: ज्या समाजात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला त्या समाजाचे, आई, वडिलांचे अन् देशाचे ऋण फेडण्यासाठी आपला सोन्यासारखा देह झिजवला आणि न भूतो न भविष्यति या मृणीप्रमाणे सर्व तळगाळतील, दारिद्रयातील, गुलामगिरीतीत गर्तेत अडकलेल्या आपल्या तमाम बांधवांना माणूसकीचे शहाणपण शिकविले. त्यांच्यात चैतन्य निर्माण केले. गुलामांना गुलामीची जाणीव करून दिली. तेंव्हा अज्ञानी असणारा मागासवर्गीय समाज खडबडून जागा झाला. त्याला मानवतेचे महत्व समजू लागले. मग त्यांनी बाबांना सर्वस्व मानले आणि संघर्षाची मशाल अखंड तेवत ठेवण्याची प्रतिज्ञा केली ती कुठपर्यंत ? डॉ बाबासाहेब आंबेडकर हयातीत असेपर्यंतच !! कारण बाबांनी आपल्या समाजासाठी सर्वस्वाची आहुती देऊन ऐक्यवृत्तीची खंबीर भावना रुजविली. परंतु त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर बलाढ्य असणाऱ्या रिपब्लिकन पक्षाचे तीन तेरा नऊ बारा वाजले आहेत. समाजाची अजूनही जैसे थे ! अशीच भयावह स्थिती धगधगत आहे. त्यात आया-बहिणीनाही नागविले जात आहे.अत्याचाराला उधाण आले आहे. निरपराधांना आपल्या प्राणांस मुकावे लागत आहे. मात्र, अशी जीवघेणी स्थिती असताना आपले नालायक राज्यकर्ते याकडे दुर्लक्ष करतात. याहीपेक्षा आपल्या बांधवांचे रक्षणकर्ते म्हणणारे नेतेही लाचारीने, गुलामगिरीने महानालायक झाले आहेत. त्यांच्या अंगात सळसळत असणाऱ्या रक्ताला लाचारीचा, गुलामीचा वास येतो आहे. अशा वासापासून सावध रहाणे अत्यंत शहाणपणाचे ठरेल. कारण नेत्यांच्या दिशाहीन नेतृत्वाने समाजाची दिशाभूल झाली आहे तो अजून दलदलीत सापडलेला आहे. जेणेकरून बार्टीच्या संशोधक विद्यार्थ्याच्या आंदोलनाला ५५ दिवस झाले आहेत तरी त्यांच्या आंदोलनाची दखल ना सरकारने घेतली, ना ही कुठल्याही नेत्याने, ना ही कुठल्याही समाजाने!!! त्यामुळे त्यांच्या समस्येसेचे घोंगडे भिजत घालून सर्वांनीच विद्यार्थ्यावर अन्याय केला आहे असे म्हटले तर वादगे ठरणार नाही. ही जर परिस्थिती मुंबई सारख्या शहरात आझाद मैदान येथे उपोषणास, आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांची होत असेल तर त्या खेडोपाडी गुलामीचे, अन्यायाचे, शिवाशिवी चे फरकारे खातो आहे. हे कशामुळे? अर्थात मागासवर्गीय, बहुजन नेत्यांच्या खुज्या नेतृत्त्वामुळेच!!! ज्यांना आपल्या अस्तित्वाची भीती वाटत असते त्यामुळे ते आपआपसांत एखादया बाईलपणासारखे भांडत असतात यापलीकडे त्यांचा समाजहितार्थ कार्यक्रम नसतो मर्ग देशहितार्थ तो कुठला ? अशी समाजातील नेत्यांची अशी स्थिती असताना त्या समाजाची अवस्था दोलायमान होणे साहजिकच आहे. परंतु या कपाळकरंट्या नेत्यांना त्यांचे काय? त्यांना बाबांच्या नावावर जोगवा मागण्याची सवय पडली आहे. त्या सवयीमुळे ते आपले अंगचे गुण दाखविण्यापेक्षा अवगुण दाखवितात. त्यातून मागासवर्गीय, बहुजनवर्गीय समाजाचे विकृत दर्शन सर्व देशासह जगाला दाखवितात.
असा हा मागासवर्गीय, बहुजन वर्गीय समाज फक्त बौद्धापुरता मर्यादित नसून ( महार, मातंग, चर्मकार, ढोर, माळी, साळी, तेली, कुणबी, भंडारी, वगैरे- वगैरे ) अशा अठरापगड साडे सहा हजार जातीचा आहे. पण, या समाजातील नेते मंडळी कुठल्याही पक्षात जाऊन तेथील मानसांची थुंकी झेलण्याचे काम पसंद करतात. परंतु आपसांत कसलीही तडजोड स्वीकारीत नाही. कसलीही माघारी घेत नाही. अशा खुज्या नेतृत्वाला त्याचे काही एक देणे घेणे नसते. रंग त्यांच्यासाठी रक्त सांडले, स्वतःची आहुती दिली तरीदेखील यांच्या ऐषा आरामात काहीही फरक पडत नाही. त्यामुळेच घाटकोपर येथील रमाबाई नगरात १२ जणांना शहीद व्हावे लागले. त्यासाठी निमित्त!!! मात्र , बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा विटंबनेचे होते. अशीच शहीद होण्याची पाळी मराठवाड्यातील विद्यापीठाच्या नामातराप्रसंगी भोवली. अशा कित्येक घटनाप्रसंगी मागासवर्गीयांना रक्ताचा सडा सांडावा लागला. त्यासाठी आत्म बलिदान करावे लागले. आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली. अजूनही कित्येक ठिकाणी अन्याय आत्याचाराला सामोरे जावे लागते. वेळप्रसंगी बलिदान पत्करावे लागते. अशा या घटनांचा सूक्ष्मपणे व बारकाईने अभ्यास केला तर लक्षात येईल की, बाबासाहेबांच्या अस्मितेसाठी मरण्यास मागासवर्गीय बांधव सदैव तत्पर असतात. परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला १३३ वर्षे पूर्ण होता आहेत तर त्यांच्या महापरिनिर्वाणाला जवळजवळ ६८ वर्षे होत आहेत. पण, त्यांच्या संदेशाचा, कार्याचा रथ पुढे न नेता मागे आणला आहे त्यामुळे अशा कपाळकरंटी नेतृत्त्वाला जनतेने चांगलाच प्रसाद दिला होता. त्यांना वेळोवेळी फटके दिले होते. कारण आज ना उद्या हे सुधारतील. पण या गेंड्याची कातडी पांघरलेल्या नेत्यांना काहीच फरक पडला/पडत नाही. तेव्हा असा प्रश्न निर्माण होतो की, आंबेडकरी चळवळीला नेत्यारूपी बळी हवा आहे का? ज्याच्या रक्ताने ही चळवळ फोफावू शकेल? पण ही शिकवण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संग्रामी लढ्यातून कदापि मिळाली नाही. याउलट प्रत्येक लढा हा विचारांच्या ताकदीवर लढा गेला पाहिजे. त्यासाठी नेत्यांनी जनतेच्या भावनेशी खेळू नये. तुम्हांला आपआपसातील वाद मिटवता येत नसेल, कुठलाही समेट घडविता येत नसेल, आपल्या नेतृत्वाने, कर्तृत्वाने, सामर्थ्याने समतेचा रथ पुढे घेऊन जाता येत नसेल तर संन्यासाचे व्रत स्वीकारले पाहिजे आणि लोकांसमोर जाहिरपणे आपल्या नाकर्तेपणाची कबुली दिली पाहिजे त्यातच समाजाचे हित आहे.विशेषतः या नेत्यांच्या लालची कार्यकर्त्याने मान्य केले पाहिजे कि, आपण कुणाचे पाईक आहोत? कुणाचे अनुयायी आहोत? आपला मार्गदाता कोण? आपण त्यांच्या विचारांशी इमाने, इतबारे वागतो आहोत कि नाही? अशीच मनोवृत्ती आपली असेल तर इतर धर्मीयानी, बांधवांनी त्यांची विटंबना केली तर त्यांच्या आणि आपल्या विटंबनेत फरक तो काय? यापेक्षा अशा कृत्याने विटंबना करीत आहोत. मग, त्यांनी विटंबना केली तर बिघडले कुठे? आणि ही सत्यता स्वीकारण्याचे मनोबल या कार्यकर्त्यांनी बाळगले पाहिजे त्याहीपेक्षा स्वीकारले पाहिजे.
त्याकरिता बहुजन नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी गटातटात सांघिक भावनेने एकरूप होऊन समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराला गाडले पाहिजे. अगदी ऐक्याने बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसारासाठी रणनिती आखून अंमलबजावणी केली पाहिजे. त्यासाठी समाजातील विविध क्षेत्रातील तज्ञांची समिती नेमून त्या त्या तज्ञांच्या कृतीशील अहवालावरून कार्यक्रमाची रूपरेषा आखून तसा अंमल केला पाहिजे. त्यासाठी कुणा नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी, तज्ञांनी बडेजाव पणाचा कित्ता न गिरवता समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचारावर जालीम उपाय काय? कोणत्या उपाययोजनांमुळे समाजातील विविध प्रश्नांचे निरासन करता येईल? याकरिता कृतीशील आराखडा तयार केला पाहिजे आणि गटातटाने लढाई लढून मरण्यापेक्षा लाचार होऊन जोगवा मागून खंगून - खंगून भीक मागण्यापेक्षा सर्व प्रादेशिक,राष्ट्रीय , आंतररष्ट्रीय पार्टी - मोर्चा - संघ- संघटना यांनी एक होऊन ऐतिहासिक लढा सुरू केला पाहिजे तरच कुठे मूठभर सत्ताधीशाची पाचावर धारण बसेल. त्यांना माणुसकीचे शहाणपण सुचेल. अन्यथा डॉ. बाबासाहेब आंबेडकरासह सर्व महामानवांची ,राष्ट्रपुरुषांची , राष्ट्रमातांची अवहेलना होणार, पुन्हा - पुन्हा खैरलांजी, खर्डा, सोनई, रमाबाई नगर, जवखेडा हत्याकांड होतच राहणार. मग, आपले नेतेमंडळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती दिनी वा त्यांच्या स्मृति दिनी वेगवेगळे मंडप उभारून ( दुकाने उघडून ) भावनेचा बाजार मांडून आपआपसांत भांडत बसणार, परंतु त्यांना समाजावर होणाऱ्या, झालेल्या अन्याय-अत्याचाराचे काही एक देणे घेणे नाही.
कारण त्यांनी सर्व समाज दावणीला बांधला आहे. समाजाच विकून टाकला आहे. पण, बस्स... आता पुरे झाले म्हणून सर्व तमाम बांधवांनी या नेत्यांच्या नेतृत्वाला काडीमोड देण्याची गरज आहे. अशा नेतृत्वाला लाथाडण्याची गरज आहे. कारण अशा नेत्या मुळे, त्यांच्या फुटीरतेमुळे समाजावर अन्याय - अत्याचार होत असेल तर त्यांना देशोधडीला लावण्याची गरज आहे आणि ही वेळ येऊ नये म्हणून यासाठी सर्व नेत्यांनी एकसंघ होऊन स्वातंत्र्याच्या लढाईची धुरा सांभाळली पाहिजे त्यातच सर्व समाजाचे आणि नेत्यांचे पर्यायी देशाचे कल्याण आहे
त्याचे कारण असे कि, रिपब्लिकन नेत्यांना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना भीमसेना ऐक्यासाठी साद घातली होती ती साद ऐकून सर्व नेतेमंडळी एकसंघ होऊन त्यांना प्रतिसाद दिला असता तर महाराष्ट्राचे आणि देशाचे ही सत्ता कारण नक्कीच बदलले असते आणि ही सत्तेचे गुपीत भाजपाला कळले आणि त्यांनी सत्तेसाठी वाटेल ते तत्त्व गहाण ठेवून सेने चा पुरता वापर करून घेतला आणि आजमितीला सेनेचे पुरते वाटोळे केले, एवढ्यावरच न थांबता त्यांनी कॉग्रेस, राष्ट्रवादी आणि इतर पक्षाची ही ईडी, सीबीआय, आयकर विभागाच्या पथकाच्या माध्यमातून पाचावर धारण बसवली. आणि हे सर्व भाजपाकडून धडा घेण्यासारखे आहे.
हे कमी पडते कि, काय? म्हणून भाजपने अब की बार ४०० च्या पार असा नारा देऊन मोदीचीच सत्ता येणार असा निकाल देऊन टाकला तो कशाच्या जोरावर, कशाच्या आधारावर? अर्थात ईव्हीएम मशिनच्या जोरावर का? याचा ही शोध घेतला पाहिजे. कारण काही राजकीय पक्षांनी, संघटनांनी, संस्थांनी ईव्हीएम मशिनीला विरोध केला आहे. परंतु कॉग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी राष्ट्रवादी पक्षाचे नेते शरद पवार शिवसेना कार्याध्यक्ष नेते उद्धव ठाकरे ,इतर पक्षाच्या नेत्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी ज्या प्रमाणात ईव्हीएम मशिनीसह महागाई, बेरोजगारी, आरोग्य, शिक्षण, संरक्षण, कामगार ह्या . एक ना अनेक समस्याबाबत, घोटाळ्याबाबत ज्या प्रमाणात जनजागृती झाली /केली पाहिजे होती ती प्रसार माध्यमांनी दाबून टाकलेली आढळून येते आहे. आणि ह्या सर्व पक्षांना सत्तेचे वावडे आहे हे दिसून येते आहे. त्यामुळेच त्यांनी मुळावर घाव घालण्यापेक्षा फांद्याच तोडण्याचे काम केले आहे. त्यामुळे त्यांनी लोकांच्या मूलभूत गरजांसह घोटाळयावर लक्ष वेधून देशात लोडशाही कि हुकुमशाही नांदेल याचा ऊहापोह करण्याची गरज आहे. कारण काग्रेसने जेवढी वर्षे सत्ता भोगली तेवढी वर्षे भाजपाला भोगता आली असती पण त्यांचे काही विधायक निर्णयांसह काही घातक निर्णयाने इथला सामान्य वर्गापासून उच्च वर्गापर्यंत, घटकांपर्यंत पुरता हादरून गेला आहे. आणि हे कोलीत कॉग्रेससह सर्व पक्षीय संघटनाना जादूचा चिराग ठरू शकतो. तेंव्हा सर्व नेत्यांनी एकसंघ होऊन स्वातंत्र्याची लढाईची धुरा सांभाळली पाहिजे. त्यातच सर्व समाजासह देशाचेआणि नेत्यांचे ही कल्याण आहे. अन्यथा सर्व समाजाचे, देशाचे आणि नेत्यांचे वाटोळेच... वाटाळे आहे.
: सुरेश गायकवाड, ९२२४२५०८७३
0 टिप्पण्या