Top Post Ad

जर आंबेडकर नसते तर या बाकीच्यांचं काय झालं असतं?


 ३ फेब्रुवारीला विक्रोळी कन्नमवार नगरातील लोकशाहीर विठ्ठल उमप स्मृती केंद्रात उठाव साहित्य मंचाचं मासिक कविसंमेलन होतं. कार्यक्रम नेहमीप्रमाणेच प्रचंड उत्साहात संपन्न झाला. खरं तर मीच कार्यक्रमाला उशीरा पोहोचलो. कवींच्या कविता झाल्या होत्या आणि आशाताईंचं मार्गदर्शनपर भाषण सुरू होतं. आमचा फोटोग्राफर मित्र सागर साखरेची लाईव्ह शूटिंग चालू होती. याबद्दल आम्ही सागरला एक पैसाही देत नाही बरं! केवळ उठावच्या प्रेमापोटी तो स्वखर्चाने येतो. गेल्या कार्यक्रमालाही तो आवर्जून आला होता. त्याचे आभार मानून मला त्याला परकं करायचं नाही. कधी नव्हे ते आमचे जेष्ठ बंधू सुमेध जाधवही या कार्यक्रमाला उपस्थित होता. या कार्यक्रमात आधीच जाहीर केलेल्या 'आंबेडकर चळवळीतील धाडसी योध्दे' या पुस्तकाचे लेखक पी. आर. तथा तात्यासाहेब गमरे यांचा सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात येणार होते. परंतू ८२ वर्षीय या लेखकाच्या नातूचे आकस्मिक निधन झाल्याने ते येऊ शकले नाहीत. त्यांच्याऐवजी हे सन्मान चिन्ह त्यांच्यावतीने त्यांच्या नातेवाईकांनी स्विकारले. हे सन्मानचिन्ह शहिद भागवत जाधव स्मृती केंद्र, लोकशाहीर विठ्ठल उमप स्मृती मंच व उठाव साहित्य मंच या तीन संस्थेच्या वतीने जरी संयुक्तपणे देण्यात आले 

 या सन्मानचिन्हाचा सगळा खर्च सुमेध जाधवने एकट्याने केला होता. खरं तर या स्मृतीचिन्हावर शहिद भागवत स्मृती केंद्राबरोबरोबर आम्हा दोन्ही संस्थांची त्याने नावे टाकली हा सुमेधच्या मनाचा मोठेपणा आहे. हे सगळं असं खुलेआम सांगणं, हे सुमेधला आवडणार नाही. पण ज्याचं श्रेय त्याला मिळायलाच हवं हे उठावचं सुरवातीपासूनचं धोरण आहे. आम्ही सूत्रसंचालन करताना सुध्दा एखाद्याची कविताही आम्ही त्या कवीचं नाव घेतल्याशिवाय म्हणत नाही. मग सुमेधचं एवढं मोठं योगदान आम्ही दडवून ठेवणं आम्हाला शक्यच नव्हतं. त्याबद्दल उठाव साहित्य मंचाच्या व संपूर्ण आंबेडकरी चळवळीच्या वतीने आम्ही सुमेधचे हार्दिक आभार मानतो.

त्यानंतर आशाताईंचं जे भाषण झालं ते नेहमीप्रमाणेच अत्यंत उद्बोधक आणि प्रेरणादायी होतं. खरंतर मी उशीरा आल्याने मला ताईच्या भाषणाचा उत्तरार्धच ऐकायला मिळाला. ताईंचं भाषण नेहमीच प्रभावी होतं, त्यामागे मला समजलेली दोन कारणे आहेत. एकतर त्यांचा प्रचंड व्यासंग व दुसरं महत्वाचं म्हणजे त्यांची भाषणाची जगावेगळी शैली. वेगळी शैली म्हणजे त्या जरी प्राध्यापक असल्या तरी त्यांची भाषणाची पध्दत प्राध्यापकी थाटाची नसून एकदम अनौपचारिक असते. त्यांचं भाषण ऐकताना असं वाटतं की, आपल्या घरातलीच एखादी आपली मोठी बहीण, आपली आई किंवा आपली आज्जीच आपल्याशी मनमोकळ्या गप्पा मारते आहे. मी ऐकलेल्या त्यांच्या भाषणाबद्दलच सांगतो.

आजकाल बर्‍याच तथाकथित फुरोगामी विचारवंताना 'आंबेडकर' नावात संकुचितपणा वाटू लागलाय. आंबेडकरी स्त्री संघटनाच्या ऐवजी त्यांना 'फुले आंबेडकरी' नाव हवे आहे. काहींना आंबेडकरांसोबत अण्णाभाऊ साठे हवेत तर काहींना आंबेडकरांसोबत कबीरही हवेत. अरे आंबेडकर नावामध्ये हे सगळे आलेच ना! जर आंबेडकर नसते तर या बाकीच्यांचं काय झालं असतं? आशाताईंनी बहिणाबाई चौधरी, सावित्रीमाई फुल्यांवर ग्रंथलेखन केले त्यांनाही, त्यांनी फक्त 'आंबेडकर' नावाचे स्त्री संघटन काढल्याबरोबर तुम्ही त्यांना एकदम संकुचित ठरवून टाकता? या विषयीही आशाताईंनी आपली खंत व्यक्त केली. मी तर असं म्हणतो की, फुले शाहू रोहिदास कबीर अण्णाभाऊ ही सगळी हिरे, माणके इतस्ततः विखरुन पडली होती. आंबेडकर नावाच्या एका सशक्त व समर्थ धाग्याने तुम्हा सगळ्यांना एका सुत्रात बांधून त्यांचा एकसंध असा मौक्तिक हार तयार केला. त्या आंबेडकर नावाच्या मौलिक सूत्रावर तुम्ही संकुचितपणाचा शिक्का मारून त्याच्यावर हल्ला करू पाहता आहात? अरे, माळी समाजही जेंव्हा घरात फुल्यांचा फोटो लावत नव्हता तेंव्हापासून इथला बौध्द समाज अत्यंत अभिमानाने आपल्या घरात फुल्यांचा फोटो लावत आला आहे. रिडल्सच्या मोर्च्याच्या वेळेस दलितांनी हुतात्मा स्मारक बाटले म्हणून ते गोमूत्र शिंपडून पवित्र करणाऱ्यांच्या टाळक्यात तेंव्हा अक्कल नसून गोबर भरला होता, त्या भुजबळांच्या आधी महात्मा फुले आमच्या अंतःकरणात आम्ही रुजवून घेतला आहे. आणि म्हणूनच आम्हाला आज आपल्या या आंबेडकरी स्त्री संघटनेला आंबेडकरी चळवळीने हत्तीचं बळ दिलं पाहिजे, अशी अपेक्षा आशाताईंनी व्यक्त केली. 

या दरम्यान आशाताईंनी आपले महाराष्ट्रभर अठरा व्याख्याने झाल्याचे सांगीतले. सध्याचे धंदेवाईक साहित्यिक, कलावंत एका कार्यक्रमासाठी किमान पन्नास हजार मानधन घेतात. या हिशेबाप्रमाणे मला आठ, नऊ लाख रुपये मानधन मिळाले असणार असा कोणाचाही समज होण्याची शक्यता होऊ शकते. पण मला या कार्यक्रमातून फक्त अठरा हजार रुपये मानधन मिळाले. त्यातले सहा हजार रुपये माझ्या प्रवासासाठी खर्च झाले. माझ्यासोबत नेहमीच असणारे जे काही दोन, चार कार्यकर्ते असतात त्यांच्या नाष्टा, जेवणावर चार, पाच हजार खर्च झाले. उरलेले पैसे आजही माझ्या पर्समध्ये शिल्लक आहेत. हा सगळा हिशेब सांगून धंदेवाईक कलावंत व साहित्यिकांना आशाताईंनी अत्यंत मार्मिक चपराक लगावली. कविसंमेलनात झालेल्या काही टुकार कविंना देखील आशाताईंनी अगदी स्पष्टपणे धारेवर धरले. काही कवींनी आपल्या कवितेत बाबासाहेबांना दलितांचा तारणहार, दलितांचा त्राता वगैरे संबोधन केले होते. 

आशाताई म्हणाल्या की, यामुळे आपण बाबासाहेबांचं अवमूल्यन करता आहात. कारण बाबासाहेब हे फक्त दलितांपुरते नसून त्यांनी संपूर्ण भारतीय जनसमुहाच्या कल्याणासाठी काम केले आहे. बाबासाहेब इतके प्रकांड पंडित होते म्हणून तर देश, विदेशामध्ये बाबासाहेबांचा गौरव होत आहे, त्यांचे पुतळे उभे रहात आहेत. आणि ही जाणीव ठेवूनच कवींनी बाबासाहेबांविषयी कविता लिहावी, अशी सूचना त्यांनी केली. काही चांगल्या कवितांचा उल्लेखही त्यांनी आवर्जून केला. हे बोलत असतानाच आंबेडकरी कवींची कार्यशाळा घेण्याची गरज असल्याचे त्या म्हणाल्या. उठाव साहित्य मंचाने त्यांच्या या सूचनेचं गांभीर्यपूर्वक स्वागत केलं असून लवकरच उठावच्या वतीने अशी कार्यशाळा आयोजित करण्याचे निश्चित केलं आहे. या कार्यक्रमाला संदेश उमप, गौतम सांगळे, संजय सावंत, उल्हास पवार व प्रकाश हिवाळे यांनी सभागृह उपलब्ध करुन दिले. याबद्दल आम्ही त्यांचे औपचारिक आभार मानणार नाही. कारण हे सगळे आमचे चळवळीतील लढवय्ये मित्र आहेत. ते नेहमीच आमच्या सोबत असतात. राहिलच तर सुदेश जगताप, बबन सरवदे, चंद्रकांत शिंदे, संदेश कर्डक हे सगळेच उठावचे सदस्य असून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हे सर्वच नेहमीच धडपडत असतात. असं म्हणतात कवीला कविता कशी करायची हे कोणीही सांगू शकत नाही. आणि ते खरेही आहे. त्यामुळे आम्ही या कवींना काही सांगण्याच्या भानगडीत पडत नाही. मात्र आंबेडकरी कवी काही विशिष्ट मुल्य बाळगून कविता लिहित असतो. त्यांच्यासाठी कार्यशाळा घेणं अत्यावश्यक आहे, असे आमचे ठाम मत आहे. या विषयावर मी एक स्वतंत्र पोस्ट लिहणार आहे. तरी तुर्तास रजा घेतो. जयभीम!

- विवेक मोरे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com