राज्यात ' पत्रकार दिन ' सर्वत्र उत्साहात साजरा झाला. अनेक पत्रकार संस्था संघटनांनी पत्रकारांचा यथोचित सन्मानही केला. तब्बल ८३ वर्षांची दिर्घ परंपरा जपणाऱ्या मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे देखील दर वर्षीप्रमाणे पत्रकारांना दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांचा शानदार समारंभ पत्रकार भवन, आझाद मैदान, मुंबई येथे संपन्न झाला. या कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे , दैनिक 'लोकमत' ( पुणे) उपस्थित होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे होते. तसेच कार्यवाह संदीप चव्हाण, उपाध्यक्ष शैलेंद्र शिर्के, स्वाती घोसाळकर, संयुक्त कार्यवाह विष्णू सोनावणे, कोषाध्यक्ष जगदीश भोवड, विश्वस्त राही भिडे, वैजयंती कुलकर्णी - आपटे, देवदास मटाले आणि सर्व कार्यकारिणी सदस्य तसेच पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आप्पा पेंडसे पत्रकारिता पुरस्कार हा मुंबईतील नागरी समस्यांवरील गेल्या वर्षभरातील उत्कृष्ट वृत्तांत, स्तंभ व लिखाण यासाठी दिला जाणारा पुरस्कार दै. प्रजासत्ताक जनताचे वार्ताहर दिनेश मराठे आणि एबीपी माझाचे प्रतिनिधी अल्पेश करकरे यांना विभागून देण्यात आला. जयहिंद प्रकाशन पुरस्कार हा पत्रकारितेला उपयुक्त ठरणार्या विषयावर उदा. सामाजिक, आर्थिक, पर्यावरण आदीवर लेखन लिहिणार्या पत्रकाराचे या वर्षातील उत्कृष्ट पुस्तक जेष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळकर यांनी संपादित केलेल्या डॉ. माईसाहेब आंबेडकर यांच्या ' सूर्यप्रभा ' या ग्रंथाला देण्यात आला. कॉ. तु. कृ. सरमळकर पुरस्कार हा कामगार, झोपडपट्टी, भाडेकरू, घरदुरुस्ती व दलितोद्धार या विषयांवरील पत्रकारितेसाठी दिला जाणारा पुरस्कार पत्रकार देवेंद्र भगत यांना देण्यात आला. विद्याधर गोखले ललित लेखन पुरस्कार ,पत्रकाराने केलेल्या ललित लेखनासाठी दिला जाणारा पुरस्कार नितीन सप्रे यांना देण्यात आला. रमेश भोगटे पुरस्कार उत्कृष्ट राजकीय बातम्या व राजकीय वृत्तांताबद्दल दिला जाणारा पुरस्कार उदय जाधव यांना देण्यात आला. तर ‘शिवनेर’कार विश्वनाथराव वाबळे स्मृती पुरस्कार शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्ट बातम्यांसाठी दिला जाणारा पुरस्कार संजीव भागवत यांना देण्यात आला.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणातून समाजव्यवस्थेचे एकंदरीत चित्रण रेखाटले. आपल्या भाषणात ते म्हणतात....
मी म्हटले - ते सोडा, पण मी कशामुळे पत्रकार?
ते म्हणाले, कारण तुमच्या हातात माध्यम आहे.
मी म्हटले, "माध्यम तर तुमच्याही हातात आहे!
आता तूही पत्रकार आहेस.
आणि, तू कधीचाच विकला गेला आहेस, हे तुला समजले का?"
ते डेटा विकतात, म्हणजे काय करतात?
थेट तुला विकतात.
पूर्वी रेल्वेत असे चोर असायचे.
ते माणसं विकायचे.
म्हणजे, एखाद्यावर पाळत ठेवायची.
सावज हेरायचे.
समजा, ट्रेन निघालीय पुण्याहून दिल्लीला.
त्यात सावज कोण्या एकाने हेरायचे.
पुढच्या स्टेशनला म्हणजे भुसावळला त्याने ते सावज दुस-याला विकायचे. मग झाशीला तिसर्यांदा विक्री.
ज्याला विकले जाते, त्याला कल्पनाही नसते की आपली विक्री होतेय वा आपल्याला खरेदी केले जातेय!
शेवटी जेव्हा दिल्लीत त्याला फायनली लुटले जाते, तेव्हाच त्याला समजते की आपला गेम झालाय.
२६ जानेवारी १९५० रोजी आपण 'नागरिक राजा' झालो.
नंतर या व्यवस्थेने आपल्याला 'मतदार राजा' केले.
त्यानंतर आपण 'ग्राहक राजा' झालो.
आता तुमची ही सगळी राज्ये गेली आहेत.
आता तुम्ही मात्र डेटा आहात.
तुमच्यावतीने खरेदीही तेच करतात. विक्रीही तेच करतात.
त्यांच्या या खरेदी-विक्रीचे तुम्ही माध्यम फक्त आहात!
पण, तुम्हाला विचारतो कोण?
तुमचे आयुष्य फक्त याच भीतीत जाणार, आपला मोबाइल कोणी मारणार तर नाही ना!
' सूर्यप्रभा ' पुस्तकाला पुरस्कार जाहिर झाल्याने यावेळी आपल्या भाषणात आवटे यांनी माईसाहेब यांच्यावर बाबासाहेबांच्या पश्चात झालेल्या घोर अन्यायाची खंत- सल आणि अपराधीपणाची भावना ही काही आता बौद्ध समाजापुरतीच मर्यादित राहिलेली नाही. ती भावना सार्वत्रिक असल्याची माईसाहेब यांच्याबद्दल भावना व्यक्त केली.
ज्या शहरात शुद्धतेबाबत निश्चिंत राहून डोळे मिटून बिनधास्तपणे पाणी पिता येते तो विकास.
जिथे सार्वजनिक म्हणजे सरकारी वाहतूक सेवेतून निर्धोक आणि सुखकर प्रवास करता येतो तो विकास.
जिथे श्रीमंतसुद्धा आपल्या घरातील रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी सरकारी रुग्णालयाकडे विश्वासाने धाव घेत असतील तो विकास.
जिथे दर्जेदार शिक्षण मिळण्याची खात्री पटून महापालिका- जिल्हा परिषदेच्या शाळांत आपल्या मुलांना दाखल करण्यासाठी श्रीमंत लोकही धडपडत असतील तो विकास.
असा विकास दिसतोय का पाहा कुठे!
विकासाची व्याख्याच राज्यकर्त्यांनी बदलून टाकली असल्याचे आवटे यांनी सांगितले.
या संस्थेचे सदस्यत्व स्वीकारून ५० वर्षे झालेले ज्येष्ठ पत्रकार अनेक असून त्यांचाही उचित सन्मान करण्यात आला. या समारंभात यंदा मी दुसऱ्यांदा पुरस्काराचा मानकरी ठरलो. मी संपादित केलेल्या डॉ. माईसाहेब आंबेडकर यांच्या ' सूर्यप्रभा ' या ग्रंथाला जयहिंद प्रकाशनचा पुरस्कार देण्यात आला. यापूर्वी २०१८ सालात सामाजिक जाणीव आणि बांधलकीची पत्रकारिता केल्याबद्दल मला समतानंद अनंत हरी गद्रे हा प्रतिष्ठेचा पुरस्कार पत्रकार संघाने दिला आहे. माझ्या माहितप्रमाणे असे पहिल्यांदाच घडले असावे. कारण पहिल्या पुरस्कारासाठी माझी निवड संस्थेचा सदस्य नसतानाही केली होती. अन् आता पुरस्कारासाठी 'सूर्यप्रभा ' ची निवड करताना माझे कार्यकारिणीतील सदस्यत्व संस्थेने त्या आड येवू दिले नाही. हा पुरस्कार म्हणजे भारतीय संविधानाच्या जनकाच्या सुविद्य पत्नी डॉ. माईसाहेब आंबेडकर यांच्या समर्पित जीवन - कार्याला पत्रकारितेच्या मुख्य प्रवाहाने दिलेली पोचपावतीच आहे,असे मला वाटते. - दिवाकर शेजवळ संपादक: ' सूर्यप्रभा '
0 टिप्पण्या