Top Post Ad

महाड चवदार तळ्याचा न्यायालयीन खटला आणि डॉ.बाबासाहेबांची साक्ष...

 


महाड चवदार तळ्याचा दावा ता.27 मार्च 1930 रोजी चवदार तळ्याचे दाव्यातील स्पृश्यांचा साक्षी पुरावा संपून ता.02-04-30 पासून अस्पृश्यांतर्फे साक्षी पुरावा सुरु झाला. प्रथम डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची साक्ष होणार असल्याने रत्नागिरी व कुलाबा जिह्यातील सर्व तालुक्यातील महार लोक मोठ्या जमावाने आले होत. कोर्टात अत्यंत गर्दी झाली होती. गावातील स्पृश्य समाजही मोठ्या प्रमाणात हजर होता. कोर्टात जेथे पाण्याचा हंडा नेहमी असेल तिथे तो नव्हता. दुपारी 1.00 वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची साक्ष सुरु झाली. अस्पृश्यांतर्फे रा.दत्तात्रेय मार्तंड वैद्य  वकील काम चालवित होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर आपल्या साक्षीत म्हणाले.... 

माझे नाव भीमराव रामजी आंबेडकर, माझे वय 37, धंदा बॅरिस्टर, मी कोलंबिया युनिर्व्हसिटीचा एम.ए आणि पीएच्.डी आहे. लंडन युनिर्व्हसिटीची एम.एस्सी आणि डी.एस्सी आहे. मुंबई युनिर्व्हसिटीच्या इंटर कॉमर्स एम.बी.ए.परीक्षेचा परीक्षक होतो. मुंबई लॉ.कॉलेजचा मी प्रोफेसर होतो. `प्रॉब्लेम ऑफ दी रुपी` प्रॉव्हिनसिअल फायनान्स इन ब्रिटीश इंडिया आणि कास्ट्स इन इंडिया ही तीन पुस्तके मी लिहिली आहेत.मी बहिष्कृत भारत पत्राचा संपादक आहे. मुंबई कायदे कौन्सिलचा सभासद आहे. डिप्रेस्ड क्लासेस इन्स्टीट्यूट व डिप्रेस्ड क्लासेस एज्यूकेशन सोसायटीतर्फे मी अस्पृश्यवर्गाच्या उन्नतीचे काम करित असतो. मी मुंबईच्या सिडनहॅम कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये प्रोफेसर होतो.  कोर्टात जे वादी  मी पाहिले त्यावरून त्यांची माहिती आहे. गावातील चवदार तळे माहितीचे आहे. हे तळे सरकारी, म्युनिसिपल आहे. व्हिलेज फॉर्म नं.16 यात चवदार तळे हे सरकारी, म्युनिसिपल म्हणून लागले आहे. म्हणून मी तळे सरकारी आहे असे म्हणतो. 

माझे माहितीप्रमाणे हिंदू व मुसलमान या तळ्यावर पाणी भरतात. अज्ञातपणे अस्पृश्य लोकही तळ्यावर पाणी भरतात, अशी मला माहिती आहे. अस्पृश्य लोक हे अस्पृश्यतेची रुढी मान्य करीत नाहीत. ही रुढी उच्च वर्गीय लोकांनी त्यांच्यावर लादलेली आहे. चवदार तळ्यात ते उघडपणे पाणी भरत नाहीत. याचे कारण अस्पृश्यांना स्पृश्य वर्गाची भीती असते. अस्पृश्य लोक उघडपणे पाण्यावर गेले तर त्यांना कदाचित मारहाण होईल व त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार घातला जाईल, आणि एकंदर त्यांचे जिवित्व कष्टमय केले जाईल. म्हणून ते उघडपणे जात नाहीत. खुद्द महाडला जेव्हा अस्पृश्य लोक चवदार तळ्यावर गेले तेव्हा त्यांना स्पृश्यांनी मारहाण केली हे उदाहरण आहे. अशा प्रकारची मारहाण महाडासच नव्हे तर खेडोपाडीही करण्यात आली आहे.  महाडला 1927च्या मार्च महिन्यात अस्पृश्यांची जी सभा झाली तिला स्पृश्यांची सहानुभूती होती. 1927 साली महाडास जी दुसरी परिषद डिसेंबर महिन्यात झाली त्यावेळी स्पृश्य लोकांनी तिला विरोध केला. मंडपाला जागा न मिळू देणे, धान्य न मिळू देणे, खुर्च्या,बैठकी वगैरे न मिळू देणे वगैरे सर्व प्रकारचा विरोध त्यावेळी करण्यात आला होता. 

न्यायनीती व सदाचरण या दृष्टीने अस्पृश्यतेच्या रुढीचा विचार केला तर माझ्या मते तो अन्याय अनैतिक व सदाचारणाविरुद्ध आहे. अस्पृश्य लोक तळ्यात शिरले तर तळे बाटेल, पाणी विटाळेल असे जे स्पृश्य लोक म्हणतात ते निव्वळ ढोंग आहे. असे माझे मत आहे. महार लोकांना येथे पिण्यासाठी विरण्याचे पाणी आहे अशी मला माहिती आहे. चांभार लोकांची पाणी पिण्याची काय सोय आहे हे मला माहित नाही. विरण्याचे पाणी हे सर्वांनी कपडे धूवुन घाण केलेले असते. हे पिण्याच्या उपयोगाचे नाही. येथे महारवाड्यात एक विहीर आहे. त्या विहीरीत कुणीतरी सर्प टाकला आहे. तीत सर्प असल्यामुळे विहिरीचे पाणी दुषित झाले आहे. त्यामुळे ते पाणी महार लोक पीत नाहीत. म्युनिसिपालटीने त्या विहिरीची व्यवस्था राखण्याकरिता अगर दुरुस्ती करण्याकरिता काहीही खर्च केल्याची चौकशी करता मला दिसून आले नाही. 

उलट तपासणी- गावाचा नमुना नं.16 हा रेव्हिन्यू डिपार्टमेंटचा कागद आहे. तो कागद डिपार्टमेंट आपल्या माहितीकरिता करते की काय ते मला माहित नाही. निशाणी 23, नमुना नं.16 यात विरेश्वराचे तळे हे सरकारी म्युनिसिपल लागल्याचे दिसत आहे. पण ह्या तळ्याच्या एन्ट्रीसंबंधाने कलेक्टरसाहेबानी पंचाच्या अर्जावरून दुरुस्ती करून ते तळे विरेश्वर संस्थानचे मालकीचे म्हणून दाखविले आहे. निशाणी 23 वरील ही एन्ट्री चुकीची होती की काय हे मला माहित नाही. ही दुरुस्ती झाली आहे. चवदार तळ्यात हिंदू-मुसलमान पाणी भरतात याची माहिती मला येथील रहिवाश्यांनी दिली. अस्पृश्य लोक या तळ्यातून पाणी नेतात याची माहिती येथील रहिवाश्यांनी दिली. मुसलमान लोकांसंबधी माहिती त्र्यंबक सीताराम कारखानीस व केशवराव काशिनाथ पांडे यांनी मला दिली. अस्पृश्य लोक अज्ञातपणे पाणी भरतात व पितात. याची माहिती सुरेंद्रनाथ गोविंदराव टिपणीस यांनी दिली. स्पृश्य लोक व मुसलमान असे किती वर्षे करतात याची चौकशी मी केली नाही. पण अस्पृश्य लोक तळ्यातून पाणी घरी नेतात की काय याची मला माहिती नाही.हे तळे चारहीबाजूनी दगडी धक्के घालून बांधले आहे. या तलावाच्या सभोवताली खाजगी लोकांच्या जमिनी आहेत.की काय याची मला माहिती नाही. या तलावाच्या सभोवताली खाजगी लोकांचे घाट आहेत की काय याची मला माहिती नाही. तसेच हे घाट कोणाचे आहेत याची चौकशी करण्याची मला जरुरी वाटली नाही. तळ्यास जे घाट आहेत ते मी बारकाईने पाहिले नाहीत. ते तळे केव्हा बांधले आहे याचीही माहिती नाही. 

मी 1927 साली प्रथम महाडास आलो. दिवेकरशास्त्री यांची अस्पृश्योद्धार विचार हे पुस्तक वादीचेच साक्षीदार वामन रामचंद्र जोशी यांस मी दाखविले होते. दिवेकर शास्त्री यांचे काही विचार मला मान्य आहेत. काही नाहीत. अस्पृश्यता ही काही धर्मशास्त्रात मानली आहे. हिंदू धर्मशास्त्रांचा मनुस्मृती हा मुख्य ग्रंथ आहे. असे सनातनी हिंदू लोक मानतात. मनुस्मृती ही कालानुक्रमे पहिली स्मृती आहे की काय याची मला माहित नाही. हिंदू धर्मशास्त्राचा पाया चातुवर्णीय आहे, असे म्हणतात. पण ही गोष्ट मला कबूल नाही. हिंदू धर्मशास्त्रात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र असे चार वर्ण आहेत. या चार वर्णाबाहेर असलेले पण हिंदू धर्मीय असे लोक अस्पृश्य आहेत. हे मला कबूल नाही. काही हिंदू लोक वेदांना मुळीच प्रमाण मानत नाहीत. मनुस्मृतीमध्ये चांडाळ, दिवाकीर्ती, अंत्यज असे शब्द वापरले आहेत. पण त्याचा अर्थ मला सांगता येत नाही. दिवेकर शात्र्यांचे अस्पृश्योद्धार विचार या पुस्तकात पान 7वर अस्पृश्यता शास्त्रसिद्ध आहे, असे म्हटले आहे. ही गोष्ट मला कबूल अगर नाकबूल आहे हे मला काही सांगता येणार नाही. अस्पृश्यता ही रुढी अनादिकालापासूनची आहे की काय हे मला सांगता येणार नाही. पण जेव्हा शाळेत मला एका कोपऱयात प्रथम बसविले तेव्हापासूनच अस्पृश्यता मला भासू लागली. मनुस्मृती ही 2800 वर्षापूर्वीची अगर त्यापूर्वी लिहिलेली आहे याची मला माहिती नाही. महाराष्ट्रात महार, चांभार, ढोर व भंगी या जाती अस्पृश्य आहेत, अस्पृश्य हे आपसांत, शहरात अस्पृश्यता मानीत नाहीत. परंतु खेडेगावातील पद्धत मला खात्रीपूर्वक माहीत आहे, चवदार तळ्यातून पाणी नेण्याचा अधिकार नाही, अशीच अस्पृश्य लोकांमध्ये भावना आहे. निशाणी 43चे जाहीरपत्रक मीच प्रसिद्ध केले आहे. 1927 च्या डिसेंबरमध्ये महाडास अस्पृश्यांची जी कॉन्फरन्स झाली त्यावेळी मीच अध्यक्ष होतो. त्यावेळी माझे भाषणात हिंदू धर्मशास्त्रात चार वर्ण आहेत व रुढी परत्वे पाच वर्ण आहेत व त्यात पाचवा वर्ण अतिशूद्र आहे, असे मी म्हणालो होतो. भेटी बंदी, रोटी बंदी, लोटी बंदी, बेटी बंदी यांचा अनुक्रमे अर्थ लग्न व्यवहारास बंदी, अन्य व्यवहारास बंदी, पान व्यवहारास बंदी व शिवण्यास बंदी असा होतो.अस्पृश्योन्नतीच्या चळवळीचा उद्देश समाजक्रांती करण्याचा आहे. व समाजक्रांती करताना जरी धर्मक्रांती मला करावी लागेल तरी तीही मी करेन.  

ता.17-12-27 रोजी महाड येथे जी कॉन्फरन्स मी बोलाविली होती. ती पाण्याचे बाबतीत आमचे जे हाल होतात, त्याबद्दल जी अडचण मार्च 1927मध्ये आली ती नाहीशी करण्यासाठी व आमचे सामाजिक हक्क प्रस्थापनेसाठी व समाज सुधारणेसाठी बोलाविली होती. हिंदू समाज हा वर्णाश्रम धर्मावर रचण्यात आला आहे हे मला माहित आहे. हिंदू समाजाचे संवर्धनासाठी बेटी बंदी, रोटी बंदी, लोटी बंदी, भेटी बंदीची वर्णाश्रमाची चौकट उखडून हिंदू सवंर्धनासाठी चार वर्णाचा एक वर्ण केला पाहिजे असे माझे म्हणणे आहे. समाजक्रांती अनत्याचारपूर्वक करावी हे माझे ध्येय आहे. पण प्रसंगाविरोधी समाजक्रांती करताना अत्याचारही होतील. स्पृश्य लोक अस्पृश्यांना ते आपणास शिवू देत नाहीत. अस्पृश्य लोक खुशीने स्पृश्यांना शिवण्यास तयार नाहीत काय हे मला सांगता येत नाही. स्पृश्य लोकांचे पाणवठे निराळे व अस्पृश्यांचे पाणवठे निराळे असे स्पृश्यांनी केले आहे. अस्पृश्य लोकांपैकी काही लोक पूर्वी मुर्दांड मांस खात असत पण मी चळवळ केल्यापासून ते बंद झाले. अस्पृश्य लोकांची राहणी ही कुणब्यापेक्षा जास्त अस्वच्छ व अमंगळ नसते. अस्पृश्य लोक अलिकडे गुरेढोरे फाडीतही नाहीत व ओढीतही नाहीत. महाडास 1927 साली माझ्या अध्यक्षतेखाली अस्पृश्यांची कॉन्फरन्स झाली तेव्हापासून ते ढोरे फाडीत व ओढीत नाहीत. कुणबी लोक चामड्यांचा धंदा करतात की काय हे मला माहित नाही, 

1927च्या कॉन्फरन्सचे ठराव माझ्या बहिष्कृत भारत पत्रातही छापले आहेत. घाणेरड्या चालीरीती अजिबात बंद व्हाव्यात असा ठरावात मजकूर होता. 1924 सालापासून मी अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी संघटीत स्वरुपाची चळवळ जोराने सुरु केली आहे. हिंदू समाजात निम्मे अधिक लोक निरक्षर आहेत. ह्या निरक्षर लोकांत अस्पृश्यतेची भावना आहे. हिंदू समाजात शेकडा 5 लोक सुशिक्षित असावेत. मी जे प्रयत्न चालविले आहेत.त्यात अस्पृश्यतेची रुढी मोडावी असे माझे प्रयत्न आहेत. 1927 डिसेंबर मधील महाडच्या अस्पृश्य परिषदेस मुंबई इलाक्यातील गुजरात खेरीज करून सर्व भागातले अस्पृश्य लोक आले होते. या परिषदेचे वेळी स्पृश्य लोकांच्या मताविरुद्ध सत्याग्रह करून चवदार तळ्यात  शिरावे असा आमचा विचार होता. सभेत गंगाधर निळकंठ सहस्त्रबुद्धे आमचे साक्षीदार यांनी मनुस्मृती जाळावी असा ठराव मांडला होता. तो ठराव पास झाला व मनुस्मृती जाळण्यात आली. परिषद अस्पृश्य लोकांची होती. पण परिषदेस स्पृश्य लोकांनी प्रमुखपणे भाग घेतला होता. सहस्त्रबुद्धे यांचे विचार रोटी, लोटी, भेटी व बेटी बंदीविरुद्ध आहेत. सहस्त्रबुद्धे यांची मला अस्पृश्यतांच्या चळवळीत फार मदत आहे. एवढेच नव्हे तर ते माझे उजवे हात आहेत. ते सोशल सर्व्हीस लीगचे लाईफ मेंबर आहेत.  

माझे साक्षीदार पालवे शास्त्रीय यांच्यावर उपकार केलेले नाहीत. बदलापूर येथे शिवाजी उत्सवात जो हिंदू मुसलमानांचा दंगा झाला त्यावेळी पालवे शास्त्री यांच्यावर फौजदारी फिर्याद झाली होती. या फिर्यादीत एकंदर 19 हिंदू आरोपी  होते. व त्या 19 आरोपीत ते एक आरोपी होते. या आरोपींचे मी वकीलपत्र घेतले होते. व त्यांचे वकिलपत्राबद्दल मी फी पण घेतली होती. पालवे शास्त्री यांच्यावर फिर्याद झाली त्यांचे अगोदरपासून त्यांचा व माझा स्नेहसंबंध आहे. मागे 2000 अस्पृश्य लोकांनी श्रावणात यज्ञोपवीते धारण केली. त्यावेळी त्यांना समाज समता संघाकडून 20/25 रु.दक्षिणा देण्यात आली होती. नेहमी ते दरसालच्या अस्पृश्यांच्या श्रावणी समारंभास हजर नसतात. सुरेंद्रनाथ टिपणीस हे दाव्याचे कामी जरूर ती मदत करीत आहेत. 

अस्पृश्यांची जी महाडास परिषद झाली त्या परिषदेची पूर्व त्या परिषदेची पूर्व खटपट व तयारी अनंत विनायक चित्रे यांनी केली. सुरेंद्रनाथ टिपणीस यांचे ते मेहूणे आहेत. 1927 चे दुसऱया कॉन्फरन्सनंतर त्यांचा व माझा स्नेहसंबंध जुळला व तो अद्याप आहे. महाडास सुरेंद्रनाथ टिपणीस व अण्णासाहेब पोतनीस यांचे मला सर्व गोष्टीत अत्यंय सहाय्य आहे. अस्पृश्य  लोक दाव्याचे तळ्याचा जो उपयोग करतात म्हणून सांगितले ते आपण अस्पृश्य आहोत ते स्पृश्यास न कळविता करतात. अस्पृश्यतेची रुढी ज्या अस्पृश्यांनी मानली नाही त्यांची उदाहरणे मला देता येतील. महात्मा चोखामेळा व त्याची बायको यांनी अभंग करून या रुढीसंबंधाने पूर्ण तिरस्कार व्यक्त केला आहे. त्यानंतर पेशव्यांच्या कारकीर्दीत सिदनाक याने  खर्ड्याच्या लढाईच्यावेळी देखील या रुढीचा धिक्कार केला आहे.  

1823 साली इंग्रज सरकारने ज्यावेळी अस्पृश्यतेच्या कारणामुळे पलटणी मोडल्या त्यावेळी सर्व अस्पृश्य लोक एकत्र जमून त्यांनी या रुढीचा धिक्कार केला आहे. अस्पृश्यतेची रुढी ही स्पृश्यांनी अस्पृश्यांवर लादली आहे.असे म्हणतो याचे कारण ती स्वार्थमूलक आहे.ती अस्पृश्यांना मान्य नाही. स्पृश्यांनी ही अस्पृश्यतेची रुढी आपल्या फायद्यासाठी अस्पृश्यांवर लादली आहे. धर्मशास्त्रात अस्पृश्यता कशी निघाली यासंबंधी विवेचन असल्याचे मला माहीत नाही. मी मनुस्मृतीचा दहावा अध्याय वाचला आहे. पण त्याचा अभ्यास केला नाही. त्यामुळे त्यात अस्पृश्यांची उत्पत्ती कशी झाली आहे याची मला माहिती आहे की काय हे मला माहीत नाही. महाड शहरातील चांभार लोक आमचे चळवळीस सहाय्य करीत नाहीत. 1927 साली मी महाडचे चांभारवाड्यात व्याख्यान देण्यास गेलो होतो. त्यावेळी चांभार लोकांनी महार लोकांविरुद्ध अस्पृश्यतेसंबंधी आपली तक्रार आहे अशी तक्रार केली नव्हती. 1927च्या मार्च महिन्यात चवदार तळ्यावर हजार पंधराशे लोक जमावाने पाणी पिण्यास गेले होते. अस्पृश्यतेची रुढी ही मनुष्याच्या गुणांवर अवलंबून नाही म्हणून ही रुढी ख्रिस्ती, पारशी वगैरे लोकांची अस्पृश्यता मानावी असे धर्मशास्त्रामध्ये सांगितले असतानाही ज्या अर्थी 

हिंदु व्यतिरिक्त पाण्यास शिवले तर स्पृश्य लोक त्यांची अस्पृश्यता मानीत नाहीत. त्याअर्थी अस्पृश्य पाण्यास शिवले तर पाणी विटाळते व स्पृश्य लोकांच्या धर्मभावना दुखावतात हे स्पृश्य लोकांचे म्हणणे ढोंग आहे असे मी म्हणालो. तसेच आगबोट, रेल्वे, न्यायकोर्ट, दवाखाना, कचेऱया यात स्पृश्य लोक अस्पृश्यता मानीत नसता फक्त चवदार तळ्यावरच गेले तर स्पृश्यांच्या मनोभावना दुखावतात हे म्हणणे संयुक्तीक नाही. यवन,म्लेंच्छ, पारशी यांना अस्पृश्य मानावे असे धर्मशास्त्रात सांगितले आहे. पण त्यांची अस्पृश्यता मानली जात नाही. हिंदू धर्मशास्त्रात आपद्धर्म आहे. रेल्वे, कोर्टातील अस्पृश्यता ही आपद्धर्मात येत नाही. कारण शास्त्रात रेलकोर्ट नव्हती. महारांचे विहिरीत सर्प टाकला आहे याची माहिती मला दाव्याची चौकशी करीत असताना गेल्या मार्च महिन्यात कळली. ही गोष्ट महारांनी म्युनिसिपालटीकडे कळविली अगर नाही हे मला माहित नाही. विरण्याचे पाणी पिण्यास येतात त्यावेळी ते वहात असते. अगर नसते याची मला जाणीव नाही, विरणे हे एक धरण आहे तेथे नदी अडवली आहे.  

फेरतपासणी- 1927चे मार्च महिन्यात जी आमची परिषद झाली त्यावेळी आम्हास पाण्याची अडचण पडली त्यावेळेस 25/30 रुपये घेऊन पाणी विकत घेतले. महाडास चांभार लोक हे आम्हास मदत न करण्याचे कारण ते गावकरी स्पृश्यास भितात. कोर्टाचे सवालात- महाड येथील 1927चे अस्पृश्यांच्या कॉन्फरन्सला 2।। ते 3 हजार लोक आले होते. परिषद महाड येथील तळ या भागात भरली होती. तळ ही जागा चवदार तळ्यापासून 1।। ते 2 फर्लांगावर आहे. मद्रास इलाख्यात ब्राह्मणेत्तर परिषदेचे प्रसंगी मनुस्मृतीचा ग्रंथ पहिल्यांदा जाळण्यात आला ही ब्राह्मणेत्तर परिषद 1927 सालापूर्वी एक वर्ष आधी झाली. महाडच्या या खटल्याचा निकाल 8 जून 1931 रोजी सबजज सी.आर.सराफ यांनी दिला. नं.405/1927 की, उच्चवर्णीय हिंदू फिर्यादी यांना आपली बाजू कायदेशीरपणे प्रस्थापित करता आली नाही. या निकालामुळे चवदार तळे सार्वजनिक ठरविण्यात आले. ते अस्पृश्यांना खुले करण्यात आले व ते अस्पृश्यांना खुले झाले. 

(साभार... प्रबुद्ध भारत) 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com