०८ मार्च, जागतिक महिला दिन, सर्वांना शुभेच्छा! आज एमआयजी क्लब, बांद्रा, मुंबई या ठिकाणी माझे पत्रकार मित्र व ऑटोकार क्षेत्रातील तज्ञ अमित मोहिले यांनी पुढाकार घेऊन आयोजित केलेल्या "सोलर टू ईव्ही आणि सामाजिक न्याय" या आगळ्यावेगळ्या महिला दिनाचे औचित्य साधून आखलेल्या कार्यक्रमांमध्ये सहभागी झालो. मान नाम. रामदास आठवले साहेब, केंद्रीय मंत्री यांनी मागासवर्गीय समुदाय व महिलांना इलेक्ट्रिकल व्हेईकलच्या माध्यमातून व विविध शासकीय योजनांचा अंतर्भाव करून रोजगाराच्या आणि प्रगतीच्या संध्या उपलब्ध करता येतील या अतिशय मौलिक भाषण ऐकल्यानंतर आपण महिलांच्या प्रति काहीतरी वेगळं नाविन्यपूर्ण काम करावं व विचार मांडावे असं मला चळवळीतील माझे सहकारी यांनी सुचवल्यामुळे व कार्यक्रमात सहभागी झाल्यामुळे लिहिण्यास सुरुवात केलीं.
महिलांनी टू व्हीलर, थ्री व्हीलर रिक्षा, फोर व्हीलर गाडी याच्या ड्रायव्हिंगच्या कौशल्याच्या माध्यमातून स्वतःच्या कुटुंबाचा रोजगार उपलब्ध करून सक्षमीकरणाच्या प्रक्रियेमध्ये कार्यरत राहणं व मुंबईसारख्या महानगरामध्ये राहत असताना सामाजिक बांधिलकी जोपासत असणाऱ्या अनेक उच्चशिक्षित, नोकरी करणाऱ्या किंवा समाजकार्यात कार्यरत असणाऱ्या महिला आज पुढाकार घेताना दिसून येतात त्याचा अभिमान वाटला. आजही बऱ्याच ठिकाणी पारंपरिक पद्धतीने महिला दिनाचा कार्यक्रम होत असतो. अलीकडच्या कालखंडामध्ये टीव्ही चॅनल्स आणि चंदेरी दुनियेतील सांस्कृतिक साज या महिला दिनाच्या निमित्ताने दिसून येतो, मात्र त्यातील काही भाग हा दिखाऊ स्वरूपाचा वाटत असला तरी आजच्या धावत्या आधुनिक जगामध्ये महिलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असताना ही डिजिटल टेक्नॉलॉजी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, अपारंपारिक ऊर्जा स्त्रोत, सोलर, इलेक्ट्रिकल व्हेईकल अशा आधुनिक व धावत्या जगाला साध घालणाऱ्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून महिला सक्षम होणे त्याचबरोबर अश्या विविध ज्ञान शाखांचा उपयोग करून आपली प्रगती साधने ह्या बाबी प्रामुख्याने झाल्या पाहिजेत असं वाटतं.
आजही गोरगरीब दुर्बल घटकातील स्त्रियांना विकासाच्या मुख्य प्रक्रियेत आणणं आव्हान जरी असलं तरी ज्या काही शिक्षणाने आणि आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर मुख्य प्रवाहात आलेल्या महिलांनी खास करून शिक्षित आणि नोकरी व्यवसाय किंवा समाजकार्य करणाऱ्या महिलांनी वर नमूद केलेल्या क्षेत्रांमध्ये आपल्या स्वतःला घडवून व प्रशिक्षित करून त्यावर स्वार होऊन पुढे जाण्याचं काम केलेले आहे व करायला पाहिजे. काही ठिकाणी आपणाला प्रखरपणाने महिलांनी पुढाकार घेतलेला अनेक क्षेत्रात दिसून येतो. विमान चालवणाऱ्या पायलट रूपाली वाघमारे यांना पाहिल्यानंतर त्यांच्यामधील आत्मविश्वास आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या शिकवणीतून त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना आधुनिक क्षेत्रांमध्ये प्रगती करण्यासाठी प्रोत्साहन दिलेलं व महिला सक्षमीकरणाचं हे मोठं उदाहरण मला वाटतं. मागील वर्षी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आयोजित महिला दिनाच्या कार्यक्रमानिमित्त काही महिलांचा सत्कार केला, त्यामध्ये मेट्रो चालवणाऱ्या मुलीचा सत्कार करण्यात आला, ही खरंच भविष्याची विकासाची एक नवी नांदी म्हणावी लागेल. आज पारंपारिक क्षेत्राबरोबरच तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये, संशोधनाच्या क्षेत्रामध्ये, नोकरी व्यवसायाच्या क्षेत्रामध्ये, बँकिंगच्या क्षेत्रामध्ये सर्रास महिला पुढाकार घेताना तर काही क्षेत्रांमध्ये तर महिलांनी स्वतःचा ठसा ही उमटवलेला दिसून येतो.
सध्याच्या प्रसार माध्यमाच्या युगामध्ये सुद्धा काही महिला व मुली पत्रकार ज्या पद्धतीने एका आत्मविश्वासानं मुलाखती घेतात, प्रश्न विचारतात आणि तेवढ्याच ताकदीने आत्मविश्वासानं टीव्ही चॅनलवर अँकरिंग करत असतात, कोर्टामध्ये काही घटनांवर महिला वकील आक्रमकतेने आपली बाजू मांडतात हे पाहिल्यानंतर भारतामध्ये खऱ्या अर्थाने "सावित्रीच्या शिक्षित लेकी, अहिल्यादेवी होळकर यांची धाडसी लढाऊ वृत्ती, रमाईचा त्याग, जिजाऊची नव्या नेतृत्वाला घडवण्याची क्षमता" अशा अनेक बाबी महिलांच्या रुपाने समोर येताना दिसून येतात. राजकारणामध्ये परखड भूमिका मांडणाऱ्या महिला नेत्यां आज पुढे येत आहेत. आज मितीस विधानसभा व लोकसभा मध्ये आरक्षण नसतानाही आपल्या क्षमतेवर त्या निवडून येत आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आरक्षण असल्यामुळे मोठ्या प्रमाणात महिला पुढे येताना दिसून येत आहेत, त्यातील काही घराणेशाहीचा भाग असला तरी संधीचं सोनं करणाऱ्या अनेक महिला नेत्या आज राजकीय परिक्षेत्रामध्ये व राजकीय परिघांमध्ये वावरताना तसेच पुढे येताना दिसून येत आहेत. निश्चितपणाने आधुनिक क्षेत्रामध्ये व आधुनिक कालखंडामध्ये धावत्या जगामध्ये या रणरागिणी भारत देशामध्ये फुले शाहू आंबेडकरांच्या विचारानं जडणघडण झालेल्या आधुनिकतेची कास धरलेल्या व कर्मकांड धर्म व्यवस्थेतून मार्ग काढत त्यातून प्रशस्त प्रगतीचा मार्ग जोपासणाऱ्या महिलांना या महिला दिनाच्या निमित्ताने अभिवादन करतो आणि येणाऱ्या कालखंडामध्ये ज्याप्रमाणे पूर्वी म्हणायचे,
" जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाचा उद्धार करी"
त्याच पद्धतीने आधुनिक काळामध्ये ज्या महिलांच्याकडे शिक्षण व आधुनिक तंत्रज्ञान असेल त्याच पुढील कालखंडातील खऱ्या खुऱ्या नेत्या बनतील व आपल्या बरोबर समाज्याचा उद्धार करतील, हा विश्वास वाटतो. पूर्वीच्या हातामधील खराटा झाडू जाऊन त्या हातात आधुनिक शेतीची अवजारे, कम्प्युटरचा माऊस, की पॅड व मेट्रो ट्रेनचे स्टेरिंग, चार्टर फ्लाईट आणि विमानाच्या त्या स्टेरिंग सीटवर बसून प्रगतीच्या नव्या दिशा जोपासतील असे वाटते. आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीला मुलींना अधिक व्यापक आणि विस्तारित झालेल्या वेगवेगळ्या ज्ञानशाखामध्ये प्रगतीपथावर घेऊन जातील या अपेक्षांना पुन्हा एकदा महिला दिनाच्या माझ्या सर्व महिला सहकाऱ्यांना शुभेच्छा देतो.
- प्रवीण मोरे
- ८ मार्च २४...जागतिक महिला दिन,
- खारघर, नवी मुंबई
0 टिप्पण्या