राज्यात भाजप, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी सत्तेत आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीने भाजपकडे लोकसभेच्या अनुक्रमे २२ आणि १० जागांची मागणी केली. पण मित्रपक्षांना इतक्या जागा सोडण्याची भाजपची तयारी नाही. शिंदेंच्या शिवसेनेनं आधी २२ आणि मग १८ जागांचा आग्रह धरला. पण केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसोबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काहीशी नरमाईची भूमिका घेतली. माझ्यासोबत असलेल्या १३ खासदारांना संधी मिळावी, अशी भूमिका त्यांनी घेतली. पण भाजप शिंदेंना १३ जागा सोडण्याच्या तयारीत नाही. भाजपनं शिंदेंना १० जागांचा प्रस्ताव दिला आहे. सह्याद्री अतिथीगृहावर बंद दाराआड झालेल्या बैठकीत शहांनी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत चर्चा केली. मात्र बंद दाराआड चर्चा पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनली आहे. कारण पाच वर्षांपूर्वी म्हणजेच २०१९ मध्ये अमित शहा मुंबई दौऱ्यावर आले होते. तेव्हा त्यांनी मातोश्रीवरील खोलीत बंद दाराआड चर्चा केली होती. या चर्चेचे नंतर काय झाले कुणाला काय मिळाले. याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
त्यावेळी अमित शहांनी आपल्याला मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता, असा दावा ठाकरेंनी केला होता. विधानसभा निवडणुकीनंतर ठाकरेंनी सत्तेत समान वाटा याचा उल्लेख वारंवार केला. पण मुख्यमंत्रिपदाच्या समान वाटपाबद्दल ठाकरेंना कोणताही शब्द देण्यात आलेला नव्हता, असं भाजपकडून सांगण्यात आलं. त्यामुळे यावेळी बंद दाराआड कोणती चर्चा झाली हा विषय सध्या चर्चेचा विषय बनला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत मंगळवारी सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित होते. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार काही काळ सोबत होते, मात्र ते नंतर निघून गेले. त्यानंतर अमित शहा यांची एकनाथ शिंदे यांच्याशी वन-टू-वन बैठक झाली. एकनाथ शिंदे हे त्यांच्या पक्षातील सर्व १३ विद्यमान खासदारांना तिकीट मिळावेत यासाठी आग्रही होते. परंतु शहा यांनी त्यांना प्रत्येक मतदारसंघाची ग्राऊण्ड रिअॅलिटी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे १३ पैकी काही विद्यमान खासदारांची तिकिटं कापली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महायुतीत पक्षांची गर्दी वाढल्यानंतर जागावाटपाचा गोंधळही वाढला आहे. आधी केवळ शिवसेना-भाजप असताना युतीच्या फॉर्म्युलानुसार तिकीटवाटप सहज शक्य होते. परंतु दरम्यानच्या काळात मोदींची ४०० पारची महत्त्वाकांक्षा वाढली, तशी महायुतीत पक्षांची संख्याही वधारली. आता अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीशी धोरणात्मक युती झाल्याने त्यांच्या खासदारांना सामावून घेणेही केंद्रीय नेतृत्वाला अपरिहार्य झाले आहे. अशातच शिवसेनेवर दबाव वाढत आहे. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रात भाजपसोबत युतीचे सरकार स्थापन करण्यासाठी त्यांच्यासोबत आलेल्या शिवसेनेच्या सर्व १३ विद्यमान खासदारांना तिकीट मिळावे, यावर ठाम आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.
गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने ४८ पैकी २५ जागा लढवल्या होत्या, तर शिवसेनेने २३ जागांवर समाधान मानले होते. भाजपने त्यापैकी २३ जागा जिंकल्या, तर शिवसेनेने १८. यापैकी १३ खासदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले. यंदा भाजपची बार्गेनिंग पॉवरही वाढली आहे. त्यामुळे भाजप ३० जागांवर लढण्यावर ठाम असल्याचे बोलले जाते. शिवसेना यंदाही २२ जागांसाठी अडून बसली होती, परंतु भाजपकडून दबाव वाढत असल्याचं बोललं जातं. राष्ट्रवादी लोकसभेच्या ८ जागा जिंकेल असा विश्वास अजित पवारांना आहे. भाजपकडे असलेल्या गडचिरोली मतदारसंघात मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांना निवडून आणण्याचा विश्वास अजित पवारांना आहे. पण हा मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडण्याची भाजपची तयारी नाही. शिंदेंना १०, अजित पवारांना ६ जागा सोडण्याची भाजपची तयारी आहे. उर्वरित ३२ जागा लढवण्याचा भाजपचा मानस आहे.
शिवसेनेच्या परभणी, नाशिक, औरंगाबाद, धाराशिव, रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघावर भाजपनं दावा केला आहे. मुंबईत शिंदेंना दोन जागा हव्या आहेत. तर शिवसेनेचा बालेकिल्ला असलेला ठाणे मतदारसंघ भाजपला हवा आहे. काल बंददाराआड झालेल्या बैठकीत अमित शहांनी शिंदे आणि अजित पवारांना लोकसभा निवडणुकीत जागावाटपात थोडी तडजोड करण्यास सांगितलं. लोकसभेला थोडं समजून घ्या. या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुकीत नुकसान भरपाई करुन देतो, असा शब्द शहांनी दिल्याचं वृत्त हिंदुस्तान टाईम्सनं दिलं होतं.
0 टिप्पण्या