काही वर्षांपूर्वी कवितेच्या माध्यमातून जनजागृतीचा विस्तव ज्वलंत ठेवणारा उठाव साहित्य मंच पुन्हा एकदा त्याच ताकदीने उभा रहात आहे. त्याची सुरुवात मुंबई चेंबूर परिसरातील "विपश्यना" या बुद्धविहारातुन झाली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून साहित्यिक अर्जुन डांगळे उपस्थित होते.
यावेळी अर्जुन डांगळे म्हणाले, सध्याची परिस्थिती लक्षात घेता आंबेडकरी चळवळीमध्ये अस्वस्थता पसरली आहे. आता खऱ्या अर्थाने एका व्यापक मोठ्या सांस्कृतिक लढ्याची नितांत गरज आहे, त्यामुळेच याची सुरुवात मुंबईतून करण्यात आली असून ह्या सांस्कृतिक लढ्याला चळवळीतल्या सर्व सामाजिक संघटना साहित्यिक विचारवंत यांनी पुढाकार घेऊन हा सांस्कृतिक लढ्याचा एल्गार बुलंद करावा,
ते पुढे म्हणाले की आंबेडकरी चळवळीला सध्या सांस्कृतिक लढ्याची गरज वाटू लागली आहे. चळवळीमध्ये ही निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी लवकरच विचारवंत ,अभ्यास, पत्रकार ,साहित्यिक ,कवी आधी चळवळीत काम करणाऱ्या सामाजिक संघटना आणि प्रतिनिधी कार्यकर्ते यांना एकत्रित बोलावून एका बैठकीमध्ये पुढील भूमिका जाहीर केली जाईल. त्यासाठी या सर्व घटकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे, असेही त्यांनी नमूद केले.
उठाव साहित्य मंचाचे अध्यक्ष विवेक मोरे यांनी सांस्कृतिक लढ्याला बळकटी देण्यासाठी हा मंच पूर्वीपासून काम करीत आहे आणि यापुढेही करत राहणार आहे .उठाव साहित्य मंचांच्या वतीने अनेक नवोदित साहित्यिकांना संधी उपलब्ध करून दिले आहे हा उठाव मंच केवळ एका व्यक्तीचा नसून तो चळवळीतल्या प्रत्येक उपेक्षित साहित्यिकांचा आवाज ठरेल, असेही ज्येष्ठ कवी विवेक मोरे म्हणाले. मुंबईतील प्रत्येक आंबेडकरी वस्त्यांमध्ये कविता गीते आदीमार्फत जनजागृती करून आंबेडकरी चळवळीतला आवाज पुढे येण्यास मदत होईल ,असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
यावेळी विद्रोही कवी बबन सरवदे, गझलकार गजानन गावंडे, चंद्रकांत शिंदे, सुदेश जगताप आदी कवींनी आपल्या कविता सादर करून संमेलनाला स्फोटक स्वरूप आणले. अहिराणी कवितेने संमेलनाला एक व्यापकता मिळवून दिली. महाड वरून आलेल्या कवीने आपल्या प्रियसी संदर्भात कविता सादर केली, तिला उत्स्फूर्त दाद मिळाली. ज्येष्ठ कवी खंडूराज अढागळे यांनी सद्यस्थितीवर चळवळीतील जनतेचे दुःख आपल्या कवितेतून सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. ह्या कवी संमेलनाला विरार ,भिवंडी, रत्नागिरी आदी भागातून आलेल्या कवीनी उपेक्षित ,वंचित चळवळीतल्या उपेक्षांवर भर टाकीत कवी संमेलनामध्ये सर्वांची मने जिंकून घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी संदेश कर्डक यांनी उत्तमरीत्या पार पाडले. कवी संमेलनाची सांगता उठावचे संस्थापक दिवंगत कवी बाळ हरी झेंडे यांना श्रद्धांजली वाहून करण्यात आली. अशी माहिती "उठाव"चे कवी आणि पत्रकार महादु पवार यांनी दिली.
0 टिप्पण्या