Top Post Ad

अर्धशतकाहून अधिक काळ असलेल्या कुळांना केले बेदखल


 सुमारे ७० वर्षांपासून अधिक काळ "कुळ" म्हणून नोंद असलेल्या कोट्यवधी रुपये किमतीच्या दीडशेहून जास्त एकर जमिनीवर मौजे वडिवलीतील मूळ रहिवाशांना त्या जमिनीवरून बेदखल करण्याचा डाव उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे हे करताना तहसीलदारांच्या २०१६च्या आदेशालाही केराची टोपली दाखवण्यात आली.

ठाणे शहरातील मौजे वडवली भागात माधव प्रल्हाद जोगळेकर यांच्या मालकीची जमीन आहे. या जमिनीवर तेथील ग्रामस्थ शेती करत असल्याने १९५६ साली तत्कालीन ठाणे तहसीलदारांनी त्या ग्रामस्थांची कुळ म्हणून (आदेश क्रमांक ८११३ /१९५६ - दिनांक १४.१.१९५६) नोंद केली. त्यानंतर दिनांक ७.८.१९५६ रोजी फेरफार क्रमांक ३७८ त्याची नोंद केली. हि नोंद आजतागायत कायम राहिली. कुळ कायद्याप्रमाणे नोंद झालेल्या जमिनीचा खरेदी विक्री व्यवहार करताना संबंधित शासकीय यंत्रणांची परवानगी घेणे आवश्यक असते. परंतु गुरुदेव रियलिटर्स या कंपनीने संबंधित कुळांना विचारात न घेता २००८ साली मूळ मालकाकडून जमीन खरेदीचा व्यवहार केला. तथाकथित खरेदी खताच्या आधारावर गुरुदेव रियलिटर्सच्या वतीने १२३ / २०१३ रोजी अर्ज करण्यात आला . पण संबंधित जागेवर कुळांची नोंद असल्याने ठाणे तहसीलदार कार्यालयाने २०१६ साली हा फेरफार क्रमांक १४६६ रद्द केला.

२०२३ मध्ये अतुल मनोहर सोनावाला, महेंद्र जैन आणि हेरंब लेले यांनी पुन्हा त्याच तथाकथित खरेदी खत- कूलमुखत्यार पत्राच्या आधारावर कुळ म्हणून नोंद असलेली नावे कमी करण्यासाठी ठाणे तहसीलदार कार्यालयात अर्ज केला. हा अर्ज करणाऱ्या वर उल्लेखलेल्या तिघांनी २००८ साली पेटिग्री या परदेशी कंपनीशी करार करून आठ दिवसांमध्ये सर्व शेतकऱ्यांच्या जमिनी विकत घेऊन देतो असे  सांगून कोट्यावधी रुपये घेतले आहेत. सदर कंपनीकडून पैसे घेतल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांच्या नावाने खोटे करारनामे, साठे करार, समझोता करार करून या तिघांनी त्या कंपनीला दिले. अशा पद्धतीने ३०० पेक्षा जास्त करारनामे तयार करण्यात आले असून त्यात काही करारनामे मृत व्यक्तीच्या नावाने खोटी माणसे उभी करून त्या मृत व्यक्ती जिवंत असल्याचे दाखवून त्यांच्या नावाने सही, अंगठे करून करारनाम्याची कागदपते तयार केली आहेत. 

या पेटिग्री कंपनीने २०११ साली दिवाणी न्यायालयात विशेष खटला (क्रमांक ४२६/ २०११)  दाखल केला. सदर प्रकरण २०२३ मध्ये सुनावणीसाठी आला. या खटल्याचा निकाल आपल्या विरोधात जाईल याची खात्री झाल्याने सोनावाला, जैन आणि लेले यांनी प्रशासकीय यंत्रणेला हाताशी धरून कुळ म्हणून नोंद असलेली सर्व नावे शासकीय कागदपत्रांवरून गायब करण्याचा कट केला.  हे करताना सर्व कायदे आणि जुन्या शासकीय आदेशांना केराची टोपली दाखवण्यात आली. त्यानुसार १५ जानेवारी २०२४ रोजी कुळांची नावे कमी करण्याचा आदेश देण्यात आला. शासकीय यंत्रणांनीही तत्परतेने या आदेशाची अमलबजावणी करताना दुसऱ्याच दिवशी दिनांक १६ जानेवारी २०२४ रोजी संबंधित कुळांची नावे कमी केली. विशेष म्हणजे संबंधित जागेच्या संदर्भात मुंबई उच्चन्यायालयाने  एका वेगळ्या प्रकरणात कुठल्याही प्रकारचा फेरफार करण्यास स्थगिती आदेश दिलेला आहे. असे असतानाही ९ फेब्रुवारी रोजी जुन्या सर्व नोंदी रद्द झाल्याचा आदेश ठाणे तहसीलदार कार्यालयाने काढला. या विरोधात हरकत नोंदवल्यावर ठाणे तहसीलदार कार्यालयात झालेल्या सुनावणीत संबंधित कुळांना सुनावणी नोटिसा व सुनावणी दरम्यान आपली बाजू मांडण्याची संधी न देता (९.२.२०२४.-विवादग्रस्त प्रकरण १६३९/ २०२४) हा आदेश दिला असल्याचा आरोप या ग्रामस्थांनी केला आहे. 

खोटी कागदपत्रे बनवताना साठे करार, समझोता करारनामे केलेल्या काही व्यक्ती खूप आधी मृत झाल्या असल्याचे या ग्रामस्थांनी उघड केले आहे. त्यात तुकाराम गोविंद शिंदे हि व्यक्ती ७ सप्टेंबर १९८९ रोजी मृत पावली. पण त्यांच्या नावाने २२ फेब्रुवारी २००८ रोजी साठे करार करण्यात आला आहे. अशी अनेक प्रकरणे ग्रामस्थांनी उघडकीस आणली आहेत. याशिवाय कुळआपल्या दैनंदिन व्यवहारात सह्या- स्वाक्षऱ्या करतात. पण या व्यक्तींचे बोटाचे ठसे असल्याचे सांगून काही करार केले आहेत. शासकीय कर्मचाऱ्याकडून झालेल्या अशा पद्धतीच्या फसवणुकीच्या विरोधात कासारवडवली पोलिसस्टेशनमध्ये या ग्रामस्थांनी २५ .८.२०२३ रोजी तक्रारही नोंदवली. पण या तक्रारीची पोलिसांनी योग्य ती दखल घेऊन अद्याप कुठलीही कार्यवाही केली नसल्याचे या ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com