Top Post Ad

येणाऱ्या काळात प्रजेची सत्ता असेल काय?


 खोटं बोल पण रेटून बोल, या उक्तीनुसार मागील दहा वर्षापासून आपलं म्हणणं जनमानसांवर बिंबवण्याचं बेमालूम कार्य इथल्या राज्यकर्त्यांनी सहजपणे केलं आणि करत आहेत.  खोट्या गोष्टी वारंवार सांगितल्यास त्या खऱ्या वाटायला लागतात. आणि सर्वसामान्य माणूस त्यालाच धर्म मानून बसला आहे.  रावणाची सोन्याची लंका होती... कृष्णाने करंगळीवर डोंगर उचलला होता.... गणपतीला महादेवानं हत्तीच तोंड बसवल. हनुमानाने पर्वत उचलून आणला  होता . वामनाने दोन पावलांमध्ये पृथ्वी आणि आकाश व्यापून टाकले होते. आणि तिसरे पाऊल बळीराजाच्या मस्तकावर ठेवून त्याला पाताळात गाढले होते. हिरण्याक्शाने पृथ्वीचे अपहरण करून ती समुद्रात लपवून ठेवली होती. आणि संत तुकोबा सदेह वैकुंठाला गेले. अशा कैक गोष्टीवर आजही कोणीही प्रश्न निर्माण करत नाही. उलट उत्सवांमधून हे देखाव्याच्या रुपाने पुन्हा पुन्हा लोकांसमोर मांडले जात आहे. 

भ्रष्टाचार, बेरोजगारी, महागाई, हे विषय आता गौण झाले आहेत. आता भारतीयांना फक्त आणि फक्त धार्मिकतेच्या शृंखलाच आनंद देत आहेत. आज  आदिवासींचे जंगल उद्योगपतींना दिलेत त्यांच्या वाडवडिलांपासूनची लाखो झाड सपासप कापली जात आहेत. आदिवासीं समाज ज्या प्रकृतीला देव मानतो त्याला त्यांच्या  समोरच नष्ट केला जात आहे. ज्या जंगलात आदीवासींचे देव आहेत  त्या जंगलांच्या चिंधड्या उडवल्या जात आहे. आदिवासी उध्वस्त होत आहेत, जल जंगल जमीन हिसकावून आदिवासींचे विस्थापन होत आहे.  थोड्याफार फरकाने भारतातील प्रत्येक जनसामान्याची अवस्था हिच आहे.  आज एका पाठोपाठ एक उद्योगधंदे गुजरातला जात असताना त्यावरून लक्ष हटवण्याासाठी रामलल्लाची प्रतिष्ठापना दिवस म्हणजे दुसऱ्या दिवाळीचं प्रयोजन करण्यात आलं. देशावर प्रचंड प्रमाणात कर्जाचं ओझं वाढत असताना सरकारी इव्हेन्ट साजरी होत आहेत. मात्र याकडे सर्व सामान्य तर सोडाच पण आता ज्यांची वैचारिक कुवत बरी आहे ते लोकही यात सामील झाले. 

जर्मन देशातील गोबेल्स थिअरी जगप्रसिद्ध आहे. गोबेल्स नीती म्हणजे एखादी खोटी गोष्ट वारंवार शेकडो वेळा पुन्हा पुन्हा सांगितली की त्या गोष्टीला लोकं शेवटी खरं समजू लागतात. गुजरात मध्ये काहीतरी भारी विकास  केलाय हे प्रसिद्धी माध्यमांना मलिदा देऊन वारंवार सांगितलं गेल. शेवटी लोकं अशी म्हणायला लागली की, खरंच काहीतरी चांगल केलं असणार. उगीच कोणी वारंवार सांगतं का?  सावरकरांनी इंग्रजांची दहा वेळा माफी मागितली. पण तथाकथित इतिहासकारांनी त्यांच्या नावासमोर  प्रत्येक जागी वीर स्वातंत्र्यवीर अशी पदवी स्वतःच लिहीली.  वारंवार लोकांच्या वाचनात आले, ऐकण्यात आले, आणि आता सहजच लोक त्यांचे नाव उच्चारतांना स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतात. यालाच म्हणतात गोबेल्स नीति. अमुक जात उच्च आहे आणी तमुक जात नीच आहे, हे सुद्धा शेकडोवेळा लोकांवर बिंबवण्यात आल्यामुळेच लोकांमध्ये भेदाभेद निर्माण झाला. जो आजही जाता जात नाही. याला म्हणतात गोबेल्स नीती. 

sc st obc मराठा लिंगायत सर्व, ब्राम्हण सोडून इतर समाजाला मनुवाद्यांनी गेली दिडशे दोनशे वर्षापासून हिंन्दु म्हणायला सुरूवात केली.  गर्व से कहो तुम हिंन्दु हो...गर्व से कहो तुम हिंन्दु हो. अस मनुवाद्यांनी ह्या सर्व जातींना म्हणायला सुरूवात केली. शेकडोवेळा तेच तेच बिंबवलं गेलं आजही ऐनकेन प्रकारे तेच बिंबवल्या जातय आणि आज लोकं स्वतः म्हणतात  मी कट्टर हिंन्दु आहे. याला म्हणतात गोबेल्स निती. जे सातत्याने बोललं लिहिलं जातं तेच लोकं खरं मानतात. म्हणून मनूवाद्यांनी सर्वात आधी आजही मिडीया अर्थात प्रसिद्धी माध्यमं आपल्या ताब्यात ठेवली आहेत. वर्तमानपत्रे, पुस्तके, वृत्तवाहिन्या, नाटके, सिनेमा यामधून समाजात व्यवस्थित हवं ते पेरलं जात आहे. भारतात ९५ टक्क्याहून अधिक न्युज चॅनल्स आज या भांडवलदारी, मनुवाद्यांच्या ताब्यात आहेत. प्रचार माध्यमाचा काय परिणाम होऊ शकतो हे त्यांना चांगले माहिती आहे. मागील १० वर्षापासून एकमेव रामलल्ला, राम मंदीराबाबत लोकांची मानसिकता तयार करण्यात आली. त्या आधीही ती होती पण त्यातील आक्रमकता या दहा वर्षात अधिक वाढवल्या गेली आणि त्याची परिणिती आज आयोध्येत झाली. 

कार्यक्रम आयोध्येत मात्र मुंबई, नवी मुंबई, ठाणे सारख्या मोठ्या शहरातून रामलल्लाची प्रतिमा असलेले झेंडे आणि गळ्यातील मफलर इतके विकले गेले की, त्यामधून या भांडवलदारांनी कोट्यावधीची कमाई केली. हा बहुतेक सगळा माल गुजरातमधूनच आला होता. राम नामाचा जप करणाऱ्यांना यामधील उद्योजकता दिसूनच आलेली नाही.  प्रसिद्धी माध्यमांना तर दुसरा विषयच नव्हता. जेव्हापासून रामलल्ला प्रतिष्ठापनाची तारीख जाहीर झाली तेव्हापासून ऐन कैन प्रकारे हाच विषय पटलावर होता. यापुढेही कदाचित याचा भरपूर प्रचार प्रसार होईल  येणाऱ्या काळात अनेक ग्रंथही लिहिले जातील. हे ग्रंथ सरकारी तिजोरीतूनच छापले जातील. आणि लोकांच्या माथी मारले जातील. प्रत्येक ग्रंथालयात ही पुस्तके आवर्जून मिळतील.  हळू हळू ही गोष्ट लोकांच्या मनावर कायम स्वरूपी बिंबवली जाईल की हा इव्हेन्ट भारतीय लोकांनी दिवाळीप्रमाणे साजरा केला.  कदाचित पुढे याला दुसरी दिवाळीचं स्वरुप देण्याचा व्यवस्थितपणे प्रयत्न होईल. 

आज इंटरनेटद्वारे संपूर्ण जग जवळ आले आहे. जगातल्या घटना लगेच कळतात. तरीही आम्ही या ग्लोबलतंत्राच्या मानसिकतेतून बाहेर आलेलो नाही. या ग्लोबल तंत्राद्वारेच या मनुवाद्यांनी इथल्या भारतीयांना कायमचे गुलाम केले आहे. या गुलामीतून मुक्त करण्यासाठी अनेक महापुरुषांनी प्रयत्न केले. मात्र त्या त्या महापुरुषांना त्यांच्या जातीपुरते सिमीत करून त्यातून जातीवाद अधिक घट्ट करण्यात आला. आणि महापुरुषांच्या शिकवणुकीला गौण स्थान प्राप्त झाले. आज २१व्या आधूनिक शतकातही हे इतकं सहजपणे घडत आहे. मग आमच्या पुर्वजांच्या काळात तर काय घडले असेल. त्यांना तर ज्ञानार्जनाचाही मज्जाव होता. आज आम्ही शिकूनही तेच करत आहोत. कदाचित पुढील पिढीलाही त्याशिवाय पर्याय नाही. कारण आज शिक्षण व्यवस्था पुर्णपणे निकामी करण्यात मनुवादी यशश्वी झाला आहे. परिक्षेसाठी पैसे भरूनही त्याचा परिणाम मिळत नाही. स्पर्धा परिक्षांचाही बाजार करण्यात आलाय. मागील दाराने आयपीएस, आयएएस न झालेल्यांना अधिकारी पदावर नियुक्त्या दिल्या जात आहेत. आणि इथला बहुजन रामलल्लाच्या मंदीराने मदहोश झालाय. 

त्याला हे देखील माहिती नाही की, याच दिवशी 22 जानेवारी 1947 रोजी संविधानाची प्रस्तावना स्वीकारली गेली. ही प्रस्तावना संविधान व लोकशाहीचा सार असून याद्वारे भारतीय नागरिकांना न्याय, स्वातंत्र्य, समतेने वागण्याची हमी देण्यात आली. मात्र याच दिवशी राम मंदिराचे उदघाटन करण्यात आले. हा ठरवून केलेला कार्यक्रम, यामागे असलेली कुटील निती आता लपून राहिलेली नाही. देशातील विद्यमान सत्ता ही धर्मांध शक्तींच्या हातात असून त्यांना संविधान, लोकशाही मान्य नाही. त्यामुळे ज्या दिवशी संविधानाने ही हमी दिली, त्याच दिवशी रामराज्याची स्थापना करून मनुस्मृतीच्या कायद्यानुसार देश चालविण्याचे दिलेले हे संकेत यामागे आहेत. 70‌ वर्षांपूर्वी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला इशारा आज खरा ठरु लागला आहे. ज्या दिवशी जात आणि धर्माचा आधार घेऊन राजकारण केले जाईल, त्या वेळी पहिल्यांदा लोकशाही धोक्यात येईल आणि त्या नंतर स्वातंत्र्य धोक्यात येईल ! ती वेळ आता दूर नाही. आज प्रजासत्ताक दिन साजरी करीत आहोत. पण येणाऱ्या काळात प्रजेची सत्ता असेल काय? हा प्रश्न प्रत्येक भारतीयांने स्वत:ला विचारायला हवा...




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com