भारतामध्ये ३३ कोटी देव आहेत, हे साऱ्या जगाला माहित आहे. भारतीय जनता पार्टीची सत्ता दिल्लीमध्ये असो की मुंबईमध्ये, त्या तेहतीस कोटी देवांच्या भक्कम पाठिंब्यामुळेच आली हे नक्की. आताच्या निवडणुकीत अनेक ठिकाणी मूळ मतदानापेक्षा जास्त मतदान झाल्याचे आकडे प्रसिद्ध झाले आहेत. ते चुकीचे नसून या ३३ कोटी पैकी काही देवांनी पहिल्यांदा केलेल्या मतदानाचे ते आकडे आहेत. मोदी हे किती महान आणि चमत्कारी पुरुष आहेत, हे निदान या चमत्कारा वरून तरी विरोधकांनी लक्षात घ्यायला हवे. त्यांना दहावा अवतार घोषित करून टाकावे, असे माझे मत आहे. बहुमत असल्यामुळे पाच मिनिटात तसा कायदा पास होईल. आणि राष्ट्रपती तर कोऱ्या कागदावर देखील सह्या करायला तयार असतात.
पैसे झाडांना लागत नाहीत, अशी एक म्हण आपल्याकडे आहे. पण मुनगंटीवरांच्या झाडांना मात्र पैसे लागणार आहेत. ही चमत्कारी झाडे आहेत. अर्थात जे लोक पुण्यवान असतील, ज्यांच्या डोक्यावर देवांचा हात असेल, त्यांनाच या झाडांच्या फांद्यावर लागलेले पैसे दिसणार आहेत, तोडता येणार आहेत. त्यामुळे भाजपचे किंवा मंत्री महोदया जवळचे काही लोक अब्जोपती होणार हे नक्की आहे. पण तो देवाचा प्रसाद असल्यामुळे त्याला नंबर दोनचा पैसा असे संबोधने गैर आहे. तो भ्रष्टाचार सुद्धा नाही. त्याची माहिती माहिती अधिकार कायद्याच्या कक्षेत देखील येणार नाही, कारण त्या झाडांची फळं अगदी वर पर्यंत पोचलेली असणार. शिवाय हा काही छोटा मोठा गोपालकाला नव्हे, तो सरकारी महाप्रसाद आहे. त्याची व्याप्ती अतिप्रचंड आहे. अतिशय सॉफ्ट अशी रेसिपी आहे. साऱ्या देशात हा फॉर्म्युला वापरायला हरकत नाही.
एवढी सारी झाडे कुठे लावणार, कोण लावणार, त्याला पाणी कोण देणार ? त्याची मोजणी कोण करणार ? एवढे पाणी कुठून येणार ? असले प्रश्न गैर आहेत. भाजपचे सरकार पुण्यवंत लोकांचे सरकार आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल संशय व्यक्त करणे हे महत्पाप आहे. अशा संशयी लोकांना सरळ नरकात पाठविले जाईल. विशेष म्हणजे हल्ली नरकाची जबाबदारी देखील अंबानी कडे दिलेली आहे. स्वर्ग सद्याच कुणाकडे दिला नसला तरी मोदी, शहा आणि अंबानी, अदाणी हे चार महापुरुष मिळून स्वर्गाचा सुद्धा नरक करण्याच्या नियोजनात गुंतलेले आहेत. भारताचा बट्ट्याबोळ करण्याचे काम आधी हातावेगळे करून नंतरच ते तिकडे लक्ष देतील, अशी योजना आहे. असो.-या ३३ कोटी झाडांसाठी पाणी कुठून येणार, हा प्रश्न अनेकांच्या मनात येणार हे नक्की. पण त्यासाठीच हजारो विहिरी मुख्यमंत्र्यांनी आधीच खोदून ठेवल्या आहेत. अर्थात त्याही गुप्त विहिरी आहेत. त्या फक्त सरकारला आणि भाजपाच्या पुण्यवान लोकांनाच दिसतात. आपल्याला दिसणार नाहीत. बघायच्या असतील त्यानं भाजपा मध्ये आधी प्रवेश घ्यायला हवा, त्याशिवाय दिसणारच नाहीत. पण खात्रीने सांगतो, त्या गुप्त विहिरींचे पाणीच या झाडांना दिले जाणार आहे. त्यासाठी वेगळी योजना सरकार तयार करणार आहे.
शिवाय जलयुक्त शिवार मधले पाणी कशासाठी आहे ? ते उगाच वाया जावू नये, म्हणून देखील ही झाडे लावण्यात येत आहे.-जसा दरवर्षी नदी, नाले स्वच्छ करण्याचा कार्यक्रम असतो. तसाच हा कार्यक्रम आहे. नदी नाले स्वच्छते मधून जो गाळ काढला जातो, तोही आपल्याला दिसत नाही. कारण तोही महाप्रसाद आहे. फक्त पुण्यवान लोकांच्या नशिबातच तो असतो. मुंबईचा महाप्रसाद या बाबतीत फेमस आहे.-दिल्लीचे भाजपा सरकार खरंच महान आहे. जादूगार आहे. त्यांनी कितीतरी करोड एलईडी बल्ब वाटल्याची घोषणा संसदेत केली. तो बल्ब मिळाला असल्याचे कबूल करणारा व्यक्ती मला तरी अजुन सापडला नाही. याचा अर्थ तो भ्रष्टाचार आहे का ? तर मुळीच नाही. मग हे बल्ब गेलेत कुठे ? तर एकदा नीट आकाशाकडे बघा. रात्रीच्या वेळी चमचमणारे जे तारे दिसतात ना, त्यांची संख्य वाढलेली तुमच्या सहज लक्षात येईल. अर्थात त्यासाठी तुम्ही पुण्यवान असायला हवे. आणि पुण्यवान लोक फक्त भाजपा मधेच आहेत हे विसरू नका. तर मुद्दा असा की आकाशामध्ये लखलख करणारे जे अतिरिक्त तारे दिसतात, ते तारे नसून भाजपा सरकारने लावलेले एलईडी बल्ब आहेत.
शंकाच असेल तर मोदी सरकार येण्या आधीचे तारे आणि सरकार आल्यानंतरचे तारे यांची संख्या स्वतः मोजून बघा. लगेच खात्री पटेल.-जसे मुख्यमंत्र्यांनी खोदलेल्या विहिरींचे गौडबंगाल आहे, जलयुक्त शिवरचे गौडबंगाल आहे, तसेच हे ३३ कोटी झाडांचे गौडबंगाल आहे. ते कुणालाही समजणार नाही. कारण तुम्ही एकतर देशद्रोही आहात किंवा पापी तरी आहात. पण माझ्याकडे मात्र त्यांच्या तिन्ही योजनांची पक्की ब्ल्यू प्रिंट उपलब्ध आहे. अर्थात मी काही भाजपा वाला नाही. मीही विरोधकच आहे. पण मी तुमच्या एवढा पापी नाही. कारण मी जुना शिवसेना वाला आहे. जुना जिल्हाप्रमुख आहे. विदर्भाच्या किमान ८ / ९ जिल्ह्यात मी भाजपाच्या उमेदवारांचा प्रचार तेव्हा केलेला आहे. ती पुण्याई माझ्या पाठीशी असल्यामुळे ह्या तिन्ही ब्लू प्रिंट माझ्या हाती लागलेल्या आहेत. त्याप्रमाणे मुनगंटीवार असोत की फडणवीस असोत, मोदी - शहा यांच्या प्रमाणेच यांच्याही योजना भन्नाट आहेत. संपूर्ण मराठी माणसांना अभिमान वाटावा अशा आहेत. त्या माहीत झाल्या तर उपाशी माणसाला उपाशी असण्याचं दुःख वाटण्याऐवजी अभिमान वाटेल.
बेरोजगारांना या सरकार मुळे आपण बेरोजगार आहोत याचा अभिमान वाटेल. ज्यांच्या नोकऱ्या जात आहेत, त्यांनाही आपण राष्ट्र कार्यासाठी केवढी मोलाची आहुती देत आहोत, याचा अभिमान वाटेल. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याला या सरकारच्या धोरणामुळे आपण थेट स्वर्गात जाणार आहोत, याची खात्री पटेल.-थोडक्यात सांगायचं झालं तर मुख्यमंत्र्यांनी खोदलेल्या विहिरी प्रत्यक्षात आपल्याला का दिसत नाहीत ? जलयुक्त शिवार मधील पाणी नेमके कुठे गेले ? दुष्काळ कसा पडला ? याचं उत्तरही आपल्याला मिळत नाही. किंवा सुधीर मुनगंटीवार यांनी लावलेली आधीची पाच कोटी झाडं कुठेच कशी दिसत नाहीत ? यानंतरची 33 कोटी झाडं नेमकी कुठे लावणार आहेत ? याबाबतीत जसा संभ्रम आहे किंवा निर्मला सीतारामन यांनी करोडो एलईडी बल्ब नेमके आकाशात कशासाठी लावलेत, हे प्रश्न आपल्या मनात आहेत, त्या सर्व प्रश्नांचं अतिशय खात्रीलायक उत्तर मी आपल्याला इथे देतो आहे.
अधिकृत आणि आतल्या गोटातली बातमी अशी आहे की, मुख्यमंत्र्यांनी खोदलेल्या आणि सरकारी रेकॉर्डवर असलेल्या हजारो विहिरी सरळ चंद्रावर खोदलेल्या आहेत. त्यामुळे आपल्याला इथून दिसत नाहीत..! जलयुक्त शिवार मधले सुद्धा 70% पाणी चंद्रावर पाठवले गेले आहे. त्यामुळेच इकडे दुष्काळ पडला ! सुधीर मुनगंटीवार यांनी लावलेली आधीची पाच कोटी झाडं आणि आताची 33 कोटी झाडं सुद्धा चंद्रावरच लावली जाणार आहेत. बरेच खड्डे खोदून झालेले आहेत. आणि त्यामागे नोटबंदी सारखीच भयानक महान अशी दूरदर्शी योजना आहे. कारण एकदा ही झाडं लावून झाली, हजारो विहिरी चंद्रावर खोदून झाल्या, की लगेच तिथे हे एक अतिभव्य असे, म्हणजेच प्रत्यक्ष राजा दशरथ यांनीही पाहिले नसेल असे, राममंदिर उभारले जाणार आहे. शिवाय सोबतच शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा देखील चंद्रावर उभारण्यात येणार आहे. त्याचे काम आधीच सुरू झालेले आहे. आणि ज्या घोड्यावर शिवाजी महाराज बसणार आहेत, त्या घोड्याच्या शेपटीचे काम जवळपास पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. पुढील हप्ते वसूल झाले ( .. म्हणजे सरकारी निधीचे हप्ते ) की लगेच पुन्हा शेपटीच्या कामाला गती येणार आहे.
हे ऐतिहासिक काम धडाक्यात सुरू आहे. घोड्याच्या शेपटीला किती कोटी रुपयांचा निधी लागेल, याचा नेमका हिशेब अजूनही लागत नाही आहे. तसे हे हिशेब स्वतः शिवाजी महाराजांना सुद्धा समजणार नाहीत. पण एकदा घोड्याचे काम पूर्ण झाले, पुतळा उभा झाला, राम मंदिर उभे झाले, की लगेच चंद्राचा सातबारा आपल्या नावाने करण्याचा मोठा प्लॅन मोदी शहा यांनी आखलेला आहे... कारण, मोदी है तो मुमकिन है ! त्यामुळे २०२४ च्या आत चंद्राचा सातबारा आपल्या नावाने होऊन जाईल, हे मात्र नक्की. जे काँग्रेसला सत्तर वर्षात करता आलेले नाही, ते मोदी यांनी पाच वर्षात करून दाखवलं, हे मात्र मग साऱ्या जगाला मान्य करावच लागेल.-..आणि ही गोष्ट जगाच्या इतिहासात पहिल्यांदा घडणार आहे. चंद्राचा सातबारा आपल्या नावाने झाल्यामुळे मोदी म्हणतील तेव्हा पौर्णिमा, मोदी म्हणतील तेवढे दिवस अमावस्या, असा भन्नाट चमत्कार होणार आहे.
संसदेत बहुमत असल्यामुळे तसा कायदाही लौकरच पास करण्यात येईल. विशेष म्हणजे चंद्र आपल्या मालकीचा झाल्यामुळे जगात कुठेही पौर्णिमा हवी असेल तर त्यासाठी त्यांना मोदी यांची दाढी धरावी लागेल..त्यांची परवानगी घ्यावी लागेल. आणि हा चमत्कार फक्त मोदीच करू शकतात. -चंद्राच्या सातबारावर आपले नाव चढल्या बरोबर पहिला विरोध त्याला अमेरिका करेल. जसा अयोध्येमध्ये राम मंदिराचा वाद निर्माण झाला, तसाच वाद चंद्रावरील राम मंदिरा बाबत अमेरिका द्वारा निर्माण केला जाईल आणि अमेरिका नेमकी जाळ्यात अडकेल.. हाच मोदी यांचा खरा मास्टर स्ट्रोक आहे..! कारण अयोध्ये मध्ये जसा मंदिर - मशीद वाद झाला किंवा निर्माण केला गेला आणि त्यातून मग भारतीय जनता पार्टी देशभर पसरली, वाढली, तसाच चंद्रावरच्या राम मंदिराचा वाद निर्माण झाला की, भारतीय जनता पार्टी थेट अमेरिकेपासून जगातील सर्व देशात तिच्या शाखा उघडायला मोकळी होईल. मागोमाग शिवसेनेलाही शाखा उघडायला आणि वसुलीसाठी नवी संधी मिळेल.
मग अमेरिकेसारख्या देशातही भारतीय जनता पार्टी आपले उमेदवार उभे करू शकेल. अमेरिकेच्या अध्यक्षपदाचा उमेदवार थेट नागपूर मधून ठरवता येईल. म्हणजेच मोदी शहा यांच्या डोक्यामध्ये केवळ काश्मीर, पाकिस्तान वगैरेसारख्या चिल्लर गोष्टी नाहीत, तर साऱ्या जगावरती आपला कब्जा असावा, अशा प्रकारची भव्य योजना आहे. त्या योजनेला अनुसरूनच मुनगंटीवार आणि मुख्यमंत्री काम करत आहेत. त्यामुळे आपण त्यांच्यावर कुठल्याही शंका न घेता त्यांना भक्तिभावानं मदत करायला हवी. आपण उपाशी राहिलो तरी चालेल, शेतकरी मेला तरी चालेल, नोकऱ्या गेल्या तरी चालतील, उद्योग बंद पडले तरी हरकत नाही, ग्रामीण भागातील शाळा बंद केल्या तरी चालतील, बहुजन समाजातील विद्यार्थ्यांचं शिक्षण अर्धवट राहिलं तरी चालेल, पण चंद्रावर राममंदिर होणे, ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. त्यासाठी जन्मोजन्मीची पुण्याई लागते. आणि ती सारी पुण्याई भाजपाच्या लोकांच्या जवळ आहे.
तेहतिस कोटी देवांनी तशी पॉवर ऑफ अटर्णी भाजपा नेत्यांच्या नावाने करून दिली आहे. भाजपा चे सरकार हे आपल्यासाठी वरदान आहे, आपण त्यांची सेवा करण्यासाठी पैदा झालेले आहोत, असं समजून आपण त्यांना मतदान करायला हवं. त्यांच्या लोकांनी चोरी केली तरी ती ईश्वरी लीला, खून केला तरी ईश्वरी इच्छा, बलात्कार केला तरी पवित्र कर्म.. त्याला आपण विरोध करायचा नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे ! त्यांची लीला अगाध आहे ! आपण गरीब पामर बापुडे !-म्हणून, तेहतिस कोटी झाडांची नेमकी कहाणी समजून घ्या. न दिसणाऱ्या विहिरींची कहाणी समजून घ्या. जलयुक्त शिवाराची कहाणी समजून घ्या. न लागलेल्या करोडो एलईडी बल्ब ची कहाणी समजून घ्या.. आणि जय श्रीरामचा नारा लावत पुन्हा एकदा या लोकांना निवडून द्या.. कारण शेवटी शिवाजी महाराजांच्या घोड्याची शेपटी पुढील पंचवार्षिक मध्ये तरी पूर्ण झाली पाहिजे ना ?-तूर्तास एवढंच..
0 टिप्पण्या