- संविधान बचाओ, डरो मत और संवाद करो…!!
- अमन का कारवॉं" अभियानाचा ६ मार्च रोजी पुण्यातून प्रारंभ*
आजची देशातील सामाजिक, राजकीय परिस्थिती अतिशय विदारक आहे. सर्वच क्षेत्रात अराजक माजले आहे. आपण सूज्ञ व जागृत असाल तर याची दाहकता निश्चितच आपल्यापर्यंत पोहोचलेली असणार. आजच्या विद्वेषी, उन्मादी, जात-धर्मवादी, वर्चस्ववादी व दडपशाहीच्या वातावरणात सामान्य माणसाला दैनंदिन जगणे आणि दुनियादारी निभावणे अतिशय कठीण व अवघड होऊन बसले आहे. आज सत्तेत असलेल्या बहुसंख्यांकवादी धर्मवाद्यांनी मुस्लिम, ख्रिश्चन, दलित आणि बहुजन समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक जीवनावर चहुबाजुंनी आक्रमण केले आहे. हे सर्व अपघाताने वा तत्कालिक कारणांनी मुळीच घडत नाही. त्यामागे संवैधानिक प्रजासत्ताकाऐवजी, धर्मसत्ताक राज्यव्यवस्था आणण्याचे मोठे व पद्धतशीर षडयंत्र आखण्यात आले आहे. आणि या प्रकारचे षडयंत्र एवढ्याच संपणारे नाही. सर्वधर्मसमभाव या तत्वावर आधारित राष्ट्राऐवजी, हिंदूराष्ट्र निर्माण करण्याचे ध्येय साध्य होईपर्यंत या धर्मवादी शक्तींच्या विद्वेषी आणि हिंसक कारवाया सुरूच राहील, हे संविधानप्रेमी नागरिकांनी ध्यानात ठेवले पाहिजे. परिणामी, शांतताप्रिय नागरिकांना नजिकच्या काळात आजच्या पेक्षाही अनेक कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.अशा कठीण व आव्हानात्मक परिस्थितीत सर्व बहुजन समाजाला, अशा विभाजनकारी शक्तींविरोधात मोठा वैचारिक व कृतिशील लढा उभारावा लागणार आहे. इथल्या मातीतील दिव्य परंपरा असलेल्या प्राचीन 'वसुधैव कुटुंबकम' म्हणजेच मिलीजुली गंगा-जमुनी' संस्कृतीमुळेच, आजवर आपण सारे भारतीय नागरिक प्रेम, सौहार्द आणि बंधुभावाने बांधले गेलो आहोत. मात्र आपल्या देशातील हा उदात्त आणि 'विश्वात्मक' सांस्कृतिक वारसा नष्ट करण्याचा सर्वंकष प्रयत्न मागील काही वर्षांपासून सुरू आहेत.
भारतीय मातीतच वाढलेल्या मुस्लिम समाजाविरूद्ध द्वेष व हिंसा भडकवून, या महत्त्वाच्या समाजघटकाला उध्वस्त करणाची ही प्रक्रिया 'बाबरी मस्जिद' उध्वस्त करण्यापासून सुरू झालेली आहे. यानंतर या प्रतिगामी शक्ती सातत्याने मुस्लिम समाजजीवनावर हल्ला व आघात करीत आहेत. गुजरातमधील नरसंहार, विविध बॉम्बस्फोट प्रकरणात मुस्लिम समाजाला दहशतवादी व देशद्रोही म्हणून लक्ष्य करून निरपराध नागरिकांना खोट्या प्रकरणात अडकवून तुरुंगवासात डांबणे, काश्मीरबाबत लागू असलेले राज्यघटनेतील ३७० वे कलम, राष्ट्रपती राजवटीत दडपशाही करून रद्द करणे, समान नगरी कायदा व सीएए व एनआरसी सारखे धार्मिक भेदावर आधारित अन्यायकारक कायदे मंजूर करण्याची धिसडघाई करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे धर्मांतर बंदी, तीन तलाकबंदी, बुरखाबंदी, आदी भीतीदायक कायदे करण्याचा केंद्र सरकारने चंग बांधला आहे.
या सर्व बाबी कमी म्हणून की काय लव जिहाद, लँड जिहाद, आर्थिक बहिष्कार, गोमास बंदी, मॉब लिंचिंग, धार्मिक दंगली घडवून आणण्याचे पद्धतशीर प्रयत्न केले जात आहेत. इस्लाम धर्मीयांच्या दृष्टीने सामाजिक व ऐतिहासिकदृष्ट्या आदर्श असलेल्या व्यक्ती, घटना व परंपरांची राजरोस बदनामी करण्याची तसेच त्यांचे विकृतीकरण करून मुस्लिम समाजाच्या विरोधात द्वेष व घृणा पसरवण्याची आणि त्यांना उद्ध्वस्त करण्याची मोहीम ही धर्मवादी मंडळी शासकीय यंत्रणेचा गैरवापर करून राबवित आहेत. महान स्वातंत्र्य सेनानी बहादूरशाह जफर, टिपू सुलतान, आदी प्रेरणादायक ऐतिहासिक व्यक्तींनाही देशद्रोही ठरवण्याचे उद्योग सर्रास सुरू आहेत. अशा असत्य, खोट्या, विकृत व जीवघेण्या गोष्टी आणि घटनांच्या विरोधात जरासुद्धा प्रतिवाद किंवा प्रतिकार केल्यास त्यांना देशद्रोही, गद्दार, मुघलांची अवलाद ठरून त्यांची घरेदारे, मालमत्ता बुलडोझरने उध्वस्त केली जात आहे.
या प्रकारे, सध्याच्या राज्यकर्त्यांनी अत्यंत भयावह अशी गंभीर परिस्थिती निर्माण केली आहे. केंद्र व राज्य सरकार या सर्व दुष्प्रचाराला खतपाणी घालत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. अशा प्रकारे, समाजांचे ध्रुवीकरण करून, आपली राजकीय सत्तेची पोळी भाजून घेणे आणि देशभरात स्वतःच्या पक्षाचे व त्यांच्या संघटनांचे वर्चस्व निर्माण करण्याचाच हा प्रकार पूर्णपणे लोकशाही व संविधानविरोधी आहे.दुर्दैवाने, आजच्या मुख्य प्रवाहातील प्रसारमाध्यमांनी देखील आगीत तेल ओतण्याचेच काम केले आहे. संसद असो वा जाहीर सभेतील भाषणांमधून अशोभनीय आणि द्वेषमूलक अशी हिंसक भाषा उघडपणे वापरली जात असून, त्यामुळे समाजामध्ये विविध जातीय व धर्मीयांमध्ये तेढ निर्माण करण्याचाच हेतू असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. अशा विखारी भाषणांना वा वक्तव्यांना अमाप प्रसिद्धी देऊन स्वतःचा टीआरपी वाढवण्यासाठी गोदी मीडिया फारच सक्रीय बनली असून, त्यामुळे समाजामध्ये गंभीर परिणाम उमटत असल्याचे चित्र सर्वत्र पहायला मिळत आहे.
वरील सर्व परिस्थिती लक्षात घेता आता सुज्ञ आणि संवेदनशील नागरिकांनी जागे होणे आणि निराशावादी विचार सोडून देऊन संघटितपणे विचार व कृती करणे आता अनिवार्य बनले आहे. त्यादृष्टीने आपण आपल्या कुटुंबियांना, युवापिढीला जागृत केले पाहिजे, धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या राज्यकर्त्यांपासून दूर राहून, आपले शेजारपाजारी राहत असलेले लोक, नातेवाईक, आप्तेष्ट आणि मित्रमंडळी यांच्याशी जाणीवपूर्वक संवाद करणे गरजेचे बनले आहे. सद्यपरिस्थितीत, प्रत्येक भारतीयांनी एकमेकांच्या धर्माचा आदर करणे आणि परस्परांमधील सदभाव, प्रेम व सहकार्याची भावना बळकट करणे क्रमप्राप्त बनले आहे.
या पार्श्वभूमीवर, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या भारतीय संविधानातील उदात्त व चिरकालीन मूल्यांचे नव्या पिढीवर संस्कार करण्याच्या स्वच्छ व पवित्र विचाराने प्रेरित होऊन, सर्वांनी एकत्र येऊन एकसंघ भारत देशाची उभारणी करावी या हेतूने, मूलनिवासी मुस्लिम मंच, संभाजी ब्रिगेड, भीमआर्मी बहुजन एकता मिशन, रिजनल ख्रिश्चन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यामाने "अमन का कारवॉं" हा अभिनव आणि समाज जोडणारा विधायक उपक्रम सुरू करण्याचा आम्ही निर्धार केला आहे.
त्याअंतर्गत, *छत्रपती श्री. शिवाजी महाराज जयंती ते प्रेषित मोहम्मद पैगंबर जयंती या सहा महिन्यांच्या कालावधीमध्ये, महाराष्ट्रातील ३६ जिल्हे आणि ३५५ तालुक्यांमधून ही ‘अमनयात्रा’ प्रवास करणार आहे. समाजातील सर्व घटकांमध्ये शांतता (अमन), प्रेम आणि भाईचारा निर्माण करणा-या “अमन का कारवॉं” हा समाजसेवी उपक्रम, शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या शुभहस्ते बुधवार, ६ मार्च २०२४ रोजी सायंकाळी ६.३० वाजता, समतेचे स्फुर्तीकेंद्र असलेल्या पुण्यातील ‘महात्मा जोतिराव फुले वाडा’ या ऐतिहासिक वास्तूपासून सुरू होणार आहे.*
याप्रसंगी पुणे येथील वरिष्ठ पत्रकार श्रीमती अश्विनी सातव डोके, सामाजिक कार्यकर्ते जनाब हाजी नदाफ, वारकरी विचार मंचाचे अध्यक्ष. ह. भ. प. श्री. श्यामसुंदर महाराज सोन्नार, मुस्लिम धर्मगुरू कारी इद्रिस अन्सारी, बौद्ध धर्मगुरु भंते बुद्धघोष, ख्रिश्चन धर्मगुरू बिशप थॉमस डाबरे, आदी मान्यवर उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. .
- अंजुम इनामदार, अध्यक्ष, मूलनिवासी मुस्लिम मंच 9028402814
- संतोष शिंदे, संभाजी ब्रिगेड
- दत्ता पोळ, भीमआर्मी भोजन एकता मिशन, 9518780857
- लुकस (प्रशांत) केदारी,रीजनल ख्रिश्चन सोसायटी
- प्रशांत कोठडिया, संस्थापक, संवैधानिक राष्ट्रवाद मंच.
- सत्यवान गायकवाड,
0 टिप्पण्या