दलित पँथर आणि शिवसेनेचे जन्माचे हाडवैर. दलित पँथरचा (1972) जन्म झाला तेंव्हा शिवसेना जेमतेम 6 वर्षांची असली तरी तिच्या नावावर विद्यमान आमदार व प्रख्यात कामगार नेता कृष्णा देसाई यांचा निर्घृण खून जमा झाला होता आणि या अल्पशा काळातच राज्यकर्त्या काँग्रेसच्या खुल्या सपोर्टमुळे शिवसेनाने एका गुंड बेभान संप-फोड्या टोळक्याचे स्वरुप धारण केले होते. मराठी माणसाच्या रक्षणासाठी वगैरे-वगैरे वल्गना हवेत विरून गेल्या होत्या. मराठी माणसांसाठी म्हणून शिवसेनेच्या नादी लागलेल्या बर्याच आंबेडकरी तरुणांचा हिरमोड होत चालला होता. शिवसेनेचे प्रखर जातीयवादी व काँग्रेसधार्जिणे भांडवलशाही धोरण त्यांच्या लक्षात यायला लागले होते. याच कालावधीत दलित पँथर जन्माला आली. शिवसेनेतील बरेच आंबेडकरी तरुण शिवसेना सोडून दलित पँथर मध्ये शामिल झाले. कामगार चळवळ मोडीत काढण्यासाठी भांडवलशाही काँग्रेसने निर्माण केलेली शिवसेना..शिवसेनेची जातीयवादी जडणघडण..प्रस्थापित रिपाई नेत्यांची काँग्रेस समोर हुजरेगिरी व शिवसेना सोबत कधी थेट तर कधी आडवाटेने मैत्रीपूर्ण युती..याउपर दलितांवर वाढलेले हिंसाचार, ते रोखण्यास काँग्रेसची उदासिनता, काँग्रेस सोबत रिपाई नेत्यांची लंगट अन या सर्वांच्या विरोधात आंबेडकरी विचारांवर, डाव्या विचारसरणीचा बाज घेवून उभी राहिलेली दलित पँथर. निश्चितच शिवसेना व दलित पँथर यांच्या जडणघडणीतच जीवघेण्या संघर्षाची बीजं पेरलेली होती.
यातूनच घडली ती भीषण वरळी दंगल. निमित्त होते दक्षिण-मध्य मुंबईची पोटनिवडणूक. या निवडणुकीत काँग्रेस तर्फे रामराव आदिक शिवसेनेच्या पाठिंब्यावर उभे होते. रिपाई ने देखिल रामराव आदिकला पाठिंबा दिला होता तर दलित पँथर ची भूमिका जाहीर करण्यासाठी वरळीत जाहीर सभा लावण्यात आली होती. या सभेकडे काँग्रेस, रिपाई, शिवसेना आणि कम्युनिस्ट पक्ष या सर्वांचे लक्ष लागले होते कारण दलित पँथरच्या भूमिकेवर रामराव आदिकचे भवितव्य अवलंबून होते. दलित पँथरच्या काही नेत्यांनी काँग्रेस सोबत परस्पर हात मिळवणी केली होती (पैसे खाल्ले होते). त्यामुळे पँथर या जाहीर सभेत आपल्याला पाठिंबा जाहिर करणार असा कयास काँग्रेसचा होता. काँग्रेसचे बडे नेते या सभेला आवर्जून उपस्थित होते आणि पँथरने निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय जाहिर केला. काँग्रेस व शिवसेनेच्या वर्मी घाव बसला तर रिपाईची गत, 'सांगता येईना अन सहन ही होईना' अशी झाली. सभा संपता-संपता सभेवर शिवसैनिकांनी हल्ला चढविला व सुरू झाली ती भीषण जातीय दंगल. या दंगलीत पोलीस खात्यातील शिवसैनिकांच्या मुलांनी आपल्या पित्याचे गणवेश घालून दंगलीत पुढाकार घेतला. निरपराध दलितांना विनाकारणच टार्गेट केलं गेलं. दंगल व तिला रोखण्यात सरकारने दाखविलेल्या कुचराई विरोधात दलित पँथरने 10 जानेवारी 1974 रोजी मोर्चा आयोजित केला. मुजोर शिवसेनेच्या गुंडांनी या मोर्चावर देखिल हल्ला चढविला. रस्त्यावरून जात असलेल्या मोर्चावर बिल्डिंगच्या टेरेस वरून दगडफेक करण्यात आली. याच दगडफेकीत भागवत जाधव यांचा बळी गेला. शिवसेनेने दलितांचा केलेला हा पहिला खून होय.
भागवत जाधव यांची शहादत वाया जावू द्यायची नाही अशा आणाभाका दलित पँथर च्या नेत्यांनी खाल्ल्या आणि त्याच वर्षी पँथर फुटली. आणाभाका जागच्याजागीच राहिल्या. भागवत जाधवचे कुटुंबीय, 'शहीद भागवत जाधव स्मृति केंद्र' या बॅनर खाली दरवर्षी नित्यनेमाने 10 जानेवारीला 'शहीद दिन' साजरा करतात व विशेष म्हणजे तेव्हढ्याच नित्यनेमाने शिवसेने सोबत गेलेल्या दलाल दलित नेत्यांना ही मानाने कार्यक्रमात आमंत्रित करतात. शिवसेने सोबत गेलेली ही कोडगी दलाल मंडळी शहीद दिनाच्या कार्यक्रमाला हजेरी लावून आपली अक्कल ही पाजळतात अगदी बेशरमपणे. कित्येकवेळा तर या कार्यक्रमाच्या प्रवेशद्वारावर भागवतचा निर्घृण खून करणाऱ्या शिवसेनेत सर्वात आधी प्रवेश घेतलेल्या नामदेव ढसाळची 'भागवता आम्हा माफ कर..तुझ्या खुनाचा बदला आम्ही घेवू शकलो नाही' ही कविता मोठ्या दिमाखात लावली जाते. रामदासचा मोह तर 'शहीद भागवत जाधव स्मृति केंद्र' वाल्यांना एव्हढा आहे की रामदासने, 'जयभीम' म्हणत शिवसेना, भाजपा कुठे-कुठेही जावून शेण खाल्लं तरी, तो जेव्हां नेमका 10 जानेवारीला भागवत जाधवचे घर गाठतो तेव्हां त्याची 'आवभगत' करायला स्मृति केंद्र वाले एका पायावर तत्पर असतात.
यंदा भागवत जाधव यांच्या खुनाला 'पन्नास वर्षे' पूर्ण होत आहेत व प्रमुख उपस्थिती मध्ये शिवसेना सोबत गेल्याने ज्याची 'छावनी हलायला लागली' व भीमशक्ती-शिवशक्ती युती विरोधात बोलणाऱ्यांची थोबाडं रंगवण्याचे आदेश ज्याने दिला, एव्हढंच नव्हे तर सर्व रिपाई गट एकत्र आले असतांना देखिल, मुंबईत आलेल्या अटलबिहारी वाजपेयीला 'चोरी-छिपे' भेटणारा अर्जुन डांगळे तर दुसरा रामदासचे बोट धरत बाळ ठाकरे अन सध्या मोदीची चाकरी करणारा अविनाश कांबळे महातेकर हे दोघे होय... असलेच आणखीन ही अनेक रथी-महारथी येतील हजेरी लावायला. मुद्दा असा आहे जिथे भागवत जाधव यांच्या मारेकऱ्यांसोबत गेलेल्या दलाल दलित नेत्यांना समाजातून हद्दपार करायला हवं होतं तिथे त्या दलालांना 'शहीद दिनात' सन्मान दिला जातोय..त्यांनी आंबेडकरी चळवळीशी केलेल्या गद्दारीचा मान राखला जातोय.. म्हणून सहाजिकच प्रश्न निर्माण होतो की - भागवत जाधवचा खून खरंच शिवसेनेने केलाय का??
पन्नासाव्या 'शहीद दिनाच्या' जोशपूर्ण कार्यक्रमात या प्रश्नाची उकल करण्याचे भान जर ठेवता आले तर पन्नास वर्षानंतर का होईना, भागवताला खरी श्रद्धांजलि वाहता येवू शकते. मात्र, जर उपस्थित जनसमुदायाने हा प्रश्न गांभिर्याने घेतला तर...बाकी स्मृति केंद्र वाले, विद्रोही जलसाकार व वक्त्यांकडून तशी काही अपेक्षा नाही..ते आपल्याला दिलेल्या विषयावर बोलून आपला दरवर्षीप्रमाणे ठरवुन घेतलेला कार्यभार उरकून निघून जातील ..बस्स..!
मिलिंद भवार
पँथर्स
9833830029
08 जानेवारी 2024
0 टिप्पण्या