आगामी लोकसभेची रणधुमाळी सुरू होण्याअगोदर जागा वाटपाची खलबते पाहायला मिळू लागलेली आहेत, आपण मागील वर्षभरात पाहिल असेल की जवळजवळ सर्वच राजकीय पक्षांनी आंबेडकरी समुदायातील पक्ष नेतृत्व आणि काही जिल्ह्यातील पॉकेट असणारे छोटे पक्ष- संघटना यांना महायुतीतील आणि महाआघाडीतील प्रमुख पक्षानीं सुरुवातीला येतील तसे सामावून घेतले आणि निवडणुकीच्या तोंडावर त्यांना डावल्याचं दिसून येत किंबहुना ते त्यांचं नावही घेत नाहीत आणि चर्चेलाही बोलवत नाहीत. सर्वात दुर्दैवी गोष्ट ही की, आंबेडकरी समुदायातील मतदार त्यांना हवे आहेत मात्र त्या समुदायाचे नेतृत्व करणाऱ्या नेत्यांना व पक्षांना तिकीट द्यायची नाहीत. महाविकास आघाडीच्या बाबतीत विचार करत असताना मान.प्रकाश आंबेडकर यांच्या मदतीने देशांमध्ये मोदींचा झंजावात थांबवणे व महाराष्ट्रातील वाढत्या भारतीय जनता पार्टीच्या प्रभावाला रोखणे यासाठी त्यांची मदत अपेक्षित आहे आणि ते काम ते प्रभावीपण करतील हा विश्वास महविकास आघाडीतील सर्व नेते व्यक्त करीत असताना वंचित आघाडीला मात्र जागा सोडण्याबाबत गांभीर्य दिसून येत नाही. महायुतीच्या माध्यमातून निळा झेंडा आणि मान. नाम. रामदास आठवले साहेब यांची सभा गाजवणारी भाषणेआणि मर्मि घाव घालणाऱ्या कविता त्यांना हव्या आहेत, मात्र त्यांनी माफक मागणी केलेल्या किमान दोन जागा याबाबत ते चर्चाही करत नाहीत आणि सोडणार का नाही हेही स्पष्ट सांगत नाहीत.
एकूणच या परिस्थितीमध्ये आगामी येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत भारत देशामध्ये एका बाजूला भाजपा दबाव तंत्राचा वापर करून राज्यसत्ता धर्म सत्तेला जवळ घेत असताना पक्ष तोडफोड करून आकडे जमा करण्याच्या प्रक्रियेला पहात बसलेला हा दुर्बल घटकातील आंबेडकरी पक्ष आणि चळवळीतील नेते म्हणून काम करणाऱ्या नेतृत्वांना जागा वाटपाच्या प्रक्रिये झुलवत ठेवत आहेत. तर प्रकाश आंबेडकर यांना व महाविकास आघाडी सोबत गेलेल्या अनेक छोट्या-मोठ्या पक्षांना ते फार जुमानत ही नाहीत किंवा त्यांना तिकीट देणं हे आपलं काम नाही फक्त त्यांची मतं आपल्याला पाहिजेत अशीच काही परिस्थिती झालेली आहे. महायुती गाजावाजा करत महाराष्ट्रामध्ये ४८ पैकी जवळजवळ ४० ते ४५ जागा जिंकण्याच्या अविर्भावात वावरणाऱ्या नेतृत्वाला जणू हा महाराष्ट्र आणि सर्वच पक्ष ही आपली जहागिरी आहे असे वाटत असल्यासारखं वातावरण तयार केलेल आहे. आजच्या आकडेवारी मध्ये तर कहरच केल्यासारखा वाटला ४८ पैकी ३७ जागा भाजपा पक्षाने लढवायच्या आणि उरलेल्या ११ मध्ये दोन प्रमुख राष्ट्रवादी आणि शिवसेना या पक्षाची बोळवण करायची, मात्र वाडी वस्ती आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि मोठ्या महानगरामध्ये झोपडपट्टी बहुल भागामध्ये मोठ्या प्रमाणात मतदार असणाऱ्या रिपब्लिकन पक्ष यांचा चर्चेमध्ये विचारही केला जात नाही.
तसेच उर्वरित दोन पक्षाबाबत आमदार बच्चू कडू यांनी म्हणल्याप्रमाणे "माणसं अजित दादा आणि एकनाथ शिंदे यांची आणि निवडणूक चिन्ह कमळ". अशी परिस्थिती राहिली तर भविष्यात पक्षीय राजकारणाला मोठा धोका निर्माण होईल, असे वाटू लागले आहे. तसेच दुसरीकडे महाविकास आघाडी भारतीय संविधानाला धोका आहे आणि त्याचं संरक्षण केलं पाहिजे आणि त्यासाठी आपण एकत्र आलं पाहिजे असं म्हणून जागा वाटप त्यांच्यातल्या त्यांच्यात करायचं आणि आपल्याला एकत्रितपणे भाजपला हरवण्यासाठी एकत्र आले पाहिजे अशा अविरभागात वागायचं, मात्र जागा सोडताना हात आखडता घ्यायचा. आपलेच दात आणि आपलेच ओठ, अशी अवस्था काही मंडळींची या राजकारणामध्ये झालेली आहे. महादेव जानकर यांचा रासप, सदाभाऊ खोत रयत, दिवंगत विनायक मेटे यांचा मराठा महासंघ, मान. नाम. रामदास आठवले साहेब यांचा रिपब्लिकन पक्ष यांनी नियोजित केलेल्या कार्यक्रमालाही न जाणं पसंत करणारी महायुतीतील राज्याचे नेतृत्व अजून कोणत्या अहंकारात व फुगीरपणाने वागत आहे हे कळत नाही. महाविकास आघाडी सोबत आलेले छोटे पक्ष संघटना, वंचित दुर्बल घटकाचे प्रतिनिधी व आंबेडकरी पक्ष यांना नावाला सोबत घेतल्या सारखे वाटते. मात्र निश्चितपणानं दलित, मुस्लिम अल्पसंख्यांक समुदाय, आदिवासी, भटके - विमुक्त तसेच ओबीसी या दुर्बल समुदायाची मोट बांधून फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा एक तुल्यबळ विरोधी पक्ष किंबहुना भविष्यात सत्तेमध्ये जाऊ शकणारा समुदाय होऊ शकतो, मात्र जागा आम्हाला मिळतील आणि भाजपा आणि नरेंद्र मोदींचा प्रभाव कमी होईल व त्यांचा पराभव करण्यासाठी बाकीच्यांनी आमच्यासोबत यावे हीच भूमिका घेताना ते दिसून येत आहेत,
किंबहुना महाविकास आघाडी आणि महायुती हे खाजगी मध्ये मध्ये अनुक्रमे काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना तसेच देवेंद्र फडणवीस यांची भाजपा, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित दादा पवार यांची राष्ट्रवादी एवढेच फक्त महाराष्ट्राच्या सत्ता स्थानी आहेत असे वागताना दिसून येतात, मात्र इलेक्टिव्ह मेरिट असू शकणारे आंबेडकरी समुदाय, ओबीसी समुदाय , आदिवासी, भटके विमुक्त समुदाय तसेच अल्पसंख्यांक समुदाय काही पॉकेटमध्ये का होईना परंतु ते ताकतवान आहेत, परंतु त्यांच्याशी चर्चा करतात मात्र जागा दिसत नाहीत व जागा वाटपामध्ये संधी देत नाहीत आणि एका भोळ्या भाबड्या ध्येयासाठी कुणाच्यातरी पराभवासाठी कुणाच्यातरी विजयासाठी, विकास या संकल्पनेसाठी आम्ही जागा वाटून घेतो तुम्ही आम्हाला मदत करा आणि उरल्यास तर तुम्हाला देऊ आणि दिलेल्या जागेवर सुद्धा आमचे उमेदवार उभे करू, निवडून आले तर आमचा विजय आणि पडले तर तुमच्यामुळे युती किंवा आघाडीला धोका झाला ही दुशने देत येणाऱ्या कालखंडामधली सत्ता न देण्याचं धोरण यामधून महाविकास आघाडी व महायुती या दोन्हीतील प्रमुख पक्ष आपल्याला वागताना दिसून येत आहेत. सदर परिस्थितीमध्ये आगामी जवळ येत असलेल्या लोकसभेच्या जागा वाटपाच्या संदर्भामध्ये छोटे पक्ष, वंचित दुर्बल घटक व आंबेडकरी पक्ष यांनी योग्य ती भूमिका घेतली पाहिजे. निश्चितपणानं आंबेडकरी पक्ष नेतृत्व आणि गरीब, दुर्बल घटक तसेच अल्पसंख्याक समुदायाने गांभीर्याने विचार करून येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे जायला पाहिजे कारण की आज देश एका अशा वळणावर येऊन थांबलेला आहे की, एका बाजूला विकासाचा दृष्टिकोन त्याचबरोबर धार्मिक अधिष्ठान ह्या बाबी पुढे येत आहेत तर दुसऱ्या बाजूला लोकशाही संवर्धन आणि आहे रे वर्गाचं भलं आणि नाही रे वर्गाकडे दुर्लक्ष अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे, त्यामुळे निश्चितपणान यावर देशांमध्ये होऊ घातलेल्या अनेक घडामोडी मध्ये आपली भागीदारी निश्चित करायची असेल तर छोटे पक्ष, वंचित दुर्बल घटक व आंबेडकरी पक्ष यांनी लोकसभेच्या जागावाटपा संदर्भात आपली भूमिका स्पष्टपणाने समोर आणणे आवश्यक आहे.
- जय भिम जय भारत!
- प्रवीण मोरे .... रिपब्लिकन सामाजिक कार्यकर्ता
- खारघर,नवी मुंबई ... दिनांक ०७ मार्च २०२४
0 टिप्पण्या