Top Post Ad

पूज्य भदंत डॉ. आनंद कौसल्यायन... जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ..... !


५ जानेवारी हा स्वातंत्र्य संग्राम सेनानी, राष्ट्रभाषा प्रचार समितीचे प्रथम प्रमुख, प्रसिद्ध हिंदी लेखक आणि साहित्यिक, पालीचे प्रकांड पंडित अ.भा. भिक्खू संघाचे उद्गाते, बौद्ध प्रशिक्षण संस्थानचे शिल्पकार पू. भदंत आनंद कौसल्यायन यांच्या ११८ व्या जयंती निमित्त विशेष लेख

आभाळाच्या उंचीचं व्यक्तिमत्त्व, आधुनिक अग्रणी धम्मगुरु म्हणून आधुनिक भिक्खुंच्या गौरवगाथेच्या इतिहासाची सुवर्णपाने चाळतांना पू. भदंत आनंद कौसल्यायन यांचे नाव आपसूकच येते. ते पालीचे एक चतुरस्त्र साहित्यिक व बहुप्रसव लेखक म्हणून विश्व प्रसिद्धीस पावले. त्यांची तेजपूर्णचर्या आणि संयतवाणी जणून शब्दांनी त्यांच्या ओठावर सतत खेळावे अशी सहजता होती. मला त्यांच्या समग्र साहित्याचा सापेक्षाने अभ्यास करता आला. पर्यायाने त्यांचे लौकिक जीवनही जवळून न्याहाळता आले. एकदाचा प्रसंग आकाशवाणी केंद्र पुणे येथे त्यांचे भाषण होते. भंतेंनी काहीच हस्तलिखीत लिहून न आणता रेकॉर्डिंग रुममध्ये प्रवेश करून अगदी दिलेल्या वेळेतच ते थांबले. तेव्हा अक्षरश: आकाशवाणी अधिकाऱ्यांना आश्चर्यचकित वाटले. शब्दांच्या विचारांचे धनीच नव्हे तर ते कोणत्याही विषयांवर तासनतास आपले मत मुक्तपणे मांडत. डॉ. आंबेडकरांच्या जीवनचर्येविषयी भदंतजी म्हणायचे, ‘एका बोधिसत्त्वाची त्यांची चर्या होती. केवळ स्वत:च नाही तर ते मानवीय जाती कल्याणाचे साधन मानतं.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘दी बुद्धा अॅण्ड हिज धम्मा’ हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथावर भाष्य करतांना भंते म्हणायचे, ‘ बुद्ध धर्म आणि बौद्ध समाजाच्या दृष्टीने नागपूरची ती दीक्षा झाली. तेवढेच किंबहुना त्यापेक्षा अधिक अत्यंत महत्त्वपूर्ण कार्य डॉ. आंबेडकरांच्या ह्या ग्रंथरत्नाच्या रचनेने केले आहे. ग्रंथ लहान-मोठा कोणता तर ते म्हणायचे. कोणताही ग्रंथ पृष्ठ संख्येनी लहान मोठा मानला जाऊ शकत नाही. प्रज्ञाचक्षुच्या यंत्राद्वारे पाहिले वा जनहिताच्या मापदंडाने जर मोजले तर जो ग्रंथ जेवढा खरा ठरेल, तो तेवढाच लहान किंवा मोठा होत असतो. बाबासाहेबांनी त्यांना एकदा विचारले, भंतेजी ‘सध्या आपल्यासारखी किती भिक्षू विद्यमान आहेत तर भदन्ताच्या शब्दात ‘बाबासाहब , भारतीय भिक्खूओके नाम पर हम सिर्फ ढाई टोटल है. पंडीत जवाहरलाल नेहरुजींच्या हस्ते १७ मे १९५७ ला श्रीलंकेत बुद्ध पोर्णिमेचा समारंभ झाला. भाषणानंतर भंतेजींना मोठ्या उत्सुकतेने विचारले, भंते आपण भिक्खू का झालात ?. तर भदंत म्हणाले, ‘मी ईश्वर , आत्मा, परमात्मा आणि स्वर्ग-नरकादींच्या मुक्ततेसाठी भिक्षू झालो. भंतेजींची वाणी लेखनी वैशिष्यपूर्ण अशीच होती. आज देखील त्यांची वैश्विक विचारधारा जीवंतपणाची साक्ष देते. ते धम्म विचार गुंफत असत की, व्यक्ती वर्तमानात स्वाभाविकरित्या जगत नाही. तो भूतकाळ आणि भविष्यात सतत विचरण करून निर्जीव असे जीवनयान करतो.

खरच त्यांची विचारदृष्टी व्यापक, सार्थक व समर्पकच वाटते. ज्योतिषाविषयी भंते म्हणायचे ‘जो ज्योतिष्य दुसऱ्याचे भविष्य सांगतो परंतु त्याला स्वत:च्या भविष्यासंबंधी निश्चितीची कल्पना, जाणीव व माहिती तसुभरही नसते’. ते स्वभावत: म्हणत असत, ‘ही केवढी विचित्र गोष्ट आहे की, ‘पाश्चिमात्य लोक बुद्ध धर्माला भारताच्या उगमस्थानी मानतात आणि ओळखतात. परंतु कित्येक अनभिज्ञ भारतीय अज्ञानी अनुयायी बुद्ध धर्माला श्रीलंका, थायलंड व म्यानमार या देशाचा धर्म समजून त्याविषयी अभारतीयत्वाचा धर्म असल्याची भावना मनात बाळगतात. त्यांच्या शब्दात, ग्रंथरचनेचे हवे तसे कौशल्य मुळीच नाहीत. या प्रयत्नामुळे काही मोठा परोपकार सिद्ध होईल, असाही अहंकार मात्र नाही. केवळ मनाला सुसंस्कारित करण्यासाठी अलप प्रयत्न करतो आहे. एवढा सिद्धहस्त प्रसिद्ध पाली विद्वान, हिंदीचा प्रकांड लेखक, समीक्षक आणि साहित्यिक स्वत: विषयी किंचीतही त्यांच्या मनात गर्व, अहंभाव, ना अभिमान इतर तत्सम बाबीचा लवलेश दिसून येत नाही. किती निरागसपणा, त्याग, सेवा, समर्पण आणि नि:स्पृहता याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे आचार्य भदंत आनंद कौसल्यायन हे होत. इहलोक, परलोक याबद्दल ते मत प्रदर्शीत करायचे की, ज्याचा इहलोक ठिक, त्याच परलोक छान आणि ज्याचा लोकीही काही स्थैर्य नाही, त्याच्या परलोकीचा काय विश्वास. चित्त आणि प्रज्ञेच्या अभ्यास म्हणजे बौद्ध साधनेचा मार्ग आहे. केवळ ध्यानाला प्राप्त होणे बौद्ध साधनेचा उद्देश नाही. बौद्ध साधनेचा मुख्य उद्देश चित्ताची अनुपम मुक्ती होय.

भारतीय संस्कृतीला बौद्ध धर्माची देण यावर विचार व्यक्त करतांना ते म्हणायचे, ‘ भारतीय संस्कृतीला बौद्ध धर्माची प्रथम महान देण ‘कालामसुत्रात क्षत्रियांना दिलेला अनुत्तर उपदेश’ तोच जगाच्या साहित्यात मानवी स्वातंत्र्याचा श्रेष्ठ असा महान जाहीरनामा होय. मानवमात्रांना एक समान लेखने आणि प्रत्येक व्यक्तीला समानतेने वागविणे ही दुसरी देण आहे, आपण दुसऱ्यांना उगीचच दोष देवू नये. त्याविषयी मर्मग्राही त्यांचे विचार, ‘दुसऱ्यांना दोष देणे हे अकुशल कर्म आहे. अशा गुन्ह्याला पद्धतशीरपणे लपविण्याचे सर्वोत्तम साधन व माध्यम आहे. सद्य:स्थितीत आधुनिक समाजाकडे दृष्टीक्षेप टाकला तर गुन्ह्याना लपविण्यासाठी दुसऱ्यांना दोष देत राजरोष सुटत असतात. आपल्या आई-वडीलांबाबत ते म्हणत की, ‘माझे आई-बाब दरिद्री नव्हते. त्यांच्याकडे संतोष या धनाची संपदा होती. कुणीतरी त्यांना विचारले, तुम्ही बनियागिरी करीत असता म्हणजे, कार्यक्रम संपला की, आपण ग्रंथ विकता. तेव्हा भंतेजी उत्तर द्यायचे,बघा, मी काय वाईट काम करतो, जे बोलतो ते लिहितो. पुस्तक प्रकाशनार्थ पैसे लागतात, मी पैशासाठी कुणाचा गुलाम नाही. कुणावर विसंबून नाही. अगदी खरच पुस्तक प्रसिद्ध करायचं म्हटले तर एक प्रकारे तारेवरची कसरतच आहे. त्यासाठी रुपयाची गरज भासते. भदंतजींनी बाबासाहेब विरचित ‘दी बुद्धा अॅण्ड हीच धम्मा’ या ग्रंथाला ६९२ संदर्भ देऊन अनुवाद केला.

पी.ई. सोसायटीचे अध्यक्ष न्यायमूर्ती आर.आर. भोळेंना म्हणाले, साहेब मी हिंदीत अनुवाद केलेला ग्रंथ प्रकाशित करावा. तर भोळे म्हणाले या अनुवादाला आधी चाळावं लागेल. भंते मनातल्या मनात पुटपुटले, ‘बाबासाहेबांचा अमूल्य ग्रंथ आणि आनंद कौसल्यायन ज्याचा अनुवादक येथे आहे, त्याला तिसरा कोण बघू शकतो? भंतेजींनी १९२८ ते १९८८ या प्रदीर्घ कालखंडात शेकडो अशी मौलिक ग्रंथसंपदा निर्माण केली आहे. भगवान बुद्धाच्या शिकवणुकीचा आरंभ बिंदू सांगताना ते भावोद्गार काढत. बुद्ध वाणीचा प्रारंभ, मानसिक दास्यतेच्या बंधनातून मुक्ती. आत्मा यावर ते सांगत, मनुष्यांनी निरंतर जिवंत असण्याची उगीचच आशा धरून लहानलहान सत्यतेची कल्पना केलेली आहे. त्याला ते आपल्या अज्ञानतेमुळे समजतो की, सतत आपल्यात विद्यमान असते, त्या काल्पनिक सत्तेचे नाव ‘आत्मा’ आहे. मी बौद्ध प्रशिक्षण संस्थान, बुद्धभूमी महाविहाराच्या सानिध्यात महाविद्यालयीन शिक्षण घेत असतांना ते धम्मचर्येमध्ये सांगत की, बघा, या जगात कोणत्या दोन व्यक्ती महान होतात. जो दुसऱ्यासाठी लिहित असतो. आणि त्यांचेसाठी दुसरे लिहित असतात.

दीक्षाभूमीला ते आधुनिक सारनाथ मानत. श्रीलंकेचा बोधिवृक्ष स्वत: आणून बुद्ध पोर्णिमेनिमित्त १३ मे १९६८ रोजी त्यांनी दीक्षाभूमीवर रोवला. ‘यदी बाबा न होते’ ही प्रथम आवृत्ती १९६९ ला प्रकाशित झाली. एकता सीताबर्डीच्या धनवटे रंग मंदिरात सुगंधा शेंडेच्या उपस्थितीत ‘धम्मदीप’ या नियतकालिकाचा प्रकाशन सोहळ्याप्रसंगी ते म्हणाले, ‘ जर साहित्य आहे तर दलित कसे? जर दलित आहे तर साहित्य कसे? त्यांची पुतणी शिक्षिका इंदिरा वर्मा हिने एकदा सहज भिक्षुणी होण्याचा मनोदय व्यक्त केला. तेव्हा भदंत म्हणाले, शरीराने योगी होऊन काय करशील? मनाने योगी बना. खरच बघा, किती मोजूनमापून शब्दांची किमया त्यांच्यात होती. जागतिक बौद्धांचा पवित्र धर्म ग्रंथ त्रिपिटकाविषयी ते उद्गारायचे समग्र त्रिपिटकात संसाराचे वर्णन आहेत. जीवन विमुक्तीच्या दृष्टीने आणि सर्व व्यावहारिक सामान्य व्यक्तीच्या दृष्टीने संसारात फुलेच नाहीत तर काटे देखील आहेत. सुखदु:ख देखील आहेत. परंतु अर्हताच्या दृष्टिकोनातून या संसाररुपी भवसागर असंख्य दु:खांनी व्यापला आहे. एकदा भंतेंना उद्योगपती बिर्ला, मंदिर मार्ग दिल्लीमध्ये म्हणाले, स्वामीजी, चीनमध्ये बौद्ध मुसलमान होत आहेत तर त्यांना थोपविण्यासाठी आपण जावे. मी हवी ती पूर्ण व्यवस्था करून देतो. त्यावर भंतेजी गांभीर्याने म्हणाले, सेठजी जर मी तेथे गेलो तर भारतातील हिंदूंना बौद्ध कोण करील?.

खरच डॉ. भदंत आनंद कौसल्यायन एवढे विचारांचे पक्के होते की, त्यांच्या हयातीत त्यांना पैशाने कुणीच खरेदी करू शकले नाहीत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महाप्रयाणानंतर खरच समाजाची चिंता वाहणारे एकमेव ठरले. कार्यकर्त्यांशी औपचारिक वार्तालाप करताना ते म्हणायचे ‘ धर्मांतरित लोक अजूनही अनेक जाती पोटजातीमध्ये विभागले गेले आहेत. मतभेदामुळे आजही सारा समाज दुभंगला. बौद्ध लोक आनंदित एकसंघ दिसतील तेव्हाच मला कायमचा मनस्वी आनंद वाटेल. जगातील अनेक देश पादाक्रांत करणाऱ्या त्या महान धर्मगुरुला विदर्भाबद्दल प्रेम वाटले. या ओसाड भूमीवर ते स्थिरावले. अखेरच्या श्वासापर्यंत ते विदर्भातच होते. भंतेजींची वैश्विक विचारधारा आणि तत्त्वप्रणाली केवळ धर्माशीच बंदिस्त नव्हती. तर धर्म अनुयायांच्या आपुलकीविषयी हृदय, मनाचा ठाव घेणारी अशी वैचारिक जीवनदृष्टी होती. खरच त्या पार्श्वभूमीवर भंतेजींच्या विचारांचे सद्यस्थितीत चिंतन, मनन आणि अभिसरण होणे आज काळाची गरज आहे. आज त्यांच्या ११८ व्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन.

- राहूल सुभेदार
साभार :
डॉ. भदंत चिंचाल मेत्तानंद विद्योदय परिवेण महाविहार, जुनी सोमवारी पेठ नागपूर-०९ महाराष्ट्र

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com