्ष्मीबाई नाईक (अकोला), सीताबाई गायकवाड दादासाहेब गायकवाड यांच्या पत्नी, शांताबाई भालेराव (अहमदनगर), मीनांबल .एन. शिवराज मद्रासच्या तत्कालीन मेयर या स्त्रियांचा प्रामुख्याने समावेश होतो.

         यानंतरच्या काळात अनेक स्त्रिया बाबासाहेबांचा विचार पुढे घेऊन विद्या विभूषितच झाल्या नाहीत, तर अनेक उच्चपदस्थ पदे त्यांनी काबीज केलीत व वेगवेगळ्या क्षेत्रात त्या कार्यरत आहेत. बुद्ध व बाबासाहेबांच्या विचारांची कास धरूनच आज त्या प्रगतीपथावर आहेत .कारण कर्मकांडांना थारा न देता फक्त कृतीशीलतेवर त्या भर देतात. त्यांच्यामुळेच आज बौद्ध समाजात महत्त्वाची स्थित्यंतरे होताना दिसतात. असे म्हणतात की, स्त्री ही कोणत्याही "संस्कृतीची वाहक असते" म्हणून स्त्री वरच काही महत्त्वाची जबाबदारी येऊन पडते ती अशी की, येणारी पिढी ही विज्ञाननिष्ठ व कार्यक्षम कशी घडवायची? आणि हे कार्य अनेक महिला आपल्या कार्यकृतीतून घडवून आणत आहेत व बौद्ध संस्कृतीला व धम्म चळवळीला पुढे नेत आहेत.

 


*जयश्री भगत* ( संभाजीनगर )

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com